मेष सर्व ग्रहमान तुमच्या भावना तीव्र करणारे आहे. जे तुम्हाला पाहिजे आहे ते मिळण्यासाठी तुम्ही अधीर झाला असाल. व्यापार उद्योगात भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व असते हे विसरू नका. नवीन व्यक्तींशी हितसंबंध सावधतेने वाढवा. नोकरीच्या ठिकाणी ‘शब्द हे शस्त्र आहे’ असा विचार करून सगळ्यांशी मित्रत्वाच्या नात्याने वागा. घरामध्ये नातेवाईकांशी वाद किंवा मतभेद न होता जमतील तीच कामे करा

वृषभ चाकोरीबद्ध आणि आखीवरेखीव काम करणे तुम्हाला नेहमीच आवडते. या आठवडय़ातही तसेच काम करण्याचे ठरवले असेल. पण काही कारणाने अचानक फेरफार झाल्यामुळे थोडासा थकवा निर्माण होईल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात पसा मिळवून देणारे काम तुमचे लक्ष आकर्षति करेल. परंतु नंतर तुमच्या लक्षात येईल की हे सर्व मृगजळ होते. नोकरीच्या ठिकाणी सहकारी एखादी अफवा पसरवून किंवा प्रलोभन दाखवून तुमचे लक्ष विचलित करतील. घरामध्ये मुलांच्या प्रश्नात लक्ष घालावे लागेल.

मिथुन एखाद्या कामाचा तुम्हाला खूप लवकर कंटाळा येतो. त्यामध्ये काहीतरी नवीन प्रयोग करून बघावासा वाटतो. या आठवडय़ात असा मोह होईल. व्यापार-उद्योगामध्ये कोणताही नवीन करार करण्यापूर्वी एखादी गोष्ट समजली नाही तर निष्णात व्यक्तींकडून त्याचा खुलासा करून घ्या. नोकरीच्या ठिकाणी आपले महत्त्व वाढविण्याकरिता वरिष्ठांच्या पुढेपुढे कराल. त्याच्यामुळे एखादी नवीन जबाबदारी येऊन पडेल. घरामध्ये जोडीदाराशी तात्त्विक मतभेद होतील.

कर्क जी गोष्ट अगदी साधी आणि सहज वाटलेली होती त्यामध्ये वेगळी कलाटणी मिळाल्याने तुमचे चित्त विचलित होईल. अशा वेळी कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. ‘थांबा, पाहा आणि पुढे जा’ हे धोरण तुम्हाला उपयोगी पडेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात तुम्ही तुमचे काम वेळेत आणि गिऱ्हाईकांच्या गरजेनुसार पार पाडा.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सूचनेनुसार वागा. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या प्रकृतीकडे आणि स्वत:च्या मन:स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल.

सिंह एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्याची अडचण समजून सांगितली तर ती तुम्ही समजून घेता, पण त्यामध्ये गोलमाल करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा राग उफाळून येतो. या आठवडय़ाला या गोष्टीची काळजी घ्या. व्यापार-उद्योगात एखादा निर्णय रामभरोसे घ्यावासा वाटेल, पण भविष्यकाळात त्यामधून तुमचाच तोटा होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी अधिकाराचा जपून वापर करा. घरामध्ये सगळ्यांना सांभाळून घ्या.

कन्या अत्यंत नियोजनबद्ध काम करणारी तुमची रास आहे. पण या आठवडय़ात  मनात एक ठरवाल, पण काम करण्याची वेळ आली की काहीतरी वेगळेच कराल. व्यापार-उद्योगात कोणताही निर्णय घेताना त्याचे भविष्यात काय परिणाम होतील याचा विचार करा. पशाची गुंतवणूक भावनेच्या भरात करू नका. नोकरीच्या ठिकाणी जे तुमचे काम आहे त्याला प्राधान्य द्या. वेळ मिळाला तरच इतरांच्या कामात मदत करा. बेकार व्यक्तींनी घाईने नवीन नोकरी स्वीकारू नये. घरामध्ये इतरांशी मिळतेजुळते घ्या.

