मेष ग्रहमान तुमचा भावनोद्रेक करणारे आहे. नको त्या गोष्टींच्या मागे लागून तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगामध्ये स्पर्धकांच्या हालचालीमुळे भूलभुलया निर्माण होईल. हातातले पसे खर्च करण्यापूर्वी त्यातून तुमचा खरोखर फायदा होणार आहे का? याचा विचार करा. नोकरीच्या ठिकाणी कामामध्ये तुम्ही काटेकोर राहा. नातेवाईकांपासून शक्यतो चार हात दूर राहा, म्हणजे वादविवाद होणार नाहीत.

वृषभ परंपरा जपणे तुम्हाला नेहमीच आवडते. पण सभोवतालच्या वातावरणामुळे आपल्याला आपली कार्यपद्धती बदलणे भाग पडते, अशी आता तुमची परिस्थिती असेल. व्यवसाय-उद्योगात ज्या गोष्टी नशिबावर अवलंबून ठेवल्या होत्या त्या तशा पद्धतीने पार पडणार नाहीत. तुम्हाला पर्यायी मार्ग स्वीकारावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ काय बोलतात आणि काय सांगतात याकडे नीट लक्ष ठेवा.  घरामध्ये एखादा जुना प्रश्न नव्याने तोंड वर काढेल. त्यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल. नातेवाईकांशी जपून बोला/वागा.

मिथुन दोन वेगवेगळ्या स्थानांवर वेगवेगळे अनुभव देणारा हा आठवडा आहे. करिअरमध्ये कितीही व्याप असला तरी घरामधल्या काही गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. व्यापार-उद्योगाच्या अफवांमध्ये लक्ष देऊ नका. सत्य परिस्थिती जाणून घ्या. महत्त्वाची कागदपत्रे काळजीपूर्वक हाताळा. नोकरदार व्यक्तींनी स्वत:चे मत व्यक्त करण्यापूर्वी वरिष्ठांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे.  घरामध्ये सर्वाना खूश ठेवण्यासाठी आखलेला बेत  इतरांना तो लगेच पसंत पडणार नाही.

कर्क माणसांना जपणारी तुमची रास आहे. पण या आठवडय़ात ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे असा अनुभव येईल. सभोवतालच्या व्यक्ती तुमच्या चांगूलपणाचा गरफायदा घेतील. व्यापार-उद्योगात तुमचे भविष्यातील बेत स्पर्धकांना कळणार नाहीत, याची दक्षता बाळगा. नोकरीमध्ये गोड बोलणाऱ्या सहकाऱ्यांपासून चार हात दूर राहा. घरातील व्यक्तींना पूर्वी काही आश्वासन दिले असेल तर ते पार पाडण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल. नातेवाईकांच्या लोपटाळ्यात जास्त पडू नका.

सिंह हत्तीला पकडण्यासाठी ज्याप्रमाणे खड्डय़ावर गवत आच्छादले जाते त्याप्रमाणे तुम्हाला एखादी स्वप्नमयी कल्पना आकर्षति करेल. त्यातील बारकावे कळल्यानंतर हे मृगजळ होते असे लक्षात येईल. व्यापार-उद्योगात धनप्राप्तीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या. नोकरीमध्ये संस्थेमध्ये काय घडामोडी चालल्या आहेत, याबाबतचे निरसन वरिष्ठांकडून करून घ्या.

कन्या ग्रहमान थोडासा चकवा निर्माण करणारे आहे. तुमची रास व्यवहारी स्वभावाची आहे. सहसा तुम्ही कुठल्याही स्वप्नामागे धावत नाही. पण या आठवडय़ात एखाद्या आगळ्यावेगळ्या कल्पनेची भुरळ पडेल. व्यापार-उद्योगात तुमची नेहमीची पद्धत जास्त उपयोगी पडेल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांचे बोलणे ऐका. पण शेवटी ऐकावे जनाचे करावे मनाचे हाच कानमंत्र तुम्हाला उपयोगी पडेल. घरामध्ये एखाद्या व्यक्तीला तुम्ही चांगला सल्ला द्यायला जाल, त्याचा फारसा उपयोग होणार नाही. किरकोळ कारणामुळे पसे खर्च होतील.

