मेष :

येत्या वर्षांत गुरू आणि शनी हे दोन्ही महत्त्वाचे ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत. त्यातच मंगळ आणि शुक्राची भर पडणार आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये तुमच्या ज्या इच्छाआकांक्षा अर्धवट राहिलेल्या होत्या त्या पूर्ण व्हायला हरकत नाही. तुमच्या राशीमध्ये नेतृत्वगुण भरपूर आहेत. त्यामुळे ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल त्यामध्ये आपले नाव झाले पाहिजे असा एकंदरीत तुमचा इरादा असेल तो पूर्ण होईल.

व्यापारीवर्गाला गेल्या अडीच-तीन वर्षांमध्ये अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल. त्याची कसर भरून काढायची असे त्यांचे उद्दिष्ट असेल. कायदेशीर किंवा कोर्ट व्यवहारामध्ये अडथळे आले असतील तर त्यातून आता काहीतरी मार्ग निघेल. जानेवारी, फेब्रुवारी महिने विशेष चांगले जातील. मार्चच्या शेवटी नवीन करार करू नका. मे महिन्यात मंगळ दशमस्थानात येईल. तो तुमच्यामध्ये व्यवसायात विस्तार करण्याचे स्वप्न निर्माण करेल. भरपूर काम करून भरपूर पसे मिळवावे असा तुमचा उद्देश असेल. कारखानदारांना देशात किंवा परदेशात नवीन शाखा उघडावीशी वाटेल. एकंदरीत वर्ष समाधान देणारे ठरेल.

नोकरदार व्यक्तींवर पूर्वी काही कारणाने अन्याय झाला असेल तर त्याची कसर भरून निघेल. त्यांच्या मनाप्रमाणे चांगले काम झाल्याने त्यांचा उत्साह द्विगुणित होईल. मार्च आणि जुल महिन्यामध्ये त्यांच्या कामात चूक करून चालणार नाही. काही जणांना परदेशी जाण्याची संधी मिळेल. प्रत्यक्ष पगारवाढ जरी जास्त झाली नाही तरी अधिकारामध्ये वाढ झाल्यामुळे काम करण्यात मजा वाटेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी लागून स्थिरता मिळेल. काही चांगले बदल घडतील.

सांसारिक जीवनामध्ये समाधान आणि समृद्धी देणारे ग्रहमान आहे. नवीन जागा खरेदी करून तेथे एप्रिल-मेच्या सुमारास स्थलांतर करता येईल. तरुणांचे वैवाहिक जीवनात पदार्पण होईल. त्यांचे परदेशात स्थिर होण्याचे उद्दिष्ट साध्य होईल. पती-पत्नीमध्ये वाद झाला असेल तर समेट घडून येईल. वृद्ध व्यक्तींना लांबच्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल.

वृषभ :

राशिचक्रामधली तुमची दुसऱ्या क्रमांकाची रास आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे आíथक परिणाम काय होतील याचा विचार केल्याशिवाय तुम्ही एक पाऊलही पुढे टाकत नाही. पण या वर्षांमध्ये गुरू आणि शनी हे दोन मोठे ग्रह तुमच्या विरोधामध्ये उभे ठाकणार आहेत. त्यामुळे तुमची गणिते आणि अंदाज आडाखे मागे-पुढे होण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात मे महिन्यापासून मंगळच तुम्हाला थोडीशी साथ देईल. त्या जोरावर बचेंगे तो और भी लढेंगे असा पवित्रा ठेवून काम करत राहा.

व्यापार-उद्योगात बाजारपेठेत जे बदल होतील त्यामुळे तुम्हाला तुमचे धोरण लवचीक ठेवणे भाग पडेल. जे काम बराच काळ चालू होते ते काही कारणाने बंद करावे लागण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यापूर्वी त्यातले बारकावे समजून घ्या. जे काम चालू आहे ते स्वत:हून सोडू नका. जानेवारी-मार्च हा कालावधी चांगला आहे. एप्रिल महिन्यात कोणताही धोका पत्करू नका. मे-ऑगस्ट या कालावधीमध्ये उत्पन्नाचे एखादे नवीन साधन मिळेल. या वर्षांत शक्यतो कोणालाही उधारउसनवारी करू नका. नाहीतर पसे लवकर मिळणार नाहीत.

