News Flash

त्याला कसलेच भय नाही..

निवृत्तीनंतरच्या आयुष्यात या दोन्ही गोष्टी टाळायच्या हे मी ठरवले आहे.

- श्रीकांत काळे, पुणे

साठीनंतर निवृत्त झाल्यामुळे वेळ असतो. आयुष्याच्या प्रयोजनाचे पूर्वी कामाच्या आवरणाखाली दाबून टाकलेले प्रश्न फणा काढून आपल्यासमोर उभे राहतात आणि त्यांची मनाला पटतील अशी उत्तरे न सापडल्यामुळे असमाधानी वृत्ती वाढीस लागत असावी. दुसरे कारण माझ्या मते आपल्या वृत्तीशी निगडित असते. ती वृत्ती म्हणजे आयुष्याचा अर्थ नेहमी पूर्वानुभवाच्या चष्म्यातूनच जाणून घेण्याची सवय. आपल्या भोवतालचे संदर्भ आता बदललेले आहेत हे लक्षात न घेता आपण आपली मते पुढच्या पिढीवर लादण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याच माणसात आपण एक विसंवादी स्वर बनून जगत राहातो. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात या दोन्ही गोष्टी टाळायच्या हे मी ठरवले आहे.

काय करायचे नाही ते ठरले, पण काय करायचे ते ठरणे जास्त महत्त्वाचे. ते ठरवताना लक्षात आले की माझे म्हणून जे काम आहे ते जीव ओतून व्यवस्थित करणे हा माझा स्वभाव आहे. मात्र साठीपर्यंतच्या वाटचालीत वेळेअभावी बऱ्याच गोष्टी मनासारख्या करायच्या राहून जात होत्या. त्या करण्यात मी आता पूर्ण बुडालो आहे. माझी व कुटुंबाची सर्व माहिती तसेच घरातील सर्व काही व्यवस्थित लावणे हे माझे एक उद्दिष्ट झाले आहे. सर्व माहितीमध्ये अक्षरश: सर्व काही आले.. फोन, ई मेल, पत्ते, माझ्याकडे असलेली पुस्तके, सीडी, फोटो, वर्तमानपत्रांची कात्रणे वगैरेपासून ते माझ्या सर्व आर्थिक व्यवहारांविषयी माहिती तसेच माझे व माझ्या पत्नीचे इच्छापत्र करणे इथपर्यंत सगळे काही. हे करत असताना ‘जुने जाऊ द्या मरणालागी, जाळून किंवा पुरून टाका’ हे धोरण ठेवले आहे. जे संदर्भहीन झाले आहे त्याचा त्याग करून सुटसुटीत जगणे हे सूत्र.

माझ्या स्वप्नातील अभ्यासिका आणि प्रशस्त बाग उभी केली. बागकामाचे छोटे प्रशिक्षण घेऊन आता माळ्याबरोबर मीही बागेत काम करतो. वयोमानाप्रमाणे दोन शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागल्या. त्या काळात स्वत:चा ब्लॉग कसा तयार करावा हे शिकून घेतले. मात्र लिखाणात सातत्य पाहिजे वगैरे बंधन स्वत:वर लादून घेतलेले नाही. कारण मी लेखक नसून हे सगळे स्व- सुखासाठी करतो याची मला जाणीव आहे. वाचन तर चालूच असते; मात्र आता निवडक वाचतो.. जे मनापासून वाटते ते करण्याचे स्वातंत्र्य मिळवणे आणि ते उत्साहाने करणे म्हणजेच भरभरून.

साठीनंतरची निवृत्ती म्हणजे निष्क्रियता वा शेवट नव्हे. वय वाढते पण म्हातारपण येऊ द्यायचे की नाही हे आपणच ठरवायचे आहे. साठी म्हणजे आयुष्याकडे नव्याने सजगतेने बघण्याची एक संधी. नवीन स्वप्ने पाहाण्याची, अपुरी राहिलेली स्वप्ने पुरी करण्याची एक संधी. काहीतरी महत्त्वाकांक्षा.. मग ती कितीही छोटी का असेना.. ती फलद्रूप करण्यासाठी प्रयत्न करण्याची ही वेळ. ‘इट्स नेव्हर टू लेट’ हे लक्षात ठेवून काहीतरी नवीन स्वप्ने पाहाण्याची ही वेळ. अनेक जण खूप उशीरा आयुष्य सुरु करतात. दुसरी इंनिंग मस्त एन्जॉय करतात, हे वाचले की म्हातारपण कुठच्या कुठे पळून जाते. साठीनंतरचे आयुष्य आणि वेळ हा फक्त आपला स्वत:चा आहे. त्यावर आता फक्त स्वत:चाच अधिकार असला पाहिजे. त्याचे काय करायचे हे ठरवण्याचा अधिकारही फक्त आपला स्वत:चाच आहे. स्वत:साठी जगा. स्वत:च्या आनंदासाठी जगा. स्वप्ने बघा; स्वत:ला क्रियाशील ठेवा. असे जगले तर म्हातारपणाची व त्यातल्या असमाधानाची भीती कशाला? कविवर्य बा. भ. बोरकरांनी म्हटलेच आहे..

