05 August 2020

News Flash

शोधिला मार्ग सुखी जीवनाचा

माझा जन्म १९४० चा असून आज वयाच्या ७८ व्या वर्षी मी समाधानी आणि आनंदी जीवनाचा लाभ घेत आहे

माझा जन्म १९४० चा असून आज वयाच्या ७८ व्या वर्षी मी समाधानी आणि आनंदी जीवनाचा लाभ घेत आहे; आणि या पुढील आयुष्यातही मी तसाच लाभ घेणार आहे. वयाच्या १७ व्या वर्षी मी मुंबईत आलो. तेव्हापासून माझ्या वेगळ्या जीवनाची सुरुवात झाली. मुंबईत माझ्या राहाण्याच्या जागेची गैरसोय होती. शिक्षणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एका रात्रशाळेत प्रवेश घेतला होता. माझे वडील गिरणी कामगार होते. त्यांच्या पगाराच्या पैशातून आमचा मुंबईतील खर्च आणि गावाकडील आई, भावंडे यांचा घरखर्च भागविणे कठीण जात होते. तशात माझ्या शाळेच्या खर्चाची भर पडली होती. अशा अवस्थेत मी नोकरी करून पैसे कमविणे गरजेचे होते.

१९५८ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी मी गिरणीत मजूर म्हणून काम करू लागलो. सहा वर्षे गिरणी कामगाराची नोकरी पूर्ण करून पुढे शासकीय कार्यालयात नोकरी पत्करून १९९८ मध्ये सेवानिवृत्त झालो. नोकरी सांभाळता सांभाळता माझे शिक्षण आणि माझ्या जन्मगावाची विकासकामे चाकरमान्यांच्या सोबत पार पाडली. आम्ही किंजवडे गावात हायस्कूल सुरू केल्याने गावातील मुलांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर रात्रशाळा, सकाळचं महाविद्यालय, संध्याकाळचं महाविद्यालय अशा मार्गानी शिक्षण घेत घेत १९७७ मध्ये एम.ए.परीक्षा द्वितीय श्रेणी मिळवून उत्तीर्ण झालो. २०००मध्ये धावपळीच्या संघर्षमय जीवनातून मी बाहेर पडलो. बालपणापासून माझ्या मनात स्थिरावलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण झाल्याने मी खूप समाधानी झालो.

मला लाभलेल्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यामुळे आज सुखी, समाधानी आरोग्यमय असे जीवन जगत आहे. हेच आरोग्य आणि सुख पुढील आयुष्यातही मिळावे याकरिता २००० पासून जाणीवपूर्वक वेगळं आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. मॉर्निग वॉकसाठी दररोज उद्यानात जातो. उगवत्या सूर्याला वंदन करून घरी येतो. घरी आल्यावर योगासने करतो. दुपापर्यंत वृत्तपत्रांचे वाचन करतो. दररोज संध्याकाळी लेखन करतो. लेखनाच्या छंदामुळे माझे कथालेखन, प्रबोधनपर लेख लिहिणे सुरू आहे. २००५ ते २००७ या काळात देवगड तालुक्यातील तळेबाजार विभागाचा वार्ताहर म्हणून मी काम पाहात होतो.

१९७० पासून लिहिलेल्या आणि प्रसिद्ध झालेल्या कथांचा ‘देवदूताचे गाव’ या नावाने संग्रह काढून १ जानेवारी २०१५ रोजी मोठय़ा उत्साहात त्याचा प्रकाशन सोहळा पार पडला. तो दिवस माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय दिवस ठरला आहे.

जीवनातील प्रत्येक दिवस माझे मित्र, आप्त आणि माझे कुटुंबीय यांच्या सहवासात आनंदात जावा याकरिता माझे नेहमी प्रयत्न असतात. गेली सहा-सात वर्षे मी कुरार गाव ज्येष्ठ नागरिक संघ परिवारात एकरूप झालो आहे. सकाळ-संध्याकाळ फिरण्याच्या निमित्ताने दररोज ६०-७० ज्येष्ठ नागरिक स्त्री-पुरुष आम्ही मालाड, पारेखनगरजवळील उद्यानात एकत्र भेटत असतो. त्यावेळी वेगवेगळ्या विषयांवर आमच्या गप्पा, हास्यविनोद होत असतात. वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम, सणावारांचे दिवस आणि प्रत्येकाचा वाढदिवस असे कार्यक्रम एकत्रितपणे पार पाडले जात असतात. इतकेच नव्हे तर एकमेकांच्या वेळप्रसंगी ज्येष्ठ नागरिक मदतीसाठी धावून जात असतात. सर्वाचेच एकमेकांशी जिव्हाळ्याचे नाते जुळले आहे. त्यातून आम्हाला मिळणारा आनंद म्हणजे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असून असाच आनंद सर्वाना मिळावा, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

