News Flash

भविष्य : दि. २७ जुलै ते २ ऑगस्ट २०१८

विचारापेक्षा कृतींवर जास्त भर ठेवणारी तुमची रास आहे.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष विचारापेक्षा कृतींवर जास्त भर ठेवणारी तुमची रास आहे. पण आता ‘अति घाई संकटात जाई’ याची आठवण ठेवा. व्यापारउद्योगात स्वत:चा मोठेपणा दाखवण्याकरिता धाडस करण्याचा मोह होईल. त्यावर नियंत्रण ठेवा.  नोकरीमध्ये अतिउत्साहाच्या भरात केलेली एखादी घोषणा अंगलट येईल. घरामधल्या छोटय़ा-मोठय़ा वादावरून तुमचा राग उफाळून येईल. वाहन चालवताना/ मशीनवर काम करताना बेसावध राहू नका.

वृषभ एखाद्या कामामध्ये  विनाकारण होणारा विलंब तुम्हाला सहन होणार नाही. अशा कामात तुम्ही ‘शेंडी तुटो वा पारंबी’ या नात्याने निर्णय घेताना आíथक धोका विनाकारण घेऊ नका. व्यापार-उद्योगात  स्पर्धक तुमच्याविरुद्ध कंडय़ा पिकवतील, त्याकडे लक्ष देऊ नका. पशाचे व्यवहार स्वत: हाताळा. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे बोलणे ऐकून घ्या, पण तुमच्या कामात कसूर करू नका. घरामध्ये एखाद्या कारणाने रागाचा पारा वर जाईल.

मिथुन थोडासा आराम करावा ही भावना मनात घर करेल. पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा व्याप वाढत जाईल. व्यापारउद्योगात महत्त्वाची कामे सप्ताहाच्या सुरुवातीला हातात घ्या. नवीन कामासंबंधी बोलणी होतील, पण त्यामध्ये घाईने कृती करू नका. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी झालेली एखादी चूक निस्तरावी लागेल. घरामध्ये तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडाव्यात असा तुमचा आग्रह असेल.

कर्क ग्रहमान थोडेसे विचित्र आहे. नवीन व्यक्तींशी ओळख करून घेण्यापूर्वी तुमचा दृष्टिकोन सावध ठेवा. व्यापारउद्योगात अतिपशाच्या मोहाने अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. नोकरीच्या ठिकाणी ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ असा तुमचा कानमंत्र ठेवा. वरिष्ठांनी दिलेले काम वेळेत आणि त्यांच्या गरजेनुसार पार पाडा. घरामध्ये जोडीदाराच्या प्रगतीमुळे किंवा प्रकृतीमुळे थोडीशी काळजी वाटेल.

सिंह गेल्या एक-दोन आठवडय़ामध्ये जी कामे विनाकारण लोंबकळत पडलेली होती ती संपविण्याचा तुम्ही निश्चय कराल. त्यामध्ये जवळजवळ निम्मा आठवडा निघून जाईल. व्यापारउद्योगात पूर्ण झालेल्या कामाचे पसे मिळतील, पण त्यासाठी तुम्हाला बरेच कष्ट पडतील. नोकरीच्या ठिकाणी कामाचा तुम्ही थोडासा आळस कराल. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा गोष्टीत मानापमानाची भावना ठेवाल. त्याचा तुम्हालाच जास्त त्रास होईल.

कन्या तुमची रास खूप संवेदनशील आहे, पण या आठवडय़ामधे तुम्ही थोडेसे बिनधास्त राहिलात तर तुमच्या हातून चांगले काम होईल. राशीमध्ये आलेला शुक्र तुमचा तणाव थोडासा कमी करेल. व्यापारउद्योगात योग्य कामाकरिता योग्य माणसाची निवड करा. आíथक व्यवहार मात्र स्वत:च हाताळा. नोकरीच्या ठिकाणी आठवडा खूप दगदगीचा जाईल. घरामध्ये प्रत्येकाच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील.