नोकरदार व्यक्तींना येत्या वर्षांत चालू काम सोडून नवीन नोकरी शोधण्याचा मोह होईल. पण हा मोह म्हणजे आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखा वाटेल. नोकरीच्या जागी सत्तेपुढे शहाणपण नसते, हे लक्षात ठेवा. जरी पगारवाढ झाली नाही किंवा प्रमोशन मिळाले नाही तरी अट्टहास धरू नका. काही जणांना मे ते पुढील दिवाळीपर्यंत परदेशगमनाची संधी मिळेल. जानेवारी ते मार्च या दरम्यान तुमचे कौशल्य तुम्हाला दाखविता येईल. येत्या वर्षांत आपल्या कामात कुठेही चूक होणार नाही याची दक्षता घ्या.

कौटुंबिक जीवनात सगळे काही आहे, पण काहीतरी कमी आहे अशी भावना राहील. घरामध्ये तुमचे निर्णय कितीही बरोबर असले तरी इतरांना ते लवकर पटणार नाहीत. नवीन जागा खरेदी करताना कागदपत्रे नीट तपासून पाहा. तरुणांनी विवाहाचा निर्णय विचारपूर्वक करावा. प्रकृतीच्या आजारांकडे नीट लक्ष ठेवा. एकंदरीत तुमचा पवित्रा सावध असू द्या.

मिथुन :

येत्या वर्षांत बहुतांशी ग्रह तुमच्या साथीला आहेत. पंचमस्थानामधला गुरू आणि सप्तमस्थानामधला शनी तुम्हाला विशेष फलदायी ठरतील. त्यामुळे दिवसेंदिवस तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढत जातील. ज्या कामात अडथळे आले होते ती कामे मार्गी लागल्यामुळे तुम्ही समाधानी दिसाल. पण या ग्रहस्थितीला मे महिन्यानंतर अष्टमात येणारा मंगळ गालबोट लावेल त्यामुळे आपली मर्यादा सोडू नका.

व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने वर्ष उत्तम आहे. अपेक्षित आणि अनपेक्षित अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला पसे मिळाल्याने तुम्ही खूश असाल. फेब्रुवारी ते मे या दरम्यान तुम्हाला सध्याच्या कार्यपद्धतीत विस्तार करावासा वाटेल. कारखानदार मंडळींना पुढील दोन-तीन वष्रे पुरेल एवढी मोठी ऑर्डर मिळेल. छोटय़ा व्यापारांना चांगले काम झाल्याचे आणि पसे मिळाल्याचे समाधान लाभेल. मात्र त्याची गुंतवणूक त्यांनी विचारपूर्वक करावी. मे महिन्यानंतर विनाकारण मोठा धोका पत्करू नका. भागीदारीचे प्रस्ताव शक्यतो स्वीकारू नका.

नोकरदार व्यक्तींना येत्या वर्षांत त्यांच्या मनाप्रमाणे काम झाल्याचे समाधान लाभेल. जानेवारी ते एप्रिल या दरम्यान एखाद्या लाभदायक प्रोजेक्टवर नेमणूक होईल. त्या निमित्ताने जादा भत्ते, पगारवाढ आणि विशेष सवलती मिळतील. काही जणांना परदेशात वास्तव्य करावेसे वाटेल. मे महिन्यानंतर कामाचा ताण प्रचंड वाढेल. अशा वेळेला नको ते काम असे  वाटू लागेल. त्या वेळी स्वत:च्या प्रकृतीला सांभाळून काम करा.

सांसारिक जीवनात खट्टा-मीठा अनुभव देणारे वर्ष आहे. तुमच्या हातात पसे असतील. परंतु कधी कधी जबाबदाऱ्यांचे ओझे वाढल्यामुळे सर्व गोष्टींचा कंटाळा येईल. मुलांची प्रगती उत्तम होईल. पण त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष उपयोग होणार नाही. येत्या वर्षांत नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याशी शक्यतो पशाचे व्यवहार करू नका. अनपेक्षित कारणांकरिता मे महिन्यानंतर पसे खर्च करावे लागतील. वृद्ध व्यक्तींनी स्वत:ची प्रकृती सांभाळली तरच त्यांना सर्व गोष्टींचा आनंद मिळू शकेल. तरुणांनी मे महिन्यानंतर करिअरमध्ये मोठे बदल करू नयेत.

