सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष आपल्या राशीतील मंगळ-हर्षल युती आपल्यातील धाडसाला, साहसाला आणि स्वतंत्र बाण्याला जोड देईल. परंतु ‘प्रमाणामध्ये सर्व काही असावे’ यानुसार जी कृती कराल ती विचारपूर्वक करा. शब्द जपून वापरावे लागतील. आपला मान राखण्यासाठी दुसऱ्याचा अपमान तर होत नाही ना, याची जाण ठेवाल. नोकरी-व्यवसायात ‘जे जे होईल ते ते पाहावे’ इतका शांत पवित्रा स्वीकारावा लागेल. अडीअडचणीच्या प्रसंगी आप्तेष्टांना मदतीचा हात पुढे कराल.

वृषभ गुरू-चंद्राच्या समसप्तम योगामुळे केलेल्या कष्टाची मधुर फळे मिळतील. मानसन्मान मिळेल. अनेक गरजूंना मदत कराल. थोडेफार समाजकार्य आणि जनजागृतीचे कार्य हातून घडेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना आपले म्हणणे प्रभावीपणे समजावून द्याल. केवळ भावनांमध्ये गुरफटून न जाता व्यावहारिक पातळीवरून विचार केल्याने काही समस्यांची उकल सोपी होईल. कौटुंबिक वातावरणातील तणाव दूर कराल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

मिथुन बुध-हर्षलाचा लाभयोग आपल्या बुद्धिमत्तेला आणि चौकस वृत्तीला चांगली साथ देईल. नवे विचार, नावीन्यपूर्ण कल्पना लोकांपुढे मांडाल. चाकोरी मोडून थोडेसे ‘हटके’ काहीतरी करण्याची योजना आखाल. नोकरी-व्यवसायात सहकारीवर्गाचे याबाबत चांगले सहकार्य मिळेल. वरिष्ठांचा कौल मिळायला मात्र वेळ लागेल.  कौटुंबिक वातावरण आनंदाचे आणि उत्साहाचे राहील. नव्या विचारांच्या नव्या उत्साहात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क रवी-चंद्राच्या केंद्रयोगामुळे आपल्यातील चांगल्या गुणांची कदर होईल. प्रेमाबरोबरच थोडासा राग, रुसवा आणि आपली नापसंतीदेखील शब्दातून किंवा वागण्यातून व्यक्त होईल. भीड न बाळगता व्यक्त केलेले विचार काहीसे क्रांतिकारक ठरतील. घरातदेखील आपल्याला कोणी गृहीत धरणार नाही, याची काळजी घ्याल. नोकरी-व्यवसायात काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील. पण त्याचा त्रास करून घेऊ नका. हातून दानधर्म, धार्मिक कार्ये घडतील.

सिंह चंद्र-मंगळाची भाग्यस्थानातील युती आणि त्यांच्या जोडीला हर्षल यामुळे आपण एखादी नवी जबाबदारी पेलण्याचे धाडस कराल. आपल्या कर्तृत्वाने कार्यक्षेत्र गाजवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल तसेच सहकारीवर्गाचा पाठिंबा मिळवाल. कधीतरी दुसऱ्यांना केलेल्या मदतीची परतफेड म्हणून किंवा कृतज्ञता म्हणून आपल्याला या ना त्या प्रकारची मदत मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील.

कन्या शनी-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड मिळेल. जुन्या-नव्याचा सुरेख संगम करून जुन्या संकल्पना नव्या रूपात राबवाल. आपल्या या कल्पकतेला लोकांकडून चांगली दाद मिळेल. आरोग्य चांगले राहील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना योग्य ते साहाय्य कराल. महत्त्वाच्या बैठकी यशस्वी कराल. जोडीदाराची साथ लाभेल. जवळच्या आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींसह सहलीचा बेत आनंददायी ठरेल.

तूळ आपल्या समतोल वृत्तीला अनुसरून दुसऱ्यावर होणारा अन्याय सहन न होऊन त्याला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसवाल. यासाठी राहू-मंगळाचा केंद्रयोग आपल्याला धाडस देईल आणि द्वितीयातील गुरू यशाची वाट दाखवेल. आप्तेष्टांचे साहाय्य वेळोवेळी मिळेल. सहकारीवर्गाकडून अपेक्षित साहाय्य मिळणार नाही. जोडीदाराची नाखुशी प्रयत्नपूर्वक दूर करावी लागेल.

वृश्चिक धाडसी वृत्ती आणि स्पष्टवक्तेपणा, मंगळ-हर्षल युतीची जोड मिळेल. परंतु कोणाचे मन न दुखावता सद्य:स्थिती मांडणे व्यावहारिक ठरेल. यासाठी आपल्या राशीतील गुरूचे साहाय्य लाभेल. शब्द जपून वापरावे लागतील. नोकरी-व्यवसायात समाधानकारक यश मिळेल. सहकारीवर्गाकडून अपेक्षित कामात विलंब होईल. सुरुवातीपासूनच कामाचा वेग वाढवावा लागेल. कौटुंबिक सुखात काही अडथळे आले तरी ज्येष्ठांच्या सल्ल्याने वातावरण निवळेल.

धनू बुध-हर्षलच्या लाभयोगामुळे बुद्धीला चालना देणाऱ्या घटना घडतील. नवी आव्हाने स्वीकाराल. आपल्या स्वतंत्र विचारांना पोषक वातावरण मिळेल. आपली ही नवीन विचारधारा सर्वाना पटेल असे नाही. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी समयसूचकता दाखवून सर्वाचा फायदा करून द्याल. जोडीदाराची उत्तम साथसंगत मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कठीण प्रसंगी कुटुंबीयांना एकमेकांचा आधार मिळेल.

मकर लाभस्थानातील गुरू केलेल्या कष्टाचे चांगले फळ देईल. मित्रमंडळी, आप्तेष्ट यांच्याकडून अपेक्षित मदत मिळेल. मार्गदर्शन लाभेल. भविष्यात याचा चांगला फायदा होईल. आर्थिक आलेख उंचावेल. अर्थार्जनाचे नवे मार्ग आपल्यापुढे खुले होतील. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेल्या प्रकल्पांमध्ये अपेक्षित प्रगती होईल. परदेशाशी निगडित कामांमध्ये गती येईल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात व्यस्त असला तरी आपल्यासाठी थोडा वेळ राखून ठेवेल.

कुंभ तृतीयातील मंगळ-हर्षल आणि एकादशातील शुक्र, शनी आणि प्लुटो यामुळे नवीन आव्हाने पेलण्याचे धैर्य मिळेल. आर्थिक आणि मानसिकदृष्टय़ा कमजोर व्यक्तींना हवी ती मदत करण्यास मागेपुढे बघणार नाही. अशा गरजू व्यक्तींचा दुवा मिळवाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जोडीदाराची नाखुशी दूर करून त्याची संमती मिळवाल. कौटुंबिक वातावरण धांदलीचे असले तरी उत्साहाचे आणि आनंदाचे राहील.

मीन कोणाला नाराज न करता सर्वाचे म्हणणे जरी आपण ऐकून घेतलेत तरी सर्वाच्या म्हणण्याप्रमाणे वागता येणे कठीण असते हे आपल्याला  कळून चुकेल. अशा वेळी आपले स्वत:चे मन काय सांगते, आपले विचार काय आहेत हे समजून घ्याल. चांगल्या-वाईटाची पारख करून मगच अंतिम निर्णय घ्याल. गुरू-चंद्राचा नवपंचम योग साहाय्यकारी ठरेल. नावलौकिकात भर पडेल. जोडीदारा-कडून अपेक्षा ठेवू नका.