News Flash

भविष्य : दि. २० ते २६ जुलै २०१८

व्यक्ती तितक्या प्रकृती याचा अनुभव देणारा हा आठवडा आहे. तुम्ही तुमचे धोरण लवचीक ठेवा.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष व्यक्ती तितक्या प्रकृती याचा अनुभव देणारा हा आठवडा आहे. तुम्ही तुमचे धोरण लवचीक ठेवा. व्यवसाय उद्योगात तुमच्या कामात गुप्तता ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सूचना बदलल्यामुळे तुमचा गोंधळ उडेल. कोणत्याच कामावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. घरामध्ये एखाद्या तात्त्विक मुद्दय़ावरून आपुलकीच्या व्यक्तीशी वादविवाद होतील; पण त्यांचे ऐकले तर तुमचा फायदा होईल. प्रकृतीकडे लक्ष द्या.

वृषभ कोणाचा कधी आणि कसा उपयोग होईल हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे या आठवडय़ामध्ये सर्वाशी सलोख्याचे संबंध ठेवा. व्यापार-उद्योगात बाजारपेठेत एखादी गोंधळात टाकणारी बातमी कळेल. सत्य परिस्थिती जाणून घ्या. कोणत्याही करारावर सह्य़ा करू नका.  तुमच्या संस्थेविषयी कोणतेही मतप्रदर्शन सहकाऱ्यांकडे करू नका. घरामध्ये शब्द हे शत्रू आहे हे लक्षात ठेवून नातेवाईक, मोठय़ा व्यक्तींशी अदबीने बोला.

मिथुन एखाद्या महत्त्वाच्या कामाला आठवडय़ाच्या सुरुवातीला तुमचे तंत्र बिनसण्याची शक्यता आहे. मनावर संयम ठेवा. व्यापारउद्योगात केलेल्या कामाचे पसे मिळवताना गिऱ्हाईकांशी वादविवाद होतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेले चांगले काम विसरून जाऊन वरिष्ठ तुमच्या चुकांवर बोट ठेवतील त्याचा तुम्हाला राग येईल. घरामध्ये एखाद्या जुन्या प्रश्नावरून तुमचे इतरांशी वादविवाद होतील.

कर्क स्वभावत: तुमची रास अतिशय संवेदनशील आहे. व्यापारउद्योगात भागीदारी किंवा मत्री करारावर सही करणे शक्यतो टाळा. नोकरीच्या ठिकाणी सहकारी गोड बोलून त्यांचा मतलब साध्य करून घेतील. त्या नादात तुमचे काम अर्धवट राहील. घरामध्ये जोडीदाराशी जुन्या एखाद्या मुद्दय़ावरून वादविवाद होतील. त्यामुळे तुमचा रागाचा पारा वर जाईल. सप्ताहाच्या उत्तरार्धात कोणतेही महत्त्वाचे काम करू नका.

सिंह या आठवडय़ात आपल्या हातून काही चूक होणार नाही याची खबरदारी घ्या. व्यवसाय-उद्योगात प्रतिस्पर्धी अफवा पसरवून तुमचे लक्ष वेधण्याची शक्यता आहे. त्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे काम करत राहा. नोकरीच्या ठिकाणी तुमचे हितशत्रू वरिष्ठांकडे कागाळ्या करतील. तुम्ही तुमचे काम व्यवस्थितपणे पार पाडलेत तर त्याचा उपयोग होणार नाही. घरामध्ये काही जुने प्रश्न नव्याने डोके वर काढतील. प्रकृतीकडे लक्ष द्या.

कन्या कधीकधी आपलीच माणसे आपल्याशी अशी का वागतात, असे  कोडे तुम्हाला या आठवडय़ात पडण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात तुमचे अंदाज, आडाखे यात गल्लत होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुम्हाला करायचे आहे त्याविषयीच्या शंकाबाबत निरसन वरिष्ठांकडून आधीच करून घ्या. घरामध्ये प्रिय व्यक्तीविषयी काळजी निर्माण होण्याची शक्यता आहे.

