11 December 2017

News Flash

भविष्य : दि. ९ ते १५ जून २०१७

घरामध्ये आवडत्या व्यक्तींना खूश ठेवण्यासाठी खास कार्यक्रम आखाल.

विजय केळकर | Updated: June 9, 2017 1:01 AM

राशिचक्र

01vijay1मेष ज्या कामामध्ये बऱ्याच काळापूर्वी तुम्ही माघार घेतली होती, त्यात पुढाकार घेण्याचे धारिष्टय़ तुमच्यात निर्माण होईल. व्यापार-उद्योगात पशाचे प्रश्न सोडविताना भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांनी हातातले काम अर्धवट ठेवू नये. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट आणि जोखमीच्या कामाकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तींना खूश ठेवण्यासाठी खास कार्यक्रम आखाल.

वृषभ आपल्या हातात चार पसे पडणार ही कल्पनाच सुखावह असते. त्याला तुम्ही अपवाद नाही. व्यापारउद्योगात तुमच्या कल्पकतेला भरपूर वाव असेल. एखाद्या विशिष्ट कामगिरीकरता जादा पशाची कुमक आवश्यक असेल तर त्या कामाला प्राधान्य द्या. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना जास्त कमाई करण्याची संधी मिळेल. नोकरीमध्ये तुमचा कामाचा वेग उत्तम राहील. एकामागून एक कामे तुम्ही पूर्ण करत जाल. वरिष्ठांनी पूर्वी काही आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण होईल. घरामध्ये मुलांच्या गरजांना प्राधान्य द्यावे लागेल.

मिथुन ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ या म्हणीची आठवण ठेवून कृतीवर जास्त भर ठेवा. व्यवसाय-उद्योगात स्वप्नांपेक्षा सत्याला महत्त्व असते हे तुमचे ब्रीदवाक्य असू द्या. रेंगाळलेल्या कामात गती आल्यामुळे तुम्ही आनंदी आणि उत्साही दिसाल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी दिलेले आश्वासन पूर्ण होण्याची लक्षणे दिसतील. बदली हवी असेल तर प्रयत्न करा. घरामध्ये एखाद्या प्रश्नावरती उपाय सुचत नसेल तर तुम्ही इतरांना चांगला सल्ला द्याल.

कर्क तुमच्या दृष्टीने जी अत्यंत महत्त्वाची कामे आहेत, ती आठवडय़ाच्या सुरुवातीलाच हातावेगळी करा. त्यात विलंब झाला तर नंतर तुमचीच गरसोय होईल. व्यापारउद्योगात नवीन संधी उपलब्ध होतील. पण सध्याचे ग्रहमान असे सुचविते की हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. नोकरीमध्ये तुमचे हितशत्रू तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. तुमचे लक्ष केवळ तुमच्या कामावर केंद्रित करा. घरामधल्या व्यक्तींना खूश ठेवण्यासाठी दिनचय्रेत फरक करावा लागेल.

सिंह आठवडय़ाच्या सुरुवातीला तुमच्या मनात अनेक भव्यदिव्य कल्पना येतील. त्या सर्वाची ताबडतोब कार्यवाही व्हावी असे तुम्हाला वाटेल. परंतु कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे हे तुम्हीच ठरवा. व्यापार-उद्योगात जे आपल्याजवळ आहे त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करा.   नोकरीच्या ठिकाणी सगळी कामे स्वत: न हाताळता फक्त महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. बेकार व्यक्तींना काम मिळेल.

कन्या जी गोष्ट आपल्या मनात असते ती घडून येणे यालाच आपण योगायोग म्हणतो. असा योगायोग या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे.  व्यापार-उद्योगात उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढविणारी एखादी संधी दृष्टिक्षेपात येईल. त्यातील बारकावे समजून घ्या आणि नंतरच शिक्कामोर्तब करा. नोकरीमध्ये तुम्ही केलेल्या एखाद्या सूचनेचा वरिष्ठ आणि संस्थेला फायदा होईल. तुमचे कौतुक ऐकायला मिळेल. ज्यांना बदली पाहिजे आहे त्यांनी ताबडतोब प्रयत्न करावे. घरामध्ये तुमची काही मते पूर्वी इतरांना पटली नसतील ती आता मान्य होतील.

