मेष

मंगळ-हर्षलाच्या लाभ योगामुळे मंगळाच्या शक्तीला हर्षलाच्या प्रचंड चेतनेची जोड मिळल्यामुळे हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास न्याल. नोकरी-व्यवसायात रेंगाळणारी कामे मार्गी लावाल. वरिष्ठांकडून मदत मिळेल. तसेच सहकारीवर्गही हाकेला धावून येईल. जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कामाचा ताण घेऊ नका. शारीरिक स्वास्थ्यापेक्षाही मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या.

वृषभ

हाती घेतलेली कामे आपल्या मनाप्रमाणेच पूर्ण होतील अशी अपेक्षा ठेवू नका. अन्यथा जिवास अधिक त्रास होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मते बदलतील. याचा आपल्या कामावरही परिणाम दिसून येईल. सहकारीवर्गाचा चांगला पाठिंबा मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एकमेकांचा आधार बनाल. जोडीदाराच्या अडीअडचणीच्या वेळी खंबीरपणे उभे राहाल. दगदग वाढेल. स्वत:चे आरोग्य, नेहमीची औषधे यांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.

मिथुन

बुध-गुरूच्या षडाष्टक योगामुळे एखाद्या गोष्टीबाबत ठाम निर्णय घेता येणार नाही. काही करार, कागदपत्रे यांच्यातील त्रुटींमुळे कामे लांबणीवर पडतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या म्हणण्याप्रमाणे वागणेच हिताचे ठरेल. सहकारी वर्गाकडून मोठय़ा साहाय्याची अपेक्षा नको. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात जास्त व्यस्त राहील. गैरसमज करून न घेता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करणे इष्ट!

कर्क

चंद्र-गुरूच्या युतीमुळे सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी व्हाल. यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा संपादन कराल. नोकरी-व्यवसायात डोक्यात राग घालून कोणताही निर्णय घेऊ नका. वरिष्ठांशी नमते घ्या. सहकारीवर्गाची चांगली मदत होईल. जोडीदाराचा मूळ स्वभाव जाणून घेऊन त्यानुसार आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी लागेल. त्याला जी मदत लागेल ती आपण आनंदाने कराल. साथीच्या रोगांपासून सावधान राहा. उष्णतेपासून स्वत:चे संरक्षण करा.

सिंह

मंगळ-हर्षलाच्या लाभयोगामुळे हाती घेतलेली कामगिरी निश्चयाने पूर्ण कराल. उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात आपल्या कामाची छाप पाडाल. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. सहकारीवर्गाच्या उपयोगी पडाल. समाजकार्यात हिरिरीने पुढाकार घ्याल. जोडीदारासह लहान-मोठय़ा प्रवासाचा आनंद मिळवाल.   आरोग्य ठीक राहील. पडणे, झडणे, ठेचाळणे यामुळे थोडीफार दुखापत होण्याच्या शक्यता आहेत. वेळच्या वेळी उपचार करा.

कन्या

अत्यावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊन त्या हातावेगळ्या कराल. प्रवासातील नव्या ओळखींचा फायदा होईल. नोकरी-व्यवसायात वेळेचे भान ठेवणे आवश्यक राहील. मित्र परिवार, नातेवाईक यांच्यासह आनंद मिळवाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. आपले विचार घरातील प्रत्येक सदस्यांना पटतील असे नाही. उष्णतेच्या विकारांपासून सावधान!

तूळ

शुक्र-हर्षल युतीमुळे भावनिक चढउतारांना सामोरे जावे लागेल. भावनेच्या भरात एखादा निर्णय घेऊन तो आचरणात आणू नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांनी सोपवलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाल. यासाठी सहकारीवर्गाची मदत घ्यावी लागेल. जोडीदारासह वैचारिक मतभेद होतील. यावर थोडे दिवस ऊहापोह न करता तूर्तास त्या गोष्टी बाजूला ठेवणे इष्ट कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. उष्णतेचा डोळ्यांना त्रास होईल.

वृश्चिक

गुरू-चंद्राच्या युतीमुळे हाती घेतलेल्या कामांना गती प्राप्त होईल. समाजकार्यात सहभागी व्हाल. यश, प्रतिष्ठा मिळेल. नोकरी-व्यवसायात नवे करार, बोलणी यशस्वी होतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. सहकारीवर्गाकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आपणही त्यांना हवी ती मदत कराल. जोडीदाराचे काही मुद्दे आपल्याला पटणार नाहीत, परंतु तरीही ते मान्य करून पुढील पावले उचलावी लागतील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील.

धनू

गुरू-बुधाच्या षडाष्टक योगामुळे डोक्यात विचारचक्र सुरू राहील. अंतिम निर्णयाप्रत जाता येणार नाही. नोकरी-व्यवसायात पेचप्रसंगांना सामोरे जावे लागेल. शांत डोक्यात विवेकबुद्धी वापरून विचार करावा. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सहकारीवर्ग मदत करेल. जोडीदार आपले तात्त्विक मतभेद व्यक्त करेल. तूर्तास तरी आपले मुद्दे समजवायला जाऊ नका. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. श्वसन, घसा आणि उत्सर्जन यांसंबंधी विशेष काळजी घ्या.

मकर

मंगळ-हर्षलाच्या लाभयोगामुळे पडलेल्या कष्टाची तयारी दाखवाल. नव्या जबाबदाऱ्या उत्साहाने स्वीकारून पार पाडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मन जिंकाल. आपल्या कामाची छाप पाडाल. सहकारीवर्ग सर्वार्थाने मदत करतील. नातेवाईक, मित्रमंडळी यांचा सहवास लाभेल. जोडीदाराला त्याच्या आवडीनिवडी जोपासण्याची संधी द्याल. एकमेकांचे सूर चांगले जुळतील. प्रदूषित हवेत फुप्फुसांचे आरोग्य सांभाळा. उष्णतेपासून स्वत:चे संरक्षण करा.

कुंभ

बुध-प्लूटोच्या नवपंचम योगामुळे आपल्या बुद्धिमत्तेचे उत्तम प्रकारे सादरीकरण कराल. याचा अनेक गरजूंना लाभ होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. सहकारीवर्ग आपल्या अपेक्षेस उतरणार नाही. त्यांच्याकडून त्यांच्या कलाने कामे करून घ्यावी लागतील. जोडीदार आपल्या गुणांचे कौतुक करेल. आपणही त्याच्यातील धडाडीला, कर्तबगारीला वाव द्याल. आरोग्य ठीक राहील. कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल.

मीन

भाग्यस्थानातील चंद्र-गुरू युतीमुळे धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मानसिक समाधान मिळेल. लहान-मोठे प्रवास यशस्वी होतील. नोकरी-व्यवसायात मनाविरुद्ध घटना घडतील. वरिष्ठ आणि सहकारीवर्गाला याबद्दल आधीच सूचित कराल. संस्थेचे हित कशात आहे हे संबंधित व्यक्तींच्या निदर्शनास आणून द्याल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण धावपळीचे असेल.