तुला कसे कळत नाही?

फुलत्या वेलीस वय नाही

क्षितिज ज्याचे थांबले नाही,

त्याला कसलेच भय नाही,

त्याला कसलाच क्षय नाही.

– श्रीकांत काळे, पुणे

‘‘आनंदी राहीन व इतरांनाही ठेवेन’’

मी स्वत: ७५ वर्षे वयाची आहे. व्यवसायाने डॉक्टर आहे. वयाच्या एक्काहत्तरीपर्यंत व्यवसाय केला. आता त्यातून निवृत्त झाले आहे. ज्यावेळी वयाची ६२-६५ वर्षे पूर्ण केली, तसेच संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या त्यावेळी मनात सारखे विचार येत होते मला माझे पुढील आयुष्य किती आहे माहीत नाही. मग हे माझे पुढील आयुष्य आनंदाने जगायला हवे. तर हे कसे शक्य आहे?

हल्ली जागोजागी मोठमोठय़ा सोसायटय़ांमधून ज्येष्ठ नागरिक संघटना प्रस्थापित झाल्या आहेत. या संस्था ज्येष्ठांना वेळ जाण्याकरिता अतिशय उपयुक्त ठरत आहेत. या संघटनांमधील दोन-तीन तास समवयस्क मंडळींत छान जातात. आपले पण दोन-तीन तास असेच छान जातील हा विचार मनात ठेऊन मी दोन संघटनांत नाव नोंदवले. मी डॉक्टर असल्यामुळे पनवेलच्या संघटनेत आरोग्य समितीचे काम करते. तेथे पंधरा दिवसांनी येणाऱ्या बुधवारी मी रक्तदाब तपासते. तेथील सदस्यांना कॅल्शियम आणि बी-कॉम्लेक्सच्या गोळ्या देते. दर वर्षांला ३-४ मेडिकल चेकअप कॅम्प घेतो. त्यात शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही तपासणी करण्यात येते. या सगळ्या कामात मी माझ्याही शारीरिक आणि मानसिक तक्रारी विसरून जाते. या सर्व कारणाने माझ्या सहकाऱ्यांशी विचारांची देवाण-घेवाण करता येते.

माझ्या बंगल्याच्या चारी बाजूंनी व्यवस्थित मोकळी जागा आहे. गेली ३०-३५ वर्षे मी बागेत निदान एक तास तरी घालवते. बागेत जास्वंदी, गुलाब, शमी, बेल, चाफा, मोगरा याबरोबरच आंबा, केळी, पपई, लिंबू, पेरू आदी झाडे डौलाने उभी आहेत. हे निसर्ग सौंदर्य बहरताना बघताना आपल्या कष्टाचे चिज झाले असे वाटते. दिवसाची सकाळ १ ते दीड तास नैसर्गिक वातावरणात गेल्यावर पूर्ण दिवस छान जातो.

संगणक शिकावा असे फार दिवस वाटत होते. त्याकरिता पाच वर्षांपूर्वी एन.आय.आय.टी.ची पहिली परीक्षा ७५ टक्के गुण मिळवून पास झाले.

