01vijay1मेष एका विशिष्ट कालावधीमध्ये काही माणसे आपल्याजवळ येतात आणि तो काळ संपल्यावर ती आपोआप लांब जातात. या आठवडय़ात याचा तुम्हाला प्रत्यय येईल. व्यापार-उद्योगात कामाच्या निमित्ताने नवीन व्यक्तींशी संपर्क साधला जाईल. नोकरीमध्ये जे काम आपले नाही त्यामध्ये वेळ वाया घालवू नका. वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य माना. घरामध्ये एखाद्या लांबच्या व्यक्तीशी गाठभेट होईल. घरगुती मेळावा ठरण्याची शक्यता आहे.

वृषभ या आठवडय़ात जे काम तुम्ही सरळ मार्गाने करायला जाल त्यामध्ये पाहिजे तसा फायदा न मिळाल्यामुळे तुम्हाला वाट वाकडी करावी लागेल. व्यवसाय-उद्योगात एखादी फसवी संधी तुमच्या डोळ्यांसमोर असेल. त्यातले बारकावे काटेकोरपणे लक्षात घेतले तर ते मृगजळ आहे असे लक्षात येईल. नोकरीच्या ठिकाणी जे काम व्यवस्थितपणे चालू आहे त्या कामात वरिष्ठ विनाकारण ढवळाढवळ करतील. खरे सहकारी उपयोगी पडतील. घरामध्ये तुमच्या हट्टी स्वभावाचा इतरांना अनुभव येईल.

मिथुन कालचक्र कोणासाठी थांबत नाही. जी संधी पुढे येणार आहे तिचा ताबडतोब फायदा उठवा. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात सध्या चालू असलेले काम बंद न करता काही तरी नवीन करावेसे वाटेल. ज्या कामात सुरुवातीची गुंतवणूक कमी आहे असे काम तुम्ही निवडलेत तर तुमचाच फायदा होईल. नोकरदार व्यक्तींना बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यांच्या आवडीचे काम मिळेल. कष्ट मात्र वाढतील. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधण्याचे कठीण काम तुम्हाला करावे लागेल.

कर्क तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे ग्रह आता अनुकूल होत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्याचा फायदा घेऊन लांबविलेली कामे मार्गी लावा. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात नवीन भागीदारी किंवा मत्रीकराराचे प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींची एखाद्या चांगल्या प्रोजेक्टकरिता निवड होईल. हे काम कष्टदायक पण तुमच्या आवडीचे असेल. काही जणांना थोडय़ा अवधीकरिता परदेशी जाता येईल. घरामध्ये इतरांना न जमलेले काम तुमच्यावर सोपवले जाईल.

सिंह धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी तुमची परिस्थिती होण्याची शक्यता आहे. एखादे नवीन काम हातात घेण्याचा मोह होईल. व्यापार-उद्योगात एखादा अनपेक्षित प्रश्न हातावेगळा करण्यात तुमचा बराच वेळ आणि शक्ती खर्च होईल. नोकरीमध्ये एकटय़ाने सर्व कामे करायला जाऊ नका. सहकाऱ्यांकडून काही गोष्टी करून घेण्यासाठी त्यांच्या दाढीला हात लावावा लागेल. नवीन नोकरीच्या बाबतीत थोडासा विलंब होईल.

कन्या ग्रहमान तुमच्यामध्ये विचारांचे एक नवीन पर्व निर्माण करणार आहे. ज्या गोष्टी सहज आणि सोप्या वाटल्या होत्या त्या वेगळी कलाटणी घेतील. तुम्हाला तुमची नेहमीची कार्यपद्धती सोडून नवीन मार्ग शोधावा लागेल. व्यापार-उद्योगात पूर्वीच्या एखाद्या गिऱ्हाईकाकडून तुम्ही केलेल्या कामाला पुन्हा मागणी येईल. नोकरीच्या ठिकाणी संस्थेकडून तुम्हाला एखादी विशेष सुविधा मिळेल. त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्याल. घरामध्ये सर्व काही ठीक असेल, पण एखाद्या कारणाने तुम्ही इतरांवर तुमचा राग काढण्याची शक्यता आहे.

