मेष  गरजेच्या वेळी कोणीच बरोबर नसते, असा अनुभव तुम्हाला या आठवडय़ात आला तर आश्चर्यात पडू नका. व्यापारउद्योगात काही नको असलेले संकेत तुम्हाला यापूर्वीच मिळाले असतील, तर त्याची आता खऱ्या अर्थाने जाणीव होईल. हातातील पशाचा काटकसरीने वापर करा. नोकरीमध्ये एखादे किचकट, कंटाळवाणे काम, जे तुम्ही पूर्वी लांबवलेले होते ते हातात घेण्यासाठी वरिष्ठ तगादा लावतील. घरामध्ये प्रिय व्यक्ती लांब गेल्यामुळे एक प्रकारची पोकळी जाणवेल. नातेवाईक आणि आप्तेष्टांशी विचारपूर्वक बोला.

वृषभ काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लांबवाव्या लागल्या असतील तर आता त्याची कसर भरून काढण्याचे ठरवाल. व्यवसाय-उद्योगात केवळ महत्त्वाच्या उद्दिष्टांकडे तुमचे लक्ष असेल, ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला चन पडणार नाही. नोकरीच्या ठिकाणी कामाला हळूहळू वेग यायला सुरुवात होईल. कोणाकडून पसे उधार केले असतील तर त्याची परतफेड करा. घरामध्ये धावपळ नसल्याने तुम्हाला थोडीशी सुस्ती जाणवेल. आवडत्या व्यक्तीच्या लांब जाण्यामुळे एक प्रकारची पोकळी जाणवेल.

मिथुन नित्यकामासंबंधी तुम्ही खूप मोठमोठय़ा गप्पा माराल, पण आयत्या वेळेला मात्र तुमचा कल सुख आणि सौख्य उपभोगण्याकडे असेल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात गिऱ्हाईकांची वर्दळ जरी साधारण असली तरी तुमच्या गरजेइतपत पसे तुम्हाला मिळाल्यामुळे तुमची तक्रार असेल. व्यावसायिक लोकांना मिळणारी कामे एक-दोन आठवडे पुढे लांबण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी नेहमीच्या सहकाऱ्यांची गरहजेरी असेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींच्या लांब जाण्यामुळे थोडासा एकाकीपणा जाणवेल.

कर्क या आठवडय़ामध्ये ज्या व्यक्तींवर अवलंबून असणार आहात त्यांची गरहजेरी असल्यामुळे कामामध्ये पाहिजे तशी मजा वाटणार नाही. व्यवसाय-उद्योगात कामाचा पसारा थोडासा कमी झाल्यामुळे जी कामे तुम्ही पूर्वी लांबवलेली होती त्या कामावरती लक्ष केंद्रित कराल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला काय वाटते याची पर्वा न करता एकामागून एक कामे तुमच्यावर सोपवत जातील. गरहजर सहकाऱ्याचे काम करावे लागेल. घरामध्ये सर्व जण आपापल्या कामामध्ये दंग राहिल्यामुळे कोणाचेच कोणाकडे लक्ष नसेल.

सिंह मौजमजा संपली, आता पुन्हा एकदा कामाला लागायचे या विचाराने तुम्ही खडबडून जागे व्हाल. व्यापार-उद्योगात ज्यांनी तुम्हाला शब्द दिला होता त्यांनी तो आयत्या वेळी फिरवल्याने तुमची धावपळ उडेल. नोकरीमध्ये वरिष्ठ एखाद्या कामाकरिता तुम्हाला तगादा लावतील, पण तुम्ही मात्र तुमच्याच पद्धतीने काम करणे पसंत कराल. घरामधल्या व्यक्तीसमवेत काही कार्यक्रम अपूर्ण राहिले असतील तर त्याची तुम्ही पूर्तता कराल. आवडती व्यक्ती तुमच्यापासून लांब गेल्याने व्यक्तिगत जीवनात एक प्रकारची पोकळी जाणवेल.

कन्या तुमच्या कामापासून तुम्ही जरा जरी लांब गेलात तरी तुमचेच मन तुम्हाला खात राहते आणि मग मनामध्ये कामांची यादी सुरू होते. व्यापार-उद्योगातील धावपळ कमी झाल्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही स्वत:करिता वेळ काढू शकाल. नोकरदार व्यक्तींना त्यांचे वरिष्ठ स्वस्थ बसू देणार नाहीत. नवीन नोकरीकरिता प्रयत्न करा. घरामध्ये गडबड गोंधळ संपल्यामुळे एक प्रकारची शांतता वाढू लागेल. थोडा काळ ही शांतता चांगली वाटेल, पण नंतर तुम्हाला एकटेपण कंटाळवाणे होईल.