कर्क :

नवीन वर्षांत गुरू आणि मंगळ या दोन ग्रहांची तुम्हाला चांगली साथ आहे. परंतु शनी षष्ठस्थानात राहात असल्यामुळे प्रत्येक बाबतीत तुम्हाला तडजोड करावी लागेल. एकंदरीत या वर्षांमध्ये तुमची परिस्थिती मानाल तर समाधान अशी असणार आहे. एप्रिल-मेनंतर काही मोठे बदल होतील, ज्यांचा तुमच्या जीवनशैलीवर वेगळाच परिणाम दिसून येणार आहे. त्यासाठी मनाने सिद्ध व्हा.

व्यापार-उद्योगामध्ये स्पर्धा तीव्र होईल. तुमचे स्पर्धक काहीतरी नवीन पवित्रा घेतील, त्याला शह देण्यासाठी तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करणे भाग पडेल. मार्च आणि एप्रिल हे दोन महिने चांगले जातील. मे महिन्याच्या सुमारास उत्पन्नाचा एखादा मार्ग तुम्हाला शोधावा लागेल. त्यामध्ये जरी पसे जास्त नाही मिळाले तरी ‘शो मस्ट गो ऑन’ या पद्धतीने काम करावे लागेल. एकंदरीत आíथकदृष्टय़ा वर्ष साधारण जाईल. नवीन बदलांकरिता पसे हातात राखून ठेवा.

नोकरदार व्यक्तींना थोडेसे कंटाळवाणे वर्ष आहे. जे काम तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला काहीतरी बदल हवा असेल. परंतु तो न मिळाल्याने तुमची थोडीशी चिडचिड होईल. फक्त त्या नादामध्ये वेडेवाकडे निर्णय घेऊ नका. एप्रिल-मेच्या सुमाराला बदलाचे वारे वाहू लागतील. तुम्ही स्वत:हून काहीतरी बदल कराल. काही जणांना नवीन नोकरीच्या निमित्ताने वेगळ्या स्थळी किंवा देशात स्थलांतर करावे लागेल. काही जणांना नको ते धाडस करावेसे वाटेल. ते धोकादायक ठरेल.

कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने नवीन वर्ष चांगले आहे. घरामध्ये एखादे मंगलकार्य ठरत नसेल तर ते निश्चित होईल. ज्यांना राहत्या जागेत बदल करायचे असतील त्यांच्याकरिता नवीन वर्ष विशेष फलदायी आहे. स्वत:च्या नवीन वास्तूचे स्वप्न एप्रिल-मेनंतर साकार होईल. तरुणांचे विवाह जमतील /पार पडतील. प्रकृतीच्या दृष्टीने वर्ष चांगले नाही. जुन्या आजारांमुळे तुम्हाला त्रास संभवतो. नातेवाईकांशी गोड बोलून संबंध चांगले ठेवा.

सिंह :

वर्षभर गुरू आणि शनी या मोठय़ा दोन ग्रहांची तुम्हाला चांगली साथ मिळणार आहे. त्यामुळे या वर्षांमध्ये दिवसेंदिवस तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढत राहतील. तुमची रास रविप्रधान रास असल्यामुळे छोटय़ा-मोठय़ा कामावर तुमचे समाधान होत नाही. या तुमच्या स्वभावानुसार येत्या वर्षांत तुम्हाला काहीतरी भव्यदिव्य करावेसे वाटेल. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात तिथे आपली प्रतिमा उंचाविण्याचा प्रयत्न करा.

व्यापार-उद्योगात गेल्या सहा-आठ महिन्यांत तुम्ही काही प्रकल्प हाती घेतला असेल तर त्यामध्ये आता गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. खूप काम करून खूप पसे मिळविण्याची तुमची तमन्ना पूर्ण होऊ शकेल. डिसेंबर, एप्रिल आणि मे हे महिने तुम्हाला विशेष फलदायी जातील. ऑगस्ट-सप्टेंबरनंतर एखाद्या चांगल्या पदाकरिता तुमची निवड होईल. एकंदरीत पुढील दिवाळीपर्यंत तुम्ही खूश असाल. कारखानदारांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून वेगळ्या पद्धतीने काम सुरू करता येईल. जोडधंद्यातून प्रगतीचा एखादा नवीन मार्ग मिळेल.

