सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष बुध-हर्षलच्या केंद्रयोगामुळे वृत्तीत लहरीपणा आणि स्वतंत्रपणा दिसून येईल. परंतु याचा आपल्या कामकाजावर परिणाम होऊ न देणे इष्ट राहील. दुसऱ्याची एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध असल्यास आपली नापसंती सौम्य शब्दात व्यक्त करावी लागेल. कौटुंबिक वातावरणात थोडे चढ-उतार राहतील. अंगच्या कलांना आणि जुन्या छंदांना थोडा वेळ द्यावा असा विचार नक्की कराल. कोणतेही आर्थिक व्यवहार जागरुकतेने करावे लागतील.

वृषभ सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घ्याल. जनजागृतीचे कार्य हातून घडण्याचे योग आहेत. शुक्र नेपच्युनच्या केंद्र योगामुळे साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटवाल. परंतु कल्पनाविश्वात वाहत जाऊ नका. वर्तमानाचे भान ठेवणे आवश्यक राहील. भावनांच्या बरोबरीने व्यवहारालाही महत्त्व दिलेत तर अनेक प्रकारचे फायदे पदरी पडतील. नोकरी व्यवसायात आणि घरातूनही चांगले पाठबळ मिळेल. कुटुंबासाठी अनपेक्षित खर्च उभे राहतील.

मिथुन सप्तमातील बुध-प्लुटो या ग्रहांची युती आपल्यातील नेतृत्व कलेला पुष्टी देईल. समविचारी लोकांचे आपण नेतृत्व कराल. नोकरी-व्यवसायातही वरिष्ठांपुढे आपले म्हणणे प्रभावीपणे मांडाल. सहकाऱ्यांनाही फायदा होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारून त्या उत्तम प्रकारे पार पाडाल. आपल्या ओळखींमुळे  अनेक कामे मार्गी लागतील. लहान-मोठय़ा अडीअडचणींनी डगमगून न जाता हिमतीने पुढे जाण्याचे बळ मित्रांकडूनही मिळेल.

कर्क रवि-हर्षलाच्या केंद्रयोगामुळे नोकरी-व्यवसायात काही नाविन्यपूर्ण योजना किंवा नव्या कल्पना मांडाल. वरिष्ठ या गोष्टीचा नक्की विचार करतील. कौटुंबिक पातळीवरही नातेवाईक-आप्तेष्टांच्या स्नेहसंमेलनात आपले नवे विचार, नव्या कल्पना स्वागतार्ह ठरतील. या कल्पना साकारण्यासाठी जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामाच्या आणि उत्साहाच्या भरात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. धार्मिक वृत्तीमुळे हातून दानधर्म घडेल.

सिंह ‘आपल्या ताकदीवर, आपल्या हिमतीवर विश्वास असावा. अभिमान असावा पण गर्व नसावा.’ हे लक्षात असू द्या. नेतृत्व वृत्तीला चांगला वाव मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या प्रकल्पाचे नेतृत्त्व कराल. आर्थिक स्थितीचा आलेख उंचावेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटाल. मानसिक समाधान मिळेल. चतुर्थातील गुरू-शुक्र युती योगामुळे घरासंबंधी शुभ्र वार्ता मिळतील. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

कन्या बुध-हर्षलाचा केंद्रयोग शंका उत्पन्न करेल. चिकित्सक वृत्तीला पोषक ठरेल. परंतु या कृतीमुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना, याची खबरदारी घ्या. दुसऱ्यांवर टीका करणे टाळलेत तर इतर अनेक चांगल्या गोष्टींचा लाभ होईल. प्रवास अगदी सुखकारक होतील. नोकरी-व्यवसायानिमित्त केलेले प्रवासही वैयक्तिक पातळीवर आणि आपल्या संस्थेसाठीही फायदेशीर ठरतील. सारासार विचारांती आपली मते मांडल्याने कौटुंबिक वातावरण शांत राहील.

तूळ मंगळ-शुक्राचा नवपंचम योग आपल्यातील कलागुणांना चांगला वाव देईल. आपल्या सृजनशीलतेची चार लोकात वाखाणणी होईल. नोकरी-व्यवसायात सर्वाच्या फायद्याच्या गोष्टी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्याल.  जोडीदार, मुलंबाळं तसेच घरातील ज्येष्ठ मंडळींनाही आपला सहवास, आपली साथ-सोबत हवी आहे, याची जाण ठेवा. ऋ तुबदलानुसार आहार-विहारातही बदल करा.

वृश्चिक बुध-हर्षलाचा केंद्र योग आपल्या स्वतंत्र वृत्तीला खतपाणी घालेल. आपल्या अविचाराने केलेल्या वक्तव्यामुळे एखादी जवळची व्यक्ती  खोलवर दुखावण्याचा संभव आहे. असे होऊ नये म्हणून शब्द जपून वापरा. मनापासून निर्धार केलात तर अशक्य असे आपल्यासाठी काहीच नाही. गुरू-शुक्राच्या साथीने विवेकाने वागाल. नोकरी-व्यवसायात अपेक्षेप्रमाणे यश नाही मिळाले तरी हार मानू नका. प्रयत्न करत रहा. पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे.

धनू व्ययस्थानातील गुरू-शुक्र युती धार्मिक सहलीचा आनंद देईल. साडेसातीमुळे उद्भवणाऱ्या अडीअडचणींवर मार्ग सापडतील. मानसिक समाधान मिळेल. अनेक क्रांतीकारक विचार मनात येतील. परंतु सगळेच विचार दुसऱ्याला पडणार नाहीत या गोष्टीचा जीवाला त्रास करून घेऊ नका. थोडा काळ जाऊ द्या. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील व्यक्तींची मते-विचार ऐकून घेऊन त्यावर शांत चित्ताने विचार करून मग निर्णय घ्याल.

मकर शुक्र-नेपच्युनचा केंद्रयोग काही नवीन कल्पना सुचवेल व त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न कराल. वरिष्ठांनी आपल्या विचारांना ताबडतोब पाठिंबा नाही दिला तरी येत्या काही दिवसात त्यांना आपली मते नक्की पटतील. ‘बाहेरच्यांना समजवणे किंवा समजावून सांगणे सोपे पण घरच्यांना कठीण.’ अशा परिस्थितीला सामोरे जावे लागेल. पण धीर सोडू नका. संयम रााखा. लाभ स्थानातील गुरू-शुक्राच्या युतीमुळे मित्र मैत्रीण मदतीला धावून येतील.

कुंभ आपल्या बुद्धीवादी वृत्तीला लहरीपणाची किनार लाभेल. हाती घेतलेले काम पूर्णत्वाला गेल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही. नोकरी-व्यवसायातील कामातून मनाला समाधान लाभेल. सर्वानी मिळून करण्याच्या कार्यात नेतृत्व कराल. आपल्याबरोबर इतरांनाही पुढे न्याल. जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळाली नाही तरी आपल्या कार्यात कोणतीही आडकाठी करणार नाही. घर -करियर सांभाळता सांभाळता तब्येतही जपावी लागेल.

मीन ‘आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा तर कोणी घेत नाही ना,’ हा व्यावहारिक विचार नक्कीच करावा लागेल. रवि-हर्षलाच्या केंद्रयोगामुळे अचानक आर्थिक अडचण समोर येऊन उभी राहील.  कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. सर्वाच्या आवडीनिवडीचा विचार करून काही नवे बेत आखाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे महत्त्वाचे काम अगदी सहजपणे पूर्ण करून त्यांच्या विश्वासाला पात्र ठराल.