सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष बुध-नेपच्यूनच्या प्रतियोगामुळे बुद्धीला कल्पकतेची जोड मिळेल. संवेदनशीलता वाढेल. लेखनातील चुका टाळा. नोकरी-व्यवसायात हितशत्रूंचा त्रास वाढेल. सतर्क राहणे महत्त्वाचे! सहकारीवर्ग मदतीची तयारी दाखवेल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात खूप मेहनत घ्यावी लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींसह जुन्या आठवणींमध्ये मन रमेल. शिरा आखडणे, दबल्या जाणे यामुळे अस्वस्थता वाढेल. वैद्यकीय उपचार घ्यावेत.

वृषभ गुरू-चंद्राच्या युतियोगामुळे विद्याव्यासंग वाढेल. वाचन व मनन कराल. ललित लेखन करण्यासाठी वातावरण पोषक असेल. नोकरी-व्यवसायात मानसन्मान मिळेल. सहकारीवर्गाची थोडी नाराजी पत्करावी लागेल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. आपल्या कार्यात त्याचे प्रोत्साहन मिळेल. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कुटुंब सदस्यांशी मनमोकळी चर्चा कराल. त्यांच्या समस्या समजून घ्याल. अपचनामुळे पोट बिघडेल.

मिथुन बुध-प्लुटोच्या नवपंचम योगामुळे सभेत सर्वासमोर धीटपणे आपले मत व्यक्त कराल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. प्रकल्पाचे योग्य नेतृत्व कराल. सहकारीवर्गाकडून अनपेक्षितपणे मदत घ्यावी लागेल. जोडीदार वैयक्तिक समस्यांमुळे त्रस्त असेल. त्याला त्याची वैचारिक स्वतंत्रता द्यावी. भावनिक आधाराची त्याला गरज भासेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. आरोग्य चांगले राहील.

कर्क रवी-शनीच्या नवपंचम योगामुळे आपल्या योग्यतेप्रमाणे लाभ मिळवण्यासाठी झगडावे लागेल. नोकरी-व्यवसायात परिस्थितीवर मात करण्यासाठी अतिरिक्त शक्ती खर्ची पडेल. वैचारिक व शारीरिक दमणूक होईल. सहकारीवर्गाकडून उल्लेखनीय साहाय्य मिळेल. आíथक आलेख उंचावण्यात जोडीदाराचा मोठा वाटा असेल. घरासाठी विशेष खरेदी कराल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. अंतस्रावी ग्रंथींच्या कार्यात बिघाड होईल. तपासणी करावी लागेल.

सिंह गुरू व मंगळ या दोन बलवान पुरुष ग्रहांच्या केंद्रयोगामुळे महत्त्वाकांक्षा पूर्ण कराल. धडाडीने पुढे जाल. नोकरी-व्यवसायात नेतृत्व करण्याच्या संधीचे चीज कराल. वरिष्ठांच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळवाल. सहकारीवर्गाला उत्तेजन देऊन उत्तम कार्य करून घ्याल. उत्साहाच्या भरात खर्चाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. रक्ताभिसरण संस्थेचे कार्य बिघडू शकते. मनाविरुद्ध गोष्टींचा मानसिक ताण घेऊ नका.

कन्या बुध व गुरू या दोन द्विस्वभावी ग्रहांच्या केंद्रयोगामुळे अनिश्चितता वाढेल. ठामपणे निर्णय घेणे कठीण पडेल. पण व्यवहारज्ञानाचा योग्य ठिकाणी उपयोग कराल. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास कराल. सहकारीवर्ग जेव्हढय़ास तेवढे संबंध ठेवेल. जोडीदार कौटुंबिक निर्णय योग्य प्रकारे घेईल. आतडय़ांना सूज येणे, आक्रसणे असे त्रास संभवतात.

तूळ रजोगुणी मंगळ व तमोगुणी शनीच्या नवपंचम योगामुळे धडाडीने व चिकाटीने कार्य पूर्ण कराल. नोकरी-व्यवसायात काही जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने  स्वीकाराल. सहकारीवर्गाचे प्रश्न व्यवस्थापकांपुढे मांडाल. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या मदतीला धावून जाल. प्रयत्नांना यश मिळेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात भरारी घेईल. आपले पाठबळ त्याच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक!

वृश्चिक रवी-चंद्राच्या केंद्रयोगामुळे अडचणींवर मात करून पुढे जाल. अशा परिस्थितीत वैचारिक दमणूक होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून कामाचा दबाव वाढेल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण होईल. सहकारीवर्गाच्या मदतीमुळे ताण कमी होईल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. एकमेकांसाठी वेळ राखून ठेवाल. कौटुंबिक प्रश्न चच्रेने सोडवाल. पित्तप्रकोप, मुरुमं, फोड, पुटकुळ्या यांचा त्रास जाणवेल. शारीरिक उष्णतेवर नियंत्रण ठेवा.

धनू रवी-गुरूच्या केंद्रयोगामुळे दिलदार व उदार मनाने गरजूंना मदत कराल. इतरांच्या विश्वासाला पात्र ठराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारीवर्गाकडून वेळेवर कामे पूर्ण करून घ्याल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. त्याच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय कुटुंबाला लाभदायक ठरतील. लहान-मोठा प्रवास कराल. अतिरिक्त खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक! पोटाचे विकार व त्वचाविकार बळावतील. वेळेवर औषधोपचार घ्या.

मकर चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे कामातील उत्साह वाढेल. कष्ट करण्याची तयारी दाखवाल. नोकरी-व्यवसायात जिद्दीने आगेकूच कराल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती होईल. सहकारीवर्गाला व्यवहारकुशलतेने अडचणीतून बाहेर काढाल. जोडीदारासह मोकळेपणाने चर्चा करून एकमेकांना समजून घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न सफल होईल. खांदेदुखी, मान दुखणे वा लचकणे अशा त्रासांमुळे चिडचिड वाढेल.

कुंभ रवी-नेपच्यूनच्या प्रतियोगामुळे गांजलेल्या व्यक्तींबद्दल आपुलकी व अनुकंपा वाटेल. मदतीसाठी पुढे व्हाल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना अमलात आणाल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नवे करार/काँट्रॅक्ट करू नका. सहकारीवर्गाकडून कामात दिरंगाई होईल. जोडीदाराला मानसन्मान मिळेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. जवळच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. पाय दुखणे, पेटके येणे या दुखण्यांना सामोरे जावे लागेल.

मीन पुरुषकारक ग्रह रवी व प्रकृतीकारक ग्रह चंद्र यांच्या नवपंचम योगामुळे परिस्थितीशी मिळतेजुळते घ्याल. प्रगतीकडे वाटचाल कराल. नोकरी-व्यवसायातील अनेक अडचणींवर मात करण्यासाठी वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारीवर्गाकडून साहाय्य मिळण्याची अपेक्षा करू नये. जोडीदाराची स्थिती समजून घ्याल. एकमेकांचे सूर चांगले जुळतील. हृदयाचे आरोग्य जपा.