उल्हास गुप्ते – response.lokprabha@expressindia.com
मेष
या वर्षी शुक्र-शनी-नेपच्यून या ग्रहांचे उत्तम सहकार्य लाभणार आहे. मात्र अतिरेक आणि साहस कटाक्षाने टाळा. अष्टमातील गुरूचा उपद्रव फार काळ सहन करावा लागणार नाही. मात्र अष्टमातील रवी-बुधामुळे १५ डिसेंबपर्यंत वाहने चालवताना मोबाइलवर बोलणे टाळा. २३ मार्चपर्यंत नवीन उद्योगधंदे, नवीन योजना आखू नयेत तसेच जमिनी-स्थावर इस्टेटीचे व्यवहार तूर्त टाळावेत. उद्योगधंद्यात-नोकरीत लहान लहान प्रवास करावे लागतील. त्यातून दगदग वाढेल. मात्र कामात चालढकल करू नका. प्रवासात मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे जपा. शनी-मंगळ त्रिएकादश योगातून आत्मविश्वास वाढेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. धंद्यातले निर्णय फलद्रूप ठरतील.

कौटुंबिक पातळीवर राहू-मंगळ षडाष्टक योगातून गैरसमज, संशय निर्माण होतील. मात्र टोकाची भूमिका न घेता शांतपणे निर्णय घ्या. त्यातून हितसंबंध जपले जातील. पुन्हा सलोखा निर्माण होईल. हळूहळू वादळ शांत होईल आणि यांचा पुरेपूर अनुभव तृतीयातील राहू प्रवेशानतंर समजून येईल.

पराक्रमातील राहू प्रवेशामुळे वेगळे चैतन्य निर्माण होईल. मात्र महत्त्वाच्या निर्णयाबाबत उतावळेपणा टाळा. कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे याचे मूल्यमापन करून प्राधान्यक्रम ठरवा. रागाला आवर घाला. मंगळाची पंचम स्थानावर सातवी दृष्टी असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाबाबतीतले प्रश्न खूप शांतपणे हाताळा. त्यांच्या आरोग्य समस्याची वेळीच काळजी घ्या.

मेष राशीतला हर्षल आपला स्वभाव बदलण्यास भाग पाडेल. आपल्या मनाशी सतत खेळत बसेल. त्यातून लहरीपणा, चंचलता वाढेल. त्यामुळे निर्णय घेण्यातील ठामपणा हरवू नका. या हर्षलच्या विक्षिप्त वागण्यातून सार्वजनिक जीवनांत आपले हसे होऊ नये यांची कटाक्षाने काळजी घ्या. लोकप्रवाहाच्या विरोधात बोलणे, पुरोगामी असल्याचा आव आणणे आणि स्पष्ट बोलून वादविवादाला विकृत स्वरूप देणे या गोष्टी टाळणे खूपच गरजेचे ठरेल. ५ फेब्रुवारीला मेष राशीत येणारा मंगळ आपल्या साहसी वृत्तीतून पराक्रमातून अडचणीचा भाग सहज दूर करील. त्यानंतर होणारा नेपच्यून-मंगळाचा त्रिएकादश योग खूप महत्त्वाचा ठरेल. कामांची पूर्तता होईल नि त्यासाठी घेतलेल्या श्रमाचे कौतुक होईल.

वृषभ वर्षांरंभी गुरू आणि राहूचे उत्तम सहकार्य मोलाचे ठरणार आहे. २३ मार्चपर्यंत राहू कर्क राशीत राहणार आहे. भावंडांतील संबंध खूप जिव्हाळ्याचे राहतील. मित्रवर्गाशी खूप जवळीक राहील. नोकरीधंद्यात, राजकारण आणि कलाजगतात कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. २२ जूननंतर कर्केत प्रवेश करणारा मंगळ यशात अधिक भर घालील. त्यात मंगळ-गुरूचा नवपंचम योग नवीन योजना, नवीन कल्पना निर्माण करील. त्यातून प्रगतीचा मार्ग खुला होईल. अष्टमातला शनी सुखाला गालबोट लागावे अशा समस्या निर्माण करील, पण हे वादळ विरून जाईल. त्या दरम्यान कुठेही चलबिचल होऊ नका. नोव्हेंबर, डिसेंबर २०१८ या काळात षष्टातील शुक्रामुळे लघवीचे विकार, आजार यापासून काळजी घ्या.

पंचमेश सप्तमात बुध आहे. तसेच बुधाचा वार्षिक प्रवास मुलांच्या शैक्षणिक जीवनाला उजाळा देणारा ठरेल. मात्र मंगळ-बुध केंद्रयोगातून मुलांना आळस, सतत टीव्ही पाहाणे, मोबाइलवर खेळणे यापासून दूर ठेवा. एप्रिल-मे २०१९ दरम्यान सर्दी, ताप आदी आजारांबाबत काळजी घ्यावी.

उद्योगधंद्यामुळे घरी वेळ देता येणार नाही. कला, नाटय़, सिनेक्षेत्रातील लोकांना गैरसमज, निंदानालस्तींना सामोरे जावे लागेल. दशमातल्या केतूबरोबर येणारा रवी बऱ्याच चुकीच्या गोष्टींना कारणीभूत ठरेल. अशा वेळी मित्रांची मदत खूपच मोलाची ठरेल.

