15 October 2018

News Flash

दि. १ ते ७ डिसेंबर २०१७

महत्त्वाच्या निर्णयाच्या बाबतीत द्विधा निर्माण होऊन हितचिंतकाच्या सल्ल्याची गरज भासेल.

daily horoscope

मेष महत्त्वाच्या निर्णयाच्या बाबतीत द्विधा निर्माण होऊन हितचिंतकाच्या सल्ल्याची गरज भासेल. व्यापार-उद्योगात भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या. औदार्य दाखवण्यासाठी आर्थिक मदत करून मोठेपणा मिळवण्याचा मोह होईल. वरिष्ठांच्या सूचना न कळल्याने कामात संदिग्धता राहील. बऱ्याच वर्षांनंतर जुन्या सहकार्याची भेट होईल. घरामध्ये छोटय़ा ट्रिपचे नियोजन होईल. पण बजेटमुळे त्यात काटछाट करावी लागेल.

वृषभ ‘कळतं पण वळत नाही’ अशी स्थिती होईल. कामात तुम्हाला आवडणारा मार्ग उपयोगी न पडल्यामुळे पर्यायी विचार करणं भाग पडेल. व्यवसाय-उद्योगात अपेक्षित पैसे हातामध्ये पडण्यात विलंब झाल्यामुळे  चिडचिड होईल. शिलकीतल्या पशाला हात लावावा लागेल. नवीन करार करताना त्यातल्या अटी समजून घ्या. वरिष्ठांनी गुंतागुंतीच्या कामात अडकवल्याचा नोकरदार व्यक्तींना राग येईल. पण नाइलाज असेल. घरामध्ये इतरांनी ठरवलेले बेत तुम्हाला आवडणार नाहीत, कारण ते खर्चीक असतील. कोणालाही फुकटचा सल्ला देऊ नका.

मिथुन ‘दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’ या म्हणीची आठवण ठेवा. योग्य व्यक्तीची योग्य कामाकरिता निवड करा. व्यापार-उद्योगात एखादे अवघड काम मार्गी लावाल. जोडधंदा करणाऱ्यांना नवीन कामाकरिता छोटासा प्रवास करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या सूचना शांतपणे ऐका. शंकांचे ताबडतोब निरसन करून घ्या. घरामध्ये समजुतीचा घोटाळा होणार नाही याकडे लक्ष द्या. मोठय़ा व्यक्तींचा सल्ला तुम्हाला पटणार नाही, पण तोच योग्य ठरेल.

कर्क ग्रहमान मानलं तर समाधान अशा प्रकारचे आहे. घरामधल्या एखाद्या प्रश्नावरून चिडचिड होईल. मन शांत ठेवा. व्यापार-उद्योगात ज्या कामात तुम्ही इतरांवर अवलंबून असाल त्यामध्ये गैरसोय होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आपण बरे आणि आपले काम बरे असा दृष्टिकोन ठेवा. तुमची संस्था आणि वरिष्ठ यांच्याविषयी कोणतेही मतप्रदर्शन करू नका. तुमचे बेत गुप्त ठेवा. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीच्या शब्दाला मान द्यावा लागेल.

सिंह तुमचे वागणे-बोलणे इतरांना कळणार नाही. पण तुम्हाला यशाची खात्री असेल. व्यापार- उद्योगात जे काम चालू आहे त्यावर तुम्ही समाधान मानणार नाही. भव्यदिव्य करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीमध्ये कामाचा उत्साह दांडगा असेल. वरिष्ठांच्या सूचना शांतपणे ऐकून मगच कामाला सुरुवात करा. चालू नोकरी घाईत बदलू नका. बुजुर्ग व्यक्तींचा सल्ला अवश्य लक्षात ठेवा. त्याचा विसर पडला तर तुम्हालाच अडचण येईल.

कन्या  ‘प्रयत्नांति परमेश्वर’ हे धोरण या आठवडय़ात तुम्हाला उपयोगी पडेल. व्यापार-उद्योगात एखादा असा निर्णय घ्याल, ज्याचे कारण इतरांना समजणार नाही. पण तुमच्या मनामध्ये मात्र विचारांचे मंथन चालूच असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ काय सांगतील याचा तुम्हाला अंदाज आल्याने ते काम तुम्ही आधीच तयार ठेवाल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. तातडीच्या कामाकरिता छोटा प्रवास करावा लागेल. घरामध्ये वडिलधाऱ्या व्यक्तींना दिलेला सल्ला सुरुवातीला तुम्हाला पटणार नाही. पण नंतर तो उपयोगी पडेल.

