वयाच्या साठीपर्यंत स्वत:चं दुकान आणि पेपर एजन्सीत सारा दिवस घालवणारा मी, व्यवसायातून निवृत्त होताच सर्वात पहिलं प्रश्नचिन्ह उभं राहिलं ते, आता पुढे काय? कसा जाणार वेळ, काय करणार दिवसभर, वगैरे वगैरे! या सर्व प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे तयार होतं.. ते म्हणजे छंद जोपासणं!

मी नेमकं तेच केलं. दैवी देणगी लाभलेल्या सुंदर हस्ताक्षराचा छंद मला स्वस्थ बसू देई ना. त्यातूनच ‘पोस्टकार्डवर विविध लेखन’ असा आगळावेगळा छंद जोपासताना मिळालेली संधी, झालेलं कौतुक आणि रसिक वाचक-प्रेक्षक यांच्या उत्तेजनाने हस्ताक्षराशी संबंधित वेगवेगळं काम सुरू केलं. पेपरबॅगवर सुलेखन, वाया गेलेल्या सीडींवर लेखन, कचऱ्यात जाणाऱ्या सुंदर लग्नपत्रिकांपासून शुभेच्छापत्रे, बुकमार्कस्, टाकाऊतून टिकाऊ बनवताना ‘अक्षर’ या मूळ पायावर आधारित वस्तू तयार होऊ  लागल्या. सर्वाना त्या आवडू लागल्या आणि मग सतत काही तरी लिहिण्याचं वेडच लागलं. अर्थात हे सारं तयार करून नुसतं घरात न ठेवता प्रदर्शन किंवा महोत्सवात स्टॉल घेऊन त्याची विक्री करणं सुरू झालं. प्रतिसादही छान मिळत होता. तरीही कुठे तरी एक कमतरता जाणवत होती. आपल्या कलेचा समाजाला काही तरी उपयोग व्हावा असं सतत वाटायचं, पण दिशा सापडत नव्हती. अखेर ‘अभिनव युवा शिक्षक संस्थे’च्या सहकार्याने आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या परवानगीने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना माझ्या वस्तूंचे नि हस्ताक्षराच्या नमुन्यांचे प्रदर्शन आणि सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा घ्यायला मिळाली.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने ‘विनामानधन’ हा उपक्रम चालू केला. आजपर्यंत सुमारे २५ शाळा, २५०/३०० शिक्षक आणि २० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ झालाय. प्रदर्शन पाहताना मुलांच्या डोळ्यातला आनंद नि उत्सुकता पाहून भारावून जायला होतं. रोज नवीन शाळा, नवीन वातावरणात स्वत:चं सत्तरीकडे वाटचाल करणारं वयही विसरायला होतं.

जे जे आपणासी ठावे। ते ते दुसऱ्यासी द्यावे।

शहाणे करून सोडावे। सकळजन।।

संत तुकारामांच्या या उक्तीप्रमाणे हा ‘अक्षरयज्ञ’ चालू आहे. अजून खूप काम करायचंय. वृद्धत्वाचा हा आनंदोत्सव साजरा करताना जगण्याचा नवा अर्थ, नवा मार्ग खूप काही शिकवून जातोय आणि या वयातही भरभरून जगताना नवी ऊर्जा मिळतेय.

– विलास समेळ, घणसोली, नवी मुंबई

 

वेळ पुरत नाही ही खंत

मी २००२ मध्ये सेवानिवृत्त झालो, त्या वेळी माझ्या वाचनात अनिल अवचटांचे ‘छंदाविषयी’ हे पुस्तक आले. मनात विचार आला, त्यांनी लिहिलेले बहुतेक छंद आपलेसुद्धा आहेत. मग काय, प्रथम पेंटिंग करायला सुरुवात केली. एक मोठा कॅनव्हासचा रोल आणला. माझ्या मुलीने जे. जे. स्कूलमधून शिक्षण घेतलेले असल्याने तिचे रंग, ब्रश आयतेच मिळाले. माझ्या निवृतीच्या प्रथम वर्षांचा प्रारंभ झाला. गेल्या पंधरा वर्षांत मी साठ-सत्तर मोठी चित्रे रंगवलीत. काही पेंटिंग्ज चक्क विकली गेली. मला निसर्गचित्रे आणि व्यक्तिचित्रे काढायला आवडतात.

