‘‘ मी रोज आरोग्य कोठीवरची डय़ुटी संपली की कंबर मोडस्तोवर बारा सोसायटय़ांमध्ये झाडूकाम करते. घरी जाऊन स्वयंपाक, धुणीभांडी, नवऱ्याची सेवा.. हे सगळं कशाला? पोरांना शिकवायला.. त्यांना मोठं कराया..’’ मुलांच्या उच्च शिक्षणाची स्वप्नं डोळ्यांत घेऊन जगणाऱ्या सफाई कामगार प्रमिलाबाईंची कहाणी..
दुपारची वेळ! योगानंद सोसायटीच्या गेटजवळ बसले होते. समोरून धाकटा पोरगा हसत हसत आला. रिझल्ट हातात घेऊन माझ्या पायांवर डोई ठेवली. शिकवणी वर्गाला न जाता, लोकांच्या पुस्तकावर अभ्यास करून पोरानं बीकॉमच्या परीक्षेत ७२ टक्के गुण मिळवले होते. मी आनंदाने त्याच्या तोंडावरून हात फिरवला. त्याने माझ्या हातातला झाडू घेतला आणि रोजच्याप्रमाणे सोसायटीच्या झाडण कामाला
निघून गेला. हातातल्या रिझल्टकडे बघून मला रडू फुटलं. तेवढय़ात समोरून देशपांडेताई आणि रानडेकाकू आल्या. ‘लकीची आई, काय झालं? अशा रडताय का?’ मी न बोलता रिझल्टचा कागद त्यांच्यापुढे धरला.
‘‘अहो लकी चांगला पास झालाय की!’’
म्हटलं, ‘‘होय! पण पोरगा सी.एस. करायचं म्हणतोय. पैसे कुठून आणू मी?’’
‘‘हात्तिच्या! अहो मी ताट घेऊन फिरते सोसायटीत तुमच्या मुलाच्या फीसाठी!’’ संध्याकाळपर्यंत दोघींनी फी गोळा केली. माझ्या हातात ठेवली. म्हणाल्या, ‘‘कमी पडले तर आणखी मागा. संकोच करू नका.’’ मी पैसे घेतले. कपाळी लावले. घरी आले. तर थोरला लेक लंकेश्वर पॅरालिसिसने अंथरुणाला खिळलेल्या बापाचं हगणंमुतणं काढत होता. पोराचं तोंड सुकलं होतं. मला पाहून त्याला जोरात रडू फुटलं.
‘‘आई, चार मार्कानी यूपीएससीची परीक्षा हुकली माझी!’’
म्हटलं, ‘‘अरे बाबा, बापाची सेवा करून, सोसायटीत झाडूकाम करून यूपीएससी/ एमपीएससी करतोयस तू! अपयशाला घाबरू नकोस. पुढच्या वेळी नक्की पास होशील! हिम्मत धर!’’ पोराला समजावलं. जेऊ घातलं. अंथरुणाला पाठ टेकली. पण झोप येईना. काय काय आठवायला लागलं..
९ फेब्रुवारी ९४ साल. सफाई कामगारांची भरती चालू झाली कळलं. फॉर्म भरला. ‘खाडे रोजंदार’ म्हणून कामाला लागली. शोभाचा आणि माझा पहिलाच दिवस होता रेडझोनमध्ये! दोघी कामावर एकत्र गेलो. तिची आरोग्य कोठी पुढे होती. ती पुढे निघून गेली. मी पदर तोंडावर घेऊन तिथंच उभी राह्य़ले. इतकी घाण होती आजूबाजूला! ढीगभर निकर, ब्रेसिअर, पानाच्या पिचकाऱ्या, निरोध! कचराकुंडीत मेलेलं कुत्रं, मांजर, घूस! नुसता घाण वास मारत होता. मला कळंना, हे कसं झाडायचं? मी नुसती खाली मान घालून उभी राह्य़ले. तर येक जण जवळ आला. कानात पुटपुटला, ‘भाव क्या तेरा?’ मी दचकले. पण झाडू उचलला नि कामाला लागले. सगळा कचरा एका ठिकाणी गोळा केला. त्यातल्या बिर्याणीच्या खरकाटय़ात अळ्या वळवळत होत्या. उलटी आली. तोंड दाबून पत्र्याने कचरा गोळा केला. गाडय़ात भरला. गाडा जरा सरकवला तर भसकन खड्डय़ात गेला. गाडय़ाच्या दांडय़ाचा ओटीपोटात दणका बसला. जीव कळवळला. दिवसभर उपाशीपोटी काम केलं. पहिल्या दिवशी २७ रुपये १० पैसे रोज मिळाला. दमले होते. म्हटलं, बसने जाऊ. बसमध्ये चढले. तसं माझ्या अंगाच्या वासानं सगळ्यांनी नाकावर रुमाल धरला. कंडक्टरने मला खाली उतरवलं.
दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाच्या आशेने आरोग्य कोठीवर गेले. मुकादम म्हणाला, ‘चौकात उभी राहा. काम देतो! चौकात उभी ऱ्हायले. चार तासाने मुकादम आला. म्हणाला, काम नाय, घरी जा. पण आधी मला चा पाज!’ आता ह्य़ाला चहा कुठून पाजू! दातावर मारायला मजजवळ पैसा नाय. त्याने दुसऱ्या दिवशी खुन्नस काढला. मलमूत्र, सांडपाणी, कचरा, चिंध्यांचा ढीग असलेल्या वस्तीवर मुद्दाम मला पाठवलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा रेडझोनच्या कोठीवर पाठवलं. मी मुकाट खाली मान घालून झाडत होते, तर येक जण जवळ आला. म्हणाला, ‘‘चल उपर. चिकणी है तू!’’