तूळ ग्रहमान उत्साहवर्धक आहे. व्यापार-उद्योगात सर्व काही ठाकठीक वाटेल. ज्यांना तुमच्याकडून पैसे मिळवायचे आहेत त्या व्यक्ती तुमची मखलाशी करतील. त्यांना भुलून जाऊ नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी नेमून दिलेले काम वेळेत आणि त्यांच्याच पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुमचे भविष्यातील बेत सहकाऱ्यांना सांगू नका. घरामध्ये वडिलधाऱ्या व्यक्तींचे विचार तुम्हाला पटणार नाहीत. पण प्रत्यक्ष घटना घडून गेल्यावर ते बरोबर होते, असे लक्षात येईल.

वृश्चिक शब्द  हे शस्त्र आहेत हे या आठवडय़ामध्ये विसरू नका. तुमच्या तोंडून कधी कधी खूप जुनाट विचार ऐकायला मिळतील. प्रत्यक्ष कामाला लागल्यानंतर तुम्ही एकदम मॉडर्न बनाल. व्यापार-उद्योगामध्ये कामाचा झपाटा उत्तम असेल.  नोकरीच्या ठिकाणी कामातील अडथळे तुम्हीच दूर करा. त्यासाठी एखादे दुसरे महत्त्वाचे काम नाइलाजाने लांबवावे लागेल. घरामध्ये इतर सदस्यांचा सल्ला तुम्ही घ्याल. जेव्हा आणि जशी वेळ असेल त्याप्रमाणे त्याचा उपयोग कराल.

धनू आवडती गोष्ट मिळविण्याकरिता जंग जंग पछाडाल. पण वरून मात्र असे दाखवाल की तुम्ही कोणावर तरी उपकार करत आहात. व्यापार-उद्योगात कामकाज लाभदायक होईल.  नोकरीच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. त्या बदल्यात त्यांच्या अपेक्षा जाणून घ्या. घरामध्ये तुमच्या दुटप्पी वागण्यामुळे सर्वजण कोडय़ात पडतील. पण तुम्ही हेका सोडणार नाही. घरखर्च वाढत असल्यामुळे एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही विरोध कराल.

मकर प्रत्येक व्यक्तीला पुढे होणाऱ्या घटनांचा अंदाज येत असतो. त्याचा कसा उपयोग करायचा हे त्यानेच ठरवायचे असते. व्यापार-उद्योगात तुमचे काही अंदाज बरोबर ठरतील. त्याचा कसा फायदा करून घ्याचचा हे तुम्हीच ठरवायचे आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना गृहीत धरू नका. त्यांच्या सूचनेप्रमाणे काम केले तर त्यांना बरे वाटेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींनी दिलेला सल्ला तुम्हाला पटणार नाही. पण त्याचा उपयोग होईल. एखादे अवघड काम चिकाटीच्या जोरावर पार पाडाल.

कुंभ ग्रहमान उत्साह वाढवणारे आहे. एकापेक्षा जास्त प्रगतीच्या वाटा समोर असतात तेव्हा मनाचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. अंतस्फूर्ती  सांगेल त्याप्रमाणे तुम्ही कराल. व्यापार-उद्योगात नवीन वर्षांकरिता विस्ताराचे बेत आखाल. त्याकरिता आवश्यक ते भांडवल गोळा कराल. नोकरीच्या ठिकाणी बरीच कामे तुमच्या हातात असतील. वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचा सल्ला पटणार नाही. एखादा आनंददायी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.

मीन  तुम्हाला जी गोष्ट मिळवायची आहे त्याकरिता बरेच कष्ट पडतील. व्यापार-उद्योगात जमा- खर्च समसमान राहील. नवीन करार तांत्रिक कारणामुळे लांबवावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी कामाचे उद्दिष्ट ठरविलेले असेल. त्यामध्ये वरिष्ठांनी ढवळाढवळ केल्याने गोंधळ उडेल. नवीन नोकरीच्या कामात विलंब होईल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींशी वादविवाद घालू नका. अतिश्रमामुळे थोडासा मानसिक आणि शारीरिक त्रास संभवतो.

विजय केळकर response.lokprabha@expressindia.com

First Published on December 1, 2017 1:26 am

Web Title: astrology from 1st to 7th decembr 2017