तूळ स्वप्नांच्या जगातून खडबडून जागे होऊन वास्तवात आल्यानंतर जसे वाटते तशी तुमची मन:स्थिती असेल. व्यापार-उद्योगात हातामध्ये पसे खुळखुळतील. लहान-मोठी देणी द्यायची, असे तुम्ही मनाशी घोकत बसाल; पण प्रत्यक्षात कृती मात्र करणार नाही. सध्याच्या नोकरीत वरिष्ठ लांबवलेली कामे पूर्ण करण्याकरिता तुमच्यामागे धोसरा लावतील, पण तुम्ही तुमच्या पद्धतीनेच काम कराल. घरामधील गडबड-गोंधळ संपल्याने तुम्हाला रिकामे वाटेल. तरीही तुम्ही मन रमविण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक मौजमजेचा कालावधी संपला. आता पुन्हा एकदा आपल्या कामाकडे वळायचे, या कल्पनेने तुम्हाला स्वप्नातून खडबडून जागे झाल्यासारखे वाटेल. व्यवसाय-उद्योगात आíथक प्राप्ती जरी कमी झाली तरी हातात पसे असल्यामुळे तुम्हाला त्याची चिंता असणार नाही.  रेंगाळलेल्या कामांना गती देण्यासाठी तुम्ही एकदम सक्रिय बनाल. नोकरीमध्ये वरिष्ठांचा कल जाणून त्या कामाला तुम्ही प्राधान्य द्याल. घरामध्ये फारसे काम न करता स्वत:च्या तंद्रीत राहिल्यामुळे इतरांचा गरसमज होण्याची शक्यता आहे.

धनू ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून राहाल, त्यांचीच काही तरी अडचण असल्यामुळे तुम्हाला ते मदत करू शकणार नाही. त्यामुळे एकटे पडल्यासारखे होईल. व्यापार-उद्योगात चांगले पसे मिळतील. देणी देण्याला आधी प्राधान्य द्या. नोकरीमध्ये सगळी कामे एकदम न करता फक्त वरिष्ठांच्या, संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. पशाचा अतिमोह टाळा. घरामध्ये एखाद्या नेहमीच्या सदस्याची गरहजेरी जाणवेल. पशाची ताळेबंदी केल्यानंतर आपण चुकलो आहोत ही भावना मनात अस्वस्थ करेल.

मकर काम कोणतेही असो त्यातून तुम्ही मागे हटत नाही. व्यापार-उद्योगात नेहमीइतके काम जरी नसले तरी ज्या नवीन कल्पना तुमच्या मनात घोळत असतील त्याचे नियोजन करण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती दोन्ही खर्च करायला सिद्ध असाल. भागीदारी किंवा मत्री करारासंबंधीचे प्रस्ताव जर पुढे आले असतील तर  त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत करा. नोकरीत अधिकारांचा न्याय्य उपयोग करा. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या विचित्र वागण्या-बोलण्यापुढे कोडय़ात पडल्यासारखे वाटेल.

कुंभ काही कारण नसताना कामाचा एक प्रकारे दबाव तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात जी कामे अर्धवट राहिलेली होती, ती पूर्ण करण्यात तुमचा बराच वेळ जाईल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी अनेक गोष्टी तुम्हाला एकाच वेळी हाताळायला सांगितल्यामुळे नेमके कशाला महत्त्व द्यावे असा गोंधळ उडेल. बेकार व्यक्तींना काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल. घरामध्ये झालेल्या खर्चाविषयी आढावा घेतल्यावर असे लक्षात येईल की तुम्ही बजेटबाहेर जाऊन जास्त पसे खर्च केले आहेत.

मीन एखादी गोष्ट घडेपर्यंत तुम्ही इतके अस्वस्थ होता की त्याकरिता काहीही करण्याची तुमची तयारी असते आणि ती गोष्ट घडल्यानंतर झाले ते योग्य का अयोग्य, असा विचार करून तुम्ही करीत बसता. या आठवडय़ात तुमच्या कामात केलेला आळस आणि तुमच्या हातून खर्च झालेले पसे या दोन गोष्टीवर विचार करून तुमचा वेळ निर्थक घालवाल. व्यापार-उद्योगात प्रत्यक्ष कामाचा वेग वाढल्यामुळे नेमके कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे, असा तुमच्यापुढे प्रश्न असेल.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com