परंतु संगणकाचे सखोल ज्ञान घेण्यासाठी मी माझ्या नातवाच्या वयाच्या शुभम याच्याकडे शिकवणी सुरू केली. तोही खूप आनंदाने मला सगळे शिकवतो. म्हातारपणी तुमचे डोळे चांगले शाबूत असतील तर लॅपटॉपसारखा दुसरा चांगला मित्र नाही. नको कोणाची निंदा, नको नालस्ती. हवी ती माहिती घ्या आणि वाचा. तसेच आमचा २५-३० मैत्रिणींचा वाचन ग्रुप आहे. त्याचे नाव ‘स्वानंद कट्टा’. महिन्यातून ३ वेळा आम्ही जमतो. त्यात निरनिराळ्या लेखकांची पुस्तकं वाचतो. एकजण मोठय़ाने वाचते, बाकी सगळ्या ऐकतो. या सगळ्या उपक्रमांच्या औषधांनी जरी आयुष्यमर्यादा वाढली तरी ते आयुष्य कंटाळवाणे जाणार नाही. मी तर आनंदी राहीनच व इतरांना पण ठेवेन, त्यामुळे आयुष्य कंटा़ळवाणं होणार नाही.

– डॉ. अपर्णा वाळिंबे, खालापूर, जि. रायगड

या जन्मावर.. या जगण्यावर..

व याची साठ वर्षे होताच मी निवृत्त झालो, ते २००७ मध्ये. तेव्हा माझ्या भोवतीच्या नात्यांनीच माझ्या जीवनाची पुढची दिशा ठरवली. १९९६ मध्ये स्टेट बँकेच्या कल्याण शाखेमध्ये वैयक्तिक बँकिंग विभागाचा व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना एक व्यक्ती मुदत ठेवीचे सर्टििफकेट घेऊन आली. खरी ठेवीदार व्यक्ती एका वृद्धाश्रमात असून ती आजारी होती. प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी एका शनिवारी मी प्रत्यक्ष अंधेरी येथील ‘होली फॅमिली’ वृद्धाश्रमात गेलो. गेटमधून आत शिरताना प्रथम नजर गेली ती तिथल्या बाकांवर बसलेल्या काका मंडळींवर. माझ्याशी हस्तांदोलन करण्यासाठी प्रत्येक हात पुढे येत होता व सोबत ‘गुड इव्हिनिंग’चे मिठ्ठास शब्द कानी येत होते. तिथल्या अधिकाऱ्याने त्या गोड शब्दांचे कारण सांगितले, त्या सर्व वृद्धांना हवा असतो मायेचा स्पर्श!

त्या प्रसंगानंतर जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा मी मुद्दाम या वृद्धाश्रमाला भेट देतो. ती फक्त या नव्या नात्यातून मिळालेल्या आत्मिर्क सुखासाठी. जिथे नि:स्वार्थी मने असतात तिथे फुलणारी प्रेमाची रोपटी जगविण्यासाठी व त्यांच्या बरोबर आपणही भरभरून जगण्यासाठी. हाच तो क्षण, खऱ्याखुऱ्या नात्यांची झालेली विकलांग अवस्था पाहून मी मनाशी ठरवले की निवृत्तीनंतर एकाकी असलेल्या निराधार व्यक्तींना किंवा इच्छा असूनही आपल्या माणसासाठी वेळ न देऊ शकणाऱ्या कुटुंबांना शक्य होईल तेवढा आपला वेळ द्यायचा. निवृत्त झालो आणि बँकेतील माझ्या एका सहकारी बाईंचा फोन आला. तिचे आजारी वडील सांताक्रूझ येथील हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांच्याजवळ दिवसभर कुणीतरी जाऊन बसण्याची गरज होती. मी लगेच तयार झालो व सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत तिथे जाऊन बसू लागलो. एक महिना हॉस्पिटल व ५ महिने कालिना येथील त्यांच्या घरी असे मुलुंड ते सांताक्रूझ प्रवास लीलया करून त्यांना सोबत दिली. त्यांच्याबरोबर मीसुद्धा मनाने सशक्त होत गेलो.

का कुणास ठाऊक, निवृत्तीनंतर जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसतसे बिकट परिस्थितीत अडकलेल्या माझे नातेवाईक व मित्रपरिवारांना माझ्या सहवासाची गरज भासू लागली. त्यांच्याकडे पाहून उजाडलेला दिवस अखेरचा समजून भरभरून जीवन जगण्याची उमेद आली. पुढे तर नात्यामध्ये किंवा शेजारी आजारी व्यक्तीचा सुगावा लागताच नकळत त्या दिशेने माझी पावले मदतीसाठी वळू लागली. एकाकी वृद्धांना भेटण्याच्या आसक्तीमधून माझे व माझ्या पत्नीचे वाढदिवस वृद्धाश्रमात जाऊन साजरे करण्याची कल्पना मनात आली. त्यांच्याशी बसून गप्पा मारताना वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटते. जीवन-मृत्यू आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत, पण आयुष्याचे सोने करणे आपल्या हाती आहे. वयाची सत्तरी ओलांडलेल्या माझ्यासारख्याला आयुष्य अर्थपूर्ण वाटते त्याचे श्रेय भवतालच्या जगाला आहे. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या मंगेश पाडगावकरांच्या ओळी आळवून मी इतकेच म्हणेन, मिळालेले हे सुंदर जीवन आपण सर्वानी मिळून भरभरून जगूया.