७ मेला पराक्रमात राहूबरोबर मंगळ प्रवेश करीत आहे. त्याबरोबर सप्तमात गुरूचे वास्तव्य आहे. उद्योगधंद्यात, नोकरीत साहस आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर घेतलेले निर्णय यशदायक ठरतील नि प्रगतीचा आलेख उंचावेल. कौटुंबिक सुखात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. विशेषत: राहूचे पाठबळ अडचणी बाजूला सारील. जूनमध्ये कर्केत येणारा मंगळ गुरूशी नवपंचम योग करीत आहे. त्यामुळे घरी उत्साह, आनंद टिकून राहील. षष्टातील मंगळ प्रवेशातून रखडलेल्या समस्या संपुष्टात येतील. जागेसंबंधीचे व्यवहारात आर्थिक लाभ संभवतो. काही महत्त्वाच्या लोकांशी ओळखी होतील. त्याचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करता येईल. तसेच १७ सप्टेंबरला षष्ठात प्रवेश करणारा रवी अधिक महत्त्वाची कामगिरी पार पाडील. वर्षांअखेपर्यंत आपल्या मनाची प्रसन्नता कायम ठेवील.

मिथुन द्वितीयात राहू, षष्ठात गुरू नि सप्तमात शनी या ग्रहांचा विरोधी सूर आहे. पण शुक्र-मंगळाच्या नवपंचम योगातून जुळणारे नवे समीकरण या अडचणी दूर करेल. या तीन महिन्यात आर्थिक व्यवहार सांभाळून करा. वेळेचे भान नि कामाचा क्रम लक्षात ठेवा. षष्ठातील रवी अडचणीचे ढग दूर सारून पुढे येईल. त्याचा महिन्याभराचा फेरफटका फायदेशीर ठरेल. निर्माण होणारा आत्मविश्वास कामांना गती देईल. मनातील भय-भीतीचे सावट हळूहळू दूर होईल. तेव्हा आलेल्या संधी नाकारू नका. बुद्धी नि श्रम यांचा समन्वय साधलात तर यश खात्रीने तुमच्याजवळ येईल. २३ मार्चला राहू मिथुनेत येईल. तर कुंभ राशीत शुक्राचे आगमन होईल. नोकरी-उद्योग धंद्यातील योजना मार्गी लागतील. मात्र कायद्याच्या कक्षा पाळा. वैवाहिक जीवनातील किरकोळ मतभेद सामोपचाराने सोडवता येतील. जोडीदाराला समजून घेणे हा एकमेव सुखाचा मार्ग ठरेल. मात्र मध्यस्थी नातेवाईकांशी सल्लामसलत टाळा.

१५ ऑगस्टनंतर रवी-बुध नि शुक्राचा तृतीय स्थानात होणारा प्रवेश आपल्या प्रगतीचा आलेख अधिक उंचावेल. बुद्धी, शौर्य नि स्नेह अशा तीन गुणांचा अविष्कार या राशीत दिसून येईल. साहित्यिक, सिनेनाटय़ कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होतील. फक्त चिडचिड आणि व्यर्थ चर्चा करू नका. आपले मनोरथ पूर्ण होईल. सकारात्मक बोलण्याची सवय ठेवा.

९ सप्टेंबरला चतुर्थात येणारा शुक्र नि नंतर येणारा रवीमुळे जागेसंबंधीचे प्रश्न निकालात निघतील. मात्र भावना आणि व्यवहार यांचे गणित खूप चातुर्याने सांभाळा, तर नक्की फायदा होईल. या सर्व गोष्टी २५ सप्टेंबर २०१९ च्या आधी उरकून घ्या. चतुर्थात प्रवेश करणारा मंगळ भाऊबंदकी, भांडणतंटे यांना आमंत्रण देणारा ठरेल. एवढे मात्र खरे की श्रेष्ठ संयमापुढे ग्रहही माघार घेणार. शनी-मंगळाचा होणारा केंद्रयोग फार काही त्रासदायक ठरणार नाही.

सामाजिक कार्यात, राजकारणात गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. लोकांची दिशाभूल करणे, गैरसमज पसरवणे हे प्रकार होतील तेव्हा हुशारीने वागा.

३ ऑक्टोबरला परत तूळ राशीत शुक्र येईल तेव्हा वातावरणात सकारात्मक बदल दिसून येईल. यांत शुक्र -शनीच्या सहयोगातून बरेच गैरसमज दूर होतील. मन:स्वास्थ्य चांगले राहील. नवीन कल्पना नवीन योजनांसाठी नवीन वर्ष फायद्याचे ठरेल.

कर्क कर्क राशीचा चंद्र स्वगृहीचा असला तरी कर्क ही गुरूची उच्च रास आहे. चतुर्थात शुक्र, पंचमात बुध- गुरू नि षष्ठातला शनी एकूण हे लाभदायक ठरणारे ग्रह कर्क राशीच्या उत्कर्षांला खूप कारणीभूत ठरणार आहेत. अष्टमात असलेले मंगळ, नेपच्यून सध्या विरोधात असले तरी ते आपले फारसे नुकसान करू शकणार नाहीत. चंद्र – मंगळ हे दोन्ही मित्र ग्रह आहेत; पण यातील एक मित्र शत्रुपक्षात सामील होतो, ही बाब खेदजनक वाटते; पण इथे हळवेपणा, सहानुभूती दूर ठेवून गुरूची बौद्धिकता पणाला लावून जशास तसे उत्तर देणे हिताचे ठरेल. नोव्हेंबर ते जानेवारी १९ पर्यंतचे तूळ राशीतील शुक्राचे वास्तव्य कुटुंबात सौख्याचे आहे.

