11 December 2018

News Flash

दि. १० ते १६ नोव्हेंबर २०१७

तुमची रास अग्नी रास आहे.

daily horoscope

मेष – तुमची रास अग्नी रास आहे.  प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने पार पाडायला पाहिजे असा हट्ट न धरता इतरांच्या कलेने वागण्याचे धोरण ठेवा. व्यापार-उद्योगात एखादी नवीन योजना राबवण्याकरता प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग कराल. नवीन करारमदार होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये पूर्वी आश्वासन दिलेली एखादी सुविधा वरिष्ठ तुम्हाला देण्याची शक्यता आहे. सहकारी  उपयोगी पडतील. घरामध्ये शुभ समारंभ ठरेल.

वृषभ – प्रकृतीसंबंधी काही तक्रारी निर्माण झाल्या असतील तर त्यावर मार्ग मिळाल्यामुळे तुम्हाला उत्साह येईल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात स्वप्न आणि सत्य यामध्ये फरक असतो हे लक्षात ठेवा. ज्या गोष्टीविषयी तुम्हाला माहिती आहे तेच काम वाढविण्याचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादे काम पूर्ण होईपर्यंत तुमची स्तुती करतील आणि नंतर तुम्हाला विसरून जातील; पण केलेल्या कामाचा तुम्हाला कुठे ना कुठे तरी उपयोग होईल हे लक्षात ठेवा. घरामध्ये प्रत्येक जण स्वत:चा स्वार्थ साधेल. तुम्हाला मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल.

मिथुन – आपण एखादी इच्छा मनात धरावी आणि त्याला अनुसरून चांगल्या घटना घडाव्यात असे फार थोडय़ा वेळेला होते; पण या आठवडय़ात असा अनुभव येण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात कामातील प्रगती वाढविण्याकरिता सध्याच्या पद्धतीत फेरफार करण्याचा प्रयोग कराल. ज्यांनी पूर्वी नकारघंटा ऐकवली होती त्यांच्याकडून मित्रत्वाची भाषा ऐकू येईल. नोकरीमध्ये थोडेसे काम करून जास्त श्रेय मिळेल. घरामध्ये सर्वाना आनंदित करणारी एखादी बातमी कळेल.

कर्क – एखादे शुभकार्य बराच काळ लांबत आले असेल तर त्याला आता मुहूर्त लाभेल. व्यापार-उद्योगात नेहमीचे काम जरी चालू असले तरी तुम्हाला एक प्रकारची सुस्ती जाणवेल. नोकरीमध्ये प्रत्यक्ष काम कमी, पण कामाचा दिखावा जास्त असेल. महत्त्वाची कामे सप्ताहाच्या मध्यापर्यंत उरका. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नातेवाईकांची हजेरी लागण्याची शक्यता आहे. तुमचे मन तुम्ही मोकळे केल्यानंतर तुम्हाला खूप बरे वाटेल.

सिंह – योग्य काय आणि अयोग्य काय याचा जास्त विचार न करता तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागाल. त्यामुळे तुम्हाला  एक प्रकारचे आंतरिक समाधान लाभेल. व्यापार-उद्योगात नवीन तंत्रज्ञान उपयोगात आणाल. कामाच्या निमित्ताने एखाद्या नवीन व्यक्तींशी परिचय होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याकरिता न आवडणाऱ्या कामात लक्ष घालणे भाग पडेल. घरामध्ये सर्वाना आवडणारा एखादा कार्यक्रम ठरेल.

कन्या – तुम्ही जास्त बोलत नाही. या आठवडय़ामध्ये तुमच्यातील कलात्मकतेला भरपूर वाव मिळेल.  व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी विशेष सवलत वरिष्ठांनी दिल्यामुळे तुम्हाला केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल. बदली हवी असेल तर प्रयत्न करा. घरामध्ये नातेवाईकांकडून एखादी भेटवस्तू मिळेल. तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही घराचे सौंदर्य वाढवाल. नवीन वास्तू किंवा वाहन खरेदी करायचे असेल तर त्यासंबंधी आवश्यक ती तजवीज करून ठेवाल.

