22 September 2020

News Flash

राशि भविष्य – दि. २२ ते २८ फेब्रुवारी २०१९

रवी-मंगळाचा लाभ योग आपल्या उत्साही वृत्तीला पोषक ठरेल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-मंगळाचा लाभ योग आपल्या उत्साही वृत्तीला पोषक ठरेल. नव्या कामांची जबाबदारी स्वीकाराल. हाती घेतलेली कामे जोषपूर्ण पद्धतीने पुढे न्याल. आपली कार्यकुशलता आणि कार्यक्षमता खरोखरच वाखाणण्यासारखी असेल. कामासाठी केलेले लहान-मोठे प्रवास फायदेशीर ठरतील. जोडीदाराचा विचार, सल्ला उपयोगी ठरेल. नोकरी-व्यवसायात फारसे यश हाती आले नाही तरी निराश न होता, कामाचा उरक कायम ठेवाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील.

वृषभ ‘आराम हराम है।’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून कामे केलीत तरच मनाप्रमाणे यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी जास्तीचा पैसा आणि शक्ती खर्ची पडेल. स्वशिस्तीचा अवलंब करावा लागेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेलच अशी आशा ठेवू नका. यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. जोडीदाराला व्यस्त दिनक्रमामुळे आपल्यासाठी वेळ काढणे थोडे कठीण जाईल. अशा वेळी त्याला समजून घेणे महत्त्वाचे ठरेल!

मिथुन बुध-शुक्राच्या लाभ योगामुळे धमाल, मजा, मस्ती यांकडे कल राहील. कामकाजाच्या ताणतणावातून मुक्त व्हाल. प्रवास आनंददायी आणि फलदायी होतील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. एकमेकांच्या विचारधारा चांगल्या जुळतील. वादाचे प्रसंग आलेच तरी ते शिताफीने टाळाल. नोकरी-व्यवसायात आपले काम वरिष्ठांच्या पसंतीस उतरले नाही तरी धीर सोडू नका. सातत्याने, अभ्यासपूर्वक मेहनतीने यशाकडे वाटचाल कराल.

कर्क बुध-गुरूच्या केंद्र योगामुळे महत्त्वाचे कागदपत्र नीट तपासून घ्यावेत. निष्काळजीपणामुळे किंवा नजरचुकीमुळे महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. केवळ भावनांचा विचार न करता व्यावहारिक दृष्टीने विचार करून वागाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारी वर्गाकडून मदत होईल. जोडीदाराची काही मते जरी पटली नाहीत तरी त्यावर आता आपले मत व्यक्त करू नका. आरोग्याच्या तक्रारींकडे वेळेवर लक्ष द्या.

सिंह गुरू-शुक्राच्या एक राश्यांतर योगामुळे मोठय़ा लोकांच्या ओळखी होतील. ज्ञान आणि कला यांच्या माध्यमातून आनंद मिळवाल.  रखडलेली कामे उशिरा का होईना पण पूर्ण होतील. जोडीदाराच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घ्याल. आपल्या मनातील प्रेम शब्दात व्यक्त करणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे, हे विसरू नका. नोकरी-व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबातील समस्या, अडचणी यांचा सारासार विचार करून त्या सोडवाल. घरात उत्साही वातावरण राहील.

कन्या बुध-प्लूटोच्या लाभ योगामुळे आपल्या वक्तृत्वकलेला नेतृत्वाची जोड लाभेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या म्हणण्याप्रमाणे कामे हातावेगळी कराल. सहकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. प्रवासात झालेल्या नव्या ओळखी फायदेशीर ठरतील. जोडीदाराच्या सोबतीने महत्त्वाचे निर्णय योग्यप्रकारे घ्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र असेल. आरोग्याची हेळसांड करू नका.

तूळ बुध-शुक्राच्या लाभयोगामुळे आपल्यातील कलागुणांना चाग्ांला वाव मिळेल. काही नवे विचार कलात्मक दृष्टीने मांडाल. मेहनतीला फळ मिळेल. वाचन, लेखन यातून आनंद मिळवाल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागून त्यांचे मन जिंकाल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित साहाय्य मिळेल. जोडीदाराची नाराजी प्रेमानेच दूर करावी लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. धार्मिक यात्रांचा योग येईल.

वृश्चिक द्वितीयातील शुक्र-प्लुटो युती सावधानतेचा इशारा देईल. शब्द जपून वापरावे लागतील. आपल्या आवाक्याबाहेरचे कोणतेही आश्वासन कोणाला देऊ नका. अचानक खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता दिसते. आर्थिक नियोजन करावे लागेल. वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. सहकारी वर्गाचे पाठबळ मिळविण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. जोडीदाराच्या साथीने अनेक अडचणींवर मात करा. सकारात्मक विचार करून आगेकूच कराल.

धनू रवी-मंगळाच्या लाभयोगामुळे आपल्या उत्साहात आणि कृतिशीलतेत वाढ होईल. एकापुढे एक कामे पूर्ण कराल. अधिकाराची पदे भूषवाल. आपल्या हातातील अधिकारांचा सुयोग्य वापर करून सर्वाना फायदेशीर ठरतील असे निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल तसेच वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रवासाला जाण्याचे बेत आखाल.

मकर बुध-गुरूच्या केंद्र योगामुळे ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ असे धोरण अवलंबावे लागले.  नोकरी-व्यवसायात आपले हक्क मिळवण्यासाठी आपले म्हणणे ठामपणे मांडावे लागेल. लाभातील गुरूच्या साहाय्याने यश मिळेल. जोडीदाराच्या लहान-मोठय़ा तक्रारी नीट समजून घ्याल आणि त्यावर उपाययोजना कराल. कौटुंबिक वातावरण शांत आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. डोळ्यांचे किंवा श्वसनासंबंधीचे त्रास अंगावर काढू नका.

कुंभ गुरू-शुक्राच्या एक राश्यांतर योगामुळे आपल्याजवळील ज्ञानाचा कलात्मक पद्धतीने कसा वापर करता येईल याचा विचार कराल. सादरीकरणाच्या नवीन पद्धतीचा अवलंब कराल. जोडीदाराची साथसोबत चांगली लाभेल. आपल्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने पूर्ण कराल. कामासाठी केलेले लहानमोठे प्रवास त्रासदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल.

मीन बुध-गुरूच्या केंद्रयोगामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय जाहीर करताना त्याबद्दल पुन्हा विचार करावा लागेल. जास्तीत जास्त लोकांच्या हिताचा विचार आपण नक्कीच कराल. अनावश्यक खर्च प्रकर्षांने टाळाल. नोकरी-व्यवसायात विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक घेतलेले निर्णय आपणास यशाची वाट मोकळी करून देतील. जोडीदाराचे मन वळवण्यासाठी त्याच्या कलाने घ्यावे लागेल. मनधरणी करावी लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 1:01 am

Web Title: astrology 22nd to 28th february 2019
Next Stories
1 राशी भविष्य : दि. १५ ते २१ फेब्रुवारी २०१९
2 राशिभविष्य : दि. ८ ते १४ फेब्रुवारी २०१९
3 राशिभविष्य : दि. १ ते ७ फेब्रुवारी २०१९
Just Now!
X