05 December 2019

News Flash

भविष्य – दि. २५ ते ३१ जानेवारी २०१९

सुरुवातीचे दिवस धावपळ-दगदगीचे असले तरी उत्तरार्धात केलेल्या कष्टाचं चीज होईल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष सुरुवातीचे दिवस धावपळ-दगदगीचे असले तरी उत्तरार्धात केलेल्या कष्टाचं चीज होईल. नोकरी-व्यवसायात दशमातील रवी मानसन्मान देईल, पण वातावरण तणावपूर्ण राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. जोडीदाराचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण क्षुल्लक गोष्टींमुळे धूसर होण्याची शक्यता आहे. समज-गैरसमज वेळीच दूर करणे हिताचे ठरेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींवर औषधोपचारांनी सहज मात कराल.

वृषभ मनापासून आणि आनंदाने समोर आलेल्या कामांचा उरक पाडाल. ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ अशी जिद्द मनाशी बाळगून कामाला लागाल. नोकरी-व्यवसायातील अनेक प्रश्न व्यावहारिक आणि विवेकी विचारांनी सोडवाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घ्याल. उत्तरार्धात शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. अशा वेळी मित्र-मैत्रिणी आणि आवडत्या छंदामध्ये रममाण व्हाल.

मिथुन अनेक अडीअडचणींवर मात करून शेवटी विजय आपलाच होईल. पेचप्रसंगांना सामोरे जाताना आत्मविश्वास ढळू देऊ नका. गुरू-मंगळाच्या नवपंचम योगामुळे महत्त्वाकांक्षेला खतपाणी मिळेल. प्रयत्नशील, कृतिशील राहाल. आर्थिक उन्नती होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आणि सहकाऱ्यांसह संबंध सुधारतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जोडीदाराच्या ‘अहम’ला धक्का लागू देऊ नका. वैयक्तिक निर्णय त्याचे त्याला घेण्याचे स्वातंत्र्य द्या.

कर्क सप्तमातील रवी-बुध युतीमुळे जोडीदारासह वैचाारिक बंध चांगले जुळतील. आपण आपले बौद्धिक छंदही जोपासाल. वाचन-लेखन यात मन रमवाल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाच्या साथीने हाती घेतलेली कामे वेळेच्या आत पूर्ण कराल. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. अनावश्यक किंवा अचानक होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. गरजूंना मदतीचा हात पुढे कराल. प्रवासात आरोग्याची चांगली साथ मिळेल.

सिंह चतुर्थातील गुरू-शुक्र युतीमुळे मानसिक समाधान मिळेल. नव्या योजना कार्यान्वित करण्याचे सामथ्र्य मिळेल. वरिष्ठ आणि सहकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. आता चिकाटीने काम करण्याची गरज आहे. यशाच्या चाहुलीने हुरळून न जाता कामात सातत्य राखणे गरजेचे राहील. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींवर वेळीच औषधोपचार करा. कौटुंबिक वातावरणात शुभ वार्ता कळतील. जोडीदारावर सत्ता न गाजवता त्याच्या मनाप्रमाणे निर्णय घेण्याची संधी द्याल.

कन्या शनी-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे धरसोड वृत्तीला लगाम बसेल. चिकाटीने कामे पूर्ण कराल. युक्तिवाद साधून आपली कामे करवून घ्याल. आपल्या कार्यामुळे समाजात मानसन्मान मिळेल. आपण मांडलेले मुद्दे सुरुवातीला वरिष्ठांना पटणार नाहीत. खूप मेहनत घेऊन त्यांना ते पटवून द्यावे लागतील. नोकरी-व्यवसायानिमित्त केलेले छोटे प्रवास लाभदायक ठरतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्र-आप्तेष्टांसाठी खर्च करावा लागेल.

तूळ मंगळ-शुक्राच्या नवपंचम योगामुळे आपल्या कलागुणांच्या सादरीकरणाला चांगला वाव मिळेल. याचा आर्थिकदृष्टय़ा-देखील लाभ होईल. प्रेमवीरांची हिंमत वाढवणारे ग्रहयोग आहेत. नोकरी-व्यवसायात मनासारखी प्रगती होईल. कौटुंबिक वातावरणातील गैरसमजाचे ढग समोरासमोर बसून, बोलून हलकेच दूर कराल. पण जोडीदाराची समजूत  गोडीगुलाबीनेच होईल.

वृश्चिक गुरू-मंगळाच्या नवपंचम योगामुळे आपण उत्साही आणि आनंदी राहाल. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आगेकूच कराल. अनेक अडचणींवर मात करून प्रयत्न करत राहाल. आपल्या अनुभवातून मिळालेले धडे इतरांना देऊन त्यांना प्रगतीचा योग्य मार्ग दाखवाल. नोकरी-व्यवसायासाठी केलेल्या छोटय़ा प्रवासांचा फारसा फायदा होणार नाही. पण आपण हिंमत न सोडता प्रयत्नशील राहाल. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील.

धनू जे बोलाल ते विचार करून आणि सांभाळूनच बोला. उदार अंत:करणाने दुसऱ्याला केलेली मदत सत्कारणी लागतेय की नाही याची शहानिशा जरूर कराल. नोकरी व्यवसायात अपेक्षित आर्थिक लाभ होणार नाहीत. पण कामाचा व्याप वाढेल. त्याचा तणाव घेऊ नका. कौटुंबिक वातावरणावर याचा थोडा परिणाम दिसून येईल. जोडीदाराच्या उत्साही स्वभावामुळे घरात आनंदी वातावरण राहील. कामाच्या धावपळीत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवू नका.

मकर ‘येईल त्या परिस्थितीला सामोरे जाणे, कोणत्याही प्रकारचे कष्ट करण्याची तयारी असणे आणि चिकाटीने आपले काम पूर्ण करणे’ या आपल्या अंगभूत स्वभावाला शनी-नेपच्यूनचा लाभ योग साहाय्यकारी ठरेल. आपल्या मेहनतीचे चीज होईल. ओळखीच्या व्यक्तींकडून कामाला गती मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. फुकटच्या सल्ल्याची कोणालाही किंमत नसते याची प्रचीती येईल. श्वसन संस्थेसंबंधित तक्रारींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

कुंभ दशमातील गुरू-शुक्र युतीमुळे मानसन्मान मिळेल. आपल्या कार्याची कीर्ती सर्वत्र पसरेल. ओळखीच्या व्यक्ती, आप्तेष्ट, मित्र-मैत्रिणी यांचे सहकार्य लाभेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारी वर्गाकडून योग्य प्रकारे कामे करून घ्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जोडीदाराला त्याच्या कामातून आपल्यासाठी वेळ काढणे थोडे कठीण जाईल. परंतु एकमेकांना समजून घेण्याची हीच खरी वेळ आहे.

मीन मनात योजलेल्या धार्मिक यात्रा पूर्ण होतील. यातून मानसिक समाधान मिळेल. लेखन-वाचन यांसारखे बौद्धिक छंद जोपासाल आणि नोकरी व्यवसायातील ताणतणावापासून दूर रहाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदारासह मनमोकळे बोलल्याने कधीकाळी झालेले गैरसमज दूर होतील. एकमेकांवरील विश्वास अधिक दृढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

First Published on January 25, 2019 1:01 am

Web Title: astrology 25th to 31st january 2019
Just Now!
X