दुसरी आवड लेखनाची. कॉलेजात मित्रमंडळी ‘कविराज’ म्हणून चिडवायची, पण कॉलेज संपले आणि तो छंदही बासनात गुंडाळला गेला. आता सेवानिवृत्तीनंतर मी ती पोतडी बाहेर काढली. वाचली. आपल्या गाढवपणावर हसलो. परत नव्याने लिहायला सुरुवात केली. मी चाळीस वर्षे कारखान्यात इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम केले. अनेक प्रसंग, किस्से मला लिहिताना आठवत गेले. त्याकडे थोडेसे विनोदी दृष्टीने पाहताना माझ्या लिखाणात आपोआप वेगळेपण आले. मित्रमंडळींना ते आवडले. पत्नीसुद्धा मी लिहावे म्हणून मागे लागली. त्यामुळे आळस झटकून मी लिहिता झालो. एका ज्येष्ठ साहित्यिकाच्या सांगण्यावरून मी ते प्रसिद्धीला देऊ  लागलो. दिवाळी अंकांत माझ्या कथांना स्थान मिळाले. बोलता बोलता माझी एक कादंबरी आणि एक कथासंग्रहही प्रसिद्ध झाला. केवळ टाइमपास म्हणून चालू केलेल्या लिखाणाने आता उर्वरित आयुष्य व्यापून टाकलं आहे, असं वाटतं.

महाराष्ट्र सेवा संघाच्या न. चिं. केळकर वाचनालयाचा सभासद होण्यामुळे माझ्यामधल्या होऊ घातलेल्या लेखकाला ऊर्जा मिळाली. मी आणि माझ्या पत्नीने वाचलेल्या काही पुस्तकांचे परीक्षण लिहून दिल्यामुळे वाचनालयाचा वाचकवर्ग चांगल्या पुस्तकांकडे आकृष्ट झाला. थोडासा सामाजिक जाणीव ठेवून केलेला प्रयत्न म्हणजे अंध विद्यार्थ्यांचे पेपर लिहून देणे.

मला प्रवासाची आवड होती आणि माझ्या पत्नीला माझ्यापेक्षा जास्तच! त्यामुळे आम्ही भरपूर प्रवास केला. काही मित्रमैत्रिणींसोबत तर काही प्रवास कंपनीसोबत! त्या प्रवासाची तयारी, पैशाची जुळवाजुळव खूप मजा आली. आयुष्यात बरेच काही मिळाल्याचा आनंद. आम्ही जवळपास वीस देश पाहिले! त्या सहलींची प्रवास वर्णने लिहून तयार आहेत. एका प्रवास वर्णनाला बक्षीसही प्राप्त झाले आहे. या प्रवासात खूप मित्र झाले. एकलेपण दूर पळाले. आम्ही वरचेवर भेटतो. विचारपूस होते. हसतो, फिरक्या घेतो. आपली दुखणी, डॉक्टर ‘चेकअप’ हे चालू असतेच. त्यावर हसण्याचा डोस देतो.

आयुष्य मजेत सरकत आहे. नातवंडे उदंड आनंद देत आहेत. त्यांच्याकडून आपल्याला अज्ञात असलेली कॉम्प्युटर आणि मोबाइल टेक्नॉलॉजी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातूनच ऑनलाइन बुद्धिबळ खेळण्याचे वेड लागले आहे. वेळ पुरत नाही ही खंत आहे. आयुष्यात आणखी काय असते? आपण आता थोडे मागे राहून तरुणांना पुढे जाण्यास वाव द्यावा असे वाटते. आयुष्यातला हाच तर न संपणारा समाधानी काल असावा असे मला वाटते.

– प्रकाश गडकरी, मुलुंड (पश्चिम), मुंबई

 

गरज आहे सक्षम वानप्रस्थींची

अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्राच्या शिक्षणानंतर घरच्या लघुउद्योगातच काम करायचे नक्की होते. सुमारे २५ वर्षांत या उद्योगांचा चांगला विस्तार करता आला; या वेळी अनेक बरेवाईट अनुभव मिळाले, अर्थप्राप्तीही पुरेशी झाली. लहानपणापासून एक प्रश्न सतत डोक्यात यायचा- निवृत्तीचे वय ५८ किंवा ६० का? ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या चार आश्रमांत आपले आयुष्य व्यतीत करायचे तर ५० व्या वर्षीच वानप्रस्थी झाले पाहिजे असे मनोमन वाटायचे. ५० व्या वर्षी निवृत्त होऊन वानप्रस्थी जीवन जगायचा पक्का निर्णय मी ४५ व्या वर्षी घेतला आणि उद्योगाचा पसारा हळूहळू कमी करत बंदही केला. वडिलांचा पाठिंबा आणि पत्नीची साथ यामुळे हे सहज शक्य झाले.

