सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष गुरू-रविच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. उत्साहाने एकापाठोपाठ एक कामे पूर्ण कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्ग सहकार्यास तत्पर असतील. आपणही सहकारी वर्गाला या ना त्या प्रकारे मदत कराल. जोडीदाराशी विचारविनिमय करून मोठे निर्णय घ्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कुटुंबातील सदस्यांचा उत्साह वाढवणे आपल्या हाती असेल. आरोग्य चांगले राहील.

वृषभ शुक्र-शनिच्या लाभ योगामुळे अनावश्यक खर्चावर आळा बसेल. व्यवहारी दृष्टिकोनातून विचार कराल. आर्थिक प्रगती संथ पण दीर्घकाळासाठी असेल. नोकरी-व्यवसायात यशाचा एक टप्पा सर कराल. सहकारी वर्ग, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांची मदत मिळेल. आपल्या प्रगतीत कुटुंबातील सदस्यांचाही वाटा असेल. घरात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. जोडीदाराशी चांगले सूर जुळतील. शरीरातील पाण्याचे संतुलन राखा.

मिथुन चंद्र-बुधाच्या समसप्तम योगामुळे आपल्या बुद्धिकौशल्याला  वाव मिळेल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आपली बाजू, आपले मुद्दे प्रभावीपणे मांडाल. वरिष्ठांची मर्जी राखाल. तसेच सहकारी वर्गाकडून साहाय्य मिळेल. आपले काम वेळेत पूर्ण कराल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आप्तेष्टांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जोडीदार मोलाचे साहाय्य करेल. घराबाहेरील अन्न-पाणी ग्रहण करताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क गुरू-शुक्राच्या केंद्रयोगामुळे काही गोष्टींसाठी आवश्यक असलेल्या चिकाटीचा अभाव जाणवेल. अध्र्या हळकुंडाने पिवळे न होता अंगी सातत्य जोपासावे लागेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. सहकारी वर्ग आपल्या भल्यासाठी चार गोष्टी सांगतील. जोडीदार आणि आपल्या मतांमध्ये काही मुद्दय़ांवर मोठी तफावत जाणवेल. सध्यातरी त्याबाबत दुर्लक्ष करणे इष्ट! कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष नको!

सिंह रवि-गुरूचा नवपंचम योग आपल्या दिलदार वृत्तीला पोषक ठरेल. गरजूंना मदतीचा हात द्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सहकारी वर्ग संपूर्ण तयारीनिशी आपली कामे वेळेत पूर्ण करून देईल. जोडीदाराच्या बौद्धिक गुणवत्तेची प्रशंसा कराल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. ध्यानीमनी नसताना एखादी लाभदायक घटना घडेल. नियमित व्यायाम आणि योग्य वेळी वैद्यकीय सल्ला हीच निरोगीपणाची गुरू-किल्ली समजावी.

कन्या शुक्र-गुरूचा केंद्र योग चंचलवृत्तीला खतपाणी देईल. कामाच्या सातत्यात अडचणी आणेल. तरी ‘हाती घेतलेली कामे पूर्ण केल्याशिवाय मागे हटणे नाही’ असा निर्धार करणे आवश्यक आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्या क्षुल्लक चुकाही निदर्शनास आणून देतील. सहकारी वर्ग म्हणावे तसे साहाय्य करणार नाही. डगमगून न जाता नव्या जोमाने कामाला लागा. जोडीदाराची साथ मिळेल.

तूळ शुक्र-प्लुटोच्या लाभ योगामुळे आपल्यातील कलागुणांना वाव मिळेल. कलात्मक आणि गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनातून लाभ मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्या मतांचा मान राखतील. सहकारी वर्गाच्या प्रश्नांवर उपाय शोधाल. कौटुंबिक वातावरण एकंदरीत चांगले असले तरी जोडीदाराची नाखुशी आपल्या ध्यानात येईल. वादाचे रूपांतर सुसंवाद करण्याचा प्रयत्न कराल. टाचा वा पावलं दुखणे तसेच शीर दबल्यामुळे होणारे त्रास उद्भवतील.

वृश्चिक रवि-प्लुटोच्या केंद्रयोगामुळे नोकरी-व्यवसयात वरिष्ठांबरोबर असलेल्या मतभेदाला वाचा फुटेल. सरकारी कामे लांबणीवर पडतील. सहकारी वर्गाकडून सध्यातरी विशेष साहाय्याची अपेक्षा ठेवू नये. जोडीदार आपली अवस्था चांगल्या प्रकारे समजून घेईल. भावनिक आधार देईल. वैचारिक सल्लादेखील देईल. अति विचार न करता कुटुंबातील आनंदी वातावरणात मन रमवा. कामाच्या ताणतणावामुळे पित्त प्रकृती उफाळून येईल. यावर नियंत्रण आवश्यक!

धनू गुरू-रविच्या नवपंचम योगामुळे सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. हाती घेतलेल्या उपक्रमांना गती मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्या कामात शंका-कुशंका काढतील. अशावेळी अविचाराने न बोलता अभ्यासपूर्वक आपले मुद्दे मांडाल. सहकारी वर्ग आपली चांगली साथ देईल. जोडीदार स्वत:चे म्हणणे खरे करेल. आत्ता तरी शब्दाने शब्द न वाढवणे उत्तम! कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. आरोग्य बरे राहील.

मकर शनि-शुक्राच्या लाभ योगामुळे कष्टाचे चीज होईल. कामाचा उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून अपेक्षित साहाय्य मिळेल. सहकारी वर्ग मदतीसाठी धावून येतील. मित्र, आप्तेष्ट, शेजारीपाजारी यांचे सहकार्य लाभेल. ओळखीतून कामे पुढे सरकतील. जोडीदाराला आपला आधार फारच महत्त्वाचा आणि गरजेचा वाटेल. कौटुंबिक वातावरण उत्साही आणि आनंदी राहील. डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.

कुंभ शुक्र-प्लुटोच्या लाभ योगामुळे संबंधित स्त्री वर्गाकडून विशेष मदत मिळेल. आनंदाची वार्ता समजेल. आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कल्पकतेच्या जोरावर नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारी वर्गात एखादी व्यक्ती नाखुशी दर्शवेल. त्याकडे फारसे लक्ष न देता ‘आपला मार्ग भला’ हा पवित्रा स्वीकारावा. जोडीदार त्याच्या क्षेत्रात आपली चमक दाखवेल. आरोग्याच्या बारीकसारीक तक्रारींवर वेळीस उपाय योजावेत.

मीन रवि-प्लुटोच्या केंद्र योगामुळे महत्त्वाच्या कामात अडचणी निर्माण होतील. कामं लांबणीवर पडतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तसेच सहकारी वर्ग ऐन वेळेवर मदत करायला तयार होईल. कामानिमित्त प्रवास योग संभवतो. जोडीदार एखादा निर्णय घेण्यासाठी आपल्यावर अवलंबून राहील. कौटुंबिक वातावरण बरे राहील. डोकेदुखी आणि पित्ताच्या तक्रारी यांवर औषधोपचार घेणे आवश्यक!