तूळ बरेचसे ग्रह अनुकूल असल्यामुळे तुमच्यात आता एक प्रकारची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा निर्माण होईल. ‘हाती घ्याल ते तडीस न्याल’ असा तुमचा बाणा असणार आहे. सप्ताहाची सुरुवात एखाद्या चांगल्या बातमीने किंवा घटनेने होईल. पण जसजसे कामाला लागाल तसतशी त्यात गुंतागुंत दिसू लागेल. व्यापारउद्योगातील तुमचे भविष्यातील बेत गुप्त ठेवा. नोकरीच्या जागी वरिष्ठ दुसरे एखादे काम तुमच्या गळ्यात मारतील.

वृश्चिक गेल्या एक-दीड महिन्यापासून ज्या अडथळ्यांमुळे तुमच्या कामाला खीळ बसली होती त्यावर आता काहीतरी उपाय योजायचे ठरवाल. गरज पडली तर थोडासा धोका पत्करण्याची तुमची तयारी असेल. व्यापारउद्योगात प्राप्तीचे प्रमाण वाढल्यामुळे तुमचा आत्मविश्वास जागृत होईल. नोकरीच्या ठिकाणी ज्यांनी तुम्हाला विरोध केला होता त्यांना न जुमानता तुम्ही तुमच्या पद्धतीनेच वागायचे ठरवाल.

धनू जे निर्णय तुम्ही घेणार आहात त्याचा भविष्यावर काय परिणाम होईल याचा विचार करून नियोजन करा. व्यापारउद्योगात ज्यांचा तुमच्याकडून मतलब आहे त्या व्यक्ती तुम्हाला खूश करण्याचा प्रयत्न करतील. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या शब्दाला भुलून न जाता तुमचे काम एकाग्रतेने हाताळा. घरामधील एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तुमचा रागाचा पारा वर जाईल. अशा वेळी संयम सोडू नका.

मकर गुरू तुम्हाला अनुकूल आहेत. त्यामुळे शांतपणे काम करायचे असे तुम्ही ठरवाल, पण एखाद्या छोटय़ा प्रसंगामुळे तुमची शांतता ढळण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगात पशाच्या कारणावरून कोणाशी मतभेद झाले असतील तर त्यामध्ये सामोपचाराची भूमिका ठेवा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर ती निस्तरण्यात थोडा वेळ जाईल. घरामध्ये इतरांच्या कलाने वागणे श्रेयस्कर ठरेल.

कुंभ गेल्या आठवडय़ात एखाद्या प्रश्नामध्ये गोंधळ निर्माण झाला असेल तर तो निस्तरण्यामध्ये बराच वेळ जाईल. अशावेळी आपले हितचिंतक कोण आणि छुपे शत्रू कोण याची परीक्षा होईल. व्यापारउद्योगात जे पसे मिळतील ते अत्यावश्यक कारणाकरिता खर्च करावे लागतील.  नोकरदार व्यक्तींना त्यांच्या मनाविरुद्ध काम करावे लागेल. घरामध्ये प्रत्येकाची गरज वेगळी असल्याने कोणाचेच कोणाकडे लक्ष नसेल.

मीन एक चांगले आणि एक वाईट तुमच्या वाटय़ाला येणार आहे. सप्तमस्थानात आलेला शुक्र तुमचा ताणतणाव थोडय़ा प्रमाणात कमी करेल.  व्यापारउद्योगात प्रमाणाबाहेर जास्त पसे मिळविण्याकरीता नको ते धाडस करण्याचा मोह होईल तो आवरा. घरामध्ये कोणाच्या तरी वागण्या-बोलण्यामुळे तुम्ही दुखावले जाल. नातेवाईकांशी पशाचे व्यवहार करताना जपून करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2018 1:02 am

Web Title: astrology 27th july to 2nd august 2018
Next Stories
1 भविष्य : दि. २० ते २६ जुलै २०१८
2 भविष्य : दि. १३ ते १९ जुलै २०१८
3 भविष्य : ६ ते १२ जुलै २०१८
Just Now!
X