04 August 2020

News Flash

भविष्य : दि. १५ ते २१ जानेवारी २०१६

ग्रहमान दोन वेगवेगळ्या आघाडय़ांवर वेगवेगळे अनुभव देणारे आहे.

01vijayमेष ग्रहमान दोन वेगवेगळ्या आघाडय़ांवर वेगवेगळे अनुभव देणारे आहे. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात तुम्ही मोठे उद्दिष्ट ठेवाल, परंतु व्यक्तिगत जीवनात मात्र इतरांकडून पाहिजे तशी साथ मिळेल की नाही याविषयी मन साशंक असेल. व्यापारीवर्ग आणि कारखानदारांना नवीन प्रोजेक्ट हातात घेऊन उत्पन्न वाढवावेसे वाटेल. नोकरीमध्ये कामाचे प्रमाण वाढवण्याची शक्यता आहे. घरामध्ये इतरांना मदत करण्यास तुम्ही तत्पर असाल.

वृषभ अडथळ्यांची शर्यत पार करण्यात काही प्रमाणात यशस्वी व्हाल. व्यापार-उद्योगात बऱ्याच प्रयत्नांनंतर एखादे काम मार्गी लागल्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल, पण तेवढय़ावर भागणार नाही. पशाची निकड असल्यामुळे बरीच धावपळ करावी लागेल. नोकरीमध्ये तुमचा कामाचा भार प्रमाणाबाहेर वाढला असेल तर वरिष्ठांकडे एखादा मदतनीस मिळण्याची मागणी करा. घरामध्ये अत्यावश्यक कामांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल.

मिथुन त्याच त्याच कामाचा तुम्हाला कंटाळा येतो आणि सतत काहीतरी वेगळे आणि छान घडावे असे तुम्हाला वाटत राहते. व्यवसाय-उद्योगात विक्री आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता पूर्वी केलेले एखादे काम उपयोगी पडेल. जाहिरात आणि प्रसिद्धी यामुळे नफा वाढू शकेल. नोकरीच्या ठिकाणी नेहमीचे काम हाताळता हाताळता एखादी वेगळी युक्ती तुम्हाला सुचेल. नवीन नोकरीच्या कामात पूर्वीचे सहकारी/भागीदार मदत करतील.

कर्क योग्य व्यक्तीचा योग्य वेळी सल्ला मिळाल्याने एखाद्या अडचणीच्या प्रसंगातून चांगला मार्ग मिळू शकेल. व्यवसाय-उद्योगात एखाद्या नवीन कल्पनेने तुम्ही भारावून जाल. पण त्याकरिता आवश्यक असणाऱ्या भांडवलाची तरतूद करणे म्हणजे एक किचकट काम असेल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी हुज्जत न घालता त्यांच्या आज्ञेचे पालन केले तर तुम्हाला कामामध्ये चांगला शॉर्टकट मिळून गती येईल. घरामध्ये दोन पिढय़ातील विचारांची तफावत जाणवेल.

सिंह या आठवडय़ात तुमच्या कृतीला तुम्ही युक्तीची जोड दिली तर त्याचा तुम्हाला विशेषरूपाने उपयोग होईल. व्यापारी वर्गाला नव्याने एखादी योजना कार्यान्वित करण्याकरिता प्रतिष्ठित व्यक्तीकडून मदतीचे आश्वासन मिळेल. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाचा दर्जा वाढून वरिष्ठांकडून एखादी जादा सवलत मागून घेण्याचा तुमचा इरादा असेल. वरिष्ठ आश्वासन देतील, पण लगेच पूर्तता करणार नाहीत.  घरगुती कामात तुम्ही प्रत्येकाला मदत करायला तयार असाल.

कन्या सर्व ग्रहमान असा इशारा देते की तुम्हाला एकाच वेळी वेगवेगळ्या आघाडय़ांवर सतर्क राहायचं आहे. व्यापार-उद्योगात ज्या कामात बिलकूल गती नव्हती ते काम हळूहळू वेग घ्यायला सुरुवात करेल. कामाचे नियोजन नीट करा. नोकरीमध्ये योग्य व्यक्तीची योग्य कामाकरिता निवड केली तर सर्व गोष्टीत तुम्ही सफल होऊ शकता. घरामध्ये आवडत्या व्यक्तींच्या जीवनातील एखादा कार्यक्रम ठरल्याने तुम्ही रममाण होऊन जाल. खर्च मात्र तुमच्या बजेटबाहेर जाईल.