तूळ तोंड झाकलं तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले की तोंड उघडे पडते असा अनुभव देणारा हा आठवडा आहे. राशीमध्ये आलेल्या गुरूमुळे तुम्ही आता प्रत्येक गोष्टीत उत्साही बनाल. पण ज्यांच्याकडून मदत पाहिजे आहे ते तुम्हाला वेळ देऊ शकणार नाहीत. व्यापार-उद्योगात  रोखीचे व्यवहार हाताळताना तुमचे दुर्लक्ष होऊ देऊ नका. नोकरीमध्ये सहकाऱ्यांवर शक्यतो महत्त्वाची कामे सोपवू नका.  घरामध्ये किरकोळ कारणावरून भांडय़ाला भांडे लागेल.

वृश्चिक ग्रहमान परस्परांविरोधी आहे. आíथक बाजू सुधारेल. ज्या गोष्टींची तुम्हाला स्वाभाविक आवड आहे. त्या करायला मिळाल्यामुळे तुम्ही आनंदात असाल.  व्यापार-उद्योगात  तुम्हाला आता भरपूर काम करावेसे वाटेल. पण ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्यांची मनोधारणा समजून घ्या. नोकरदार व्यक्ती त्यांचे काम चांगले करतील. मात्र सहकाऱ्यांचे काम स्वीकारण्यापूर्वी त्यांनी स्वत:च्या मर्यादा लक्षात घ्याव्यात. घरामध्ये तुम्ही सर्वाना खूश कराल.

धनू या आठवडय़ात जीवनाचा आनंद लुटण्याचा तुमचा मूड असेल. त्यासाठी तुम्हाला बरीच तडजोड करावी लागेल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता भलतीच तडजोड करू नका. नाहीतर तुमच्या उत्पन्नामध्ये फरक पडेल. नोकरदार व्यक्तींनी त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांचा जपून वापर करावा. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रमत्रिणींशी गाठभेट होईल.

मकर प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपल्याला मिळालेले यश आणि पसा कायम टिकून राहावा, पण तसे कधीच घडत नाही. म्हणून या आठवडय़ामध्ये तुमचा दृष्टिकोन वास्तवतावादी ठेवा. व्यापार-उद्योगात कोणत्याही एका व्यक्तीवर अवलंबून राहू नका. नोकरीच्या ठिकाणी स्वत:चे काम स्वत: पूर्ण करा. सहकाऱ्यांवर जास्त विसंबून राहिलात तर फजिती होईल. नवीन नोकारीच्या कामात यश लाभेल. घरामध्ये तुमच्या कल्पना आणि इतरांचे विचार यांच्यात बराच फरक असेल. प्रवासाच्या वेळेला स्वत:ची चीजवस्तू सांभाळा.

कुंभ ग्रहमान फसवे आहे. थोडेसे यश मिळाल्यानंतर माणसाच्या अपेक्षा वाढतात. तशा तुमच्या अपेक्षा वाढतील. पण नंतर हे मृगजळ आहे असे लक्षात येईल. व्यापार-उद्योगात अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करण्यापूर्वी त्यांची नीट माहिती मिळवा. हातचे सोडून पळत्याच्या मागे जाऊ नका. नोकरीच्या ठिकाणी संस्थेमध्ये एखादी अफवा पसरली असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. घरामध्ये सर्व काही ठीक असेल, पण आपले काहीच चांगले नाही ही भावना त्रासदायक ठरेल.

मीन ज्या मार्गाने तुम्हाला प्रगती करायची आहे, त्यामध्ये अडचणी आल्यामुळे वाकडी वाट करून पुढे जावे लागेल. व्यापार-उद्योगात अपेक्षित व्यक्तीकडून थोडेफार सहकार्य मिळेल. विनाकारण लोंबकळत पडलेली कामे पुढे सरकतील. नोकरीच्या ठिकाणी कामामध्ये बदल पाहिजे असेल तर वरिष्ठांना विनंती करा. घरामध्ये तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागाल. त्यामुळे इतरांशी किरकोळ खटके उडण्याची शक्यता आहे.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com