01vijayमेष तुमच्या राशीमध्ये धडाडी आणि नेतृत्व हे दोन चांगले गुण आहेत. पण कधी कधी तुम्ही भावनावश होऊन एखादी कृती अविचाराने करता. व्यापार-उद्योगात तुमचे नेहमीचे धोरण उपयोगी पडणार नाही. बदलत्या गरजेनुसार तुम्हाला तुमचा पवित्रा बदलणे भाग पडेल. नोकरीमध्ये तुम्ही कष्टदायक काम निश्चयाच्या बळावर पार पाडाल. सहकाऱ्यांशी जपून बोला. घरामध्ये एखाद्या सदस्याविषयी तुम्हाला चिंता वाटेल. वाहन चालविताना किंवा मशीनवर काम करताना बेसावध राहू नका.

वृषभ या आठवडय़ात तुम्हाला विचारापेक्षा कृतीची घाई असल्यामुळे तुम्ही थोडाही वेळ घालवणार नाही. व्यापार-उद्योगामध्ये रोजचे व्यवहार सुरळीतपणे चालू असल्यामुळे त्याच्याकडे तुमचे फारसे लक्ष नसेल. त्याऐवजी एखादे भव्यदिव्य स्वप्न तुम्हाला अस्वस्थ करेल. नवीन उद्योजकांना मात्र जादा धोका पत्करून चालणार नाही. नोकरीमध्ये कामाचा वेग उत्तम राहील. वरिष्ठांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करू नका. घरामध्ये मुलांच्या उपद्व्यापामुळे लक्ष द्यावे लागेल. प्रिय व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यामुळे तुम्ही कोडय़ात पडाल.

मिथुन शक्ती आणि युक्ती यांचा योग्य प्रकारे समन्वय केलात तर तुमचे यश द्विगुणित होईल. व्यवसाय-उद्योगात नवनवीन योजना कार्यान्वित कराव्याशा वाटतील. मात्र जमाखर्चाचे गणित नीट समजल्याशिवाय कोणताही निर्णय पक्का करू नका. नोकरीमध्ये एखादे काम लवकर संपवण्याकडे कल राहील. पण ‘अति घाई संकटात जाई’ हे विसरून चालणार नाही. चालू नोकरीत बदल करणाऱ्यांनी कामात गुप्तता राखावी. घरामध्ये एखादे शुभकार्य ठरले असेल तर ते पार पडेल.

कर्क तुम्ही नेहमी कामामध्ये आनंदी राहता. त्यामुळे तुमच्या रसिक स्वभावाचे क्वचितच दर्शन होते. व्यापार-उद्योगाच्या निमित्ताने छोटा प्रवास करून एखादा निर्णय तुम्हाला निश्चित करावा लागेल. पण यादरम्यान गडबड-गोंधळ होऊ नये म्हणून निष्णात व्यक्तीचा सल्ला घेऊन ठेवा. नोकरीच्या ठिकाणी सहकारी त्यांची एखादी मागणी पूर्ण करण्याकरिता तुमची ढाल करतील. हे काम तुम्ही अत्यंत प्रभावीपणे कराल. घरामध्ये इतरांकडून झालेला बेशिस्तपणा व दिरंगाई खपणार नाही. त्यांना तुम्ही स्पष्ट शब्दात सांगाल.

सिंह ग्रहयोग तुमच्या साहसप्रिय स्वभावाला खतपाणी घालणारा आहे. तुम्ही फक्त कृतीवर भर ठेवता आणि विचारांचे कवाड बंद असते अशी टीका सभोवतालच्या व्यक्तींकडून तुम्हाला ऐकायला मिळते. पण या आठवडय़ात उत्तम निर्णयक्षमता आणि कल्पनाशक्ती याचा सुरेख संगम तुमच्यात दिसून येईल. व्यापार-उद्योगात चार पसे हातात खुळखुळल्याने विस्ताराचे विचार तुमच्या मनात घोळत राहतील. नोकरीमध्ये एखादा निर्णय किंवा काम विनाकारण लोंबकळत पडलेले असेल तर त्यावर तुम्ही तातडीने हालचाल कराल.

कन्या या आठवडय़ात मात्र तुमचा प्रकार उलटा असेल. ‘आधी केले मग सांगितले’ असा तुमचा बाणा राहील. व्यवसाय-उद्योगात मात्र थोडेसे विचाराने वागलात तर बाजारातील परिस्थितीचा अंदाज येऊन आíथक बाजू अधिक बळकट होऊ शकेल. जादा पसे मिळविण्यासाठी एखादी नवीन कल्पना तुमच्या मनात घोळत राहील. नोकरीमध्ये पशाकरिता सत्तेचा दुरुपयोग करण्याकडे तुमचा कल राहील. तो मात्र वेळीच आवरा. घरामध्ये एखाद्या लोंबकळलेल्या प्रश्नावर तुम्ही स्वत: जातीने लक्ष देऊन तोडगा काढाल.