तूळ बौद्धिक रास म्हणून तुमच्या राशीची प्रसिद्धी आहे. व्यवसाय-उद्योगात बराच काळ चालू असलेले हितसंबंध संपुष्टात आल्याने नवीन पद्धतीने तुम्हाला काम करावे लागेल. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना एखादे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी बदलत्या कार्यपद्धतीनुसार काम करावे लागल्याने सुरुवातीला थोडासा गोंधळ उडेल. घरामध्ये तुमच्या नावीन्यपूर्ण कल्पना सर्वाना आवडतील.

वृश्चिक दुसरीकडे सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेताना तुम्हाला स्वतच्या तत्त्वाशी तडजोड केल्यासारखे वाटेल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात एखादी नावीन्यपूर्ण कल्पना तुमच्या मनात येईल. त्याकरिता जादा भांडवलाची तुम्ही व्यवस्था कराल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या चाणाक्ष बुद्धीमुळे आणि  प्रसंगावधान राखून काम करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हाला काही फायदे मिळतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तीचे हट्ट पुरविण्याकरिता तुम्ही तुमच्या हौसमौजेवर मुरड घालाल.

धनू ज्या नतिक कर्तव्यातून तुम्हाला सुटका हवी होती ती मिळाल्यामुळे तुमच्या मनाला थोडासा आराम मिळेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात ज्यांचा परदेशात व्यवहार आहे. त्यांना तेथून एखादी महत्त्वाची संधी मिळेल. त्यावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी तेथील कायदे कानून वगरे यांची माहिती मिळवा. नोकरीमध्ये एखाद्या अवघड कामाकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. घरामध्ये तुमचा सल्ला आणि सक्रिय मदत एक प्रकारचा आधार देईल.

मकर एकाच वेळी अनेक डगरींवर हात ठेवून तुम्ही काम करू शकता. त्यामुळे या आठवडय़ात तुम्हाला विश्रांती अशी मिळणार नाही. पण केलेल्या कामाचे आंतरिक समाधान लाभेल. व्यापार-उद्योगात तुमचा दूरदर्शी स्वभाव आणि अंदाज-आडाखे यांचा चांगला समन्वय होईल. नोकरीमध्ये फक्त वरिष्ठांच्या दृष्टीने महत्त्व असणाऱ्या कामांना प्राधान्य द्या. घरामध्ये अडचणीच्या वेळेला सर्वाना तुम्ही मदत कराल, पण त्याचा उल्लेख केलात तर इतरांना मात्र राग येईल.

कुंभ आर्थिक बाजू सुधारण्याचा संकेत मिळाल्यामुळे तुम्ही थोडेसे खूश असाल. व्यापार-उद्योगात पेरल्याशिवाय उगवत नाही याची तुम्हाला आठवण होईल. नवीन कामगिरीत जादा नफा मिळवण्यासाठी आणखी पसे गुंतवावे लागतील. जोडधंद्यातून कमाई करण्याची संधी तुम्ही सोडणार नाही. नोकरीमध्ये तुम्ही चांगले काम कराल. संथेतर्फे मिळणाऱ्या सुखसुविधांचा गरजेपेक्षा जास्त फायदा घ्याल. घरामध्ये इतरांना काटकसरीचे धडे शिकवाल.

मीन प्रगती करण्याकरिता तुमच्याकडे अनेक नवीन कल्पना आणि योजना असतील त्या साकार करण्याकरिता बरेच प्रयत्न कराल. व्यापार-उद्योगात एखादी मोहमयी संधी तुमच्यापुढे आल्यास त्यातले तांत्रिक, व्यावहारिक अडथळे नीट जाणून घ्या. नोकरीच्या ठिकाणी प्रतिस्पर्धी तुमची ढाल करून त्यांचा एखादा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचा सल्ला आणि सक्रिय मदतीचा तुम्हाला कुठे ना कुठेतरी आधार वाटेल.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2016 1:04 am

Web Title: astrology 35
Next Stories
1 दि. ८ ते १४ जानेवारी २०१६
2 दि. १ ते ७ जाने. २०१६
3 दि. २५ ते ३१ डिसेंबर २०१५
Just Now!
X