-हरिश्चंद्र सुर्वे, मुंबई

 

समाजऋण फेडण्याचा प्रयत्न

अधीक्षक अभियंता या पदावरून २००१ डिसेंबरमध्ये मजीप्रा (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) मधून सेवानिवृत्त झालो. जवळजवळ ३५ वर्षे शासकीय सेवा केली. त्यानंतर १० वर्षे तांत्रिक सल्लागार म्हणून निरनिराळ्या संस्था आणि कंपन्या यांच्याकरता काम केले. निवृत्तीनंतर २००३ मध्ये प्रथमच बाबा आमटे यांच्या आनंदवनाला भेट दिली आणि तेव्हापासून आजतागायत वर्षांकाठी किमान एक याप्रमाणे १८ वेळा आनंदवनाला भेट दिली.

पाच वर्षांपूर्वी १० दिवसांसाठी आनंदवनात मुक्काम केला आणि काही तरी मनात ठरू लागलं, त्याप्रमाणे २००३ मध्ये स्वरानंदवनाच्या डोंबिवलीतील पहिल्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या लोकांच्या सहकार्याने ‘आनंदवन मित्र मंडळ’ स्थापन केलं.

या मंडळामार्फत ‘आनंदवन-ओळख’ या नावावर आजपर्यंत ६० सहलींचे आयोजन, नियोजन आणि अर्थसहाय्यसंबंधित काम केले. वापरण्यायोग्य कपडय़ांचे संकलन करून शेकडो गोण्या आनंदवनात पाठवल्या. काही लाखांची औषधेही संकलन करून पाठविली. प्रत्यक्ष आणि अपरोक्ष अशा स्वरूपात आर्थिक मदत केली. ‘आनंदवन-ओळख’ या नावाने ‘ना नफा ना तोटा’ या नावावर महाराष्ट्रातील लोकांना आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ या तीन मुख्य प्रकल्पांची ओळख करवली. हा समाजहित साधणारा प्रयोग आजही चालू आहे.  एकंदर ६० सहली, त्यापैकी पहिल्या ४० सहलींच्या वेळी प्रत्येक सहप्रवाशांकडून (संस्थेसाठी) आनंदवनासाठी देणगी घेतली जात असे. प्रत्येक सहलीमागे दीड ते दोन लाख अशी देणगी जमा होत असे. गेली १० -१२ वर्षे निरनिराळ्या प्रदर्शनात आनंदवनातील वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल मिळवून त्यांच्या विक्रीसाठी मदत तसेच त्या ठिकाणी बाबांच्या विचाराचा प्रचार करणे सुरू आहे. समाजऋण फेडणे हा या कार्यामागील उद्देश तर आहेच, पण त्यातून माझ्या निवृत्तीनंतरचा काळ कारणी लागतो आहे, हे महत्त्वाचे.

 -गोविंद दत्तात्रय जोशी, डोंबिवली (पूर्व)

 

आनंदाची शिदोरी

‘भरभरून जगताना’ हे शब्द वाचले आणि गेले काही वर्ष शिकवताना ‘खळखळून हसताना’, ‘धडपडून उठताना,’ ‘कडाडून भांडताना’ अशा जोडय़ा जुळवणारे शब्द आठवू लागले, जे मुलांना शिकवताना दरवर्षी भेटायचे. गेल्या सहा वर्षांपासून मी त्या शब्दांशी फारकत घेतली. आणि आज अचानक त्यांनी माझ्याभोवती फेर धरल्यासारखे वाटले.

मुलांची शिक्षणं संपून त्यांनी स्वत:च्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आणि मी पोकळी निर्माण होण्यापूर्वीच माझा आवडता ‘शिकवण्याचा’ व्यवसाय सुरू केला. खरंच अनुभवाने सांगते, मन तरुण ठेवण्यासाठी तरुणाईबरोबर राहा आणि त्याही मागे जाऊन मूलपण अनुभवण्यासाठी मुलांमध्ये मिसळा. मी दोन्ही केले. दहावीपर्यंतचे क्लास खूप वर्षे घेतले. कुठल्या पानावर काय आहे, हे सांगता येण्यापर्यंत त्यात बुडून गेले. पण नंतर नापास न करण्याच्या धोरणामुळे लक्षात आले की ‘दगडही दहावी पास होऊ शकतो.’ आठवीच्या मुलांना चौथीचेही ज्ञान नसते. हळूहळू शिकवण्यातला रस कमी होऊ लागला. अखेरीस क्लास बंद करण्याचे ठरवले.

