05 December 2019

News Flash

राशिभविष्य : दि. १ ते ७ फेब्रुवारी २०१९

शुक्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे अनेक नवीन ओळखी होतील.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष शुक्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे अनेक नवीन ओळखी होतील. हातून समाजकार्य घडेल. यातून आपणास मानसिक समाधान मिळेल. नोकरी-व्यवसायात हातातून निसटून जाणाऱ्या संधी पुन्हा प्राप्त करण्यासाठी शांत डोक्याने विचार करणे आवश्यक. जोडीदाराची साथ मिळेल. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. लहान-मोठय़ा वादांमुळे कौटुंबिक वातावरण गढूळ होऊ न देता सामोपचाराने उपाय शोधाल आणि तो अमलात आणाल.

वृषभ बुध-गुरूच्या लाभयोगामुळे आपल्यातील कार्यकुशलता उत्तम प्रकारे व्यक्त होईल. नोकरी-व्यवसायात नव्या प्रकल्पांचे आकलन आणि सादरीकरण यशस्वी होईल. कुटुंबातील सदस्यांच्या भावनांची कदर कराल. त्यांना मानसिक आधार द्याल. प्रत्येक वेळी जोडीदाराची साथ मिळेलच असे नसले तरी त्याचा विरोध नक्कीच नसेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रवासातील कामांची गती मंदावेल. उशिरा का होईना पण कामे यशस्वी होतील. प्रयत्न सोडू नका.

मिथुन बुध-नेपच्यूनच्या शुभयोगामुळे आपल्यातील उत्स्फूर्ततेला दुजोरा मिळेल. बौद्धिक आव्हाने लिलया पेलाल. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ याप्रमाणे कृती करून अनेक कामं यशस्वी होतील. जोडीदाराच्या समस्यांवर उपाय शोधून द्याल. आपल्या भक्कम पाठिंब्यामुळे जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात नव्याने आगेकूच करतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांचे चांगले सहकार्य लाभेल. काव्य लेखन, ललित लेख, गायन, वादन यातून आनंद मिळवाल.

कर्क बुध-प्लुटोच्या एकराश्यांतर योगामुळे आणि गुरुबलाच्या पाठिंब्यामुळे आपले विचार आणि योजना सभाधीटपणे वरिष्ठांपुढे मांडाल. आपल्या प्रभावी सादरीकरणाची आणि अभ्यासपूर्वक मांडणीची वाहवा होईल. जोडीदाराच्या व्यस्त वेळापत्रकात आपल्यासाठी फारसा वेळ नसला तरी जेवढा वेळ मिळेल तो आनंदाने, एकमेकांच्या आवडीनिवडी जपत व्यतीत कराल. आप्तेष्टांच्या गाठीभेटींमुळे कौटुंबिक वातावरण आंनदाचे राहील. आरोग्य चांगले राहील.

सिंह मंगळ-प्लुटोचा केंद्रयोग आपल्या धाडसी आणि करारी वृत्तीला साहाय्यकारी ठरेल. कोणावरही अन्याय होताना बघून आपण स्वस्थ बसणार नाही. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाच्या समस्या वरिष्ठांपुढे मांडण्यात पुढाकार घ्याल. उशिरा का होईना पण आपल्या या प्रयत्नाला यश मिळेल. कौटुंबिक वातावरणावर नोकरीच्या ठिकाणच्या ताणतणावाचा परिणाम होऊ देऊ नका. जोडीदार आपल्या भावभावना जाणून घेऊन सर्वतोपरी आपली साथ देईल.

कन्या शनी-बुधाच्या एकराश्यांतर योगामुळे बुधाच्या बुद्धीला शनीच्या चिकाटीची जोड मिळेल. कोणतीही महत्त्वाची गोष्ट चारचौघांपुढे मांडण्यापूर्वी त्याचा अभ्यासपूर्वक विचार कराल. नोकरी-व्यवसायातही या धोरणाचा फायदा होईल. सहकारी वर्ग आणि वरिष्ठ यांच्यासह वैचारिक देवाणघेवाण चांगली कराल. अंतिम निर्णय सर्वाच्याच हिताचा ठरेल. कौटुंबिक पेचप्रसंगात समोरच्याची बाजू समजून घेऊन, त्याच्या भावनांची कदर करून हलकेच सोडवाल.