कर्क राशीच्या व्ययात राहूचा प्रवेश पैशाची आवक वाढवेल तसे खर्चाचे प्रमाणही वाढवेल; पण षष्ठातील शनी, केतू युती कर्क राशीला वाईटातून चांगले घडते असा वेगळा प्रत्यय देईल. या युतीतून बरेच रखडलेले प्रश्न मार्गी लागतील. मात्र जगात भावनेपेक्षा पैशाला खरी किंमत असते, या कटू सत्याचा प्रत्यय वारंवार आढळून येईल. त्यामुळे अशा वातावरणात बुद्धीच्या निकषावर निर्णय घ्या म्हणजे पश्चात्तापाची वेळ येणार नाही.

१६ डिसेंबरला षष्ठात येणारा रवी शनीला खूप चांगली साथ देईल. आखलेल्या योजनांतील अडचणी संपून जातील. उद्योगधंद्यात फायद्यावर लक्ष ठेवून सुरुवात केली तर ते नक्कीच सफलता देईल. पंचमातील गुरू तात्पुरता पुढे गेलेला आहे. वृश्चिक राशीत तो परत मागे येईल; पण या काळात केतू शनीचेही सान्निध्य लाभेल. काही चुकीचे, गैरमार्गाचे काम करण्याचे प्रस्ताव पुढे येतील. त्यात दबावतंत्राचा अवलंब झाला तरी त्याला खंबीरपणे सामोरे जा. तसेच वृश्चिक राशीत परतणारा गुरू वक्री असणार आहे. अशा काळात सद्शील ग्रह आपले ‘सत्त्व’ हरवून बसतात. तेव्हा त्यांच्याकडून फारशी अपेक्षा ठेवू नका. ऑगस्ट २०१९ मध्ये येणारा लाभ स्थानातील मंगळ खर्चाचे प्रमाण वाढेल. घरातील वृद्ध माणसांच्या आरोग्याची काळजी घेणे जरुरीचे ठरेल. मात्र ऑगस्टमध्ये द्वितीयेत येणारा शुक्र आर्थिक बाबतीत उत्साह, आनंद निर्माण करील. उद्योगधंदा – नोकरीत चैतन्याचे वातावरण दिसून येईल. उत्कर्षांची नवीन दिशा मिळेल. थोरामोठय़ांच्या भेटीतून नव्या कल्पनांना चालना मिळेल. त्यात पराक्रमात आलेल्या मंगळाचे जोरदार साह्य़ मिळेल. एकूण वर्ष संपता संपता मिळणारा दिलासा खूप मोठा आधार ठरेल.

सिंह या वर्षांरंभी शुक्र, केतू हर्षल यांचे मोलाचे साह्य़ लाभणार आहे. तसेच मंगळ, शुक्राच्या नवपंचम योगातून आनंद उत्साह लाभेल. व्ययातील राहूच्या उपद्रवातून निर्माण होणारी वादळे मनस्ताप देतील. संयमाने घेतलेत तर त्यावर सहज मात करू शकाल. विशेषकरून आपल्या धीरगंभीर बोलण्याने कुटुंबात, मित्र परिवारात आपला खूप आधार वाटू लागेल. तर शुक्र, शनी त्रिएकादश योगातून सुचलेल्या कल्पना आपल्याला कार्यक्षेत्राचा मध्यबिंदू ठरतील. त्यातून आपला प्रवास यशाकडे सुरू होईल. २३ मार्चला व्ययातील राहूचे एकादश स्थानातील आगमन लाभदायक ठरेल. शत्रुत्त्वाकडून मित्रत्वाकडे असा राहूचा प्रवास आपल्याला वर्षभर मोलाची साथ देईल. आपल्यात एक वेगळा बदल दिसून येईल. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्याल.

खऱ्या अर्थाने बौद्धिक क्षमतेचे एक वेगळे रूप पाहाण्याची संधी या राशीला या वर्षी प्राप्त होईल. राजकारणात, सामाजिक कार्यात या व्यक्ती एक वेगळा ठसा उमटवू शकतील. उत्तम बुद्धिमत्ता नि मानसिक स्थिरता यामुळे यांच्या कर्तृत्वात एक वेगळी चमक दिसून येईल. समस्यांकडे शोध बुद्धीने पाहून त्यांचे रूपांतर संधीत करणे हे चातुर्य यशस्वीरीत्या साधता येईल.

१ जून २०१९ ला मिथुन राशीत येणारा बुध आर्थिक बाबतीत मदतीचा ठरेल. कला, साहित्य, शिक्षण, उद्योगधंदा, नोकरीत नवीन परिचय, नवीन गाठीभेटीतून होणारा आनंदाचा स्पर्श मनाला उभारी देईल. नवीन जबाबदाऱ्या देताना वरिष्ठांनी ठेवलेला विश्वास खूप समाधान देईल. मात्र या सर्व धावपळीत आरोग्याकडे लक्ष द्यावे. .

जून महिन्याअखेर व्ययात येणारा मंगळ खर्चाचे प्रमाण वाढवील. गुप्त शत्रूचा ससेमिरा नि कुटुंबातील गैरसमज अस्थिरता निर्माण करील. नातेवाईक, मित्र परिवार गोंधळात टाकणाऱ्या समस्या निर्माण करतील, पण कुठेही आपला तोल जाऊ देऊ नका. सूडबुद्धीच्या गर्तेतून बाहेर या. आजूबाजूच्या विश्वासू माणसांशी संवाद साधा. शारीरिक ताकदीपेक्षा मनाचे बळ खूप मोठे असते. अशा वेळी आपली खरी मानसिकता आपल्या जिभेवर घोळत असते. त्यामुळे विचारपूर्वक बोला. मनाचे संतुलन साधून परिस्थितीला सामोरे जाणे महत्त्वाचे ठरेल.