तूळ काही महत्त्वाच्या आणि मोठय़ा बदलांची नांदी करणारे हे ग्रहमान आहे. त्याचा परिणाम तुमच्या करिअरवर आणि व्यक्तिगत जीवनावर होईल. व्यापारउद्योगात कोणतेही मोठे आणि महत्त्वाचे करार करण्यापूर्वी निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीच्या ठिकाणी चालू कामात अचानक फेरफार होण्याची शक्यता आहे.  घरामध्ये सर्वाच्या जीवनमानावर परिणाम करणारे काही निर्णय होतील.

वृश्चिक स्वभावत: तुमची रास अत्यंत संशयी आहे. सभोवतालच्या व्यक्ती काय बोलतात आणि काय करतात याकडे तुमचे बारकाईने लक्ष असते. योग्य वेळ आली की तुमचे मत व्यक्त करता. या गुणाचा आता तुम्हाला फायदा मिळेल. व्यापारउद्योगात शक्यतो नवीन करारांवर या आठवडय़ात सही करू नका. नोकरीच्या ठिकाणी संस्थेविषयी कोणतेही मतप्रदर्शन करणे टाळा. घरगुती कामाकरिता प्रवास करत असाल तर आपली चीजवस्तू सांभाळा.

धनू माणसाचे मन फार विचित्र आहे. एखाद्या मार्गाने जायचे नाही असे ठरविले की, त्याच मार्गाने जावेसे वाटते आणि त्यामुळे पुढे काही प्रश्न निर्माण होतात. या आठवडय़ात अशा प्रकारचा मोह कटाक्षाने टाळा. व्यापारउद्योगात पशाची उधार-उसनवारी करू नका. नोकरदार व्यक्तींनी सहकारी आणि वरिष्ठांशी जपून बोलावे, नाही तर त्यातून गैरसमज होण्याची शक्यता आहे. घरामध्ये जो वाद पूर्वी मिटला होता तो नव्याने डोके वर काढेल.

मकर कधीकधी आपण विचार करतो एक आणि होते भलतेच असा अनुभव या आठवडय़ात येईल. व्यापारउद्योगात दिसते तसे नसते असा प्रकार घडेल. ज्या व्यक्तींनी मदतीचे आश्वासन दिले होते त्या आयत्या वेळी शब्द फिरवतील. नोकरदार व्यक्तींनी जे काम केले आहे त्याचे वरिष्ठांना महत्त्व वाटणार नाही. नवीन नोकरीची घाई करू नका. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या तालावर तुम्हाला नाचावे लागेल. कदाचित त्यामुळे तुमचे बेत बदलतील.

कुंभ ग्रहमान फसवे आहे. एखादी गोष्ट करायची नाही असे तुम्ही ठरवले असेल, पण नेमका तुम्हाला त्याच गोष्टीचा मोह होईल. तो कटाक्षाने टाळा. व्यापारउद्योगात या आठवडय़ात नवीन करारावर सही करू नका. नोकरीच्या ठिकाणी कोण काय बोलते याकडे लक्ष न देता तुमच्या सारासार विचारबुद्धीला जे पटेल तेच करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. घरामध्ये छोटय़ामोठय़ा कारणांवरून झालेल्या कुरबुरी मनाला लावून घ्याल.

मीन एखादा माणूस ज्या वेळेला प्रमाणाबाहेर गोड बोलायला लागतो त्या वेळी समजायचे त्याचा काही तरी स्वार्थ दडलेला आहे. अशा वेळी सावध राहावे. व्यापारउद्योगात जे काम तुम्हाला माहीत नाही त्या कामात वेळ व पशाची गुंतवणूक करू नका. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांविषयी किंवा वरिष्ठांविषयी कोणतेही मतप्रदर्शन करू नका. नातेवाईकांना कोणतेही आश्वासन देऊ नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 1:01 am

Web Title: astrology 20th to 26th july 2018
Next Stories
1 भविष्य : दि. १३ ते १९ जुलै २०१८
2 भविष्य : ६ ते १२ जुलै २०१८
3 भविष्य : २९ जून ते ५ जुलै २०१८
Just Now!
X