पण ‘मूळ स्वभाव जाईना’सारखी अवस्था झाली आणि पाच वर्षे पुन्हा दहावीच्या झोपडपट्टीतल्या मुलींना शिकवण्याचा अनुभव घेतला. त्या मुलींनी इतके छान यश मिळवले की त्यांनी पुढे शिकावे एवढीच माझी फी होती, ती मला पुरेपूर मिळाली. पुन्हा एकदा हे चक्र भेदून आता या क्षेत्रापासून दूर जायचे ठरवले. हे समाजकार्य भारावून टाकणारे असते.

जाहीर केलेली शेवटची बॅच संपण्यापूर्वीच आमच्या गावातील सर्वात जुनी ‘पंचाहत्तर’ वर्षे पूर्ण केलेली शाळा बेवारस झाल्यासारखी झाली होती. आम्ही काही जणांनी त्या शाळेचे पुनरुज्जीवन करण्याचा वसा घेतला. मी तर ठरवले ज्या क्षेत्रात आपण अर्थार्जनाबरोबर मानसन्मान मिळवला त्याच क्षेत्राकरता तो खर्च करू. पदरमोड झाली तरी कुठेच मावणार नाही इतका आनंद देणाऱ्या या क्षेत्रात मी पुन्हा नव्या उमेदीने भिरभिरू लागले. अगदी गोरगरीब समाजातली मुले आमच्या शाळेत आहेत. नर्सरी ते सातवी. अनुदानित पहिली ते चौथीचे शिक्षक चाळीस हजारच्यावर पगार घेतात आणि शेजारच्याच वर्गात विनाअनुदानित यत्तांचे शिक्षक चार हजारपेक्षाही कमी पैसे घेऊन शिकवतात. तेही आमच्यासारखेच या क्षेत्रातले ‘क्रेझी’, काही ‘गरजू’! पण शिकवतात मनापासून. त्याचा आनंद आम्हाला खूप आहे. गरजेनुसार शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचा अनुभव आमचे आयुष्य अधिकच समृद्ध आणि आनंदी करतो. आमची ‘अभिनव बाल विद्यालय’ मला भरभरून जगायला हुरूप देते.

वयाप्रमाणे थोडी शारीरिक क्षमता कमी पडू लागल्याचे जाणवू लागले होते तोवर एक जादूई अ‍ॅप हातात आले. आमच्या १९६८ च्या वर्गमित्राने त्यावेळच्या मुला-मुलींशी संपर्क करून व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनवला, चार दिशांना ४० चा पट विखुरला होता. आज त्यातील ३० जण या ग्रुपवर आले आणि भरभरून जगण्याच्या आमच्या समस्त वर्ग मित्र-मैत्रिणींना कित्येक वर्षे मागे नेले, आमचे ‘मिरज हायस्कूल’ धन्य झाले.

गेली तीन वर्षे वर्षांतून एकदा आम्ही एकत्र जमतो. बरेच जण या ना त्या सामाजिक कार्याशी बांधील असल्याने आपल्या क्षेत्रापासून दूर येऊन फक्त शाळकरी मूल होऊन त्यातील आठवणीत रमतो. त्या आनंदाच्या शिदोरीवर पुन्हा ताजेतवाने होऊन नातवंडात रमण्यासाठी आणि घेतला वसा जपण्यासाठी आपापल्या घरी परततो. ‘आजीचा मित्र’ किंवा ‘आजोबांची मैत्रीण’ या नव्या संकल्पनेची आमची नातवंडे मजा घेतात.

आता आणखी काय हवे? हे भरभरून जगणे शेवटपर्यंत साथ देईल ही खात्री आहे. त्यातूनच प्रत्येक दिवस उत्साहात जातो आणि असेच काही लिहिण्याची ऊर्जा देत असतो.

– वैशाली खरे, मिरज, जि. सांगली

 

साठी असते सर्व समाधानासाठी

पकडून ठेवता येत नाही हातात

पण भरभरून साठवता येते मनात

ते काय असते? तर आपलेच आयुष्य!

