सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष व्ययस्थानातील मंगळ आणि अष्टमातील गुरू-शुक्रामुळे कौटुंबिक समस्या उभ्या राहतील. रवी-नेपच्युनचा त्रिएकादश योग आपल्या मनास आधार देईल. मेषेचा हर्षल रागवण्याचे प्रसंग आणेल, पण अशा वेळी शब्द जपून वापरा. संयम मोलाचा ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरी-उद्योगात वरिष्ठांची मर्जी सांभाळा. जोडीदाराचे प्रश्न प्रेमाने सोडवा. नवीन वर्षांतल्या नव्या जबाबदाऱ्या निर्धाराने पूर्ण कराल.

वृषभ आठवडय़ाचा पूर्वार्ध आव्हानात्मक असला तरी अखेरीस तुम्हीच बाजी माराल. लाभातील मंगळ आणि सप्तमातील गुरु-शुक्र यांमुळे जोडीदाराची चांगली साथ मिळेल. मनास आनंद होईल असे कौटुंबिक वातावरण असेल. भावंडांशी मात्र वाद टाळा. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. धार्मिक यात्रेचा योग चांगला आहे. हातून चांगली गोष्ट घडल्याने मानसिक समाधान मिळैल. नोकरी व्यवसायात जम बसेल.

मिथुन नव्या वर्षांचे नवे संकल्प प्रयत्नपूर्वक पूर्ण कराल. सप्तमातील शनी-रवी आणि लाभातील हर्षल आपले मन विचलित करतील. पण निर्धाराने त्यावर मात करा. अंतर्मनाचा आवाज ऐकून विवेकबुद्धीने अंतिम निर्णयावर ठाम रहा. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या विशेष गुणांची छाप पाडाल. जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. दुखणे अंगावर काढल्यास पुढे त्रास भोगावा लागेल. अतिस्पष्टवक्तेपणा थोडा गुंडाळून ठेवणेच हिताचे.

कर्क आपल्या राशीतील राहू आणि षष्ठातील बुध-रवी-शनी यांमुळे वरिष्ठांचे म्हणणे मान्य करावे लागेल. आपले म्हणणे कितीही बरोबर असले तरी ते मांडण्याची ही वेळ नव्हे. थोडे सबुरीने घ्यावे लागेल. जोडीदाराची समजूत काढूनही फारसा फायदा न झाल्यास त्याला त्याचा थोडा वेळ घेऊ द्या. नोकरी व्यवसायात सहकारी आपल्याला मदत करायला तयार होणार नाहीत. पण नंतर मात्र त्यांना आपली बाजू पटेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

सिंह नव्या वर्षांची सुरुवात उत्साही वातावरणात होईल. नव्या वर्षांसोबतच नव्या संधी उपलब्ध होतील. दशमस्थानावरील गुरू-शुक्राची दृष्टी नोकरी-व्यवसायात प्रगती करेल. अपेक्षित फलप्राप्तीचे योग आहेत. एखादा परदेशी प्रवास करून याल. नव्या कल्पना, नवे संकल्प यासाठी सहकाऱ्यांचे सहाय्य मिळेल. जोडीदार आपल्याला समजून घेईल. मुलांच्या समस्यांना थोडा वेळ देऊन आपण त्या लीलया सोडवू शकाल.

कन्या उत्साहाच्या भरात न झेपतील अशा जबाबदाऱ्या आपल्या अंगावर घेऊच नका. मंगळ-राहूचा नवपंचम योग आपला आत्मविश्वास वाढवेल. कोणतेही कार्य अभ्यासपूर्वक पूर्ण करा. तृतीयातील गुरू-शुक्रामुळे चांगली संधी मिळेल. प्रयत्नांनी या संधीचे चीज कराल. जोडीदारासह छान सूर जुळतील. नोकरी व्यवसायातील अडचणींवर व्यवहारी राहून मात कराल. भावनांपेक्षा विवेक श्रेष्ठ या वचनाचा अवलंब कराल.

तूळ मुळातच समतोल साधणारी आपली रास आहे. द्वितीयातील गुरू-शुक्रामुळे नोकरी व्यवसायात वरिष्ठ दबाव आणण्याचा प्रयत्न करतील, पण आपल्या व्यवहारी वृत्तीमुळे त्याला उत्तम प्रकारे सामोरे जाऊ शकाल. रवी-नेपच्युनचा त्रिएकादश योग आत्मविश्वास वाढवेल. प्रयत्न सफल होतील. जोडीदाराची नाराजी प्रेमाने दूर कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. वादाचे प्रसंग शिताफीने टाळाल.

वृश्चिक आत्मविश्वासाने आणि नव्या उमेदीने या नवीन वर्षांत कामाला लागाल. ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ असे धोरण स्वीकारावे लागले. बुध-राहूच्या षडाष्टक योगामुळे कोर्टकचेऱ्यांमध्ये असे वक्तव्य टाळावे. शब्द जपूनच वापरावेत. नोकरी-व्यवसायात आहे ती स्थिती कायम राहील. सध्या मोठी भरारी घेण्याची स्वप्ने बाजूला ठेवावीत. आरोग्याच्या तक्रारीवर वेळीच उपचार करावे लागतील.

धनू व्ययातील गुरू-शुक्र आणि चतुर्थातील मंगळ कौटुंबिक सुखात चढ-उतार देईल. शब्दाने शब्द वाढवण्यापेक्षा शांतपणे विचार करा आणि मगच आपला मुद्दा मांडा. वाणीत कटुता येणार नाही याची काळजी घ्या. सध्या सामोपचाराने वागणेच हितावह राहील. जोडीदार आपले म्हणणे खरे करेल. नोकरी व्यवसायातही स्थिती काही वेगळी नाही. आपल्या बिनधास्त स्वभावाला थोडी मुरड घाला.

मकर तृतीयातील मंगळ अनेक आव्हाने पेलण्याची ताकद देईल. तर लाभातील गुरू-शुक्र प्रयत्नांना यश देईल. जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. त्याला थोडा वेळ देणं महत्त्वाचं ठरेल. आर्थिक व्यवहार जपून करावे. नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कौटुंबिक सुखात चढउतार येतील. मनात नवीन संकल्प आखाल. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका. विशेषत: श्वसनासंबंधित तक्रारींवर लगेच उपचार करा.

कुंभ दशमातील गुरू-शुक्र आणि लाभातील रवी आपल्या नव्या योजनांना मूर्त रूप देतील. आर्थिक स्थितीचा आलेख चढता राहील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राखाल आणि सहकाऱ्यांची मदत मिळेल. यामुळे उत्साह वाढेल.  कौटुंबिक वातावरण आनंदाचे, उतसाहाचे राहील. जोडीदाराचे साहाय्य मिळेल. औषधपाण्याकडे दुर्लक्ष न करता वेळचेवेळी औषधं घ्या. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या.

मीन व्ययातील नेपच्युन आणि भाग्यातील गुरू-शुक्र यामुळे धार्मिक यात्रांचा योग संभावतो. नोकरी-व्यवसायात कारण प्रसंगी वरिष्ठांची नाराजी दिसेल. अशावेळी थोडे सबुरीने आणि संयमाने घ्यावे.  पाठीशी गुरुबळ असताना चिंता करण्याची गरज नाही. ‘ही वेळही निघून जाईल’ यावर आपला विश्वास बसेल. किरकोळ आजारांमुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील.