मेष मनाची द्विधा मन:स्थिती निर्माण करणारे ग्रहमान आहे. थोडासा वेळ स्वत:करिता काढून मौजमजा करावीशी वाटेल, पण नेहमीच्या कर्तव्यामध्ये तुम्ही जखडून जाल. व्यापार-उद्योगात ज्यांना तुम्ही पैसे द्यायचे कबूल केले होते, त्यांच्याकडून आठवण करून दिली जाईल.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ केलेले चांगले काम विसरून चुकांवर बोट ठेवतील. तुमचा मूड जाईल,  घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या.

वृषभ हातामध्ये पैसे पडले की तुम्हाला ते खर्च करावेसे वाटत नाहीत, पण या आठवडय़ामध्ये एखाद्या मोठय़ा खर्चाची नांदी होण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगात जरी पैसे मिळाले तरी त्यावर तुमचे समाधान होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांना मदत करण्यापूर्वी आपले काम वेळेमध्ये आणि पद्धतशीर रीतीने पार पाडा.  घरामध्ये मुलांच्या वागण्या-बोलण्यामुळे थोडासा मनस्ताप होईल. त्यांना प्रेमाने समजावून सांगा.

मिथुन एकाच प्रकारचे काम करायला तुम्हाला कंटाळा येतो. त्यामुळे तुम्ही सतत नवीन वातावरणाचा शोध घेत असता. या आठवडय़ात एखाद्या निमित्ताने वेगवेगळ्या स्तरांवरल्या व्यक्तींना भेटण्याचा योग चालून येईल. व्यापारउद्योगात गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता जाहिरात किंवा विशेष योजना तयार करा. नोकरीमध्ये तुमच्या प्रावीण्याला आणि कौशल्याला भरपूर वाव असेल.  घरामध्ये प्रियजनांचा मेळावा ठरल्यामुळे खूश असाल.

कर्क तुमची इच्छा नसतानाही चन, आराम वगैरे गोष्टींना विसरून या आठवडय़ामध्ये तुम्हाला काम करावे लागेल. व्यापारउद्योगातील प्रत्येक छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे लक्ष ठेवावे लागेल. सरकारी कामे आणि कोर्ट व्यवहार या गोष्टींवर स्वत: जातीने देखरेख करा. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामात शॉर्टकटचा उपयोग होणार नाही.  नवीन नोकरीच्या कामात थोडा संयम राखा.  वयोवृद्ध व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटेल.

सिंह ग्रहमान संमिश्र आहे. ग्लास अर्धा रिकामा आहे की अर्धा भरला आहे हे तुम्हीच ठरवायचे आहे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे बघून स्वत:चा आत्मविश्वास टिकवून ठेवा. व्यापारउद्योगात जे पैसे मिळतील ते लगेच खर्च झाल्यामुळे हातात काहीच शिल्लक राहणार नाही. सरकारी नियम काटेकोरपणे पाळा. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठ त्यांच्या पद्धतीनेच काम करायला लावतील. घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तीचे तंत्र सांभाळावे लागेल.

कन्या सतत होणाऱ्या दगदग धावपळीचा मनस्वी कंटाळा आला असेल.  पण कामाचा व्याप इतका असेल की तुम्हाला हे सगळे विसरून जावे लागेल. व्यापारउद्योगात ठरविलेली कामे वेळेत पूर्ण करण्याकरिता कामगारांना खूश ठेवावे लागेल. त्याव्यतिरिक्त मशीनची देखभाल, सरकारी देणी वगैरे कारणांकरिता पैसे खर्च करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी कितीही काम केले तरी वरिष्ठांना ते कमीच वाटेल.

तूळ एकाच आठवडय़ात बऱ्याच प्रकारची कामे हाताळायची असल्यामुळे तुम्हाला कंबर कसून सिद्ध व्हावे लागेल. त्यामध्ये जरा जरी आळस झाला तरी तुमचे कामाचे उद्दिष्ट हुकण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगात ठरविलेली कामे संपल्याशिवाय नवीन कामात लक्ष घालू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला विश्रांती मिळू देणार नाहीत. घरामध्ये वस्तूंची मोडतोड, एखाद्या व्यक्तीचे आजारपण या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल.

वृश्चिक या आठवडय़ामध्ये कामाच्या वेळी काम आणि इतर वेळी आराम असा तुमचा फॉम्र्युला असेल. तरीपण कोणतीही गोष्ट गृहीत न धरता ठरविलेले काम वेळेत आणि शांतपणे उरका. व्यापारउद्योगात काही न चुकवता येणारी देणी द्यावी लागतील. कामगारांचे प्रश्न थोडेसे कठीण होतील. नोकरीच्या ठिकाणी एखादी युक्ती वापरून वरिष्ठांनी दिलेले काम संपवून टाकाल. घरामध्ये तुम्ही फारसा वेळ देऊ शकणार नाही.

धनू ग्रहमान संमिश्र आहे. तोंड झाकले की पाय उघडे पडतात आणि पाय झाकले की तोंड उघडे पडते असा अनुभव येईल. ज्या कामात तुम्ही लक्ष घालाल ते काम व्यवस्थितपणे पार पडेल. पण ज्याच्याकडे तुमचे दुर्लक्ष होईल, त्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगात वेळेत कामे उरकण्याकरिता गिऱ्हाईकांचा तगादा राहील. आर्थिक स्थिती साधारण असेल. नोकरीच्या ठिकाणी काम करता करता तुम्ही घडय़ाळाचे गुलाम व्हाल.

मकर या आठवडय़ात तुमच्याकडे काम भरपूर असेल, पण ते काम कदाचित तुमच्या आवडीचे नसेल. त्यामुळे तुम्ही ढकलगाडीसारखे काम कराल. व्यापारउद्योगातील सरकारी नियमांचे उल्लंघन करू नका, त्याचा तुम्हाला नंतर त्रास होईल. कामगार ऐन महत्त्वाच्या कामाच्या वेळी त्यांच्या मागण्या तुमच्यापुढे ठेवतील. नोकरीच्या ठिकाणी जी कामे आळसाने तुम्ही पुढे ढकलले होते ती पूर्ण करावी लागतील. घरातील वृद्ध व्यक्तींची प्रकृती सांभाळा.

कुंभ ग्रहमान उलटसुलट आहे. रोजच्या धावपळीचा तुम्हाला मनस्वी कंटाळा येईल. व्यापारउद्योगात वेळेमध्ये काम उरकण्याकरिता गिऱ्हाइकांचा तगादा राहील. कामगारांना खूश ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणे जिकिरीचे होईल. नोकरीच्या ठिकाणी रात्र थोडी सोंगे फार अशी तुमची अवस्था असेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या प्रकृतीची आणि स्वास्थ्याची काळजी घ्या. कोणाशी वादविवाद झाले तरी त्याचा जास्त गंभीरपणे विचार करू नका.

मीन खूप काम केल्यानंतर जसा थकवा येतो तसा तो तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. सर्व गोष्टी झुगारून देऊन थोडीशी मौजमजा करावी असे तुम्हाला वाटेल, पण अखेर कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असे तुम्हाला वाटून कामाला लागाल. व्यापारउद्योगात केवळ पशाशी निगडित महत्त्वाच्या कामात लक्ष घाला. ठरवलेले काम शक्यतो ठरवलेल्या वेळेत उरका.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com