तूळ तुमच्यामध्ये एक प्रकारचा नवीन जोम आणि उत्साह निर्माण करेल. जी कामे विनाकारण अडकून पडली होती त्या कामाला गती देण्यासाठी धक्कास्टार्ट पद्धत वापरावी लागेल. पशाची आवक थोडीशी सुधारेल. नोकरीच्या ठिकाणी कंटाळवाणे काम संपुष्टात आल्याने तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामातून नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. घरामध्ये एखाद्या मुद्दय़ावरून इतरांशी मतभेद झाले असतील तर त्यात समेट होईल.

वृश्चिक कोणतेही काम करण्यापूर्वी तुम्ही मनामध्ये त्याचे उत्तम नियोजन करता. पण या आठवडय़ामध्ये तुम्हाला बदलत्या परिस्थतीनुसार वागावे लागेल. प्रकृतीकडे लक्ष दिले तर सर्व काही ठीक होईल. व्यापार-उद्योगात काही अनपेक्षित खर्च अचानक उद्भवतील तरीही हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. नोकरीमध्ये वरिष्ठ नेहमीच्या कामाव्यतिरिक्त इतर बरीच कामे तुम्हाला सांगतील. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या प्रश्नामध्ये लक्ष घालावे लागेल.

धनू तुमची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. या संधीचा फायदा घेऊन एखादे महत्त्वाचे काम मार्गी लावता येईल. व्यापार-उद्योगात इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:च्या कर्तृत्वावर भर ठेवा. नोकरीमध्ये ज्या कामामध्ये विचारांपेक्षा कृतीची जास्त गरज असते त्या कामात तुम्ही सफल व्हाल. बदली हवी असेल तर प्रयत्न करा. घरामध्ये तुमच्यातील नेतृत्वगुणांना महत्त्व येईल. कष्ट वाढतील.

मकर कळतं पण वळत नाही अशी तुमची स्थिती होईल. आपले काम वाढवावे याकरिता तुमच्या मनामध्ये अनेक कल्पना असतील. पण काही कारणाने त्या प्रत्यक्षात उतरणे कठीण वाटते. व्यापार-उद्योगात इतरांवर अवलंबून राहिल्यामुळे तुमच्या कामात विलंब होईल. नोकरीच्या ठिकाणी एकामागून एक कामे तुमच्यावर लादली जातील. बहुतांशी कामे पूर्ण कराल. जी अर्धवट राहतील त्याचा जास्त विचार करू नका. घरामध्ये एक खर्च सोडला तर बाकी वातावरण उत्साहवर्धक असेल. स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

कुंभ गेल्या एक-दोन आठवडय़ांमध्ये काही कामे लांबली असतील तर ती आता हातात घ्याल. सुरुवातीला थोडा गोंधळ असेल, पण नंतर सर्व काही सुरळीत होईल. व्यापार-उद्योगात कमी श्रमात जास्त पसे मिळवावेसे वाटतील. पण त्यापेक्षा नेहमीची कामाची पद्धत तुम्हाला उपयोगी पडेल. नोकरीच्या ठिकाणी कंटाळा आला असेल पण वरिष्ठ तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. घरामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी अर्धवट बातमी कळेल. घाईने कोणताही निष्कर्ष काढू नका.

मीन तुमच्या राशीला एक वेगळेच अंतज्र्ञान लाभलेले आहे. त्यामुळे तुमचे अंदाज सहसा चुकत नाहीत. या आठवडय़ात त्याला अनुभवाची जोड दिलीत तर सोन्याहून पिवळे. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात चांगली होईल. लांबलेले काम मार्गी लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादे जोखमीचे काम तुमच्यावर सोपवतील.  घरातील एखाद्या सदस्याच्या बाबतीत थोडीशी चिंता वाटेल. बुजुर्ग व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on June 9, 2017 1:01 am

Web Title: astrology 9th to 15th june 2017