नोकरदार व्यक्तींना एकंदरीतच वर्ष पूर्ण समाधान देणारे आहे. त्यांनी केलेल्या कामाची पूर्वी वरिष्ठांनी दखल घेतलेली नसेल तर ती आता घेतली जाईल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चांगल्या प्रकल्पाकरिता निवड होईल. हा प्रकल्प कष्टदायक असेल. त्यामुळे एप्रिलपर्यंत तुम्हाला विश्रांती मिळणार नाही. परंतु त्यानंतर जे श्रेय मिळेल त्यामुळे तुमचे मन तृप्त होईल. मे किंवा ऑगस्टच्या सुमारास पगारवाढ किंवा प्रमोशनचे योग संभवतात. काही जणांना एक-दीड वर्षांकरिता परदेशी जाण्याची संधी मिळेल.

कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने येणारे वर्ष साधारण आहे. तुमच्या रोजच्या कामाच्या व्यापामुळे तुम्ही घराकडे फारसे लक्ष देऊ शकणार नाही. तरीपण ज्या वेळी वेळ मिळेल त्या वेळी तुम्ही कुटुंबीयांसमवेत मनमुराद आनंद लुटाल. तरुण मंडळी वैवाहिक जीवनात पदार्पण करतील. मुलांच्या प्रगतीविषयी मात्र थोडीशी चिंता जाणवेल. वृद्धांना लांबचा प्रवास करून नातेवाईकांना भेटण्याचा योग संभवतो.

कन्या :

येत्या वर्षांत धनस्थानातील गुरू आणि चतुर्थस्थानातील शनी तुम्हाला दोन वेगवेगळ्या आघाडय़ांवरती व्यस्त ठेवणार आहेत. एकीकडे नोकरी-व्यवसायातील प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. तर दुसरीकडे घरामधल्या काही जबाबदाऱ्या असतील, तर त्या पूर्ण करणे भाग पडेल. या सगळ्यामुळे तुम्हाला स्वत:च्या स्वास्थ्याकडे लक्ष देता येणार नाही. मात्र वातावरणाची चांगली साथ मिळाल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा हुरूप वाटेल.

व्यापार-उद्योगात पशांवर तुम्ही तुमचे सर्व लक्ष केंद्रित कराल. ज्या माध्यमातून तुम्हाला जास्त पसे मिळतात त्यावर लक्ष केंद्रित करून इतर गोष्टींकडे दुर्लक्ष कराल. जुनी व्यावसायिक जागा विकून एखाद्या मोठय़ा जागेमध्ये  तुम्हाला स्थलांतर करावेसे वाटेल.  एप्रिल, मे, जून हे तीन महिने तुम्हाला प्रगतीकारक ठरतील. पुन्हा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये नेहमीपेक्षा जास्त कमाई झाल्याने तुम्हाला बरे वाटेल. एकंदरीत  मनाचे धाडस करून तुम्ही या वर्षांमध्ये उत्पन्नाचा एक नवीन उच्चांक प्रस्थापित करू शकाल. त्याची भविष्यकाळासाठी गुंतवणूक करून ठेवाल.

नोकरदार व्यक्तींना थोडेसे गरसोयीचे वर्ष आहे. जास्त काम करून जास्त पसे मिळविण्याची तुमची नेहमीच अभिलाषा असते. ती पूर्ण करण्याची तुमची जबरदस्त इच्छा या वर्षांत जागृत होईल. पण त्याच्याकरता कदाचित तुम्हाला कौटुंबिक सुखात कमतरता सहन करावी लागेल. जानेवारी ते मार्च या दरम्यान खूप दगदग होईल. एप्रिलच्या सुमारास सध्याच्या नोकरीत बदल करावासा वाटेल. काही जणांना देशात किंवा परदेशामध्ये स्थलांतर करावे लागेल. परंतु प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.

कौटुंबिक जीवनात मात्र थोडीशी कमतरता सहन करावी लागेल. चतुर्थस्थानातील शनी तुमच्यावरील नतिक जबाबदाऱ्यांचा बोजा वाढवेल. त्या पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला चन पडणार नाही. पण त्यासाठी आवश्यक असणारे पसे हातात असल्यामुळे चिंता वाटणार नाही. तरुणांनी सांसारिक जीवनामध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याच्या होणाऱ्या परिणामांचा विचार करावा, वृद्धांनी प्रकृती सांभाळल्यास वर्ष चांगले जाईल.