सप्टेंबर, ऑक्टोबरमधील शुक्राचा कन्या तुळेतील प्रवास चित्र पूर्ण बदलून टाकेल. खूप प्रश्नांची उत्तरे प्रसंगानुरूप सापडतील. चांगले मन चांगले विचार देते. चांगला सहवास चांगली स्पंदने निर्माण करतो. एकूण वर्षभराच्या ग्रहांच्या फेऱ्यात हे दोन महिने खऱ्या अर्थाने मानसिक विसाव्याचे ठरतील.

कन्या शुक्र, राहूचे उत्तम सहकार्य एक नवीन पर्वाची सुरुवात करतील.  वरवर दिसणाऱ्या समस्यांना रवी, केतूच्या बौद्धिक सामर्थ्यांतून यशदायक कलाटणी मिळेल नि अखेर कन्या राशीच्या पारडय़ात झुकते माप पडेल. या दोन ग्रहांच्या उत्तम सामर्थ्यांच्या जोरावर बऱ्याच सकारात्मक गोष्टींना प्रोत्साहन मिळेल. विशेष करून स्थावर इस्टेट उद्योगधंद्यात नफ्याचे प्रमाण वाढेल. नवपरिचित माणसे मदतीचा हात देतील. मात्र २३ मार्चला मिथुनेत येणारा राहू शनीशी समसप्तक योग करीत आहे. कौटुंबिक जीवनात किरकोळ घटना वादग्रस्त ठरतील. पण हे फार काळ टिकणार नाही. मीनेतील रवी आपल्या स्वच्छ प्रकाशाने हे सावट दूर करील. ग्रहांची साथ नसताना स्थिर मनाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतात मात्र अशा काळात मित्र वर्गाला दुखवू नये. नाती जपावीत.

आता मंगळ, राहू युती नि समोर शनी महाराज यातून मे महिना खूप वादग्रस्त गोष्टींना खतपाणी घालेल. पण संयम, सावधानता आणि विनय यांची मदत खूप मोलाची ठरेल. महिन्याभरात मंगळ पुढे सरकेल आणि खूप गोष्टी सकारात्मक वाटू लागतील. या काळात स्वमनाशी होणारा संवाद कठीण समस्यांचे रूप साधे सोपे करील. आपल्या संवादातून निर्माण होणारे उत्साह, आनंदाचे पडसाद मित्रमंडळींत, नातेवाईकांत वेगळे वातावरण निर्माण करेल. यासाठी कुठल्याही आध्यात्मिक प्रयोगाची गरज भासणार नाही. स्वमनातून निर्माण होणारी ही स्पंदने आपल्या जीवनांत एक वेगळे चैतन्य निर्माण करतील.

एकादश स्थानात रवी, मंगळ शुभ योगात तर गुरूचा होणारा नवपंचम योग आहे. एकूण कन्या राशीला लाभलेला हा एक अतिशय उत्तम काळ. शिक्षण, कला, उद्योगधंद्यात खूप चांगले प्रोत्साहन लाभेल. जागोजागी मदतीचे हात माणुसकीचे दर्शन घडवील. मात्र षष्ठातील नेपच्यूनमुळे पाण्यापासून, संसर्गजन्य आजारापासून दूर राहावे यासाठी शक्यतो बाहेरचे खाणे जरूर टाळावे, आरोग्य सांभाळावे.

या वर्षांअखेर ग्रहस्थिती अडचणीची असली तरी पराक्रमात असलेला शुक्र खूप गोष्टींना पूरक ठरेल. या वर्षांची हद्द ओलांडली की रवी पराक्रमात येईल आणि समस्यांचे कठीण गणित सहज सुटेल. मात्र पैशाचा अव्यय जरूर टाळा. व्यवहार नि भावना याचे समीकरण जपा. पुढील वर्षांत रवी, शुक्र, मंगळाचा प्रवास खूप कामांना गती देईल. प्रेम, विवाह, नातीगोती अशा अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नात त्यांची मदत खूप मोलाची ठरेल. एकूण ग्रहाचे माणसाशी असलेले वैश्विक नाते किती जवळचे आहे त्याचा आपल्याला या वर्षी प्रत्यय येईल.

तूळ कुठलाही ग्रह हा आपला कधीच मित्र नसतो वा शत्रू. कालचक्राप्रमाणे ग्रहांना आपल्या वेगवेगळ्या भूमिकांतून प्रवास करावा लागतो. त्यातून होणारे चांगले-वाईट परिणाम आपण अनुभवत असतो.

या वर्षी तूळ राशीला गुरू शनीचा शुभ सहवास  पूर्ण वर्षभर लाभणार आहे. विनयशील बोलणे, उत्तम विचार यामधून एक वेगळीच आपुलकी निर्माण होईल. उद्योगधंद्यात, नोकरीत स्नेह परिवार वाढेल. व्यवहारात विश्वास, सचोटी संपादन कराल. मात्र चतुर्थातील केतू वातावरण काहीसे गढूळ करील. कुटुंबात गैरसमज, संशयाचे वादळ निर्माण होईल त्यामुळे निराशा येईल. निरुत्साह वाढेल नि त्यात भर म्हणजे पंचमात नेपच्यून, मंगळ अतिभावनिक करतील. आपल्याला कुणी समजून घेत नाही असा गैरसमज मनात निर्माण होईल. पण याच सुमारास गुरूचा सद्भाव नि शनीची सहनशीलता धावून येईल. ज्या शनीने साडेसातीत आपला पिच्छा पुरविला होता तोच शनी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहील नि त्यातून आपण कर्तव्य, समजूतदार, समंजसपणा यांचे यथार्थ दर्शन घडवाल. त्यामुळे घरातील वातावरणात सकारात्मक बदल दिसून येईल. १६ डिसेंबरला पराक्रमात प्रवेश करणारा रवी आपल्या कामात उत्साह आणि परिश्रमाची आवड निर्माण करील. २३ मार्चला राहू नवमात नि केतू पराक्रमात प्रवेश करत आहे ही एकूण जमेची बाजू आहे. अचानक सुरू झालेल्या विरोधाचे प्रमाण कमी होईल. खूपशा कामांना गती प्राप्त होईल. स्थावर इस्टेटीच्या व्यवहारात फायदा होईल. मात्र अतिघाई, अतिविश्वास टाळा. नोकरीधंद्यात महत्त्वाचे निर्णय घेताना सहकाऱ्यांना विश्वासात घ्या. प्रवासात आरोग्य सांभाळा. नवीन परिचय, ओळखीतून नवीन संधी चालून येतील. उत्साह, स्फूर्ती यांच्या जोरावर बऱ्याच क्षेत्रात सहभागी व्हाल. आपल्या निर्भय वागण्यातून यशाकडे वळाल. षष्ठात नि सप्तमात शुक्राचा प्रवास फारसा लाभदायक ठरणार नाही.  विशेषत: मूत्राशयाच्या आजाराची तसंच खोटय़ा आरोपात अडकणार नाही याची काळजी घ्या. सप्तमातील शुक्रामुळे आर्थिक लाभाचे योग येतील. त्यामुळे एप्रिल ते जून हा काळ तसा त्रासाचा वाटला तरी फायद्याचे योग जरूर येतील. अष्टमात-नवमात शुक्राचा प्रवास मनाला समाधान देईल. घरातील वातावरण आनंदी राहील. घरात मुलांच्या लग्नाचे योग येतील. तर काहींना दूरचे परदेशगमन योग येतील. हे दोन महिने सुखासमाधानाचे असतील. वाद टाळा. जमीनविक्रीचे, जागेचे सौदे मनासारखे होतील.

१७ ऑगस्टला रवी एकादशात प्रवेश करीत आहे. हा लाभयोग आत्मविश्वास निर्माण करेल. चांगले विचार, चांगल्या अपेक्षा ठेवल्या की सकारात्मक बदल होतो. याची खात्री पटेल.

वृश्चिक सध्या शनीची साडेसाती असली तरी पराक्रमातला केतू मार्चपर्यंत मदतीचा ठरेल. स्वराशीत गुरू हिताकडे ठरेल. भूक, तहान, निवारा या गरजा पैशाच्या हिशेबातून भागल्या जातात. मानसिक सुख पैशाने विकत घेता येत नाही. साडेसातीच्या काळात आपल्या मानसिक संयमाची परीक्षा ठरेल. अशा वेळी भावना, दु:ख, वेदना, सहानुभूती या शब्दाच्या फेऱ्यात आपण मध्यबिंदू असतो. अशा वेळी उद्योगधंद्यात, नोकरीत भावविवशता बाजूला ठेवून काम करणे योग्य ठरते.

२३ मार्चला केतू धनूराशीत शनीसोबत येईल तेव्हा राहूही अष्टमात असेल. अशा वेळी आरोग्याची काळजी घ्यावी, बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, उद्योगधंद्यात, नोकरीत पैशाचा वापर जपून करावा. कारण या काळात आर्थिक ओढाताण होण्याची जास्त शक्यता आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रात पावले जपून टाकावीत. गुप्त शत्रूपासून काळजी घ्यावी. तात्त्विक मतभेद दूर ठेवावेत. या काळात आपलं मनही शत्रूचाच एक भाग बनत असते. अशा वेळी शांत राहणे, कमी बोलणे आणि प्रार्थना यातून मनाला चांगली विश्रांती लाभते. १४ जानेवारीला मकर राशीत येणारा रवी व त्यापाठोपाठ लाभात प्रवेश करणारा शुक्र यापासून आधार लाभेल. परिस्थितीत चांगला बदल होईल. जुनी येणी येतील. अचानक पैशाची आवक वाढेल. थोरामोठय़ांचा सहवास लाभेल. पण हे यश डोक्यात जाऊ देऊ नका. आनंदातही संयमाने वागण्याचा फायदा तुमच्या वागण्यातून दिसून येईल. हाच विनय आपल्या यशाचे आयुष्य वाढवत असतो. हा शुक्राचा प्रवास १० मेपर्यंत चालू राहील. उद्योगधंदा, नोकरीत शब्दाला किंमत येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या नेतृत्वाने उत्साही वातावरण निर्माण होईल. त्यातून जबाबदारी वाढेल. वाढणाऱ्या प्रश्नाचे स्वरूप ओळखून त्यासाठी वेळ द्या. वेळेचे महत्त्व जाणा. आपल्यातील धाडस, बुद्धिमत्ता यातून आपल्या कामाचे स्वरूप बदलेल. मात्र आपल्या हाताखालील लोकांना सन्मानाने वागवा. हे यश त्यांच्या प्रोत्साहनातून लाभलेले आहे. त्यांचाही यात भाग आहे हे विसरू नका.

