18 February 2019

News Flash

दि. २ ते ८ फेब्रुवारी २०१८

ग्रहमान तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला खतपाणी घालणारे आहे.

मेष ग्रहमान तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला खतपाणी घालणारे आहे. जे तुम्हाला मिळत आहे त्यापेक्षा अधिक चांगले तुम्हाला पाहिजे असेल. व्यापार-उद्योगात तुमच्या कामाला गती येईल. हातात पसे पडल्यामुळे सरकारी कर किंवा इतर देणी देऊ शकाल. नोकरीमध्ये एखाद्या आव्हानात्मक कामाकरिता तुमची नेमणूक होईल. घरामध्ये तुमचा सल्ला आणि मार्गदर्शन इतरांना उपयोगी पडेल

वृषभ एकंदरीत ग्रहस्थिती सुधारल्यामुळे तुमची निराशा कमी होईल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेले काम गिऱ्हाइकांना आवडल्यामुळे त्यांच्याकडून एखादे आश्वासन मिळेल. हातामध्ये असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याकरिता तुम्ही बरीच मेहनत घ्याल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खूश करण्याकरिता तुम्हाला जास्त काम करावे लागेल. घरामध्ये तणाव असला तरी तुम्ही सगळ्यांना सांभाळून तुमचे कर्तव्य पार पाडा.

मिथुन प्रत्येक माणूस आशावादी असतो. काही तरी चांगले घडेल या आशेने तो पुढेपुढे जात राहतो. या आठवडय़ात हाच आशावाद तुम्हाला उपयोगी पडेल. व्यापार-उद्योगात जी कामे काही कारणाने लांबलेली होती त्यांना आता वेग येईल. पण पसे मिळायला वेळ लागेल. नोकरीच्या ठिकाणी एखादे बेचव काम संपल्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. घरामध्ये वादविवाद झाले असतील तर त्यामध्ये समेट घडण्याची शक्यता निर्माण होईल.

कर्क ग्रहमान तुम्हाला कोडय़ात टाकणारे आहे. तुमचे राहणीमान अत्यंत साधे असते. हातातले पसे खर्च करायला तुम्ही सहसा तयार होत नाही, पण या आठवडय़ात इतरांना खूश ठेवण्यासाठी तुम्हाला बजेटबाहेर जाऊन पसे खर्च करावे लागतील. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण थोडेसे कमी होईल. नोकरीमध्ये जो काम करतो त्याच्याच मागे काम लागते असा अनुभव येईल. घरामध्ये एखाद्या मोठय़ा खर्चाची नांदी होण्याची शक्यता आहे.

सिंह तुमची रास अतिशय आशावादी आहे. कोणत्याही कामाला सुरुवात करताना त्यामध्ये आपल्याला यश मिळणारच ही तुमची धारणा  आता उपयोगी पडेल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात धनलाभाने होईल.  महत्त्वाची मीटिंग किंवा चर्चा पार पडल्याने नवीन काम हातात घ्यावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यामधले नेतृत्वगुण  उपयोगी पडतील. घरामध्ये इतरांना न सुटलेले कोडे तुम्ही युक्तीने सोडवून दाखवाल.

कन्या पशाच्या बाबतीत तुम्ही खूप काटेकोर असता. पण या आठवडय़ात तुमच्या हातून पसे कसे सुटतील हे तुम्हाला समजणार नाही. व्यापार-उद्योगात विशिष्ट कामे विशिष्ट वेळात पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवापाड मेहनत घ्याल. त्यामुळे गिऱ्हाईक तुमच्यावर विश्वास ठेवेल. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या वेळी काम आणि इतर वेळेला थोडासा आराम असा फॉम्र्युला वापरलात तर तुमच्या हातून चांगले काम होईल.

तूळ दोन आघाडय़ा एकाचवेळी सांभाळायच्या असल्यामुळे तुमचा पूर्णपणे गोंधळ होईल. त्यापेक्षा एकावेळी एकच काम करा. व्यापार-उद्योगात नवीन कामे मिळवण्यासाठी पूर्वी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. जी कामे हातात आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीमध्ये तुम्ही हातचे राखून काम कराल. बेकार व्यक्तींना आशादायक ग्रहमान आहे. घरामधल्या सदस्यांच्या बाबतीत एखादी चांगली बातमी कळेल.

वृश्चिक जशी गरज असते त्याप्रमाणे तुम्ही तुमची वागणूक बदलता. त्यामुळे सहसा तुम्ही ठरविलेले उद्दिष्ट अर्धवट राहत नाही. या आठवडय़ात याचा तुम्हाला उपयोग होईल. व्यापार-उद्योगात कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. नोकरदार व्यक्तींना मुलाखतीत यश लाभेल.  संस्थेतर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.  घरामध्ये काही छोटय़ा-मोठय़ा सुधारणा करायचे ठरवाल. त्याची आखणी करण्यात तुमचा पुढाकार असेल.

धनू योग्य विचार आणि वेळेवर केलेल्या कृतीमुळे या आठवडय़ातील तुमचे वय वाढणार आहे. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात चांगली होईल. एखाद्या मोठय़ा व्यक्तीशी संपर्क साधला जाईल. पूर्वी केलेल्या कामातून वसुली झाल्यामुळे चार पसे हातात खुळखुळतील. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताणतणाव कमी करण्याकरिता तुम्ही एखादी युक्ती शोधून काढाल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मुलाखतीत यश मिळेल.

मकर ग्रहमान तुम्हाला एक नवीन स्फूर्ती देणारे आहे. जे काम तुम्ही कराल त्यामध्ये आपले कौशल्य पूर्णपणे दाखविल्याशिवाय चन पडणार नाही. व्यापार-उद्योगाच्या ठिकाणी एखादा महत्त्वाचा व्यवहार होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या महत्त्वाच्या कामाकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. त्या कामानिमित्त तुम्हाला विशेष फायदेसुद्धा मिळतील. घरामध्ये एखादी आनंददायी घटना घडेल.

कुंभ एखादे काम विशिष्ट पद्धतीने व्हायला पाहिजे असा आग्रह धरू नका. ते केलेत तर तुमचे मन शांत राहील आणि कामाचा दर्जाही सुधारेल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात थोडीशी कंटाळवाणी जाईल. अपेक्षित पसे हातात पडतील. नोकरीच्या ठिकाणी कामाचा  तणाव जास्त असल्याने एक प्रकारचा दबाव तुमच्यावर राहील. घरामध्ये एखादे कार्य लांबले असेल तर ते होण्याची शक्यता निर्माण होईल.

मीन जी गोष्ट मिळविण्याकरिता तुम्ही धडपड करीत होता ती मिळाल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. परंतु काही कामामध्ये मात्र अनपेक्षितरीत्या अडथळे निर्माण होतील. व्यापारीवर्गाला काहीतरी मिळविण्याकरिता काही तरी गमवावे लागेल याचा अनुभव येईल. नोकरीमध्ये स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी वरिष्ठांची मखलाशी कराल. घरामध्ये एखादी महागडी कल्पना सर्वाना आवडेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on February 2, 2018 1:01 am

Web Title: astrology from 2nd to 8th february 2018