तूळ – जे काम तुम्ही कराल त्यातून आपले वेगळेपण सिद्ध कराल. अनेक दिवस जे स्वप्न तुम्ही उराशी बाळगले होते ते पूर्ण होईल. व्यापार-उद्योगात तुमच्या क्षेत्रामध्ये एखादा नवीन उच्चांक प्रस्थापित कराल. कारखानदार एखादे नवीन उत्पादन बाजारात आणतील. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामात जणू काही बुद्धिबळाचा डाव असेल. हे काम तुम्ही नवीन पद्धतीने मार्गी लावून दाखवाल. घरामध्ये पूर्वी ठरलेले एखादे कार्य पार पडल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असेल.

वृश्चिक – ज्या ग्रहांनी तुमच्याविरुद्ध बंड पुकारले होते ते ग्रह आता तुम्हाला साथ द्यायला तयार होतील. त्याचा फायदा उठवा. व्यापार-उद्योगात  बराच काळ अडकून पडलेले काम मार्गी लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ केलेल्या कामाची दखल घेतील. तुम्ही केलेले काम त्यांना आवडल्यामुळे तुमच्यावर त्यांची भिस्त असेल. आवडणारा कार्यक्रम ठरेल. तुम्ही छान खरेदी करण्याच्या मूडमध्ये असाल. दीर्घकाळानंतर लांबचे नातेवाईक भेटण्याचा योग येईल.

धनू – ग्रहमान बदलले की सर्व काही बदलते. ज्या व्यक्तींनी पूर्वी तुम्हाला विरोध केला होता त्या व्यक्ती आता सहकार्य करतील. या संधीचा फायदा घेऊन अवघड कामे मार्गी लावाल.  व्यापार-धंदा-नोकरीमध्ये जादा काम करून जादा पसे मिळविण्याची संधी असेल तर ती तुम्ही सोडणार नाही. नवीन नोकरीच्या कामामध्ये आळस करू नका, कारण एखादी चांगली संधी मिळेल. घरामध्ये एखादा सर्वाना आवडणारा कार्यक्रम ठरेल.

मकर – आपण एखादी गोष्ट मनात आणावी आणि त्याला अनुसरून चांगल्या घटना घडाव्या असे फार थोडय़ा वेळेला होते; पण या आठवडय़ात असे काही घडले तर आश्चर्यात पडू नका. व्यापार-उद्योगात काही जुनी प्रकरणे मार्गी लागतील. देशात किंवा परदेशात विस्तार करण्याची कल्पना आकार घेऊ लागतील. त्यासंबंधी निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या. नोकरीमध्ये इतरांना न दिली जाणारी सवलत तुम्हाला मिळेल. घरामध्ये एखादे शुभकार्य ठरेल किंवा पार पडेल. काही जुने वादविवाद असतील तर ते संपवायला चांगला आठवडा आहे.

कुंभ – प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक स्वप्न असते. ते पूर्ण करण्याकरिता त्याची धडपड असते. असे एखादे स्वप्न तुम्ही उराशी बाळगलेले असेल तर ते आता पूर्ण होऊ शकेल. व्यापार-उद्योगात नवीन आणि मोठय़ा व्यक्तींशी ओळखी होतील. तुम्हाला तुमच्या कामाचा पसारा वाढवावासा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याला भरपूर वाव मिळेल.  घरामध्ये पूर्वी कोणाला काही आश्वासन दिले असेल, तर तुम्ही पूर्ण कराल. एखादा शुभ समारंभ ठरेल.

मीन – ‘अडला नारायण गाढवाचे पाय धरी’ अशी तुमची स्थिती असेल. काही गोष्टी मिळविण्यासाठी सभोवतालच्या व्यक्तींशी जुळवून घ्यावे लागेल. व्यापार-उद्योगात एखाद्या मध्यस्थाचा उपयोग करून तुम्ही तुमची कामे कराल. नोकरीमध्ये मदतीच्या वेळेला वरिष्ठांना तुमची आठवण येईल. नंतर तुम्हाला ते विसरून जातील. तसेच उपयोग करून घेण्याचा मोह होईल. घरामध्ये एखादे कार्य ठरण्यापूर्वी त्यावर बरीच उलटसुलट चर्चा होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on November 10, 2017 1:01 am

Web Title: astrology 10 to 16 november 2017