मिथुन राशीतील मंगळाचा प्रवास जून-जुलैमध्ये चालू राहील. त्यात मानसिक त्रास आणि शारीरिक इजा यापासून काळजी घ्यावी. वाहने वेगाने चालवणे, रस्त्यात वादविवाद करणे या गोष्टी जरूर टाळा. विशेषत: ऑगस्ट महिन्यात उद्योगधंद्यात, नोकरीत होणारे चढउतार शांतपणे अनुभवा. त्रास-त्रागा करून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. मात्र रवीच्या वार्षिक प्रवासातून मिळणारी बौद्धिक चालना मदतीची ठरेल. हळूहळू विरोध निवळेल. खऱ्या अर्थाने पुढील वर्षांसाठी प्रगतीचीे दारे खुली होतील. तेव्हा नव्या वर्षांचे प्रफुल्लित मनाने स्वागत करा.

धनू स्वराशीत शनी साडेसातीचे ओझे घेऊन बसला आहे. धनस्थानात केतू अधिक ताणतणाव निर्माण करील. व्ययातला गुरू-रवीचा असहकार पाहता एकूण वर्षांच्या सुरुवातीला या ग्रहांची मदत शून्य असणार आहे. उलट शत्रूच्या रूपात हे ग्रह उभे आहेत. पण पराक्रमातील मंगळ नेपच्यून आणि एकादशातला शुक्र आणि पंचमातला हर्षल यांच्या शुभ युतीतून खूप बदल घडून येईल. मात्र मनाची खंबीरता ढळू देऊ नका. विशेषत: चंद्रप्रवासाच्या हळवेपणातून होणारा त्रास दूर सारा. हळव्या मनाच्या भावकोषातले जुने स्मरण करत जुन्या आठवणींची उजळणी बंद करा. आयुष्यातल्या मागच्या पाऊलखुणांकडे बघण्यापेक्षा पुढचे पाऊल कसे पडते याकडे लक्ष ठेवा. भूतकाळ पायाखाली ठेवून चाललं की वर्तमान जगताना त्रास होत नाही. मनातल्या सद्विचारांचे स्मरण हेसुद्धा ईश्वर चिंतनाइतकेच मोलाचे असते. हे स्मरणच तुमचा पुढील मार्ग मोकळा करील.

धनू राशीतील गुरूचे आगमन २९ मार्चला होईल. पाहुण्याचे चार दिवस अशा बेताने तो परत महिनाभरात वक्री होऊन पुढच्या नव्या वर्षांपर्यंत वृश्चिकेत येऊन बसेल. व्ययातला हा पुण्यग्रह स्वराशीसाठी काहीही करू शकणार नाही. मात्र १० मेला पंचमात येणारा शुक्र कौटुंबिक पातळीवर समाधानाचे वातावरण निर्माण करील. तर जुलै-ऑगस्टमध्ये अष्टम आणि नवमस्थानातील शुक्र स्थावर इस्टेटीच्या कामांना उत्तम गती प्राप्त करून देईल. नोकरी-धंद्यात अधिकार योगात अडथळे आले तरी ती शर्यत आपण जिंकणार हे लक्षात असू द्या. शक्यतो कोर्टकचेरीकडे वळू नका. यासाठी तडजोड समेट करून कामे निकालात काढा. दशमात येणारा शुक्र आर्थिक बाबतीत बेरंग करील. देण्या-घेण्यातील पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. पैसे उसने देण्यावरून संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. नातेवाईक, मित्रमंडळींत आपल्या पाठीमागे होणाऱ्या चर्चाना फार किंमत देऊ नका. नोकरी-धंद्यातील आमिषांना बळी पडू नका.

रवीचा दशमातील प्रवेश खूपशा आशा पल्लवित करील. वातावरण संघर्षांचे असले तरी प्रत्येक येणारी संधी सफलतेचा मार्ग मोकळा करील. तसेच तूळ राशीतले शुक्राचे आगमन कौटुंबिक सुखात आनंद निर्माण करील. पाहुणेमंडळींच्या आगमनामुळे घराला घरपण लाभेल. खूप ज्येष्ठ नागरिकांची ही साडेसाती तिसरी असेल, पण तिसऱ्या साडेसातीचा फार विपरीत त्रास होत नाही. उतारवयात शरीर मनाला फार छेद देत असते. पण आपण शरीराने जगत नसून मनाने जगत आहोत ही जाणीवच तुम्हाला मोठा आधार देईल. तेव्हा शरीराने जगण्यापेक्षा मनाने जगण्याचे सूत्र लक्षात ठेवा. म्हणजे वर्षांचे रूपांतर दिवसात होईल.

