13 August 2020

News Flash

राशिभविष्य : दि. ११ ते १७ ऑक्टोबर २०१९

मंगळ-हर्षलच्या षडाष्टक योगामुळे धाडसी, साहसी विचार कराल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष मंगळ-हर्षलच्या षडाष्टक योगामुळे धाडसी, साहसी विचार कराल. पण डोक्यात राग घालून टोकाची भूमिका घेऊ नका. लहरी स्वभावाला लगाम लावा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा शब्द पाळला पाहिजे. मनाविरुद्ध काम स्वीकारावे लागेल. सहकारीवर्ग आपल्या फायद्याच्या चार गोष्टी सुचवतील. मित्रमंडळी व नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. जुन्या गोष्टी विसरून जाणे हेच इष्ट! जोडीदार उत्तम साथ देईल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल.

वृषभ रवी-गुरू या दोन शक्तिशाली मित्रग्रहांच्या लाभयोगामुळे दिलदार व उदार अंत:करणाने गरजूंना मदत कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गाकडून मान मिळवाल. त्यांच्यापुढे आदर्श उभा कराल. जोडीदाराच्या आवडत्या विषयात सहभागी व्हाल. एकत्रितपणे वेळ आनंदात घालवाल. प्रेमाने कुटुंबातील ज्येष्ठांचे मन जिंकाल. जुन्या परंपरांचा आदर कराल. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होईल. वैद्यकीय सल्ला आवश्यक!

मिथुन भाग्यस्थानातील चंद्र-नेपच्युनच्या युतीयोगामुळे बौद्धिक प्रगती होईल. उत्साह वाढेल. पण मानसिक स्थिती नाजूक होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सूचना जिव्हारी लावून घ्याल. शांत डोक्याने विचार करावा. सर्वाच्या हिताचा निर्णय घ्यावा. सहकारीवर्गाची मदत मिळेलच असे गृहीत धरू नका. घरासंबंधी विचार लांबणीवर जातील. जोडीदारासह वाद घालून वेळ व शक्ती फुकट जाईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवा. उष्णतेमुळे पोटाचे अनारोग्य संभवते.

कर्क शनी-चंद्राच्या केंद्र योगामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होईल. सुस्तपणा वाढेल. आत्मविश्वास कमी झाला तरी धीर सोडू नका. नोकरी-व्यवसायात अडथळे पार करून पुढे जावे लागेल. वरिष्ठांचा मान राखा. ते मदतीचा हात देतील. सहकारीवर्ग कामे पूर्ण करण्यासाठी मागाल ते साहाय्य करेल. याची जाण आपण ठेवाल. जोडीदारासह क्षुल्लक गोष्टींसाठी वाद घालू नका. काही बाबतीत आत्ता बोलणे टाळा. सांधेदुखी व मणक्याचे त्रास सतावतील. व्यायाम आवश्यक!

सिंह शनी व बुध या दोन मित्र ग्रहांच्या लाभयोगामुळे व्यवहारी बुद्धीचा वापर कराल. डोळसपणे मदत कराल. संयम व सुनियमन यांचे पालन होईल. नोकरी-व्यवसायात नवे करार स्वीकाराल. सहकारीवर्गाच्या प्रश्नांचा शांतपणे विचार कराल. त्यांच्या मागण्यांसाठी वरिष्ठांकडे शिफारस करून त्यांचे मन जिंकाल. कोर्ट-कचेरीच्या कामात शक्ती खर्च होईल. जोडीदाराची मर्जी राखाल. न पटणारे मुद्दे वगळून जोडीदारासह इतर वेळ आनंदात घालवाल.

कन्या चंद्र-मंगळाच्या प्रतियोगामुळे हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी जास्त उत्तेजित असाल. मात्र उत्साहाच्या भरात एखादी महत्त्वाची गोष्ट राहूनच जाईल. अशा वेळी पर्यायी व्यवस्थेचा विचार करून ठेवावा. नोकरी-व्यवसायात मनाविरुद्ध घटना घडल्यामुळे अस्वस्थता वाढेल. सहकारीवर्ग समजूतदारपणाने वागेल. फुप्फुसाचे आरोग्य जपा.