-सूर्यकांत भोसले, मुलुंड (पूर्व)

दुसऱ्यासाठी जगणे हेच खरे

डिसेंबरला वयाची बहात्तरी पूर्ण केली. अंतर्मुख होऊन जीवनाचा इतिहास आठवू लागले. बालपण व तारुण्य खूप सुखात गेले. आज उतारवयातदेखील सुख, सौभाग्य, लक्ष्मी हात जोडून पुढे उभी आहे. तीन मुले, तिन्ही सुना, तीन मुली आणि १२ नातवंडे असा माझा परिवार! सर्व माझ्याशी प्रेम व आदराने वागतात. मीदेखील माझ्या परीने त्यांना प्रेम देते. स्वर्गसुख म्हणजे दुसरे काय असते? जीवन सुखी व समृद्ध असणे म्हणजेच स्वर्गसुख होय. २००१ मध्ये सर्वात लहान मुलाचे लग्न झाले, डिसेंबर २००३ मध्ये नोकरीतून निवृत्त झाले. सर्व जबाबदाऱ्या संपल्याची जाणीव झाली. लहानपणापासून मित्रमैत्रिणींना भेटण्याची आवड होती ती आता पूर्ण करावी असे ठरवले आणि तसेच वागत आहे.

पहाटे साडेपाचला माझा दिवस सुरू होतो. दोघीतिघी मिळून योग करतो, ८ वाजता स्नान करून सुनेला थोडीफार मदत करून मी घराबाहेर पडते. आजारी असणाऱ्यांना भेटते, जे वयामुळे बाहेर पडू शकत नाहीत त्यांच्याशी घरी जाऊन गप्पा मारते. काही घरात सासू-सासरे, सुनांचे जमत नाही त्यांचे ऐकून घेते, कधी त्यांना समजावून सांगते, त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करते. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या वागण्यात बदल झालेत, संसार सावरले. बऱ्याच मैत्रिणींना एकेकटे बाजारात, बँकेत जाता येत नाही त्यांना सोबत करते. कुणालाही उपयोगी पडण्यासाठी, काही काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही. गरज पडल्यास आर्थिक मदतही करते.

तीन मुले एकाच शहरात पण वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मी सध्या छोटय़ा मुलाकडे राहते. सकाळी त्या सुनेला स्वयंपाकात मदत करते. मोठी सून डॉक्टर तिला कधी ८ वाजता बाहेर पडावे लागते त्यावेळी मी तिकडे जाऊन थांबते व मोलकरणीकडून कामे करून घेते. कधी मधल्या मुलाकडे जाऊन त्यांना मदत करते. एकूण काय, मी माझ्या जीवनात ज्याला गरज आहे त्याला वेळ देते. त्यांच्या संसारात ढवळाढवळ करत नाही. विचारले तरच सल्ला देते. बाहेरगावी जायलाही तयार असते. मोठय़ा नातवाच्या कानपूरला प्रवेशासाठी मीच सोबत गेले होते. मुलीच्या मुलाला दिल्लीला परीक्षेसाठी नेले. नातवांसोबत कोटय़ाला ४ वर्षे राहिले. छोटय़ा नातवंडांना चित्रपटाला घेऊन जाते. वाचन हा माझा आवडता छंद बालपणापासून आहे. त्यामध्ये भरपूर वेळ जातो. एकूण काय एक चौरस दगड कुठेही फिट होतो. दुसऱ्यासाठी जगणे हेच खरे जगणे असे मला वाटते व मी तेच आचरणात आणते आहे.

– गंगाबाई पतंगे, नांदेड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2018 4:15 am

Web Title: successful life after retirement activities after retirement happy retirement
Next Stories
1 अनेक मैल जायचे आहे..
2 चोवीस तासही कमीच
3 आरोग्याची गुरुकिल्ली
Just Now!
X