तूळ :

येत्या वर्षांत राशीतील गुरू आणि तृतीय स्थानामधला शनी हे दोन मोठे ग्रह तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. त्यामुळे वर्षांच्या सुरुवातीला तुम्हाला अनेक नवीन उपक्रम हातात घ्यावेसे वाटतील. व्ययस्थानातल्या गुरूमुळे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला निराशा आली होती त्या गोष्टीमध्ये काहीतरी सकारात्मक घडल्यामुळे तुम्ही अधिक उत्साही बनाल. मात्र मे महिन्यानंतर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काही मोठे बदल होतील. त्याचा परिणाम सर्व गोष्टींवर होईल.

व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने वर्ष चांगले आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांमध्ये तुम्हाला चांगले पसे मिळाल्यामुळे आपण केलेल्या कामाची पावती मिळाली असे वाटेल. मे महिन्याच्या सुमाराला चालू असलेल्या कामामध्ये विस्तार करायचे ठरवाल. त्यातून कमाईचे प्रमाण लगेच वाढले नाही तरी भविष्यात त्याचा उपयोग होईल अशी तुम्हाला खात्री वाटेल. जून, जुल, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये तुम्ही जे काम कराल त्यातून बाजारपेठेतील प्रतिमा उंचावेल. कारखानदारांचा आधुनिक तंत्रज्ञानावर जास्त भर राहील.

नोकरदार व्यक्तींना पूर्वी वरिष्ठांनी काही आश्वासन दिले असेल, तर त्याप्रमाणे पगारवाढ किंवा बढती मिळण्याचे योग संभवतात. बेकार व्यक्तींना काम मिळाल्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. एप्रिलच्या सुमारास तुमच्या संस्थेत बदलाचे वारे वाहू लागतील. वरिष्ठ एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावरती सोपवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला नवीन ऑफिसमध्ये पाठविण्यात येईल. तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे वेगळ्या स्थळी बदली किंवा बदल होईल. काही जणांची परदेशी जाण्याची इच्छा पूर्ण होईल.

सांसारिक जीवनामध्ये जर काही वादविवाद झाले असतील तर त्यामध्ये सर्वानुमते तोडगा निघेल. जुनी प्रॉपर्टी विकून नवीन जागेमध्ये स्थलांतर करण्याचे योग एप्रिल ते पुढील दिवाळीपर्यंत संभवतात. तरुणांपुढे विवाह करायचा की परदेशाची संधी घ्यायची असा पेच पडेल. सर्व काही चांगले आहे. मात्र प्रकृतीच्या दृष्टीने वर्ष चांगले नाही. वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी.

वृश्चिक :

वर्षभर राशीच्या व्ययस्थानात राहणारा गुरू आणि धनस्थानात असणारा शनी येत्या वर्षांत तुमच्या संयमाची परीक्षा बघणार आहे. पण या दरम्यान राश्याधिपती मंगळ बराच काळ तृतीयस्थानात भ्रमण करत असल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचे नतिक धर्य लाभेल. जरी तुमच्यापुढे प्रश्न आले तरी त्यातून तुम्ही मार्ग काढू शकाल. साडेसातीच्या मधला आणि कठीण भाग आता संपला आहे. त्यामुळे खूप काळजी करायचे कारण नाही. तुमच्या कर्तव्यात तुम्ही तत्पर राहिलात तर सर्व काही ठीक होईल.

व्यापार-उद्योगात तुमची परिस्थिती दगडापेक्षा वीट मऊ अशी असणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये जर काही कर्ज झाले असेल तर आता त्याची परतफेड हळूहळू करता येईल. मार्च महिन्यामध्ये तुम्हाला चांगले पसे मिळतील. त्यामुळे तुम्ही वेळ मारून नेऊ शकाल. डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात एखादे अवघड काम मार्गी लागेल. एप्रिल आणि मेचा काही भाग थोडासा खडतर जाईल. मे महिन्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा एखादा नवीन मार्ग  मिळेल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना त्यातूनही पसे मिळाल्याने बरे वाटेल. येत्या वर्षांत शक्यतो भली मोठी गुंतवणूक करू नका.