मकर शनीची साडेसाती, तर व्ययात केतू शनी, द्वितीयात मंगळ आणि चतुर्थात हर्षल आहे. आलेख खाली उतरलेला वाटला तरी वर्षभर लाभात शांतपणे बसलेला गुरू या अशांत ग्रहांवर करडी नजर ठेवून आहे. कुठल्याच गोष्टीचा अतिरेक गुरू महाराज होऊ देणार नाहीत. वर्षांच्या सुरुवातीला रवी-बुधाचेही उत्तम सहकार्य लाभणार आहे. एकंदरीत या संमिश्र स्थितीला काबूत ठेवण्यासाठी स्वमनाच्या मदतीची फार गरज आहे. वारंवार राहत्या जागेचे स्थलांतर करीत राहणे खूप चुकीचे ठरेल. त्यातून लहानमोठय़ा समस्या निर्माण होऊ शकतील. तसेच गुरू आणि रविचा वर्षभराचा प्रवास आपल्या बुद्धिमत्तेला एक नवीन संस्कार देईल. मुख्यत: विचारांचे सूत्र बदलेल आणि स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. दु:खाचे मूळ आपल्या बुद्धीत नसून ते आपल्या मनात असते. संकटं नेहमी सहानुभूतीची वाट पाहत असतात . दु:ख आपण बुद्धीच्या निकषावर तपासतो तेव्हा तत्त्वहीन आणि फसवे वाटू लागते. जानेवारी महिन्यात येणाऱ्या शुक्रामुळे कलाप्रांतात तसंच सामाजिक कार्यात आपल्या कामाची दखल घेतली जाईल. सहज घडणाऱ्या यशदायक घटना आश्चर्यचकित करतील. आपल्या नव्या विचारांचे, नव्या कामाचे कौतुक होईल. त्यातून उत्साहाने आपली कामे पुढे सरकतील. मार्चपर्यंत हा शुभकाळ खूप मदतीचा ठरेल.

२३ मार्चला शनीबरोबरचा केतू प्रवेश व्ययस्थानात काहीसा क्लेशदायक ठरेल. विशेष आर्थिक व्यवहारात खूप जपून पावले टाकावीत. उद्योगधंद्यात भागीदाराशी तर नोकरीत सहकाऱ्यांशी वादविवादाचे प्रसंग टाळावेत. आपल्या चांगल्या कामाचे कौतुक होण्याऐवजी आपल्यावर टीकाटिप्पणी केली जाईल. घरात कुटुंबातील वातावरणातही असाच बदल दिसून येईल. नको ते जुने वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. नातेवाईक, मित्रमंडळीत गैरसमजुतीतून काही समस्या निर्माण होतील. पण गुरूच्या शुभदृष्टीतून ते बरेचसे सावरले जाईल. पती-पत्नी तसेच मुलांकडून होणारा विरोध हळूहळू मावळला जाईल. षष्ठात राहू बरोबर होणारा रविप्रवेश विरोध तसंच समस्यांची तीव्रता कमी करेल. गैरसमज दूर होतील आणि हा खडतर प्रवास इथेच संपेल. मात्र तरीही योग्य निर्णय, आर्थिक व्यवहार, महत्त्वाचे करार, नव्या योजना याबाबतीत विशेष काळजी घ्या. बेपर्वाई कटाक्षाने टाळा. यातूनच परिश्रमाचा परिचय होईल. शुक्राच्या शुभ प्रवासातून खूप चांगले प्रत्यय येऊ लागतील. आपण खूप काही करू शकतो हा दृढविश्वास आपल्या मनात निर्माण होईल. या वर्षांत गुरूने दिलेली साथ आणि राहूचा षष्ठातला सहवास खूप मोठा आधार ठरेल. हाच आधार पुढील वर्षी कायम असणार आहे. तेव्हा पुढील वर्षी साडेसाती असली तरी चिंता नको.

कुंभ ही शनीची वायू तत्त्वाची रास आहे. उत्तम बुद्धिमत्ता लाभलेली, वैचारिक पातळीवर नेहमीच न्यायाधीशाच्या भूमिकेत वावरणारी, समंजसपणा, दयादृष्टी राखून न्यायाच्या चौकटीत जगणारी आणि अन्यायाचा बीमोड बुद्धीच्या जोरावर करून तितक्याच आत्मीयतेने स्वत:चं पापभीरू मन जपणारी ही रास आहे.

वर्षभर शनीची कृपादृष्टी या राशीला लाभणार आहे. तसेच वर्षभराच्या सुरुवातीला रवी, राहू आणि शुक्राचे उत्तम सहकार्य मिळणार आहे. मात्र मंगळ-गुरूकडून निर्माण होणारा विरोध फारसा विपरीत परिणाम करू शकणार नाही. पण गुरूच्या प्रेरणेतून मिळणारा संयम आणि प्रोत्साहन कुठेतरी हरवल्यासारखे वाटेल. पण जीवन प्रवासात आणि विशेषत: ग्रहांच्या या पुढेमागे होणाऱ्या फेऱ्यात असे घडणार हे गृहीत धरावे लागेल.

षष्ठातील राहू कामांना गती मिळवून देईल. सामाजिक कार्य, राजकारण, व्यापार, शिक्षण क्षेत्रात संधी प्राप्त होतील. अर्थप्राप्ती, महत्त्वाचे करार आणि अभिनव उपक्रम यातील सहभाग उल्लेखनीय ठरेल. मात्र २३ डिसेंबरला द्वितीय स्थानात येणारा मंगळ आर्थिकबाबतीत अडचणी निर्माण करील. त्यात दिलेला शब्द पाळताना काहीशी कसरत करावी लागेल. पण काही दिवसांतच २९ जानेवारीला लाभात येणारा शुक्र या अडचणी सोडवून त्यातून सोपा मार्ग काढील. मात्र मंगळाच्या या नीतीचा राग करून कुणाशीही सूडभावनेने वागू नका. त्यामुळे शत्रूंची संख्या वाढून मनस्तापात भर पडेल. पंचमातील राहूचे राश्यांतर घरगुती समस्या, मुलांचे शिक्षण, नातेवाईकांच्या अपेक्षा असा गुंता निर्माण करेल. पण त्यावर शांतपणे निर्णय घेणे हा एकमेव उपाय ठरेल.

