01vijayमेष एकीकडे आपुलकीच्या व्यक्तींकरिता काही तरी छान आणि भव्यदिव्य करावे असे तुम्हाला वाटेल तर दुसरीकडे अत्यावश्यक कामांना वेळ द्यावा लागेल. व्यापारीवर्गाला एखादी नवीन संधी उत्तेजित करेल. त्यामध्ये पसे गुंतवण्याचा मोह अनावर होईल. पण तसे करणे धोक्याचे ठरेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचना पाळण्यात काही गफलत झाली तर त्यांना ती आवडणार नाही. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्तींच्या बाबतीत ‘ज्याचे करावे भले..’ असा अनुभव येईल. मोठी खरेदी खरोखर गरजेची आहे का याचा विचार करा.

वृषभ तुमच्या करिअर किंवा व्यवसायामध्ये तुमचे इरादे बुलंद असतील. घरगुती अडचणींमुळे त्यावर थोडीशी मुरड घालावी लागेल. व्यापार-उद्योगात बाजारातील घडामोडींवर नीट लक्ष ठेवून तुमचा पवित्रा ठरवा. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांनी नवीन काम स्वीकारताना गिऱ्हाईकांच्या अपेक्षा समजून घेणे. नोकरीमध्ये कोणताही नवीन निर्णय घेण्यापूर्वी किंवा कामाची पद्धत बदलल्यामुळे वरिष्ठांची संमती घ्यायला विसरू नका. घरामध्ये वातावरण उत्साहवर्धक असेल. पण मोठय़ा व्यक्तींचे मानापमान सांभाळावे लागतील.

मिथुन तुमच्या स्वभावातील आधुनिकता आणि पारंपरिकता या दोन्हीचे दर्शन सभोवतालच्या व्यक्तींना होईल. व्यापार-उद्योगात कोणतेही नवीन करार करताना त्यातल्या अटी आणि शर्ती यांचा अर्थ नीट समजून घ्या. नोकरीच्या ठिकाणी सहकारी एखादी अफवा पसरवून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. नवीन नोकरी स्वीकारण्यापूर्वी कामाविषयी नीट माहिती करून घ्या. घरामधल्या व्यक्तींशी बोलताना शब्द हे शस्त्र आहे याची आठवण ठेवा. नातेवाईक आणि आप्तेष्टांशी वागताना त्यांचा मतलब समजून घ्या.

कर्क या आठवडय़ातही जिथे तुम्ही जाल तिथे तुमची लोकप्रियता तुम्हाला उपयोगी पडेल. व्यापार-उद्योगात कोणतेही मोठे सौदे किंवा पशाचे व्यवहार करणार असाल तर त्याचे भविष्यात काय परिणाम होतील याचा अंदाज घ्या. रोखीचे व्यवहार सावधानतेने हाताळा. नोकरीमध्ये वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न करतील. बेकार व्यक्तींनी तडजोड केली तर काम मिळेल. घरामध्ये नवीन जागा किंवा वाहनखरेदीच्या बाबतीत भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व देणे चांगले. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याशी जपून बोला.

सिंह इतर राशींमध्ये अणि तुमच्या राशीमध्ये मोठा फरक आहे. तुमचे खरे मित्र व दिखाऊ साथीदार यांच्यातील भेद तुमच्या लक्षात येईल. व्यापार-उद्योगात सरकारी कामे व कोर्टव्यवहार हाताळताना निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. एखादे जुने प्रकरण नव्याने डोके वर काढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये सत्तेपुढे शहाणपण नसते याची आठवण ठेवा. नवीन नोकरीचा निर्णय घाईने घेऊ नका. घरामधल्या व्यक्तींशी तुम्ही आपुलकीने वागाल. त्यांना मात्र तुमच्या औदार्याचा फायदा मिळेल. हृदयविकार, रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

कन्या कोणतेही काम करताना तुम्ही उत्तम नियोजन करता आणि त्याकरिता आवश्यक असलेल्या पशाची तरतूद करून ठेवता. व्यवसाय-उद्योगात काम चांगले होईल. परंतु रोखीचे व्यवहार कमी असल्यामुळे मनामध्ये एक प्रकारची चिंता राहील. नोकरीमध्ये तुमच्या मनाप्रमाणे इतरांनी वागले नाही तर संबंधित व्यक्तींना अधिकाराचा तुम्ही बडगा दाखवाल. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमानिमित्त लांबच्या नातेवाईकांशी गाठभेट होण्याची शक्यता आहे. घरामध्ये मोठी खरेदी करण्यापूर्वी खिशाची चाचपणी करून बघा.

