03 August 2020

News Flash

राशिभविष्य : दि. १६ ते २२ ऑगस्ट २०१९

चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे धाडस व साहस दाखवाल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष
चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे धाडस व साहस दाखवाल. काही निर्णय मनाशी पक्के कराल. क्रीडा क्षेत्रात मोलाची कामगिरी पार पाडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपल्या प्रगतीत वरिष्ठांचे चांगले योगदान असेल. सहकारी वर्गदेखील मदतीस उत्सुक असेल. जोडीदाराच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवाल. मनातील प्रेमभाव शब्दात व्यक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न कराल. कफ व अपचनाचा त्रास होईल.

वृषभ चतुर्थ व दशम स्थानातून होणाऱ्या मंगळ चंद्राच्या प्रतियोगामुळे जोश, जोम व उत्साह वाढेल. त्याचबरोबर लहरी व तापटपणातही वाढ होईल. परंतु यामुळे नोकरी-व्यवसायात हातातोंडाशी आलेला घास गमवून बसू नका. स्वनियंत्रण महत्त्वाचे! सहकारी वर्ग सहाय्य करेल. याची आपण जाण ठेवाल. जोडीदाराच्या मताशी सहमत असाल. कौटुंबिक प्रश्नांवर दोघे मिळून उपाययोजना कराल. युरिन इंफेक्शन, उष्णतेचे विकार सतावतील.

मिथुन बुध-चंद्राच्या नवपंचम योगामुळे नवनव्या गोष्टी शिकण्याची आवड जोपासाल. नोकरी-व्यवसायात आपल्या व्यवहार कौशल्य व चौकस बुद्धीचा विशेष लाभ होईल. सहकारी वर्गाला हवी ती मदत कराल. परतफेडीची अपेक्षा नसावी. जोडीदारासह न पटणाऱ्या मुद्दय़ांवरून खटके उडतील. कौटुंबिक वातावरणावर आपण त्याचा परिणाम होऊ देणार नाहीत. इतर बाबतीत चांगले जुळेल. अतिरिक्त उष्णता शरीराबाहेर पडेल. ताप येणे, डोळ्यांची जळजळ होईल.

कर्क प्रथम व दशम स्थानातून होणाऱ्या बुध-हर्षलच्या केंद्र योगामुळे नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याकडे कल राहील. या बुद्धिमत्तावर्धक योगामुळे बौद्धिक छंद जोपासाल. नोकरी-व्यवसायात इतरांच्या मताची पर्वा न करता पुढे गेलात तर अडचणीत याल. सहकारी वर्ग आपल्या संशोधन कार्यात मोलाचा हातभार लावेल. जोडीदार आपल्या व्यस्त दिनक्रमातून आपल्यासाठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करेल. त्वचाविकार दुर्लक्षित करू नका.

सिंह चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे राजेशाही थाट अनुभवाल. सुखाचा उपभोग घेता येईल. नोकरी-व्यवसायात पूर्वी घडून गेलेल्या त्रासदायक गोष्टी विसरून जाल. नव्या उत्साहाने प्रयत्न कराल. सहकारी वर्ग नवे प्रश्न उपस्थित करेल. या प्रश्नांची अभ्यासपूर्वक उत्तरे तयार ठेवाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कुटुंबासाठी जोडीदाराने घेतलेली मेहनत खरोखर कौतुकास्पद असेल.पोट, आतडी, जठर यांसंबंधित त्रास अंगावर काढू नका.

कन्या गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे आत्मविश्वास वाढेल. हाती घेतलेल्या कामाला गती येईल. सातत्य राखणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. सहकारी वर्गातील वाद मिटवण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराच्या साथीने अडचणींवर मात कराल. एकमेकांसाठी राखून ठेवलेल्या वेळेचा सदुपयोग कराल. विश्वास वृिद्धगत होईल. छातीत कफ होऊ देऊ नका.

तूळ चंद्र-नेपच्युनच्या युतियोगामुळे भावनिक अस्थिरता येईल. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मत मान्य करून कृती करावी लागेल. ज्येष्ठ जाणकारांचे अनुभवाचे बोल योग्य मार्गदर्शन करतील. सहकारी वर्गावर नव्या जबाबदाऱ्या सोपवू नका. आपल्या गोड शब्दांनी व मुद्देसूद बोलण्याने जोडीदाराचे मन जिंकाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. पित्ताशयाला सूज येणे, त्यात खडे होणे याची शक्यता!

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या समसप्तम योगामुळे कामाचा उत्साह वाढेल. आपल्या अपेक्षित वेगाने सहकारी वर्गाकडून काम पूर्ण होणार नाही. परंतु या गोष्टीचा आपण आपल्या जीवाला किती त्रास करून घ्यावा? राग आवरणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून कामाचा दबाव आणला जाईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. कौटुंबिक अडचणींवर जोडीदार समर्थपणे उपाय योजेल. मज्जासंस्थेचे आरोग्य सांभाळा. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

धनू रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. सर्वच गोष्टी आपल्या मनाजोगत्या व्हाव्यात अशी अपेक्षा नको. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून संमत्ती मिळवण्यासाठी सतत त्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागेल. सहकारी वर्ग मदत करेल. वेळप्रसंगी योग्य सल्लाही देईल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात खूपच ओढाताण होईल. अशा वेळी आपला धीराचा शब्द त्याच्यासाठी लाखमोलाचा ठरेल. मनोधर्य कायम ठेवा.

मकर चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे स्वभावात चंचलता येईल. संशय घेणे टाळा. त्यापेक्षा मनमोकळी चर्चा करून मनातील शंका दूर करा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मत पटणार नाही. सहकारी वर्ग आपल्या म्हणण्याला दुजोरा देईल. परंतु त्याचा सध्या तरी फारसा उपयोग होणार नाही. जोडीदाराची स्थिती समजून घ्याल. वादविवाद टाळाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. छातीत वात अडकल्याने अस्वस्थ वाटेल. वातहारक औषधी उपयोगी ठरतील.

कुंभ चंद्र-नेपच्युनच्या लाभ योगामुळे कल्पना, प्रेरणा यांना जोड मिळेल. नव्या संकल्पना अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास खरा करून त्यांची मर्जी संपादन कराल. सहकारी वर्गाकडून फारशा अपेक्षा न ठेवता आपली कामे आपणच उरकून घ्याल. वेळ व शक्ती दोन्ही वाचेल. जोडीदाराचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. त्याच्या कार्यक्षेत्रात तो प्रगती करेल. कफ, सर्दी व डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागेल. वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.

मीन गुरु-चंद्राच्या नवपंचम योगामुळे इतरांना मदत कराल. बौद्धिक छंद जोपसाल. नोकरी व्यवसायात अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न कराल. ज्येष्ठ वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. सहकारी वर्गाला बहुमोल सहाय्य कराल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. कुटुंबात ज्येष्ठ मंडळींच्या सोयीनुसार आपल्या वेळापत्रकात बदल करावा लागेल. उष्णतेचे विकार बळावतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 1:01 am

Web Title: astrology from 16th to 22nd august 2019
Next Stories
1 राशिभविष्य : दि. ९ ते १५ ऑगस्ट २०१९
2 राशिभविष्य : दि. २६ जुलै ते १ ऑगस्ट २०१९
3 राशिभविष्य : दि. १९ ते २५ जुलै २०१९
Just Now!
X