सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष मंगळ-प्लूटो नवपंचम योगामुळे संघर्ष करून यश मिळवाल. प्रगतिपथावर वाटचाल कराल. मित्र-मैत्रिणीची साथसोबत मिळेल. नोकरी-व्यवसायात कामे अपेक्षित वेगाने पुढे सरकली नाही तरी धीर सोडू नका. सहकारी वर्गाच्या समस्या समजून घ्याल. जोडीदाराच्या मदतीने पेचप्रसंग सोडवाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मानसिक संतुलन ढळू देऊ नका.

वृषभ शुक्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे भावनांचा कोंडमारा होण्याची संभावना आहे. एखाद्या गोष्टीबाबत थोडक्यात समाधान मानावे लागेल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. नोकरी-व्यवसायात अधिक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील. सहकारीवर्गाच्या साहाय्याने त्या पार पाडण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. आरोग्य चांगले राहील. सामाजिक कार्यात रस घ्याल.

मिथुन बुध-रवीच्या युतीयोगामुळे बौद्धिक छंद जोपासाल. यातून थोडे अर्थार्जन होऊ शकते. नव्या गोष्टी शिकण्याची तयारी दाखवाल. तशा संधीही उपलब्ध होतील. दोघा-तिघांचे वेगवेगळे सल्ले ऐकून संभ्रमात पडाल. परिस्थितीचा अभ्यासपूर्वक विचार करून मगच स्वत:चा निर्णय पक्का कराल. जोडीदाराला आपली मते पटणार नाहीत. त्याला त्याचा स्वतंत्र विचार करू द्या. कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

कर्क गुरू-बुधाच्या केंद्रयोगामुळे कोणतेही लिखित करार, व्यवहार करताना काळजीपूर्वक करावे लागतील. एकांगी विचार न करता सर्वसमावेशक धोरण स्वीकारावे लागेल. वरिष्ठ त्यांच्या अधिकारपदाचा दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. डगमगून न जाता सगळे बळ एकवटून धिटाईने परिस्थितीला सामोरे जाल. जोडीदाराची खंबीर साथ लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

सिंह शनी-बुधाच्या लाभयोगामुळे जोडीदाराच्या विचारी वृत्तीशी सहमत होऊन योग्य निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. सहकारी वर्गाची मदत मिळेल. अचानक प्रवासाचे योग येतील. आरोग्याच्या बारीकसारीक तक्रारी डोके वर काढतील. कुटुंबातील सदस्यांच्या समस्या साकल्याने विचारविनिमय करून सोडवाल. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. यातूनच काही लाभकारक घटना घडतील.

कन्या गुरू-शुक्राच्या लाभयोगामुळे आपल्या नावलौकिकात भर पडेल. गुरूची विद्या आणि शुक्राची कला यांचा सुंदर मिलाफ होईल. नोकरी-व्यवसायात याचा सादरीकरणासाठी चांगला फायदा होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. सहकारी वर्ग थोडीफार अडवणूक करेल. जोडीदाराचे म्हणणे मान्य करावे लागेल. कौटुंबिक वातावरण उत्साही व आनंदी ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल.

तूळ शुक्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे अनावश्यक खर्चावर आळा घालावा लागेल. जोडीदार नव्या मागण्या आपल्यापुढे मांडेल. सामंजस्याने त्याला परिस्थितीचा अंदाज द्याल. नोकरी-व्यवसायात एखादवेळी रागाचा पारा चढण्याची शक्यता दिसते. परंतु गुरूच्या दृष्टीमुळे रागावर नियंत्रण ठेवाल. मित्र-मैत्रिणींच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीगाठींचे बेत रद्द करावे लागतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. स्नायू आखडल्यास दुर्लक्ष नको!

वृश्चिक मंगळ-बुधाच्या लाभयोगामुळे बुद्धिचातुर्याने संघर्ष जिंकाल. समयसूचकता आणि मार्मिक बोलणे यामुळे संमेलने गाजवाल. आपला मुद्दा वरिष्ठांना प्रभावीपणे समजावून द्याल. सहकारीवर्ग आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही. जोडीदार आपल्यातील गुणांची कदर करेल. त्याच्या भावना आपण समजून घ्याल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. पित्तविकार कमी होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतील.

धनू शनी-बुधाच्या लाभयोगामुळे व्यवहारी दृष्टिकोनातून परिस्थितीचा विचार कराल. ‘मनात आलं करून टाकलं’ असे धोरण न ठेवता शांतपणे विचार करून निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात पडती बाजू स्वीकारावी लागेल. सहकारीवर्गाकडून मदतीची अपेक्षा न ठेवणे उत्तम! जोडीदारासह आप्तेष्टांच्या मंगलकार्यात सामील व्हाल. कुटुंबासाठी काही तडजोडी कराव्या लागतील. छोटे प्रवास कराल.

मकर गुरू-शुक्राच्या लाभयोगामुळे प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. मित्रमंडळी, आप्तेष्ट यांच्या ओळखीतून लाभ होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या म्हणण्याप्रमाणे वागून काम पूर्ण कराल. सहकारीवर्गाची विशेष साथ लाभेल. कौटुंबिक वातावरण प्रयत्नपूर्वक शांत ठेवावे लागेल. जोडीदाराच्या भक्कम आधाराची जाण ठेवाल. घशाचे विकार त्रास देतील. वेळच्या वेळी वैद्यकीय तपासण्या करून घ्याल.

कुंभ बुध-मंगळाच्या लाभयोगामुळे मूळचा स्वभाव तसा नसूनही स्पष्टवक्तेपणा अंगीकाराल. नाखुशी व्यक्त कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांपुढे आपले म्हणणे प्रभावीपणे मांडाल. या धाडसी कृतीचा सहकारीवर्गालाही लाभ होईल. जोडीदाराच्या सर्वच मतांशी आपण सहमत नसलात तरी त्याला त्याचे विचारस्वातंत्र्य देऊन आनंदी सहजीवन उपभोगाल. कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहील.

मीन मंगळ-प्लूटोच्या लाभयोगामुळे कार्यपूर्तीचा आनंद घ्याल. विलंबित कार्यामध्ये जातीने लक्ष घालून धडाडीने पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या मार्गावर आगेकूच कराल. जोडीदाराच्या अडचणी समजून घ्याल. त्यावर मार्ग शोधाल. अतिविचारांमुळे डोकेदुखीचा त्रास संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंद ठेवाल.