तूळ वास्तविक तुम्ही सरळ मार्गाने जाणे पसंत करता, पण आठवडय़ात त्याचा फारसा उपयोग न झाल्याने तुम्हाला तुमची वाट वाकडी करावी लागेल. व्यापार-उद्योगाच्या कामात ज्या प्रोजेक्टवर पूर्वी तुम्ही काम करून ठेवले होते त्याचा आता उपयोग होईल. एखादा जुना वाद निकालात काढण्यासाठी मध्यस्थाची मदत घ्यावी. नोकरीमध्ये कंटाळवाणे काम संपुष्टात आणण्यासाठी नवीन पद्धतीचा वापर कराल. बेकार व्यक्तींना नोकरी मिळविण्यात विलंब होईल. घरामध्ये पाहुण्यांची अचानक हजेरी लागेल.

वृश्चिक काळ बदलला की सर्व काही बदलते याचा अनुभव देणारे हे ग्रहमान आहे. नुकताच शनी धनस्थानात आल्यामुळे साडेसातीची शेवटची अडीच वष्रे सुरू झाली आहेत. जे अनुभव तुम्हाला आले होते त्याचा तुम्हाला पुढील निर्णय घ्यायला उपयोग होणार आहे. व्यापार-उद्योगात अनाठायी झालेले नुकसान भरून काढण्याचे ठरवाल.  नोकरदार व्यक्ती नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याकरिता मनाची तयारी करतील. घरामध्ये सर्वाच्या भल्याकरिता कटू धोरण अवलंबावे लागेल.

धनू एकाच वेळी तुमचे घर आणि तुमचे करियर या दोन आघाडय़ांवर तुम्हाला सक्रिय राहायचे आहे. नुसते काम न करता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अशी नीतिमत्ता वापराल. व्यापार-उद्योगात   जुन्या कार्यपद्धतीपेक्षा एखादे नवीन तंत्रज्ञान जास्त फलदायी ठरेल. नोकरीतील कामाच्या निमित्ताने वेगळ्या वर्तुळात येऊन पोहचाल. सहकारी तुमच्या चांगुलपणाचा गरफायदा घेतील. घरामध्ये तुमचे विचार योग्य असूनही जोडीदाराला ते पटणार नाहीत.

मकर ग्रहमान तुमचा एक वेगळाच मूड इतरांसमोर आणेल. या आठवडय़ामध्ये तुम्ही इतरांना जास्त किंमत न देता माझे तेच खरे असा दृष्टिकोन ठेवाल. व्यापार-उद्योगात नवीन प्रकल्प तुमच्यापुढे असतील. त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा मोह होईल. पण अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या आणि मगच पुढे जा. नोकरीच्या ठिकाणी संस्थेमधल्या राजकारणांमध्ये भाग न घेता आपल्या कामावर लक्ष केद्रित करा. प्रत्येक काम बिनचूक असू दे. घरामध्ये इतरांच्या शब्दाला आणि भावनेला मान द्या. त्यामुळे वातावरण हसते खेळते राहील.

कुंभ ग्रहमान तुमच्या आचारविचारात एक चांगला बदल घडवून आणणार आहे. विचार जास्त आणि कृती कमी अशी तुमची नेहमी कामाची पद्धत असते. पण या आठवडय़ामधे कृतीला तुम्ही प्राधान्य द्याल. व्यापार-उद्योगात बाजारातील प्रतिष्ठा वाढविण्या-करिता एखादी वेगळी युक्ती योजाल. त्यामधून तुमचा आíथक फायदा चांगला येईल. नोकरीच्या ठिकाणी इतरांना न जमलेले काम तुम्ही युक्तीने पूर्ण करून दाखवाल. घरामध्ये तुम्ही दिलेला सल्ला इतरांना लगेच पटणार नाही.

मीन ग्रहमान बदलले की सर्व काही बदलते. अशा वेळी माणसाच्या हाती एकच गोष्ट राहते, ती म्हणजे तडजोड करणे. पण आता तुम्ही जी तडजोड करणार आहात त्यातून तुमचाच फायदा होणार आहे. व्यापार-उद्योगात ज्यांनी एकेकाळी तुम्हाला सहकार्य द्यायचे कबूल केले होते ते आपला शब्द पाळतील. नोकरीमध्ये वरिष्ठांना तुमच्या कामाचे महत्त्व समजल्याने तुम्हाला हुरूप येईल. घरामध्ये डागडुजी, रंगरंगोटी होण्याची शक्यता आहे.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com