News Flash

भविष्य : दि. २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०१८

घरामध्ये कोणताही निर्णय एकटय़ाने घेऊ नका. त्यामध्ये जोडीदाराला सहभागी करून घ्या.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मेष : मनाच्या एका कोपऱ्यामध्ये तुमचा मौजमजा करण्याचा मूड असेल. पण दैनंदिन कर्तव्यात तुम्ही जखडले जाल. त्यामुळे थोडीशी चिडचिड होईल. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण वाढविण्याकरिता जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम सहकाऱ्यांना जमले नाही ते काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये कोणताही निर्णय एकटय़ाने घेऊ नका. त्यामध्ये जोडीदाराला सहभागी करून घ्या.

वृषभ : ‘कळतं पण वळत नाही’ अशी तुमची परिस्थिती असणार आहे. त्यामुळे कोणालाही कसलाही सल्ला न देता ‘आपण भले, आपले काम भले’ असे धोरण ठेवणे निश्चित चांगले ठरेल. व्यापार-उद्योगात टिकून राहण्यासाठी तुम्हाला जादा खेळत्या भांडवलाची गरज भासेल. नोकरीच्या ठिकाणी ‘जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला’ याची आठवण ठेवा. घरामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीच्या आगमनाची चाहूल लागेल.

मिथुन नशिबाचा वाटा आपल्याला नेहमी मदत करत नाही. कधी कधी आपल्या कष्टावर अवलंबून राहावे लागते. या आठवडय़ामध्ये तुमच्या दृष्टीने जी महत्त्वाची कामे आहेत त्यांची सुरुवात लगेचच करून ठेवा. व्यापार-उद्योगात बाजारातील चढ-उतारानुसार तुम्हाला तुमचा पवित्रा बदलणे भाग पडेल. नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या चुका काढण्यापेक्षा आपले काम व्यवस्थित कसे पार पडेल, याकडे लक्ष द्या.

कर्क तुम्हाला थोडीशी सुस्ती आली असेल, फारसे काम करायचे नाही असे तुम्ही ठरवाल. परंतु हा तुमचा निर्धार थोडा वेळच टिकेल.  व्यापार-उद्योगाच्या ठिकाणी व्यावसायिक जागेची मांडणी फेरबदल वगैरे गोष्टीत तुमचा वेळ जाईल.  नोकरीच्या ठिकाणी छोटेसे काम घेऊन ते काम खूप मोठे असल्याचा आव आणाल. ज्यांना बदली हवी असेल त्यांनी ताबडतोब प्रयत्न करावे. घरामध्ये किरकोळ कामात खूप वेळ जाईल.

सिंह रवी हा तुमच्या राशीचा अधिपती असल्याने दिलेला शब्द पाळण्यामध्ये तुम्ही स्वत:ला धन्य मानता. या आठवडय़ात असाच एखादा शब्द पूर्ण करण्याकरिता तुम्ही जिवाचे रान कराल. व्यापार-उद्योगात आर्थिक कमाई थोडीशी कमी झाल्याने तुम्हाला एक प्रकारची सुस्ती येईल.  नोकरीच्या ठिकाणी मात्र एकाच वेळी अनेक कामे तुम्हाला करावी लागतील. प्रिय व्यक्तीचे मन सांभाळण्याकरिता तुमची तारेवरची कसरत होईल.

कन्या  हातातोंडाशी आलेली कामे थोडीशी लांबल्यामुळे तुम्ही विचारात पडाल. पण त्याच्या बदल्यात वेगळे काम मिळाल्यामुळे त्याची कसर भरून निघेल. व्यापार-उद्योगात नवीन कामाकरिता तुम्ही प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढविणारे काम वरिष्ठांनी सोपविल्यामुळे तुमचा आळस निघून जाईल. घरामध्ये एखादा चांगला सोहळा ठरण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आवश्यक असणारे नियोजन करा.

तूळ ग्रहमान जरी चांगले असले तरी तुम्हाला तुमच्यावरती थोडासा संयम घालायला लावणारे आहे. व्यापार-उद्योगात बरीच मोठी गुंतवणूक करायची असल्यामुळे मनावर एक प्रकारचा दबाव असेल. पण आठवडय़ाच्या शेवटपर्यंत तुम्ही त्याची व्यवस्था कराल. जोडधंदा असणाऱ्यांना फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा तणाव भरपूर असला तरी ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण कराल. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या.

वृश्चिक ग्रहमान संमिश्र आहे. विनाकारण वाढणारे खर्च आणि जबाबदाऱ्या कोणालाच नको असतात, पण या आठवडय़ात तुम्हाला या दोन्ही गोष्टींना सामोरे जावे लागेल. व्यापार-उद्योगात एका हाताने घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने द्यायचे अशी परिस्थिती असेल. नोकरीच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे काम मिळाल्याने तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल. घरामध्ये काही किरकोळ दुरुस्त्या करून ते सजविण्याचा प्रयत्न कराल.

धनू गेल्या काही दिवसांत तुम्ही बरेच काम केले असेल. त्याचे चांगले फळ आता नजरेच्या टप्प्यात येईल, पण त्याचा फायदा घ्यायला गेला की कुठे तरी गणित बिनसते, असा अनुभव येईल. व्यापार-उद्योगात ज्यांच्याकडून पैसे येणे अपेक्षित आहे त्यांची अडचण निघेल. नोकरदार व्यक्तींना एखादे आमिष दाखवून वरिष्ठ त्यांच्याकडून जास्त काम करून घेतील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीचे आणि मुलांचे तंत्र सांभाळावे लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्या.

मकर दिवसेंदिवस ग्रहमान सुधारत आहे. त्यामुळे  तुमच्यामधली महत्त्वाकांक्षा जागृत होईल. व्यापार-उद्योगात एखादे काम नवीन पद्धतीने सुरू केले असेल तर त्याला गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर विश्वास टाकतील. एखाद्या कामानिमित्त तुम्हाला किचकट प्रकरण हाताळावे लागेल. बेकार व्यक्तींना छोटे-मोठे काम मिळेल. घरामध्ये काही खर्च अचानक वाढतील.

कुंभ तुमच्या आचारविचारामध्ये बदल घडवून आणणारे हे ग्रहमान आहे. गेल्या एक-दोन आठवडय़ांमध्ये ज्या प्रश्नांनी तुम्हाला त्रास दिला होता त्या प्रश्नांवर आता तुम्ही लक्ष केंद्रित करा.  व्यापार-उद्योगात काही सरकारी कामे अडून राहिली असतील तर त्याकडे तुम्ही लक्ष द्या.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा काही गैरसमज झाला असेल तर तो तुम्ही दूर कराल. घरामध्ये प्रियजनांबरोबर छोटे मोठे कार्यक्रम ठरवाल.

मीन  तोंड झाकले की पाय उघडे पडतात आणि पाय झाकले की तोंड उघडे पडते असा अनुभव देणारा हा आठवडा आहे. व्यापार-उद्योगात जास्त पैसे मिळविण्याकरिता खेळत्या भांडवलाची तुम्हाला गरज भासेल. त्याकरिता बरीच धावपळ करणे भाग पडेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न करतील.  घरामध्ये एखादा खर्चीक बेत ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 1:01 am

Web Title: astrology 28th september to 4th october 2018
Next Stories
1 भविष्य – दि. २१ ते २७ सप्टेंबर २०१८
2 भविष्य : दि. १४ ते २० सप्टेंबर २०१८
3 भविष्य : दि. ७ ते १३ सप्टेंबर २०१८
Just Now!
X