सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष
रवी-हर्षलाच्या युती योगामुळे अधिकारी व्यक्तीकडून लाभ होईल. सरकारी कार्यालयातील लांबणीवर पडलेली कामे गती घेतील. फंड, पेन्शन इत्यादी संबंधित कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून हवा तसा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्ग मात्र मदत करण्यास राजी नसेल. मित्र परिवार, आप्तेष्ट यांचा सहवास लाभेल. जोडीदारासह विचारांची देवाणघेवाण होईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. डोक्यात राग घालून घेऊ नका.

वृषभ शुक्र-रवीच्या एकराश्यांतर योगामुळे नवे छंद जोपासाल. कलात्मक दृष्टीने विचार करून नावीन्यपूर्ण गोष्टी लोकांपुढे मांडाल. याचा भविष्यात उपयोग होईल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचे आपल्या कार्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. सहकारी वर्गाच्या मदतीने आपले काम वरिष्ठांपुढे मांडण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराची समर्थ साथ लाभेल. कौटुंबिक समस्या धीराने आणि विवेकबुद्धीने सोडवाल. दूषित पाण्यापासून सावध राहा. खर्चावर ताबा ठेवा.

मिथुन शनी-केतू युती योगामुळे अनेक अडथळे पार करत पुढे जावे लागेल. आपली चूक वा त्रुटी नसतानाही अनपेक्षित दिरंगाईला सामोरे जावे लागेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यात जास्त शक्ती खर्च पडेल. सहकारी वर्ग मात्र संपूर्ण साहाय्य करेल. जोडीदाराची चिडचीड वाढेल. जोडीदाराला आपल्या भावनिक आधाराची गरज भासेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. फोड, मुरूमं, पुटकुळ्या यांच्यात पू साठल्यास दुर्लक्ष करू नका.

कर्क इतरांच्या हिताचे जे कार्य हाती घ्याल त्यात यश मिळेल. ओळखीतल्या व्यक्तींच्या कामाच्या दृष्टीने लाभ होईल. नोकरी-व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेची विशेष चमक दाखवाल. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराल. सहकारी वर्गाचे साहाय्य उल्लेखनीय  असेल. कामाच्या धावपळीत आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात नेहमीपेक्षा जास्त व्यस्त असेल. एकमेकांच्या अडीअडचणी समजून घ्याल. घरातले वातावरण आनंदी राहील.

सिंह चंद्र-नेपच्यून केंद्र योगामुळे भावना आणि कर्तव्य यांच्यातील संघर्षांस सामोरे जावे लागेल. विवेकनिष्ठ विचार करूनच अंतिम निर्णय घ्याल. जोडीदाराच्या भावनांची कदर कराल. नोकरी-व्यवसायात आपल्या सल्ल्यामुळे वरिष्ठांचा लाभ होईल. एखाद्-दोन सहकाऱ्यांना आपल्याकडून मोलाचे साहाय्य होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. आरोग्याच्या तक्रारी सुरुवातीला किरकोळ वाटल्या तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या शनी-केतूच्या युतीयोगामुळे कौटुंबिक समस्यांमधून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. घरासंबंधित कामे लांबणीवर पडतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गाचे विशेष साहाय्य मिळेल. जोडीदाराच्या सल्ल्याने आणि सहकार्याने समस्यांवर उपाय सापडतील. नुसते विचार मांडण्यापेक्षा त्यावर प्रत्यक्ष कृती करा. आपल्याकडून होणारी दिरंगाई टाळा.

तूळ सप्तमातील रवी-हर्षलच्या युतीयोगामुळे जोडीदाराशी सहमत नसूनही त्याच्या म्हणण्याला होकार द्यावा लागेल. सद्य:स्थितीत असे वागणेच दोघांच्या हिताचे ठरेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्या कार्यक्षमतेचा योग्य उपयोग करून घेतील. सहकारी वर्गाकडून मदतीची अपेक्षा न ठेवणे उत्तम! कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. पाऊल किंवा खोट दुखणे, शीर दबणे यांसारख्या तक्रारींवर वैद्यकीय उपचार घ्या. पित्तावर प्रतिबंधात्मक उपाय योजा.

वृश्चिक चंद्र-नेपच्यून केंद्रयोगामुळे आपल्या दयाळू व परोपकारी वृत्तीला आधार मिळेल. संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय दुसऱ्याला मदत वा दानधर्म करायला जाऊ नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे आपणास मान्य नसले तरी ऐकून घ्यावे लागेल. सहकारी वर्गाच्या अडचणी समजून घेऊन वरिष्ठांपुढे मांडण्याचे धाडस कराल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंब समस्यांचे प्रश्न विचारविनिमयाने सोडवाल. उष्णतेचे विकार बळावतील.

धनू शनी-केतूच्या केंद्रयोगामुळे महत्त्वाच्या गोष्टींबाबत निर्णय घेण्यात विलंब होईल. यासाठी ज्येष्ठ व्यक्तींचा किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्याकडून अधिक कामाची अपेक्षा ठेवतील. ती पूर्ण करण्यात आठवडा धावपळीत जाईल. सहकारी वर्गाची थोडीफार मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण ठीक राहील. जोडीदाराकडून फारशा अपेक्षा ठेवू नका. तो त्याच्या कार्यक्षेत्रात अधिक व्यस्त असेल.

मकर शुक्र-रवीच्या एकराश्यांतर योगामुळे लांबणीवर पडलेल्या कामांना गती द्या. व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार कराल. बुद्धिवाद आणि प्रयत्नवादाला बुध-नेपच्यूनची जोड मिळेल. त्यामुळे योग्य शब्दात मुद्दे मांडाल. याचा नोकरी-व्यवसायात वरिष्ठांवर चांगला प्रभाव पडेल. सहकारी वर्गदेखील आपल्या बाजूने कौल देईल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. जोडीदाराच्या नातेवाईकांचे प्रश्न भावनिकतेनेच सोडवाल. तब्येत चांगली राहील.

कुंभ रवी-हर्षलच्या युतीयोगामुळे धाडसाने परिस्थितीला सामोरे जाल. स्वत:च्या हक्कांसाठी हिमतीने लढाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गाकडून आधी नाराजी दिसली तरी तेही आपल्या पाठीशी उभे राहतील. जोडीदाराची समर्थ साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. आरोग्याबाबत जागरूक रहा. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी पुढे त्रासदायक होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

मीन उच्चीच्या शुक्रामुळे वागण्या-बोलण्यात उत्साह वाढेल. समोर आलेल्या अडचणींकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यातूनही मार्ग काढाल. नोकरी-व्यवसायात अनपेक्षित विलंब संभवतो. परंतु या काळात आपण इतर गोष्टींकडे लक्ष देऊन वेळेचे चांगले नियोजन कराल. सहकारी वर्ग अपेक्षित मदत करतील. जोडीदार  आपल्यासाठी फारसा वेळ देऊ शकणार नाही. तरीही आपण त्याची बाजू समजून घ्याल.