17 December 2018

News Flash

दि. ३ ते ९ नोव्हेंबर २०१७

तुमचे ग्रहमान आता सुधारल्यामुळे प्रत्येक कामाची तुम्हाला घाई असेल.

daily horoscope

मेष तुमचे ग्रहमान आता सुधारल्यामुळे प्रत्येक कामाची तुम्हाला घाई असेल. विशेषत: जी प्रकरणे गेल्या दोन-तीन वर्षांत त्रासदायक ठरली होती, ती निकालात काढण्याचा तुमचा मानस असेल. व्यापार-उद्योगात पूर्वी एखादी संधी तुमच्या हातून निसटली असेल तर ती पुन्हा एकदा मिळविण्याचा प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणी नियोजनावरती भर द्या. घरामध्ये नेहमीच्या कर्तव्याव्यतिरिक्त एखादा करमणुकीचा कार्यक्रम ठरवाल.

वृषभ ग्रहमान तुम्हाला थोडीशी मानसिक उभारी देणारे आहे, पण महत्त्वाचे ग्रह तुमच्या विरोधात असल्यामुळे प्रत्येक गोष्ट मिळवताना तुम्हाला भरपूर कष्ट घ्यावे लागतील. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात स्पर्धक काय करतात याकडे लक्ष ठेवा.  नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेले काम बरोबर झाले आहे याची खात्री करून ठेवा. वरिष्ठांशी नम्रतेने वागा. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये. घरामध्ये तुम्ही इतरांची अडचण समजून घ्याल, पण तुमची अडचण कोणीच समजून घेणार नाही.

मिथुन ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत. त्यामुळे तुम्ही आता जोशात असाल. व्यवसाय-उद्योगात जी कामे विनाकारण काही ना काही कारणामुळे अडकून पडली होती ती कामे हळूहळू वेग घ्यायला लागतील. अनपेक्षित मार्गाने पसे मिळाल्याने तुमची तातडीची गरज भागेल. नोकरदार व्यक्तींना नवीन कामाच्या निमित्ताने संस्थेकडून विशेष सुविधा मिळेल. नवीन नोकरीकरिता प्रयत्न करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. घरामध्ये लांबवलेले एखादे शुभ कार्य निश्चित होईल.

कर्क बाहेरची कोणतीही कामे असोत, ती करायला ताबडतोब तयार होता, पण घरातले एखादे काम तुम्हाला सांगितले की तुमच्या कपाळावर आठय़ा पडतात. या आठवडय़ात याच कारणामुळे घरामध्ये किरकोळ वादविवाद होतील. व्यापार-उद्योगात आठवडय़ाच्या सुरुवातीला अत्यावश्यक देणी देता आल्यामुळे तुमच्या मनावरचे ओझे कमी होईल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांकडून मदत मिळविण्याकरिता त्यांच्या दाढीला हात लावावा लागेल. घरामध्ये तुमचे मन बंड करून उठेल.

सिंह स्थिर रास असे तुमच्या राशीचे वर्णन केले जाते. सहसा तुम्ही तुमचा स्वभाव बदलत नाही, पण या आठवडय़ात जसे वातावरण असेल त्याप्रमाणे तुम्ही वागायचे ठरवाल. व्यापार-उद्योगात विस्तारासाठी आवश्यक असणारे भांडवल आणि इतर गोष्टींची तुम्ही जुळवाजुळव कराल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याकरिता नेहमीपेक्षा जास्त काम कराल.  घरामध्ये इतरांना तुमचा आधार वाटेल.

कन्या तुमची रास मुत्सद्दी स्वभावाची आहे. या आठवडय़ात या स्वभावाचा तुम्हाला फायदा होईल. व्यापार-उद्योगात तुम्ही उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता सध्याच्या कार्यपद्धतीत थोडेफार बदल कराल. त्याचा उपयोग लगेचच होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये एखादे जबाबदारीचे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. हे काम चांगल्या पद्धतीने करून सर्वाना आश्चर्यचकित कराल. घरामध्ये मात्र ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे असा अनुभव येईल. याचा जास्त विचार करू नका.