तूळ ज्या कामामध्ये किरकोळ कारणावरून विलंब झाला होता. ते काम आता तुम्ही नव्या जोमाने हातात घ्यायचे ठरवाल. व्यापार-उद्योगात नवीन व्यक्तीकडून काही कल्पना तुम्हाला सुचवल्या जातील. त्या प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वी शांतपणे आणि विचारपूर्वक काम केले तर त्या कामाचा दर्जा उत्तम राहू शकेल. नोकरीमध्ये कामाचा कंटाळा केलेला वरिष्ठांना चालणार नाही  नोकरीमध्ये बदल करायचा असेल तर हळूहळू प्रयत्न कराल. घरामध्ये इतरांना तुम्ही काटकसरीचे धडे शिकवाल.

वृश्चिक एखाद्या कठीण कामाच्या बाबतीत तुमचा पवित्रा सावध असेल, पण ज्या वेळी यशाची तुम्हाला खात्री वाटेल त्या वेळी तुम्ही त्याच्यावर तुटून पडाल. व्यापार-उद्योगात पूर्वीची देणी देण्याकरिता तुम्हाला मोठा हात मारावासा वाटेल. त्यातील धोके किती आणि कसे आहेत याचा अंदाज अनुभवी व्यक्तीकडून घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्याकडून जादा काम करून घेतील. घरामध्ये मुलांचे हट्ट पुरवावे लागतील, पण ते महागडे असल्यामुळे तुम्ही विचारात पडाल.

धनू ‘आशा’ ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला काम करायला आणि जीवनातील उद्दिष्ट ठरवायला कायम उपयोगी पडत असते. याचा प्रत्यय तुम्हाला या आठवडय़ात येईल. ज्या कामामध्ये पूर्वी तुम्हाला निराशा आली होती ते काम हातात घेऊन त्याला धक्का स्टार्ट या पद्धतीने तुम्ही चालना द्याल. व्यापार-उद्योगात जमाखर्चाची बाजू समसमान राहील. नोकरीमध्ये वरिष्ठ गोड बोलून तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. घरामध्ये लहान-मोठय़ा व्यक्तींच्या हट्टावरून एखादा करमणुकीचा कार्यक्रम ठरेल.

मकर या आठवडय़ात एखादी चांगली संधी दृष्टिक्षेपात आल्यामुळे तुम्ही ती ताबडतोब काबीज कराल. व्यापार-उद्योगात भविष्यातील प्रगतीचा वेध घेऊन नवीन व्यक्तीशी हितसंबंध प्रस्थापित करावेसे वाटतील. महत्त्वाची कागदपत्रे सावधतेने ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खूश करण्याकरिता बढाया मारल्यात तर तुमची जबाबदारी वाढेल. नवीन नोकरीसंबंधातील कामे ताबडतोब हाताळा. घरामधील कामात तुम्ही पुढाकार घ्याल, पण त्यामध्ये आपले महत्त्व वाढावे, असा तुमचा उद्देश असेल.

कुंभ या आठवडय़ात तुमच्यामधली कल्पकता आणि महत्त्वाकांक्षा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. व्यापार-उद्योगात तुम्ही चांगले काम कराल. पण जे काम आपण करीत आहोत त्यातून भरघोस कमाई झाली पाहिजे, असा एकंदरीत तुमचा उद्देश असेल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी तुम्हाला काही सवलत किंवा भत्ता देण्याचे मान्य केले असेल, तर त्यांचा मूड पाहून त्याची आठवण करून द्यायला हरकत नाही. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. घरामध्ये एखाद्या कामामध्ये तुम्ही आपणहून पुढाकार घ्याल व ते काम पार पाडाल.

मीन ग्रहमान तुमच्या आनंदी आणि उत्साही स्वभावाला खतपाणी घालणारे आहे. व्यापार-उद्योगात स्पर्धक तुम्हाला अटीतटीचा सामना करायला भाग पाडतील. त्याऐवजी नेहमीच्या कामात गिऱ्हाईकांना चांगली सेवा दिलीत तर त्यातून फायदा होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचना ऐकून घेण्यापूर्वीच काम करण्याची तुम्हाला घाई होईल, पण असे काम न करता संस्थेच्या नियमांनुसार वागाल. घरामध्ये इतरांमुळे गरसमज होण्याची शक्यता आहे. म्हणून मन शांत ठेवा.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com