नोकरदार व्यक्तींनी या वर्षांत भरपूर काम करण्याची तयारी ठेवावी. त्यांना त्याचे फळ लगेच मिळाले नाही तरी निराश न होता काम चालू ठेवावे. एप्रिलनंतर पुढील दिवाळीपर्यंत काही चांगले काम मिळेल. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढेल. काही जणांना या दरम्यान छोटय़ा प्रोजेक्टच्या निमित्ताने परदेशी जाण्याची संधी मिळेल. या वर्षांमध्ये पगारवाढ  किंवा बढती अशा कारणांकरिता वरिष्ठांशी भांडू नका. तुमचे महत्त्व कमी होईल.

धनस्थानात शनी आणि व्यवस्थानातील गुरू कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत तुमची परिस्थिती ‘कळतं पण वळत नाही’ अशी करणार आहे. नतिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरिता पशाची उभारणी करावी लागेल. नवीन प्रॉपर्टी खरेदी करताना तुमच्या आíथक कुवतीचा विचार करा. मुलांच्या प्रगतीकरिता आणि स्थर्याकरिता विशेष प्रगती करणे भाग पडेल. पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही तुमची रास बाहेर पडते. त्यानुसार तुम्ही या सर्वामधून सहीसलामतपणे बाहेर पडाल.

धनू :

सध्या शनीचे भ्रमण तुमच्या राशीमधून चालू आहे.  साडेसातीचा मध्य आहे. त्यामुळे प्रगतीची  वाढ खडतर असेल पण कर्मधर्मसंयोगाने मंगळ, गुरू आणि शुक्र  या तीन ग्रहांकडून तुम्हाला चांगली साथ मिळणार असल्यामुळे घाबरून जाण्याचे काम नाही. प्रयत्नांती परमेश्वर  या म्हणीवर विश्वास ठेवून तुमचे प्रयत्न चालू ठेवा.

व्यापार-उद्योगात वर्षांची सुरुवात चांगली होईल. तुम्ही पूर्वी केलेल्या कामाचे पसे मिळाल्याने  तुमची काही जुनी देणी असतील तर ती तुम्ही फेडू शकाल. नवीन प्रकल्प हाती घेण्यापूर्वी त्यातील बारकाव्यांकडे नीट नजर ठेवा. गरज पडल्यास निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. लाभस्थानातला गुरू वर्षभर तुम्हाला पसे देत राहील.  पण त्याच्या बदल्यात तुम्हाला भरपूर काम करावे लागेल. मे महिन्यानंतर मंगळ धनस्थानात येईल. त्या वेळी एखादी नवीन गुंतवणूक करण्याचा मोह होईल. एकंदरीत  या वर्षांत तुम्ही केलेल्या  कष्टाचे पशाच्या स्वरूपात चीज होईल.

नोकरदार व्यक्तींकडून वरिष्ठांच्या खूप मोठय़ा मागण्या असतील. त्यांना कदाचित नवीन प्रकारचे  काम शिकून घ्यावे लागेल. ज्यांची जादा काम करण्याची तयारी असेल त्यांना भरपूर पसे मिळतील. डिसेंबर, जानेवारी, एप्रिल हे तीन महिने तुम्हाला विशेष फलदायी ठरतील. जून आणि जुल या महिन्यात खूप दगदग होईल. ऑगस्ट ते पुढील दिवाळीपर्यंत काही जणांना विशेष अधिकार आणि परदेशी जाण्याची संधी मिळेल. एकंदरीत या वर्षांत घाबरून जाण्याचे काम नाही. फक्त आपली लक्ष्मणरेषा ओलांडू नका.

कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने मात्र वर्ष फारसे सौख्यकारक नाही. राशीमधला शनी तुम्हाला तुमच्या नतिक जबाबदाऱ्यांमध्ये जखडून ठेवेल. अपेक्षित आणि अनपेक्षित कारणांमुळे खर्च उद्भवल्याने तुम्ही थोडेसे गांगरून जाल. काही वेळा पशाने सर्व गोष्टी मिळत नाहीत याची जाणीव होईल. मे महिन्यानंतर नवीन स्थळी स्थलांतर होण्याची शक्यता आहे. नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याशी हितसंबंध राखून ठेवा. वृद्ध व्यक्तींनी हट्टीपणा करू नये.