तुळ ‘सबसे बडा रुपय्या’ हे मानणारी तुमची रास नाही, पण हातामध्ये पसे खेळले नाही तर तुम्ही अस्वस्थ होता. व्यवसाय-उद्योगात काही आकर्षक मोठे प्रस्ताव तुमच्यापुढे असतील, परंतु त्यासंबंधी करार करण्यापूर्वी भविष्यात होणाऱ्या परिणामांचा नीट विचार करा. भावनेच्या भरात खर्च वाढवू नका. नोकरदार व्यक्तींना त्यांनी वरिष्ठांच्या आज्ञेचे उल्लंघन केले तर त्यांची अवमर्जी सहन करावी लागेल. घरामध्ये सर्वाचे हट्ट पुरविण्याचा तुमचा इरादा असेल, पण मुलांच्या हट्टापुढे तुमचे काहीच चालणार नाही.

वृश्चिक प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक कामात आपला पुढाकार असावा असे तुम्हाला वाटत राहील, परंतु त्यातील तांत्रिक अडथळे दूर करण्यात तुमचा बराच वेळ आणि शक्ती खर्ची पडेल. व्यवसाय-उद्योगात उत्पन्न वाढविण्यासाठी एखाद्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात करावीशी वाटेल. त्याकरिता एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची तुम्हाला मदत घ्यावी लागेल. नोकरीमध्ये घाईने घेतलेले निर्णय वरिष्ठांना ते आवडणार नाही. घरामध्ये मौजमजेच्या वेळेला सर्व जण पुढे असतील, पण कामाच्या वेळेला कोणीच उपयोगी पडणार नाही.

धनू एखादे महत्त्वाचे काम जेव्हा आपल्याला करायचे असते त्या वेळेला आपण कोणावर तरी अवलंबून असतो, पण त्या वेळी काही तरी गडबड होते. हे गृहीत धरून तुम्ही वेळीच सावध आणि स्वयंभू होणे चांगले. व्यापार-उद्योगात स्पर्धकांच्या गोटात काय चालले आहे याची माहिती काढून तुमचा पवित्रा ठरवा. पशाची तरतूद करण्याकरिता थोडय़ा अवधीकरिता कर्ज घ्यावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील. घरामध्ये आनंददायी वातावरण असेल, पण सगळ्यांचे हट्ट पुरविणे तुम्हाला जड जाईल.

मकर स्वभावत: तुम्ही खूप भावुक किंवा धार्मिक नाही. प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही व्यवहारी दृष्टिकोन ठेवून तुमचा पवित्रा ठरविता. व्यापार-उद्योगातील काम वाढविण्यासाठी निकराने प्रयत्न कराल. खेळत्या भांडवलाची बरीच गरज असल्यामुळे बँक किंवा इतर माध्यमातून पसे उभे करण्याकरिता प्रयत्न कराल. नोकरीमध्ये एखाद्या कामात तुमच्या हातून चूक झाली तर वरिष्ठांना त्याचीच आठवण येईल. घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तींचा तुमच्यावर प्रभाव असेल. त्यामुळे तुमचे व्यक्तिगत स्वातंत्र्य कमी झाले अशी भावना मनात येईल.

कुंभ सकृद्ददर्शनी एखादी गोष्ट खूप सोपी आहे असे तुम्हाला वाटेल. मात्र जेव्हा तुम्ही हाताळायला जाल तेव्हा त्यातली गुंतागुंत तुमच्या लक्षात येईल. व्यापार-उद्योगात तुमचे इरादे बुलंद असतील. विक्री आणि फायदा दोन्ही वाढविण्याकरिता तुम्ही खऱ्या अर्थाने सिद्ध झाले असाल. कामगारांना खूश ठेवण्यासाठी जादा भत्ते द्यावे लागतील. नोकरी-मध्ये वरिष्ठांच्या आज्ञेशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. घरामधल्या व्यक्तींना खूश ठेवण्यासाठी आश्वासन द्याल. नंतर खिशाची चाचपणी केल्यावर नाकापेक्षा मोती जड आहे असे लक्षात येईल.

मीन तुमच्या उत्साहाचा तुमच्यापेक्षा इतरांना जास्त फायदा मिळण्याची शक्यता आहे. तसे होऊ नये म्हणून काळजी घ्या. व्यापार-उद्योगात कोणत्या गिऱ्हाईकाला उधारी द्यायची आणि कोणाशी रोखीने व्यवहार करायचे याचा नीट अंदाज घ्या. नोकरीमध्ये आपले महत्त्व वाढविण्याकरिता वरिष्ठांसमोर बढाया मारायला जाल, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला जास्त काम करावे लागेल. घरातील वातावरण छान असेल. सजावट वगरे गोष्टीमध्ये तुम्ही जातीने लक्ष घालाल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com