तूळ इच्छा आहे तिथे मार्ग आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून सिद्ध करून दाखवाल. ज्या कामाचा पूर्वी नाद सोडून दिला होता त्या कामात लक्ष घालाल. व्यापार-उद्योगात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तींशी ओळख होईल. त्या व्यक्तीचे विचार ऐकून नवीन स्फूर्ती मिळेल. ज्यांना नोकरीमध्ये बदल करण्याची इच्छा आहे, त्यांना मनाप्रमाणे संधी लाभेल. चालू नोकरीमध्ये तुमचा कामाचा वेग आणि कार्यक्षमता दोन्ही उत्तम राहील. घरामध्ये तुमच्या विचारांना इतरांकडून चांगली साथ मिळेल.

वृश्चिक ग्रहमान संमिश्र आहे. जे काम तुम्हाला पूर्ण करायचे आहे त्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. त्याऐवजी ते काम तुम्ही स्वत:च पूर्ण केले तर त्याचा दर्जा उत्तम राहील. व्यवसाय-धंद्यामध्ये जुनी येणी वसुली करण्याकरिता निकराने प्रयत्न करावे लागतील. हातातोंडाशी आलेले काम स्पर्धकांना मिळू नये म्हणून तुम्ही जिवाचे रान कराल. नोकरीच्या ठिकाणी सोपे काम अवघड झाल्यामुळे तुमची शक्ती आणि पसे खर्च होतील. घरामध्ये इतरांना दिलेले आश्वासन पाळावेच लागेल.

धनू तुमच्यामधली इच्छाशक्ती खऱ्या अर्थाने जागृत होईल. व्यापार-उद्योगात प्रत्येक काम सहज आणि सोपे वाटेल. प्रत्यक्षात ते काम करायला गेल्यानंतर बरेच कष्ट पडतील.  नोकरीच्या ठिकाणी वेगळे काम सांगून वरिष्ठ तुम्हाला चांगला अनुभव देतील. तुम्ही केलेल्या कामाचा भविष्यामध्ये निश्चित उपयोग होईल.  घरामध्ये तुमचे विचार तुम्ही इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. त्याला थोडासा विरोध होईल.

मकर शनिप्रधान रास आल्यामुळे तुम्हाला विनाकारण वेळ घालवायला आवडत नाही. या आठवडय़ामध्ये तुमची परिस्थिती रात्र थोडी सोंगे फार अशी होईल. अनेक कामे एकाच वेळी हाताळाल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेले चांगले काम आणि ओळखी यांचा तुम्हाला उपयोग होईल. नोकरीमध्ये तुम्ही केलेले काम वरिष्ठांना आवडेल. त्याच्या बदल्यात तुम्ही एखादी विशेष सवलत मिळवाल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचा सल्ला आणि सक्रिय मदत याचा तुम्हाला उपयोग होईल. एखाद्या लांबच्या नातेवाइकाला भेटण्याचा योग येईल.

कुंभ एकदा माणसाला यश मिळायला लागले की त्यांच्या इच्छा-आकांक्षा वाढत जातात. तशी तुमची स्थिती असेल. प्रत्येक कामात पुढाकार घेऊन त्यात यश मिळवावेसे वाटेल. व्यापार-उद्योगात चार पैसे हाताशी असल्यामुळे एखादी गुंतवणूक करावीशी वाटेल. नोकरीमध्ये तुम्हाला तात्पुरते जादा अधिकार मिळण्याची शक्यता आहे. बेकार व्यक्तींनी मिळेल ते काम स्वीकारावे. घरामध्ये तुमच्या इच्छेला मान मिळेल. तुमच्यातील विनोदबुद्धी सर्वाना आनंदी ठेवील.

मीन ग्रहमान विशेष चांगले नाही. कोणतेही काम सहजगत्या होणार नाही. त्यासाठी तुम्हाला निश्चयाने पुढे जावे लागेल. व्यापार-उद्योगात स्पध्रेमध्ये टिकून राहण्यासाठी एखादी नवीन युक्ती शोधावी लागेल. ज्यांना पसे द्यायचे कबूल केले होते, त्यांचे वेळापत्रक लक्षात ठेवा. तुमचे बेत गुप्त ठेवा. नोकरीमध्ये त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. नोकरीच्या कामात विलंब होईल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींचे हट्ट पुरवावे लागतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on November 3, 2017 1:01 am

Web Title: astrology 3 to 9 november 2017