१५ एप्रिलला मीनेत येणारा शुक्र आपली मन:स्थिती उत्तम ठेवील. प्राप्त होतील तिथे संधीचे स्वागत करा. शनीच्या सामंजस्यातून रखडलेली कामे पूर्ण होतील. राजकारण, सामाजिक कार्य, व्यापार, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत आपले वर्चस्व कायम राहील. १६ जुलैला रवी षष्ठात येत आहे, तर सप्तमात शुक्र आहे. खोटी आपुलकी, प्रेम जास्त काळ फसवू शकत नाही याचा प्रत्यय येईल. तेव्हा अतिविश्वास, प्रेम यात अति गुंतू नका. समोरच्या माणसाला ओळखण्याचे कसब अंगी असू द्या. म्हणजे मनस्तापाची पाळी येणार नाही.

एकंदरीत पुढील शुक्राचा प्रवास खूपच आनंदी, उत्साही असेल पण मंगळाच्या अष्टमातील प्रवेशातून वेगाने वाहन चालवणे, रस्त्यातून चालताना मोबाइलवर बोलणे या गोष्टी टाळाव्यात. तसेच प्रवासात मौल्यवान वस्तूची काळजी घ्या, पैसे सुरक्षित ठेवा. वर्षांच्या अखेरीस उद्योगधंद्यातील नवीन बदल पथ्यावर पडतील. कामाचे उत्तम आयोजन श्रम ध्यास यातून आपली प्रगती होईल. नवीन जबाबदाऱ्यांमध्ये आनंद आणि समाधान लाभेल.

मीन यशस्वी माणसे जास्त कृतिशील असतात, हे विधान मीन राशीबाबत बरेच सत्य आहे. गुरू ग्रहाची संवेदना जोपासणाऱ्या या राशीला बुद्धिमत्तेचे उत्तम वरदान लाभलेले आहे. या वर्षी गुरू ग्रहाचा मानसन्मान जपण्यात ही रास कुठेही कमी पडणार नाही. अतिशय धार्मिक पण त्यातही विज्ञानाचा शोध घेणे, प्रवासात निसर्गाशी एकरूप पावणे असे अनेक सद्गुण या राशीच्या अंगी दिसून येतात.

या वर्षी मीन राशीच्या भाग्य स्थानात गुरूचे अधिष्ठान वरदान ठरणार आहे. मंगळ-शनी-राहू अशा मातबर ग्रहांचा प्रवास खूपच अडचणीचा भासला तरी गुरूच्या आशीर्वादाने तो तितका हानीकारक ठरणार नाही. शुक्र केतूच्या स्नेहशील भूमिकेतूनही खूप आधार निर्माण होईल. मित्रवर्गातही आपले भावविश्व चांगल्या तऱ्हेने जपले जाईल. राजकारण, व्यापार, अर्थप्राप्तीत आपले वर्चस्व राहील. समाजात प्रतिमा अधिक मोठी  होईल. गुरू केतूच्या त्रिएकादश योगातून चिंतन मनन यातून आध्यात्मिक भक्तिभाव निर्माण होईल, पण त्यात वैयक्तिक स्वार्थाचा अंश बिलकूल नसेल.

२३ मार्चला चतुर्थात राहूचा प्रवेश होईल. दशमात शनीसोबत केतू असल्यामुळे कौटुंबिक वाद-विवाद निर्माण होतील. त्यात मानापमान तसंच नको त्या समस्यांचा परीघ तयार होईल. पण सुखदु:खात संयमी माणूस स्थिर राहतो हे लक्षात असू द्या. आपल्या पाठीशी असलेले भाग्यातले गुरुबळ परिस्थितीवर नियंत्रण ठेवेल. १५ मे ला वृषभ राशीत होणारा रविप्रवेश आणि त्याच दरम्यान मेष राशीत होणारा शुक्रप्रवेश कालाय तस्मै नम: असे म्हणावे इतका आश्चर्याचा सुखद धक्का देईल. ग्रहांच्या अडथळ्यांची शर्यत संपेल. विशेष म्हणजे समजुतीने वागण्याचा फायदा होईल. गैरसमज दूर होतील. उद्योगधंद्यात नोकरीत यश लाभेल. सत्याच्या साहाय्याने विरोध पूर्णपणे मावळेल. पण ज्या रवीने पराक्रम स्थानात मदत केली तोच चतुर्थातला रविप्रवेश राहूच्या संगतीत अतितापदायक ठरेल. त्या रवी-शनी प्रतियोगामुळे घरात तसंच बाहेरील जगातही वातावरण वादातीत राहील. एकूण केंद्रातील या ग्रहाच्या चौखूर उधळण्याने गुरू ग्रहही काहीसा हतबल ठरेल. कुणी कुणाला समजून घ्यायचे हा प्रश्न सतत त्रास देत राहील. पण ३१ जुलैला चतुर्थात प्रवेश करणारा शुक्र वातावरणात बदल घडवून आणेल. अचानक सुरू झालेल्या विरोधाचे प्रमाण कमी होत जाईल. आर्थिक बाबतीत केतू – शनीने केलेली कोंडी हळूहळू सैल होईल आणि आर्थिक गाडी रुळावर येईल. स्थावर इस्टेटीचे व्यवहार मार्गी लागतील. मात्र अतिघाई, अतिविश्वास टाळा. शुक्र-रवी सहकार्यातून वर्षांअखेपर्यंतचा प्रवास सुखाचा होईल.