या सुमारासच वडिलांनी चिखली येथे वानप्रस्थाश्रम व गुरुकुल पद्धतीच्या शाळेचा एक वर्ग सुरू केला होता. सध्या या प्रकल्पात बालवाडी ते दहावी, मराठी माध्यमात ३०० विद्यार्थी पंचकोश विकसनाधारित शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना गीता- गीताई- मनाचे श्लोक व परिस्थितिज्ञान शिकवण्यासाठी नियमित वेळ देतो. एम फॉर सेवा या संस्थेच्या सहकार्याने येथे वसतिगृहात ५० मुलामुलींची निवासाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. उपेंद्र पाठक यांच्या मदतीने भारतीय वंशाच्या सुमारे ५० गाईंची गोशाळाही येथे सुरू केली आहे. वयाच्या ५० व्या वर्षी गीताई प्रचारासाठी वर्धा ते गागोदे (विनोबांचे जन्मगाव) ते नागपूर अशा ३५०० कि.मी.च्या सायकल यात्रेतही मी सहभागी झालो. प्रबोधिनी पद्धतीने पौरोहित्यही करायला शिकलो. नामकरण ते अंत्येष्टी सर्व विधी भावपूर्ण पद्धतीने करताना समाधान मिळते.

प्रशिक्षण वर्ग, शैक्षणिक सहली, शिबिरे यांसाठी भरपूर प्रवास झाला. पंजाब यात्रेत अनेक गुरुद्वारांत राहून शीख धर्माचा प्रत्यक्ष परिचय करून घेता आला. माजी राष्ट्रपती (डॉ. कलाम) यांना भेटायची संधीही मिळाली. शांतिकुंज- हरिद्वार, पुनरुत्थान विद्यापीठ- अहमदाबाद, प्रबोधिनी संस्कृत गुरुकुल- बंगळूरु यांसारख्या अनेक संस्थांचा परिचय झाला.

महिला सक्षमीकरण व ग्रामविकसनाचे कार्य करणाऱ्या ‘दिशा’ संस्थेने २०११ मध्ये प्रबोधिनीकडे कार्यकर्त्यांची मागणी केली. निगडीजवळचेच काम म्हणून ही जबाबदारी माझ्याकडे आली. देहू रोडच्या अयप्पा टेकडीवर दर आठवडय़ाला कुटुंबीयांसह फिरायला जायचो. तेव्हा लक्षात आले की, ही टेकडी फारच रूक्ष आणि वृक्षहीन होत चालली आहे. मग आम्ही कुटुंबीयांनी लहान प्रमाणात तेथे वृक्षलागवडीचे प्रयोग सुरू केले. सुरुवातीला निगडीहून गाडीतून पाणी नेऊन तिथली झाडे जगवली. पण आमच्या प्रयत्नांतील सातत्य पाहून हळूहळू मदत करणारा एक गट उभा राहिला, टेकडीवर पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था केली. आता हे काम अनेक ठिकाणी व अनेक पटींनी वाढत आहे याचा मनस्वी आनंद होतो..

पाच वर्षांपूर्वी आमच्या घरी वृद्ध, अंथरुणाला खिळलेल्या सासूबाई व सासरे वास्तव्यास आले. त्यांची आजारपणे, शस्त्रक्रिया या वेळी प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी मिळाली. अगदी डायपर बदलणे, जेवण भरवणे इथपासून कॅथेटर घरी बदलण्यापर्यंत सगळी कामे करण्याचा अनुभव आणि आनंद मिळाला. याशिवाय पुण्यातील एका दत्तक आज्जींचीही जबाबदारी सध्या घेतली आहे. त्यांची पेन्शनची व बँकेची कामे, बाजारहाट व औषधोपचार यासाठी नियमित वेळ देतो.

मुक्तपणे जीवन जगायचा आनंद आता ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतरही भरभरून घेत आहे. पूर्वी ‘अर्थ’प्राप्ती खूप होती, पण जीवनाचा ‘अर्थ’ मात्र आता उलगडत आहे! भगवद्गीतेतल्या स्थितप्रज्ञ लक्षणांप्रमाणे जगणाऱ्या अनेक महानुभावांचा सहवास मिळतो व तसे जगायची प्रेरणा मिळते. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच पडत नाही; याउलट उपलब्ध वेळ कसा पुरवायचा हाच प्रश्न रोज समोर असतो!

एक प्रबोधनगीत मला कायम प्रेरणा देते-

बहुत असती जे यशाचे मिरविती माथी तुरे

वैभवाची शीग चढता म्हणती ना केव्हा पुरे

यश सुखाची मीठ मोहर मातृमुखी ओवाळूनी

मुक्त झाले जीवनी या असती का ऐसे कुणी..? या प्रश्नाचे उत्तर ‘मी स्वत:’ असले पाहिजे असे मला मनोमन वाटते आणि हे मी माझ्या जीवनाचे ध्येय समजतो.

आज सामाजिक क्षेत्रात अनुभवी, नि:स्वार्थी व झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फार मोठी गरज आहे. सीएसआरच्या माध्यमातून अनेक दाते चांगल्या संस्थांचा शोध घेत आहेत. गरज आहे सक्षम वानप्रस्थींची! त्यांच्या अनुभवाची शिदोरी व त्यांचा बहुमूल्य वेळच अनेकांची जीवने उजळवू शकेल.

– यशवंत लिमये, पुणे</strong>