सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-हर्षलच्या युतीयोगामुळे शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक! डोक्यात राग घालून न घेता परिस्थितीचा शांतपणे विचार करावा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना दमछाक होईल. कामाचे योग्य नियोजन केलेत तर अतिरिक्त श्रम वाचतील. सहकारी वर्गांच्या शंकांचे समाधान कराल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात अनेक अडचणींशी सामना करावा लागेल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवाल. मज्जासंस्थेसंबंधित आजारांवर उपाय सापडतील.

वृषभ  चंद्र-बुधाच्या केंद्रयोगामुळे भावना आणि व्यवहार दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतील. एखाद्याच्या वागणुकीबद्दल शंका घेऊ नका. नोकरी-व्यवसायात आपली मते अभ्यासपूर्वक आणि संदर्भ देऊन मांडाल. सहकारी वर्गावर संपूर्णपणे विसंबून न राहता पर्यायी योजना तयार ठेवावी. जोडीदाराच्या कार्यात त्याचा मान वाढेल. त्याच्या कष्टाचे चीज होईल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे. उत्सर्जन संस्थेचे विकार बळावण्याची शक्यता आहे.

मिथुन चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे सद्य परिस्थितीचे भान ठेवून आपला आनंद आणि उत्साह व्यक्त कराल. इतरांनाही नवी उमेद द्याल. नोकरी-व्यवसायातील नव्या प्रकल्पात आपल्याला सहभागी करून घेतील. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळाल्याने कामाला वेग येईल. जोडीदाराचे गैरसमज दूर कराल. कुटुंब सदस्यांना अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवाल. पोटाचे विकार बळावतील. गर्भाशयासंबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक.

कर्क गुरू-चंद्राच्या केंद्रयोगामुळे आपल्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सहवास, संपर्क अथवा मार्गदर्शन लाभेल. नोकरी-व्यवसायात  वरिष्ठांच्या म्हणण्याप्रमाणे वागणे काहीसे जड जाईल, परंतु प्रयत्न कराल. सहकारी वर्गाच्या तारतम्यामुळे मोठा आधार मिळेल. कामात लाभ होईल. जोडीदाराच्या कामाचा व्याप आणि ताप वाढेल. त्याचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक! प्रकृतीची काळजी घ्या. हाडे, सांधे यांचे दुखणे उद्भवेल.

सिंह चंद्र-नेपच्यूनच्या युतीयोगामुळे कामातील उत्साह वाढेल. सद्य:स्थितीत  इतरांना सकारात्मक ऊर्जा द्याल. नोकरी-व्यवसायात कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. इतरांच्या भावना समजून घ्याल. त्यांना मदतीचा हात पुढे कराल. सहकारी वर्गाकडून काम वेळेत पूर्ण करून घ्याल. त्यांच्या अडचणी सोडवाल. कौटुंबिक मतभेद बाजूला सारून संकटात ठामपणे उभे राहाल. जोडीदाराच्या प्रेमाला योग्य प्रतिसाद द्याल. कामाच्या व्यापामुळे हाडांची दुखणी बळावतील.

कन्या गुरू-चंद्राच्या लाभयोगामुळे हाती घेतलेल्या कामाला गती येईल. मानसन्मान मिळेल. यशाची शिखरे गाठाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पल्ला सर कराल. सहकारी वर्गाच्या समयसूचकतेमुळे कामाचा भार हलका होईल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील. त्याचे कार्यकौशल्य पणाला लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. श्वसनाचे त्रास, जुने विकार डोकं वर काढतील. वैद्यकीय सल्ला आवश्यक!

तूळ मनाचा कारक चंद्र आणि बुद्धीचा कारक बुध याच्या नवपंचमयोगामुळे भावना आणि विचार यांच्यात समतोल राखाल.  नोकरी-व्यवसायात महत्त्वाच्या मुद्दय़ांवर योग्य चर्चा कराल. सहकारी वर्गाकडून बाहेरगावची कामे उत्तमरीत्या पार पडतील. जोडीदाराच्या कामकाजात नाहक अडथळे येतील. त्याची चिडचिड वाढेल. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. ते हलकेफुलके करण्याची जबाबदारी आपली! तळपायाची जळजळ होईल.

वृश्चिक चंद्र-शुक्राच्या नवपंचमयोगामुळे नव्या संकल्पना, वेगळ्या योजना सर्वापुढे मांडाल. नोकरी-व्यवसायात नित्यनेमाच्या कामात काही बदल अमलात आणाल. सहकारी वर्गाची मदत लाभदायक ठरेल. आर्थिक प्रगती होईल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात पत वाढेल. त्याच्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. सद्य:स्थितीचे भान राखणे आवशयक! डोकं दुखणे, सायनस याचा त्रास संभवतो.

धनू  चंद्र-शनीच्या लाभयोगामुळे चंद्राच्या कुतूहलाची, शनीच्या संशोधक वृत्तीची जोड मिळेल. कष्टाचे चीज होईल. नोकरी-व्यवसायात स्वत:च्या हिमतीवर पुढचे पाऊल टाकाल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारी वर्गाच्या समस्या समजून घ्याल. जोडीदाराच्या कष्टाचे सार्थक होईल. त्याचे नव्या क्षेत्रात पदार्पण होईल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवाल. सद्य:स्थितीचा विचार करून योग्य निर्णय घ्याल. गुह्य़ांगाचे त्रास उद्भवल्यास त्वरित वैद्यकीय उपाय करावेत.

मकर गुरू-शनीच्या युतीयोगामुळे शनीचा सखोल अभ्यास, कष्ट, मेहनत यांना गुरूचे ज्ञान, मार्गदर्शन यांची चांगली जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात अडीअडचणींवर जिद्दीने मात कराल. अन्यायाला वाचा फोडाल. सहकारी वर्गाची साथ मिळेल. सध्याच्या परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घ्यावा. जोडीदाराच्या रखडलेल्या कामांना वेग येईल. त्याचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंब सदस्यांकडून आनंदवार्ता समजतील. मांडय़ा, पोटऱ्या यांच्यात पेटके येतील.

कुंभ रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. यश, कीर्ती, संपत्ती लाभेल. नोकरी-व्यवसायात कष्टाचे चीज होईल. नव्या जबाबदाऱ्या हिमतीने पूर्ण कराल. सहकारी वर्गाला चांगला पाठिंबा मिळेल. त्यांच्यातील गुणांचे कौतुक कराल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. त्याच्या अधिकारात वाढ होईल. कुटुंब सदस्यांची प्रगती मनाला उत्साह देईल.  कौटुंबिक वातावरण शिस्तीचे राहील. डोळ्यांची जळजळ होईल. विश्रांतीची आवश्यकता भासेल.

मीन  चंद्र-मंगळाच्या युतीयोगामुळे उत्साह वाढेल. चंद्राच्या क्रियाशीलतेला आणि कल्पकतेला मंगळाच्या ऊर्जेची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात उच्चाधिकाराचे पद भूषवाल. सर्वाच्या हिताचा विचार करून अंतिम निर्णय जाहीर कराल. जोडीदाराच्या कामाला गती मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही, खेळीमेळीचे राहील. छाती आणि हृदयाची काळजी घ्यावी. अति दमणूक, ताण टाळणे आवश्यक!