मेष बहुतांशी ग्रहमान चांगले असल्यामुळे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागाल. कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा याकडे मात्र लक्ष ठेवा. व्यापार-उद्योगात पशाची आवक अपेक्षेनुसार असल्यामुळे तुमच्या गरजा भागतील. नोकरीमध्ये एखाद्या कामानिमित्त तुम्हाला विशेष अधिकार मिळतील. घरामध्ये लक्ष द्यायला तुम्हाला फारसा वेळ मिळणार नाही. पण इतरांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. सप्ताहाची सुरुवात धावपळीत जाईल.

वृषभ  मानले तर समाधान अशी तुमची स्थिती असणार आहे. जी कामे विनाकारण लांबली होती त्यांना थोडीशी गती मिळाल्याने तुमचा जीव भांडय़ात पडेल. व्यापार-उद्योगात खूप पैसे हातात न पडल्याने तुम्ही थोडेसे नाखूश असाल. नोकरीच्या ठिकाणी कंटाळवाणे काम थोडेसे पुढे सरकेल. बेकार व्यक्तींनी मिळालेली संधी सोडू नये. घरामध्ये जर काही रुसवे-फुगवे झाले असतील तर त्यामध्ये समेट घडेल.

मिथुन ग्रहांचे आधिक्य वाढल्याने प्रत्येक गोष्ट पार पाडताना तुमच्यापुढे आव्हान असेल. ते स्वीकारण्या-करिता कंबर कसून सिद्ध व्हा. व्यापारामधले बेत गुप्त ठेवा. नोकरीच्या ठिकाणी आपले काम पूर्ण झाल्याशिवाय सहकाऱ्यांच्या मदतीला जाऊ नका. कामातील दगदग वाढल्यामुळे तुम्ही ठरविलेले काही बेत मागेपुढे होतील. घरामध्ये काही खर्च अनपेक्षितरीत्या उपटण्याची शक्यता आहे.

कर्क  तुमचे घर आणि नोकरी-व्यवसाय या दोन्ही आघाडय़ांवर तुम्हाला सतर्क राहावे लागेल. व्यापार-उद्योगातील काही महत्त्वाची कामे मार्गी लावण्यासाठी मध्यस्थांचा उपयोग करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचा आणि गुणांचा संस्थेला चांगला उपयोग होईल. मात्र काम वेळेत पूर्ण करण्याकरिता तुम्हाला घडय़ाळाच्या काटय़ानुसार नियोजन करावे लागेल. घरामध्ये जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव असेल.

सिंह प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून काही तरी वेगळे आणि चांगले काम करावेसे वाटेल. परंतु प्रकृतीचा अंदाज घेतल्याशिवाय कामाचे नियोजन करू नका. या आठवडय़ात तुम्हाला करिअर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर संधी न सोडता त्यावर तुम्ही तुटून पडाल. कारखानदार मंडळी महत्त्वाच्या मीटिंगसाठी छोटी परदेशवारी करतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला विशेष सवलती द्यायला तयार होतील.

कन्या ‘तोंड झाकले की पाय उघडे पडतात, पाय झाकले की तोंड उघडे पडते’ अशी तुमची स्थिती असणार आहे. करिअरकडे लक्ष दिले तर घरामधील व्यक्तींना राग येईल. घरात जास्त लक्ष दिले की करिअरकडे दुर्लक्ष होईल. आपण नेहमीच्या कामात कमी पडतो ही भावना त्रास देईल. यातून बाहेर पडण्याकरिता कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे हे तुम्ही ठरवा. व्यवसाय-उद्योगात काही नवीन कामे मिळाली की तुमचा कामाचा वेग वाढेल.

तूळ वरून तुम्ही अगदी शांत आणि सुस्त वाटाल. या आठवडय़ात फारसे काही कराल असे इतरांना वाटणार नाही. पण तुमच्या मनात मात्र कामाची आखणी आधीच झाली असेल. व्यापार-उद्योगात घडय़ाळाच्या काटय़ानुसार सर्व गोष्टी पार पाडाल. पशाच्या कामांना महत्त्व द्यावे. इतर गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष कराल. नोकरीत तुम्हाला सर्व फायदे हवे असतील पण त्याकरिता काम करण्याची तयारी नसेल.

वृश्चिक तुमचे मन आणि कृती यामध्ये पूर्णपणे विरोधाभास असेल. काहीही काम न करता मस्तपैकी आराम करावा असा विचार तुमच्या मनामध्ये येईल. व्यापार-उद्योगात पूर्वी लांबविलेली देणी  आठवडय़ाच्या सुरुवातीला द्यावी लागतील. पण त्याची कसर नंतर भरून निघाल्याने तुम्हाला बरे वाटेल. घरामधील सदस्य त्याच्या स्वार्थापोटी तुमची स्तुती करतील. पण तेवढय़ाने तुमचे समाधान होणार नाही.

धनू  ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत. त्यामुळे कितीही अडथळे आले तरी न डगमगता काम करत राहा. व्यापार-उद्योगात जे व्यवहार होतील, त्यामुळे पैसे मिळण्याचे तुमची उमेद वाढेल. त्या जोरावर एखादे छोटे काम सुरू करता येईल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामाबाबत जोवर वरिष्ठ आज्ञा देत नाहीत तोपर्यंत त्या कामाला सुरुवात करू नका. घरामधल्या नैतिक जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीरीत्या पूर्ण करू शकाल.

मकर एकीकडे तुम्हाला खूप काम करावेसे वाटेल तर दुसरीकडे जीवनाचा आस्वाद घ्यावासा वाटेल. अशा संभ्रमात आठवडा जाणार आहे. या आठवडय़ात जी कामे तुम्ही काही कारणाने अर्धवट ठेवली होतीत त्या कामात लक्ष घालणे भाग पडेल. व्यापार-उद्योगात संपूर्ण आठवडा धावपळीत जाईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कष्टाळू स्वभावाचा गैरफायदा घेतील. घरामध्ये एखादा शुभ कार्यक्रम ठरेल. तुमच्या खिशावर ताण येईल.

कुंभ प्रत्येक काम पूर्ण होण्याची तुम्हाला खात्री असेल. पण त्यासाठी कोणावर तरी अवलंबून राहाणे भाग पडेल. ही गोष्ट तुमच्या स्वभावाला रुचणारी नाही. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण वाढत जाईल. प्रत्येक काम वेळेत होण्यासाठी गिऱ्हाईकांची घाई असेल. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामात वरिष्ठ तुम्हाला गृहीत धरतील.  घरामधील सदस्यांच्या मागण्या रास्त असल्याने त्यांना ‘नाही’ म्हणता येणार नाही.

मीन ग्रहमान तुम्हाला लाभदायक आहे. प्रत्येक माणसाला जे मिळाले आहे त्यापेक्षा अधिक काही तरी पाहिजे असते. व्यापार-उद्योगात शक्ती आणि युक्ती यांचा वापर करून कमाई वाढवण्याचा प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणी जे आपल्यापाशी आहे त्यामध्ये आनंद माना.  घरामध्ये एखादे चांगले कार्य पार पडेल. त्यानिमित्त आवडत्या व्यक्तींची हजेरी लागेल.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com