सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ हे धोरण आपल्या फायद्याचे ठरेल. एखाद्या कटू प्रसंगाचा साकल्याने विचार करून मगच त्यावर आपले मत मांडावे. मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठींचे योग संभवतात. गुलाबी थंडीचा आनंद घेताना श्वसन आणि त्वचा यांसंबंधीच्या आजारांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. दशमातील रवी-केतू युती योगामुळे हाती आलेली संधी निसटून जाईल, पण कौटुंबिक वातावरणात तणाव येऊ देऊ नका.

वृषभ जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याच्या दृष्टिकोनामुळे नव्या जोमाने कामाला लागाल. अष्टमातील बुध-शनी युती आणि तृतीयातील राहूमुळे कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या घालाव्या लागतील. परंतु यातूनही मार्ग निघेल. नोकरी-व्यवसाय आणि घर यांचा समतोल साधाल. जोडीदाराच्या साथीमुळे मनाला समाधान लाभेल. घरासंबंधीचे प्रश्न मार्गी लागतील. घरातील ज्येष्ठ मंडळींचा पाठिंबा मिळेल. प्रवास योग येतील. उत्साह वाढेल.

मिथुन एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये आपण लक्ष देण्याचा प्रयत्न कराल, त्यापेक्षा मोजक्याच गोष्टी सुरू करा आणि निर्धाराने पूर्णत्वाला न्या. काही बाबतीत आपला जोडीदार त्याची नाखुशी व्यक्त करेल. अशा वेळी त्याचे म्हणणे आधी पूर्णपणे ऐकून घ्या आणि मगच ‘काय आणि कसे करावे’ याचा निर्णय घ्या. नोकरी-व्यवसायात अपेक्षित बातमी मिळण्याची शक्यता दिसते. अनावश्यक खर्च टाळणे हेच हिताचे ठरेल. तिळगुळाचा गोडवा वाणीतही आला तर नातेसंबंध सुधारतील.

कर्क पंचमातील गुरू-शुक्र आणि भाग्यातील मंगळ या ग्रहयोगामुळे आपल्याला मानसिक पाठबळ मिळेल. नव्या विचारांना गती मिळेल. हाती घेतलेले काम अर्धवट सोडू नका. जिद्दीने पूर्णत्वास न्या. आपले म्हणणे किंवा वागणे सुरुवातीला आपल्या जोडीदाराला पटणार नाही. अशा वेळी थोडे नमते घेऊन त्याला ते स्पष्ट करून, उलगडून सांगाव. विश्वासात घ्याव. नोकरी-व्यवसायात आपले मत मांडू शकाल असे ग्रहमान लवकरच येईल. संधीची वाट पाहा.

सिंह कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राखाल. आपल्या विशेष कामगिरीमुळे व्यवसायात लाभ होईल. नवीन करार सुरुवातीला फारसे लाभदायक नसले तरी पुढील भविष्यात ते नक्कीच उपयोगी ठरतील आणि वैयक्तिक पातळीवरही फायदेशीर ठरतील. कामाच्या ताणामुळे पित्त होण्याची शक्यता आणि थंडीच्या दिवसात सांधे आखडण्याची शक्यता दिसून येते. कोणतेही लहान-मोठे दुखणे अंगावर काढू नका.

कन्या मंगळ-शुक्राचा स्थानात्मक नवपंचमयोग नवी उमेद देईल. कौटुंबिक मतभेद पेल्यातील वादळाप्रमाणे शांत होतील. नोकरी-व्यवसायातील आपली मते ठामपणे मांडाल. छोटे-मोठे सुखकर आणि आनंददायी प्रवास कराल. भावंडांसह लहानपणीच्या आठवणींत रमून जाल. लहानपणीच्या मित्र-मैत्रिणी भेटण्याचाही योग आहे. घरासंबंधीच्या  प्रश्नांवर लवकरच मार्ग शोधण्याचा प्रयत्न कराल. आवडत्या छंदासाठी वेळ दिल्यामुळे मानसिक समाधान मिळेल.

तूळ वाणीत गुळाचा गोडवा आणि वागणुकीत तिळाची स्निग्धता असल्याने आपला सहवास सर्वाना हवाहवासा वाटेल. नातेवाईकांना आपलेसे कराल. कौटुंबिक समारंभात आपल्या कलागुणांनी विशेष चमकाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. हितशत्रूंवर मात कराल. लहानमोठय़ा पेचप्रसंगांत आत्मविश्वास ढळू न देता शांतचित्ताने विचारपूर्वक निर्णय घ्याल.

वृश्चिक आपल्या राशीतील गुरू आणि शुक्र हाती घेतलेली कार्ये पूर्णत्वाला नेण्यास मदत करतील. सत्याची कास सोडू नका. मित्रमंडळींच्या कायद्याच्या व्यवहारापासून दूर राहणे हिताचे ठरेल. कौटुंबिक वातावरण थोडे तणावाचे राहील. पण जोडीदाराच्या समर्थ साथीमुळे कौटुंबिक प्रश्न सोडवण्यास मदत होईल. ‘एक घाव दोन तुकडे’ हा पवित्रा थोडा बाजूलाच ठेवावा लागेल. नोकरी-व्यवसायातही अनेक प्रसंग मोठय़ा शिताफीने हाताळाल.

धनू मकर संक्रांतीचे रवीचे मकर राशीतील भ्रमण नोकरी-व्यवसायात आणि आर्थिक स्थितीत चढउतार देईल. कुटुंबात सर्वानीच एकमेकांचे म्हणणे ऐकून घ्यावे. कौटुंबिक समस्या चर्चेने सोडवाव्या लागतील. ‘मनात आले आणि करून टाकले’ असे वागून चालणार नाही. तर आपल्या वागण्या-बोलण्याचे काय परिणाम होतील याचाही विचार करावा लागेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक. वैद्यकीय सल्ला घेणे आणि तो पाळणे महत्त्वाचे ठरेल.

मकर आपल्या चांगल्या गुणांमुळे नोकरी-व्यवसायातील नव्या जबाबदाऱ्यांचा ताण मनावर आणि शरीरावर येऊ देऊ नका. प्रयत्नान्ती परमेश्वर या न्यायाने आपण सर्व कामे चोख पार पाडाल. त्यातूनच आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक वातावरणात चढउतार राहतील. जोडीदाराच्या मानसिकतेचा पूर्ण विचार करून मगच नवा विषय मांडा. रवीच्या मकर संक्रमणामुळे मन विचलित होईल. पण गुरू-शुक्राच्या साथीमुळे एकंदरीत आठवडा आनंदी जाईल.

कुंभ कौटुंबिक वातावरण आनंदाचे आणि उत्साहाचे राहील. मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. नेहमीच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सुखद क्षणांचा आनंद अनुभवाल. नोकरी-व्यवसायात ‘एकमेका साहाय्य करू’ असे वातावरण राहील. नवे करार जपून  करा. कायद्याच्या भाषेत अडकणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. व्ययातील रवी-केतू जोडीदारासाठी विशेष खर्च करायला लावेल.

मीन भाग्यातील गुरू-शुक्राचा मंगळासह झालेला नवपंचम योग साहाय्यकारी ठरेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांनी जरी काही प्रश्न उपस्थित केले तरी आपण त्याची समर्पक उत्तरे देऊ शकाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मित्रमंडळींना त्यांच्या अडचणी समजून घेऊन मगच मदतीचा हात पुढे करा. व्यवहारी राहावेच लागेल. वेळात वेळ काढून आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवा.