18 January 2018

News Flash

दि. २१ ते २७ एप्रिल २०१७

सभोवतालच्या व्यक्तींकडून काम करून घेणे हे तुमच्या दृष्टीने आव्हान असेल.

विजय केळकर | Updated: April 21, 2017 6:05 PM

राशिचक्र

मेष सभोवतालच्या व्यक्तींकडून काम करून घेणे हे तुमच्या दृष्टीने आव्हान असेल. व्यापार-उद्योगात फायदा आणि उलाढाल वाढविण्यासाठी एखादे धाडस करण्याचा मोह होईल. त्यातून तुम्हाला खरंच फायदा होणार आहे का, याचा सल्ला निष्णात व्यक्तीकडून घ्या. नोकरीमधल्या कामात तुम्हाला तुमचे मन शांत ठेवून काम करावे लागेल. काही जणांना परदेशी जाता येईल. घरामध्ये प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेला असेल.

वृषभ ग्रहमान एकमेकांच्या विरुद्ध तत्त्वाचे असल्यामुळे तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढवायला कारणीभूत ठरतील. तुमच्या स्वभावातील स्वार्थ आणि लबाडी सभोवतालच्या व्यक्तींना दिसून येईल. एखादी गोष्ट मिळविण्याकरता तुम्ही आधुनिक तंत्राचा वापर कराल. पण इतरांना मदत करायच्या वेळेला तुम्ही मागे हटाल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश ठेवण्याकरिता वेगळी युक्ती अमलात आणाल. नोकरीच्या ठिकाणी  फायदा असलेले काम तातडीने उरकाल. घरामध्ये सगळ्यांनी मनाप्रमाणे वागावे असा आग्रह असेल.

मिथुन गेल्या आठवडय़ात कष्ट घेऊनही ज्या कामाला गती आली नव्हती त्याला वेग देण्यासाठी आता सज्ज व्हाल. व्यापार-उद्योगात थोडेसे धाडस करण्याची तयारी दाखवाल. जादा पसे मिळविण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा वापर कराल. कारखानदार नवीन मार्केट मिळविण्यासाठी परदेशवारी करतील. नोकरीमध्ये एखाद्या सहकाऱ्याच्या विचित्र वागणुकीचा अनुभव येण्याची शक्यता आहे. घरामध्ये आवडत्या पाहुण्यांची वर्दी लागेल. त्यांच्यासमवेत बरेच कार्यक्रम ठरतील.

कर्क पाहिजे असलेली गोष्ट तुम्ही मिळवण्यासाठी वेळ पडली तर राजमार्ग सोडून वाकडी वाट करण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात लक्ष्मी चंचल असते याचा  अनुभव येईल. जी संधी तुमच्या पुढे आहे त्याचा ताबडतोब फायदा उठवा. नोकरीच्या ठिकाणी फायदा जास्त असलेल्या  कामाला महत्त्व द्याल. इतर कामे बाजूला ठेवाल. बेकार व्यक्तींना नवीन संधी उपलब्ध होईल.  कौटुंबिक जीवनात छोटे-मोठे वादविवाद होतील.

सिंह जी गोष्ट तुमच्या मनामध्ये येईल, ती पूर्ण करण्याची तुम्हाला प्रचंड घाई असेल. त्या नादात थोडेसे धाडस आणि अविचार होण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या चांगल्या कामातून  एखादी नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये नेहमीच्या पद्धतीने काम करायला वेळ लागेल. घरामध्ये नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या आगमनाची वर्दी लागण्याची शक्यता आहे. त्यांना खूश करण्याकरिता कार्यक्रम बदलावे लागतील.

कन्या तुमची परिस्थिती मानलं तर समाधान अशी असणार आहे. साधे आणि सोपे वाटणारे काम हातात घेतल्यानंतर गुंतागुंतीचे आहे असे तुमच्या लक्षात येईल. व्यापार-उद्योगात पशाची आवक समाधानकारक असेल, पण काही अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामाचा तुम्हाला कंटाळा आहे तेच काम हाताळावे लागेल. अखेर ते काम पूर्ण कराल. घरामध्ये इतरांच्या मदतीला धावून जाल, पण तुमची अडचण कोणीच समजून घेणार नाही. प्रकृतीला सांभाळून कार्यक्रमाचे नियोजन करा.

तूळ प्रत्येक गोष्ट वेळेत आणि तुमच्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे असते. पण या आठवडय़ात तसे न घडल्याने तुम्हाला तडजोड करणे भाग पडेल. सभोवतालच्या व्यक्तींना सांभाळून घ्या. व्यापार-उद्योगाच्या ठिकाणी ज्यांना पसे देण्याचे कबूल केले होते, त्यांच्या पशाची तरतूद करून ठेवा. नोकरीमध्ये दुप्पट काम टाळण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनांकडे काळजीर्पूक लक्ष द्या. घरामध्ये जोडीदाराच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी विचारपूर्वक बोला.

वृश्चिक जशी परिस्थिती असते तसा तुम्ही तुमचा पवित्रा बदलता. या आठवडय़ात एखादे मोठे उद्दिष्ट  साध्य करण्याकरिता तुम्ही मनात काही बेत आखून ठेवलेले असतील. व्यापार-उद्योगात गरजेनुसार पसे मिळतील. जोडधंदा असणाऱ्यांना एखादा नवीन प्रयोग करून पाहावासा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुम्हाला आवडते त्यात तुमची कार्यक्षमता उत्तम राहील. इतर गोष्टींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष कराल. घरामध्ये तुमचे रागरंग बदलत राहतील.

धनू एखादी जगावेगळी कल्पना तुमच्या डोक्यात येईल, पण ती व्यावहारिकदृष्टय़ा योग्य आहे का याचा विचार करा. व्यापार-उद्योगात  तुम्ही तुमच्या पद्धतीने काम केले तर ते तुम्हाला जास्त उपयोगी पडेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नेमून दिलेले काम वेळेत आणि अचूक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये जोडीदाराचे म्हणणे योग्य असूनही तुम्ही ते मान्य करणार नाही. अनोळखी व्यक्तींवर एकदम विश्वास टाकू नका.

मकर तुमच्याकडे असलेल्या विशिष्ट कौशल्याचा तुम्हाला उपयोग होईल. सहसा वेळ वाया घालविणे तुम्हाला आवडत नाही. या आठवडय़ामध्ये महत्त्वाचे काम नसल्यामुळे व्यापार-उद्योगातील कामे पूर्ण करून टाकाल. जुन्या ओळखीमुळे एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ नेहमीपेक्षा वेगळे काम तुमच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करतील. ते टाळण्यासाठी तुम्ही एखादी युक्ती शोधून काढाल. घरामध्ये इतरांना तुमच्या कल्पना पसंत पडणार नाहीत. त्याचा तुम्हाला राग येईल.

कुंभ कधी तुम्ही चांगल्या मूडमध्ये असाल आणि कधी तुमचे बिनसेल याचा पत्ता लागणार नाही. त्याचे चांगले-वाईट परिणाम तुम्हालाच सहन करावे लागतील. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामाचे पसे मिळविण्यासाठी जिभेवर साखर पेरावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. महत्त्वाची कामे स्वत:च हातात घ्या. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा कारणावरून रुसवेफुगवे होतील. हे असंच चालायचं असा विचार करून त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही दिलेला सल्ला इतरांना पटेल.

मीन स्वभावत: तुम्ही खूप चंचल आहात. कोणताच एक विचार तुमच्या मनात जास्त काळ टिकत नाही. या आठवडय़ात मात्र तुम्ही इच्छा आहे तिथे मार्ग आहे हे तुमच्या कृतीतून सिद्ध कराल. व्यापार-उद्योगाच्या कामात भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व असते ही गोष्ट लक्षात ठेवा.  नोकरीमध्ये पूर्वी केलेले काम पुन्हा करायला लागल्यामुळे चिडचिड होईल. घरामध्ये इतरांनी बोललेल्या सर्वच गोष्टी मनाला लावून घेऊ नका.
विजय केळकर
response.lokprabha@expressindia.com

First Published on April 21, 2017 1:05 am

Web Title: astrology 21st to 27th april
  1. No Comments.