सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष मंगळ-शुक्राच्या केंद्रयोगामुळे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होईल असे नाही. परंतु याचा जिवाला त्रास करून न घेता तडजोड करावी लागेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाकडून साहाय्य मिळेल. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. जोडीदाराची बाजू ऐकून घ्याल. आपल्या अडचणींवर जोडीदार उपाय सुचवेल. सारासार विचार करून अंतिम निर्णय घ्याल.

वृषभ शुक्र-हर्षलाच्या लाभयोगामुळे सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कलागुणांचे सादरीकरण करून लोकांची वाहवा मिळवाल. नोकरी-व्यवसायात नव्या योजना वरिष्ठांपुढे मांडाल. सहकारीवर्गाच्या सर्वागीण प्रगतीचा विचार कराल. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात व्यस्त असल्याने हवा तितका वेळ आपल्याला देऊ शकणार नाही, पण विचारांची देवाणघेवाण नक्कीच करू शकाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मिथुन बुध-नेपच्यून युतीमुळे आपल्या कुशाग्र बुद्धीला जोड मिळेल. संशोधन क्षेत्रातील कार्याला वेग येईल. अनेक मुद्दे नव्याने, अभ्यासपूर्वक आणि कल्पकतेने मांडाल. वरिष्ठांचे साहाय्य लाभेल. सहकारीवर्गावर सोपवलेली कामे वेळेत पूर्ण होतील. जोडीदाराची नाखुशी प्रेमाच्या चार शब्दांनी दूर करावी लागेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. घसा आणि पोटाच्या तक्रारी डोकं वर काढतील. काळजी घ्यावी.

कर्क गुरू-मंगळाच्या षडाष्टक योगामुळे एखाद्या कार्यात स्वत:ला झोकून द्याल. मागचापुढचा फारसा विचार न करता पुढे जाल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. नोकरी-व्यवसायात विरोधकांचे वर्चस्व सहन करावे लागेल. तडकाफडकी निर्णय घेणे आपल्या स्वभावात नाही. त्यामुळे एकंदर परिस्थितीचा साकल्याने विचार करूनच निर्णय घ्याल. जोडीदारासह असलेले वैचारिक मतभेद चर्चेने दूर कराल.

सिंह शुक्र-हर्षलाच्या लाभयोगामुळे ध्येयाकडे वाटचाल कराल. सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात अभिनव उपक्रम लोकांपुढे मांडाल. वरिष्ठांची सहमती मिळवाल. सहकारीवर्गाचे पाठबळ उपयोगी पडेल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि समाधानी राहील. हाडे आणि स्नायू यांचे आरोग्य जपावे लागेल. आवडत्या छंदात मन रमवून कल्पनाशक्ती आणि वेळेचा सदुपयोग कराल.

कन्या बुध-नेपच्यूनच्या युती योगामुळे काही कल्पक विचारांना  कृतीची जोड मिळेल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कामाची गती वाढेल. याचा आर्थिक मोबदलादेखील मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती कराल. जोडीदाराच्या नाराजीचा सामना करावा लागेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. नियमित व्यायामाचा संकल्प नेटाने राबवलात तर आरोग्यदायी जीवन जगाल.

तूळ शुक्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे शुक्राच्या कलेला मंगळाच्या धडाडीचे पाठबळ मिळेल. कला लोकांपर्यंत पोहोचेल. बौद्धिक दृष्टीने प्रगती कराल. यशाची नवी शिखरे पादाक्रांत कराल. वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारीवर्गाच्या मदतीला धावून जाल. आपल्या ओळखींमुळे गरजूंना साहाय्य कराल. जोडीदार त्याच्या नातेवाईकांची सरबराई करण्यात मग्न असेल. त्याला आपल्या पाठिंब्याची गरज आहे, याचे भान असावे.

वृश्चिक मंगळ-गुरूचा षडाष्टक योग अनावश्यक खर्च वाढवील. धनस्थानातील शनी या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल. वरिष्ठांचे काही विचार न पटूनही मान्य करावे लागतील. सहकारीवर्ग आपल्या विचारांना सहमती देतील. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होईल. याचा कुटुंबाला चांगला फायदा होईल. पित्त प्रवृत्तीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

धनू बुध-नेपच्यूनच्या युती योगामुळे मनातील विचार व्यक्त करण्यासाठी योग्य शब्दांचा वापर कराल. त्यामुळे पूर्वी आपल्याबद्दल झालेले लोकांचे गैरसमज दूर व्हायला मदत होईल. नोकरी-व्यवसायात नव्या आणि फायदेशीर संकल्पना वरिष्ठांपुढे मांडाल. आर्थिक लाभ होतील. सहकारीवर्गाला अपेक्षित मदत कराल. जोडीदाराचे पारडे जड राहील. त्यामुळे त्याचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानुसार वागावे लागेल. दोघांच्या ते फायद्याचेच असेल.

मकर मंगळ-शुक्राच्या केंद्रयोगामुळे प्राप्त गोष्टींचे समाधान मिळणार नाही. चिकाटीने आणखी प्रयत्न करत राहाल. हे प्रयत्न करताना आपल्या क्षमतेचा जरूर विचार करावा. अति श्रमाने प्राप्त गोष्टींचा आनंद हरवून बसू नका. ‘सबुरीचे गोड फळ’ नक्कीच मिळेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. मित्र परिवार मोलाचे साहाय्य करेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जोडीदारासह एखाद्या छोटय़ा प्रवासाचा आनंद लुटाल.

कुंभ गुरू-मंगळाच्या षडाष्टक योगामुळे नव्या जबाबदाऱ्या पेलण्यात व्यस्त राहाल. कामाचा उत्साह वाढेल. टीमवर्क करताना नेतृत्व चांगले कराल. लग्नी / प्रथम स्थानातील बुध-नेपच्युन युती वैचारिकतेला कल्पकतेची जोड देईल. वरिष्ठ आपल्या कामावर खूश होतील. सहकारीवर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराच्या लहान-मोठय़ा समस्यांवर उपाय शोधाल. कौटुंबिक वातावरण उत्साही आणि आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील.

मीन शुक्र-हर्षल लाभयोगामुळे आपल्यातील कलात्मकतेला वाव मिळेल. कला-साहित्य यासंबंधी नवीन गोष्टी खरेदी कराल. नोकरी-व्यवसायात मित्रमंडळींच्या ओळखींचा फायदा होईल. क्षुल्लक मुद्दय़ांवरून वरिष्ठांशी वाद होतील. सहकारीवर्ग आपली बाजू घेईल. जोडीदाराच्या भावनांची कदर करून त्याला आपला आधार द्याल. त्याचा आत्मविश्वास वाढवाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील.