सोनल चितळे response.lokprabha@expressindia.com

मेष सरत्या वर्षांला गुडबाय करताना आणि नव्या वर्षांचं स्वागत करताना खुल्या हाताने खर्च कराल. पण आपल्या मर्यादा ओळखून स्वत:वर संयम ठेवणं आवश्यक! भाग्यातील शनी-रवीच्या युती योगामुळे काही गोष्टी संघर्ष करूनच प्राप्त कराव्या लागतील. परंतु हा संघर्ष घरात नसावा. स्वत:चे हक्क मिळवण्यासाठी संघर्ष चालेल, पण घरात मात्र प्रेमाचाच विजय होईल. प्रेमाने साध्य झालेल्या गोष्टींची गोडी संघर्ष करून जिंकण्यात नाही हे ध्यानात असू द्यावे.

वृषभ कलात्मक बुद्धीचा उपयोग करून नव्या कल्पना आणि सर्जनशील विचार यांना नोकरी-व्यवसायात चांगला वाव मिळेल. शुक्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे या नावीन्यपूर्ण विचारांना आर्थिक पाठबळ मिळेल. वर्षांचे शेवटचे दिवस आणि नव्या वर्षांची सुरुवात आनंदाने, नव्या उत्साहाने कराल. कौटुंबिक वातावरण मोकळेपणाचे असल्याने जो तो आपला आनंद साजरा करण्यात मग्न असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. काही अनावश्यक खर्च स्वत:हून कराल.

मिथुन नव्या वर्षांच्या स्वागताला आपण तयार आहात, पण आपल्या जोडीदाराचे प्लॅन्स काही वग्ेाळे असतील. दोघांच्या विचारांची सांगड घालता घालता नव्या वर्षांचे नवेपण हरवून बसू नका. सप्तमातील रवी-शनी युतीमुळे दोघांच्या खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना आपली मते पटवून द्याल. सुरुवातीला विरोध होईल, पण नंतर त्यातील फायदे वरिष्ठांना समजून येतील. आरोग्यविषयक किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्वरित औषधोपचार करा.

कर्क वर्षभरातील सुख-दु:खांचा आढावा घेताना मन भूतकाळात रमेल. सुखद आठवणी गोळा करून नवीन वर्षांचे स्वागत कराल. बुध-हर्षलाचा शुभ योग व्यावहारिक दृष्टिकोन देईल. भावनेच्या भरात वाढू देणार नाही. आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहील. भाग्यातील मंगळ नव्या योजनांना मूर्तरूप देईल. हिंमत देईल. थंडीच्या दिवसात त्वचा आणि पोटाची विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरी-व्यवसायात संमिश्र अनुभव येतील.

सिंह एखाद्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम कराल, पण ते व्यक्त करणं जमत नाही. हीच संधी आहे. सरत्या वर्षांला आणि नव्या वर्षांला साक्षी ठेवून आपले प्रेम व्यक्त कराल. लहान-मोठी भेटवस्तू देऊन, प्रेमाचे चार शब्द बोलून प्रिय व्यक्तीचे मन जिंकाल. शुक्र-प्लुटोचा लाभयोग प्रेमात पुढाकार घ्यायला मदत करेल. नोकरी-व्यवसायात कोणतीच कामे फारशी पुढे जाणार नाहीत. सहकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून द्याल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील.

कन्या शंभरापैकी नव्वद गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्यात, यात समाधान माना. चंचल वृत्तीवर प्रयत्नपूर्वक संयम ठेवा. नव्या वर्षांतले नवे संकल्प आखण्यासाठी आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी तृतीयातील गुरु-शुक्र आणि लाभातील राहू या ग्रहयोगांचे पाठबळ मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जोडीदाराची मते, त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे लागेल. घरासाठी नव्या वस्तूंची खरेदी कराल.

तूळ आपल्या आवडीनिवडी, आपली क्षमता आणि आपली आर्थिक स्थिती यांचा समतोल ठेवून २०१८ ला बाय बाय कराल. २०१९ चे स्वागत नव्या पद्धतीने कराल. आपल्या आनंदात सर्वाना सामावून घ्याल. शुक्र-नेपच्यूनच्या शुभ्र योगामुळे कलाक्षेत्रात यश मिळेल. आपल्या भावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे व्यक्त कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळून आपली अपेक्षित कामे पूर्ण कराल. कामासाठी लहान-मोठे प्रवास कराल.

वृश्चिक मागील वर्षभरातल्या चढउतारांकडे पाहता नव्या वर्षांच्या नव्या योजना तयार ठेवाल. दुसऱ्याच्या चुका दाखवण्यापेक्षा गुरू-शुक्राच्या साथीने त्या चुका दुरुस्त करण्याचा किंवा सुधारण्याचा उपाय सुचवाल. नव्या वर्षांच्या स्वागतासाठी खर्च जास्त होईल. वेळीच संयम ठेवलात तर उपयोग अन्यथा आपल्या दिलदार वृत्तीचा गैरफायदा घेणारे अनेक जण आहेत हे आपण जाणताच. नोकरी-व्यवसयात वरिष्ठांच्या मताचा मान ठेवावा लागेल.

धनू कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची जिद्द आपल्यात आहे. रवी-शनीच्या युती योगामुळे संघर्ष करून गोष्टी मिळवाव्या लागतील. आपल्या अनुभवातून इतरांना त्यांच्या अडचणींवर मात करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण कराल. वेळप्रसंगी अशा गांजलेल्यांचे नेतृत्वही कराल. नोकरी-व्यवसायात अनेक चढउतारांना तोंड द्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. घरात मात्र प्रयत्नपूर्वक संघर्ष टाळा. अंगीच्या कलागुणांना वाव देण्याची संधी चालून येईल.

मकर ‘रात गई बात गई’ याप्रमाणे गेल्या वर्षीच्या कटू आठवणींना जास्त कुरवाळत बसण्यापेक्षा नव्या वर्षांच्या नव्या योजना कशा यशस्वी होतील याकडे जास्त लक्ष द्याल. आप्तेष्टांच्या मदतीने, ओळखीने कामाला गती मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्यात मेळ घालण्याची जबाबदारी गुरू-शुक्राच्या सहयोगामुळे उत्तम प्रकारे पार पाडाल. कौटुंबिक वातावरण जपावे लागेल. ठिणगीचा वणवा होऊ न देता वेळीच नमते घ्यावे लागेल.

कुंभ रवी-नेपच्यूनच्या लाभयोगामळे ‘केलेल्या कष्टाचे चीज झाले’ असा अनुभव मिळेल. मानसिक समाधान लाभेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी-व्यवसायात मानसन्मान प्राप्त होईल. नव्या वर्षांत नव्या संधी मिळतील. मैत्रीखातर कायदेशीर कागदपत्रांवर सह्य करणे टाळा. नको ते धाडस करणे फारच महागात पडेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदाराचा सहभाग विशेष उल्लेखनीय असेल. जोडीदाराच्या वैयक्तिक अडचणींवर आपण उपाय सुचवाल.

मीन इतरांच्या मनाप्रमाणे वागून त्यांना खूश ठेवण्यापेक्षा कधीतरी स्वत:च्या आवडींचाही विचार करावा. २०१९ चे स्वागत करताना स्वत:साठी जगण्याचा निर्धार कराल. आपली कर्तव्ये चोख पार पाडाल. नोकरी-व्यवसायात येणाऱ्या पेचप्रसंगांवर विवेकबुद्धीने विचार करून उपाययोजना कराल. दशमातील रवीचे भ्रमण कामात उत्साह आणि यश देईल. कुटुंबासाठी, जोडीदारासाठी आपला वेळ राखून ठेवा.