तूळ सर्वाच्या हिताचा विचार करताना स्वत:कडे दुर्लक्ष करू नका.  नोकरी-व्यवसायात कामाव्यतिरिक्त इतर काही जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडाल. ओळखीच्या व्यक्तींकडून अनपेक्षितपणे मदतीचा हात पुढे येईल. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटींमुळे मन आनंदी राहील. नव्या उत्साहाने कामाला लागाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. वादाचे विषय सामोपचाराने मार्गी लावाल.

वृश्चिक रवी-नेपच्यूनच्या एकराश्यांतर योगामुळे समोर आलेल्या संधीचा दूरदर्शीपणाने विचार कराल. कोणताही निर्णय तडकाफडकी न घेता पुनर्विचार करूनच अंतिम टप्पा गाठाल. आर्थिक स्थितीला धक्का पोहोचेल, असे कोणतेही काम टाळावे लागेल. नोकरी व्यवसायानिमित्त छोटे प्रवास करावे लागतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये वैचारिक देवाणघेवाण चांगली होईल. नव्या पिढीच्या विविध अनुभवांनी आश्चर्यचकित व्हाल. आरोग्य चांगली साथ देईल.

धनू शुक्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे समाजात नव्या ओळखी होतील. या ओळखींचा वैयक्तिक, तसेच नोकरी-व्यवसायातही उपयोग होईल. अनपेक्षितपणे खर्च अचानक पुढे येऊन उभे राहतील. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. जोडीदाराच्या बौद्धिक युक्तिवादाला सलाम कराल. कधी आपण स्वत:कडे कमीपणा घेणे फायदेशीर असते याची प्रचीती येईल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. प्रसंगावधान राखून आपणही हास्यविनोदात सामील व्हाल.

मकर ‘मेहनतीला पर्याय नाही किंवा शॉर्टकटही नाही’ हे आपले ब्रीद वाक्य कृतीमधून सिद्ध कराल. शनी-बुधाच्या एकराश्यांतर योगामुळे आणि त्या मेहनतीचे योग्य फळदेखील पदरी पडेल. नोकरी-व्यवसायात आपली चिकाटी आणि सातत्य कामी येईल. वरिष्ठांनी सुरुवातीला नाराजी दाखवली तरी सहकारी वर्ग आपल्या पाठीशी उभा राहील. कौटुंबिक वातावरण धावपळीचे आणि धांदलीचे असेल. शांत डोक्याने निर्णय घ्याल.

कुंभ ‘आपण बरे आणि आपले काम बरे’ या नियमानुसार वागून चालणार नाही. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. बुध-प्लुटोच्या एकराश्यांतर योगामुळे अयोग्य गोष्टी उजेडात आणाल. अन्यायाला वाचा फोडाल. आपल्या या धाडसाचा इतरांनादेखील फायदा होईल. समूहाचे नेतृत्व चांगले कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मन जिंकाल. सहकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मानसिक समाधान लाभेल.

मीन भाग्यातील गुरूचे भ्रमण अनेक गोष्टींसाठी साहाय्यकारी ठरेल. नोकरी-व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराल. या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्य कराल. विचारांची चक्रे गतिमान होतील. सारासारविचार करून जास्तीत जास्त लोकांच्या फायद्याचा निर्णय घ्याल. आर्थिक उन्नती होईल. रोजच्या धावपळीत आरोग्यासाठी थोडा वेळ राखून ठेवाल. कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहील.

First Published on February 1, 2019 1:02 am

Web Title: astrology 1st to 7th february 2019
Just Now!
X