तूळ शुक्र-हर्षलच्या प्रतियोगामुळे जास्त भावुक व्हाल. कलेच्या क्षेत्रात प्रगती कराल. लहरीपणा वाढेल. नोकरी-व्यवसायात  मूड सांभाळून काम करणारी मंडळी भेटतील. सहकारीवर्गात ईर्षां निर्माण होण्याची शक्यता! जोडीदारासह तात्कालिक विषयांवर खटके उडतील. कुटुंबातील सदस्य आपला हेका खोडून काढतील. त्यांना त्यांची स्वतंत्रता द्यावी लागेल. मानसिक संतुलन ढळू देऊ नका. बद्धकोष्ठता व पित्तप्रकोप यांना सामोरे जावे लागेल.

वृश्चिक आत्मकारक रवी व मनाचा कारक चंद्र यांच्या षडाष्टक योगामुळे बाहेरून राग व्यक्त केलात तरी मनातून प्रेम कराल. जिवलग व्यक्तीची काळजी घ्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मन वळवाल. कंपनीच्या हिताचे निर्णय घ्याल. सहकारीवर्गाकडून मदत मिळेल. जोडीदाराला आपल्या कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. ज्येष्ठ मंडळींची सेवा कराल. पोटातील आतडय़ांना सूज आल्याने त्याच्या कार्यात बिघाड होईल.

धनू चंद्र-शनीच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेली कामे चिकाटीने पूर्ण कराल. संयमी वृत्ती अंगी बाणवाल. नोकरी-व्यवसायात धडाडीने जबाबदाऱ्या स्वीकाराल व कुशलतेने पूर्णत्वाला न्याल. कष्टाचे चीज होईल. सहकारीवर्गाला साधकबाधक विचारांचे धडे द्याल. जोडीदाराचा सल्ला आपणास लाभदायक ठरेल. कुटुंबातील सदस्यांच्या हिताच्या दृष्टीने पावले उचलाल. मूत्रिपडाचे आरोग्य बिघडल्यास त्वरित उपाय करावे लागतील.

मकर गुरू-चंद्राचा केंद्रयोग बौद्धिक प्रगतीचा दर्शक आहे. आलेल्या परिस्थितीवर विचारपूर्वक मात कराल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद भूषवाल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारीवर्गाची बाजू समजून घ्याल. त्यांना न्याय मिळवून द्याल. मित्रमंडळी, नातेवाईक यांची मदत कराल. कौतुकास पात्र व्हाल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. एकमेकांना पािठबा द्याल. श्वसन व घशासंबंधित त्रास संभवतात. योग्य आहार व प्राणायाम आवश्यक!

कुंभ शुक्र व चंद्र या दोन स्त्री-ग्रहांच्या समसप्तम योगामुळे कुटुंबसुख व गृहसौख्य चांगले मिळेल. नोकरी-व्यवसायात गरजूंना कामाची संधी द्याल. माणसांच्या सुप्त गुणांची योग्य पारख कराल. काही गोष्टींमधील यश मिळण्यास दिरंगाई होईल. प्रयत्न सोडू नका. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात अधिक व्यस्त असेल. आपणास फारसा वेळ देऊ शकणार नाही. याबाबत तक्रार न करता आपली स्वतंत्र कामे उरकून घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मीन गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे समाजोपयोगी प्रकल्पांमध्ये सहभागी व्हाल. शिक्षण क्षेत्रात पुढे जाल. मोकळेपणाने विचार मांडाल. नोकरी-व्यवसायात नाव कमवाल. यश मिळवाल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारीवर्गासाठी मोलाची कामगिरी कराल. जोडीदाराच्या तक्रारी ऐकून घ्याल. विचारपूर्वक कृती कराल. हाडे व सांधे यांच्या बळकटीसाठी औषधे घ्यावीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2019 1:01 am

Web Title: astrology from 11th to 17th october 2019
Next Stories
1 राशिभविष्य : दि. ४ ते १० ऑक्टोबर २०१९
2 राशिभविष्य : दि. २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१९
3 राशिभविष्य : दि. २० ते २६ सप्टेंबर २०१९
Just Now!
X