मकर :

राश्याधिपती शनी यापूर्वीच राशीच्या व्यवस्थानात हजर झाला आहे. म्हणजेच साडेसातीची  सुरुवात झाली आहे. त्यामुळे मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी चिंता असेल की सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पार पडतील की नाही, पण या वर्षांमध्ये दशमस्थानात राहणारा गुरू तुम्हाला  चांगली साथ देणार आहे. त्याच्याच बरोबर राशीमध्ये राहणारा मंगळ आणि दशमातला शुक्र तुमच्या प्रगतीला हातभार लावतील. येत्या वर्षांत जीवनात मोठे बदल घडतील.

व्यापार-उद्योगात अनेक मोहाचे क्षण निर्माण होतील. दिवाळी २०१७ च्या आसपास एखादा मोठा प्रकल्प तुमचे लक्ष आकर्षति करेल. त्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची नीट माहिती घ्या. नाहीतर चिखलामध्ये पाय  रुतल्यासारखे वाटेल. जानेवारी-फेब्रुवारी मध्ये चांगले पसे मिळतील. मे महिन्याच्या सुमाराला काही नवीन करार किंवा भागीदारीचे प्रस्ताव पुढे येतील. त्याचा साधकबाधक विचार करा. येत्या वर्षांत तुमच्या हातून चांगले काम झाल्यामुळे तुम्हाला एक  प्रकारचा अभिमान वाटेल. प्रतिष्ठित व्यक्तींकडून ऑगस्ट-सप्टेंबरनंतर उत्तम साथ मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. मात्र अतिपशाचा मोह धरू नका.

नोकरीच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडण्याची शक्यता आहे. परंतु त्यामुळे तुमची दगदग, धावपळ प्रचंड प्रमाणात वाढेल. जानेवारीच्या सुमारास जादा पगारवाढ होईल. एप्रिलमध्ये नवीन प्रकल्पाकरिता तुमची निवड होईल. मे महिन्यानंतर देशात किंवा परदेशामध्ये जाण्याची संधी मिळेल. येत्या वर्षांमध्ये पदोन्नतीचा आनंद तुम्हाला मिळेल.

सांसारिक जीवनामध्ये काही मोठे बदल या वर्षांत संभवतात. कदाचित त्याला तुमचे  करिअर जबाबदार असेल. काही जणांना अधिक पसे मिळविण्याकरिता दुसऱ्या देशामध्ये स्थायिक/जावेसे वाटेल. मुलांची शिक्षणामधली प्रगती चांगली राहील. त्याच्याकरिता तुम्हाला वेगळे पसे काढून ठेवावे लागतील. तरुणांचे विवाह जमतील. पण त्यामध्ये स्थिरता मिळायला थोडा जास्त अवधी द्यावा लागेल. ज्यांना रक्तदाब किंवा हाडांचे विकार आहेत त्यांनी या वर्षांत अति दगदग करू नये. नवीन जागा खरेदी करताना आपल्या बजेटच्या पुढे न जाणे चांगले.

कुंभ :

येत्या वर्षांत राश्याधिपती शनी लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याला भाग्यस्थानामधल्या गुरूची जोड मिळेल. हे दोन्ही ग्रह तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला पूरक आहेत. मे महिन्यानंतर पुढल्या दिवाळीपर्यंत व्ययस्थानात राहणारा मंगळ तुमची गरसोय करणार आहे. थोडक्यात येत्या वर्षांमध्ये तुमचा सुखदु:खाचा वाटा समसमान राहणार आहे.

व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने वर्षांची सुरुवात धुमधडाक्यात होईल. आवडणारा प्रकल्प मिळाल्याने तुम्ही खूश असाल. त्यातून पसे कमी मिळाले तरी आनंद भरपूर असेल.  नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांत तुमची एखादी मनोकामना पूर्ण होईल. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पूर्वी केलेल्या कामाचे पसे मिळतील. एप्रिलनंतर एखादी  मोहात टाकणारी कल्पना तुमचे लक्ष आकर्षति करेल. पण थोडे काम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे मृगजळामागे धावणे आहे. मे महिन्यानंतर हातातले पसे कसे निसटतील हे तुम्हाला समजणार नाही.