कर्तव्याची पूर्तता करता करता निवृत्तीचे वय कधी आले ते समजलेच नाही. घरासाठी, मुलांच्या लग्नासाठी आणि इतर काही कारणांसाठी हप्ते फेडता फेडता साठी उंबरठय़ात आली अन् एकदाच वळून पाहिले पाठी, तर हा भला मोठा नागमोडी उंचसखल जीवनपट दिसला! कोण नव्हते त्यात! माता-पित्यांपासून बंधू-भगिनी-नातेवाईक-तऱ्हेवाईक. सुखद आणि दु:खदही घटना! बापरे! हे सगळे आपणच जगलो? मनाने प्रश्न केला आणि होय तर! असे उत्तर अंतर्मनाने दिले सुद्धा!

आता सर्वासाठी जगून झालंय, चला स्वत:साठी जगू या. या विचाराशी अनेकदा संवाद साधल्यावर निर्णय पक्का झाला. म्हटलेच आहे की ‘अ वुमन बीकम स्वीटी अ‍ॅट दि एज ऑफ सिक्स्टी’. आज साठी पार करून पाच वर्षे उलटली. पण कशी! ते वर्णन करावं तेव्हढं थोडंच. साठीच्या आधीच पौरोहित्य शिकण्यास सुरु वात केली होती. भांडुप पूर्वेचा ग्रुप चांगला मूळ धरून होता. रुद्र, सत्यनारायण पूजा याबरोबरच ‘वात्सल्य’सारख्या मुलांच्या संस्थेला भेटी सुरू झाल्या, कीर्तने शिकले आणि त्याचे अनेक मंदिरांपासून जाहीर कार्यक्रम केले. हाती आलेला पैसा सामाजिक संस्थांना दान केला. ‘इद न मम’ म्हणून. मुलगा-सून घर आणि आम्हाला सांभाळतात मग जास्त मोह नको.

कॉन्व्हेंटमधील शिक्षिकेची नोकरी यथास्थित पार पडली पण ‘संस्कृत’ विषयाची हौस राहून गेली. मग भांडुप मधील काही मैत्रिणींना ‘गीता’ वाचन विवेचनासकट सांगण्याचा उपक्रम केला. गीता पठणानंतर दासबोध – हरिविजय या ग्रंथांचेही सामूहिक वाचन केले. आता काही भगिनींना ‘सत्यनारायण पूजा’ शिकवत आहे. मैत्रिणींच्या समूहाबरोबर संपूर्ण भारत भ्रमण झाले. काही वेळा कुटुंबीयांबरोबरही प्रवास झाला. अनेक परदेश पाहून डोळे आणि मन तृप्त झाले. जेष्ठ नागरिक संघात विविध उपक्रमात भाग घेणे. उपक्रम बसविणे असे जीवन जगत आहे. छोटय़ा नातीचा पूर्णवेळ सांभाळ आणि सुनेला करियरसाठी पूर्ण मोकळीक ही जणू एक स्वेच्छेने स्वीकारलेली जबाबदारी मानली आहे. त्यात तडजोड नाही. पूर्वायुष्यात राहून गेलेल्या दोन गोष्टी शिकत आहे. एक पोहणे दुसरे संवादिनी वादन!

‘स्वान्तसुखाय’ जगताना, आता उरलो उपकारापुरता, हा विचारही डोके वर काढतो. दिवसाचा काही वेळ किंवा आठवडय़ातून किमान दोन दिवस समाजासाठी काही करावे असे वाटते. भांडुपमधील शैक्षणिक किंवा सामाजिक संस्थांनी संपर्क साधल्यास वेळेचा सदुपयोग करून मनाला समाधान वाटेल असे कार्य करण्याचा मानस आहे. संस्कृत शिकवणे ही तर आनंदाची पर्वणीच! मराठी – हिंदी पण शिकवता येईल अर्थात् अल्प मोबदला घेऊन.

साठी बुद्धी नाठी म्हणण्यापेक्षा साठी असते सर्व समाधानासाठी असे म्हणणे योग्य वाटते. अजून शरीर निरोगी आहे. मन उत्साही आहे म्हणून म्हणते द्या साद मिळेल प्रतिसाद. धन्यवाद!

-मीना वि. खानझोडे, भांडुप

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 12:18 am

Web Title: senior citizens share stories of life experiences with loksatta chaturanga part 5
Next Stories
1 वाचनातून मनाचा अभ्यास
2 बडी आणि लंबी जिंदगीचा अनुभव
3 वाचकांचे अभिप्राय हीच ऊर्जा
Just Now!
X