तूळ कोणत्या परिस्थितीत तुम्ही कसे वागाल याचा इतरांना सहज अंदाज येतो. पण या आठवडय़ात मात्र तुमचे वागणेबोलणे थोडेसे वेगळे आणि विचित्र असेल. त्यामुळे सर्वाना आश्चर्य वाटेल. पण तुमचे कामाचे नियोजन मनामध्ये ठरलेले असेल तर ते पार पडल्यानंतर तुम्ही त्यासंबंधी घोषणा कराल. व्यापार-उद्योगात कामामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठांची एखादी सूचना तुम्ही विसरून जाल त्याचा त्यांना राग येईल. घरामध्ये जोडीदाराशी रुसवेफुगवे होतील.

वृश्चिक ज्या वेळेला तुम्ही शांत असता त्या वेळी तुमच्या मनामध्ये बरेच विचार असतात. योग्य वेळ आल्याशिवाय तुम्ही ते इतरांकडे व्यक्त करीत नाही. या आठवडय़ात काही कारणाने तुमच्या भावनांचा उद्रेक होईल. व्यापार-उद्योगात ज्या स्पर्धकांनी पूर्वी तुम्हाला त्रास दिला होता त्यांचा वचपा काढायचे ठरवाल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे हितशत्रू वरिष्ठांकडे तुमच्याविषयी कागाळ्या करतील. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यामुळे कोडय़ात पडल्यासारखे होईल.

धनू ग्रहमान उलटसुलट आहे. तुमची रास अत्यंत स्वातंत्र्यप्रिय आहे. कोणीही तुमच्या कामामध्ये लुडबुड केलेली तुम्हाला चालत नाही.  व्यापार-उद्योगात काही कारणाने आधी ठरविलेले बेत बदलावे लागल्यामुळे तुमची धावपळ होईल. अपेक्षित पसे वसूल करताना एखादी युक्ती किंवा ओळख शोधावी लागेल. नोकरीमध्ये आपण बरे आणि आपले काम बरे असे धोरण उपयोगी पडेल. घरामध्ये किरकोळ कारणावरून वादविवाद होतील.

मकर सहसा कोणताही निर्णय घेताना तुमच्या विचारांचा गोंधळ उडत नाही. पण या आठवडय़ामध्ये एखाद्या कारणामुळे तुम्हाला कोडय़ात पडल्यासारखे होईल. घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. व्यापार-उद्योगात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची सूचना नीट लक्षात घ्या आणि मगच कामाला सुरुवात करा. नवीन नोकरीचे निर्णय घाईगडबडीमध्ये घेणे धोक्याचे ठरेल. घरामध्ये छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये पशाचा खूप विचार कराल. जागेच्या स्थलांतराविषयी विचारविनिमय होईल.

कुंभ या आठवडय़ात तुमचा भर कृती करण्यावर असेल. त्याला कल्पनाशक्तीची जोड दिलीत तर सोन्याहून पिवळे. व्यापार-उद्योगात नेहमीपेक्षा जास्त पसे मिळविण्याकरिता काहीतरी धाडस करावे लागेल. व्यापारीवर्ग आणि कारखानदार यांना एखादे नवीन काम मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कोणताही निर्णय वरिष्ठांच्या परवानगीशिवाय घेऊ नका. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या बोलण्याचा गरसमज करू नका. नातेवाईकांशी जपून बोला.

मीन सहसा तुम्ही तुमच्या मागण्यांच्या बाबतीत हट्टी बनत नाही, पण या आठवडय़ात जे तुम्हाला हवे आहे त्याबाबतीत तडजोड करणार नाही. व्यापार-उद्योगात  आíथक बाजू सुधारण्याची चिन्हे दिसू लागतील. व्यावसायिक जागेच्या स्थलांतराचे विचार मनात येतील. नोकरीत वरिष्ठांच्या सूचना शांतपणे ऐका. नाहीतर तेच काम पुन्हा करावे लागेल. घरामध्ये तुमचे प्रेम आणि राग या दोन्हीचे दर्शन घडेल. प्रकृतीकडे लक्ष ठेवा.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com