नोकरीत या वर्षी तुम्ही चांगली मजल माराल. तुमच्या कामात  कौशल्य पणाला लावाल. काहीजणांना नोव्हें ते फेब्रुवारी या दरम्यान छोटय़ा प्रकल्पाच्या निमित्ताने परदेशी जाण्याची संधी मिळेल. ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे त्यांना जानेवारी-फेब्रुवारी महिना चांगला आहे. पण त्यांनी नवीन कामाची नीट माहिती करून घ्यावी. नाहीतर त्यांना मे महिन्यानंतर पुन्हा एकदा नोकरी बदलावी लागेल. ज्या व्यक्ती संशोधनकार्यात आहे त्यांना येत्या वर्षांत उत्तम कामगिरी बजावता येईल. मे महिन्यानंतर काही अनपेक्षित बदल संभवतात, पण तुमचा नाइलाज असेल.

सांसारिक जीवनामध्ये आनंदायी वृद्धी करणारा कालावधी आहे. काही अपेक्षित घटना लांबल्या असतील तर त्या पूर्ण झाल्याने एक प्रकारचे समाधान लाभेल. तरुण मंडळींनी धरसोड केली नाहीतर त्यांना स्थिरता लाभून त्यांचे वैवाहिक जीवनात पदार्पण होईल. नवीन जागा घेण्याचा मोह मे महिन्यानंतर शक्यतो आवरा नाहीतर तुमचे बजेट कोलमडेल. अतिविचार आणि खर्च यामुळे जूननंतर तणाव निर्माण होईल. काहींना नाईलाजाने स्थलांतर करावे लागेल.

मीन :

राश्याधिपती गुरू वर्षभर अष्टमस्थानात भ्रमण करणार आहे. सप्टेंबरनंतर शुक्रही तेथेच येणार आहे. हे दोन ग्रह जरी अनुकूल नसले तरी दशमस्थानातला शनी आणि मे महिन्यानंतर लाभस्थानात राहणारा मंगळ चांगले असल्यामुळे मानलं तर समाधान अशी तुमची स्थिती वर्षभर राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली बाब म्हणजे वर्षभर पसे मिळत राहिल्यामुळे तुम्ही सर्व समस्यांना तोंड देऊ शकाल.

व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने डिसेंबर, जाने आणि फेब्रुवारी हे तीन महिने चांगले आहेत. या दरम्यान तुम्हाला पसे मिळाल्यामुळे काम करायला हुरूप येईल. मार्च महिन्यामध्ये तुमच्या कामाची पद्धत थोडीशी बदलावीशी वाटेल. एप्रिलमध्ये त्याचा फायदा होईल. मे महिन्यापासून उत्पन्नाचे नवीन साधन मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहीजणांना परदेशातील एखादे काम मिळेल. मात्र या सर्व दरम्यान तुमचे खर्च वाढत राहिल्यामुळे हातामध्ये जास्त पसे शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे मिळालेले पसे जपून खर्च करा.

नोकरदार व्यक्तींना येत्या वर्षांत त्यांचे वरिष्ठ बरीच आश्वासने देतील, या आश्वासनांमुळे त्यांना चांगले काम करावेसे वाटेल. २०१७ दिवाळीपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत भरपूर काम असेल. त्यानिमित्त जादा फायदे किंवा सवलती मिळतील. मार्च महिन्याच्या सुमारास नवीन नोकरीची एखादी संधी येईल. पण ती स्वीकारण्यापूर्वी कामाची नीट माहिती करून घ्या. मे महिन्यापासून पुढील दिवाळीपर्यंत तुमच्या आवडीचे काम तुम्हाला मिळणार नाही. पण केवळ पशाकरिता तुम्ही काम करीत राहाल. पुढच्या दिवाळीच्या सुमारास मनाप्रमाणे घटना घडायला सुरुवात होईल.

सांसारिक जीवनात या वर्षांत तुम्हाला बरीच तडजोड करावी लागेल. सभोवतालच्या व्यक्तींच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. पण तुम्हाला काय पाहिजे याची कोणालाच पर्वा नसेल. मे महिन्यानंतर जुनी प्रॉपर्टी विकून पसे मिळू शकतील. तब्येतीच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष थोडेसे खडतर आहे. पण त्याची पर्वा न करता तुम्ही काम रेटत राहाल. तरुणांनी येत्या वर्षांत जास्त धाडस करू नये. त्यांचे विवाहाचे बेत थोडेफार लांबण्याची शक्यता आहेत. वृद्धांनी औषधोपचाराकडे लक्ष द्यावे.
विजय केळकर