दोघी-चौघी बायांनी ऐकलं. त्या म्हणाल्या, ‘ए, उसको कायको परेशान करता है? हम कायके लिए है?’’ तो म्हणाला, ‘‘नाय, मला तीच पायजे!’’
बायांनी मला डोळा मारला. ‘तुला हीच बाय पायजे? चल दिली तुला. रविवारी ये. किती पैसे घेऊन येशील?’’
‘तू सांगशील तेवढे!’ त्यांचा आपसात रेट ठरला. तो माझ्याकडे बघत हसत हसत निघून गेला. मी भयंकर घाबरले. रविवारी माझी तिथेच डय़ुटी होती. ठरल्याप्रमाणे तो माणूस आला. दोन बिल्डिंगमधल्या सगळ्या बाया झंपर-परकरवर खाली उतरल्या. त्याला धरलं. त्याचे पैसे काढून घेतले. त्याला पार नागडा करून मार मार मारला आणि वस्तीबाहेर हाकलून दिला. त्या दिवशी मला ताकद मिळाली. भीती मरून गेली. ह्य़ा आपल्या आया, बहिणी, मावशा आहेत, ह्य़ा विचाराने मी बिनधास्त झाले. पुढे त्या बाया खाली घाण, कचरा, निरोध टाकेनाशा झाल्या. मी पण रस्ते साबणाच्या पाण्याने चकाचक धुवायला लागले.
.. त्या बायांची आठवण करीत कधी झोप लागली कळलं नाय. पहाटे तीनला जाग आली. सहाच्या डय़ुटीवर मला जायचंय. पटापट आंघोळ केली. स्वयंपाक केला. नवऱ्याचं हगणं-मुतणं काढलं. त्याला आंघोळ घातली आणि काळोखात भाएर पडली. सकाळच्या पारी व्यायाम करणारी माणसं भेटतात. एकाने शिटी मारली. मी लक्ष नाय दिलं. एक बाई देवळात चालली होती. मला बघून तिने नाकावर रुमाल धरला आन् रस्ता क्रॉस केला. हे रोजचंच आहे. सहा वाजता कोठीवर हजेरी दिली. एक वाजस्तवर झाडू काम केलं तेवढय़ात मोठय़ा
सायबांनं बोलावणं धाडलं. लय घाबरले. सायबासमोर थरथरत उभी ऱ्हायले. ते म्हणाले, ‘‘ताई, तुझ्या
हातात बांगडय़ा किती आहेत?’’ मी खुळ्यावाणी बघत राह्य़ले.
‘‘भर बांगडय़ा ह्य़ा मुकादमाच्या हातात! ह्य़ा ०ने कमिशनरकडे तुझी तक्रार केलेय. तू म्युनिसिपालटीतलं काम संपलं की सोसायटय़ा झाडायला जाते. प्रायव्हेट कामं करते. अरे ० तिचं रोजचं काम ती चोख करते ना? मग ते केल्यावर ती काय पण करो! तुला काय करायचंय? तुला बघवत नसेल तर तिचं घर भागव!’’ मला रडू फुटलं. सायबांचे पाय धरावेसे वाटले. मी रोज आरोग्य कोठीवरची डय़ुटी संपली की कंबर मोडंस्तोवर बारा सोसायटय़ांमध्ये झाडूकाम करते. घरी जाऊन संध्याकाळचा स्वयंपाक, धुणीभांडी, नवऱ्याची सेवा.. हे सगळं कशाला? पोरांना शिकवायला.. त्यांना मोठं कराया.. काम संपवून सांजच्याला घरी आले तर थोरला झोपलेला! म्हटलं, काय बाबा? बरं नाय का तुला? म्हणाला, नाय आई. पाय दुखतायत. वाटेत सायकल पंक्चर झाली. स्वारगेट ते कोथरूड पायी चालत आलो. तसा मामा ए.सी. गाडीतनं गेला माझ्या समोरून.. मला बघत. पण मी नाय मागितले पैसे त्याच्याजवळ!’’ मला पोराची नाराजी कळली. आम्ही जातीनं चांभार. गटई काम करणारे! पोरांच्या शिक्षणासाठी मी हातात झाडू घेतला तेव्हा घरच्यांना लई कमीपणा वाटला. सुरुवातीला वर्षभर डोक्यावर पदर घेऊन तोंडं झाकायची. जोडीदारीण माझा झाडू वागवायची. शेजारणी टोचून बोलायच्या. पण मी डगमगले नाय. एकदा रस्ता क्रॉस करताना पदर पडला. भावाने नेमकं बघितलं. घराबाहेर उभा राहून तणतणला. ‘‘भर रस्त्यात पदर पाडून बनीबावर (लाज सोडून) का पळत होतीस?’’ भाऊ ओरडला. भावजय अंगावर थुंकली. पण मी त्याच्यावर रागवले नाय. हाच भाऊ लहान असताना उसाची दोन कांड, दोन बोरं भेटली का लहान बहीण म्हणून माझ्यासाठी खिशात घालून घेऊन यायचा. ते मी कसं विसरू? माणूस वाईट नसतो. परिस्थिती वाईट असते. वडिलांचा चप्पल शिलाईचा धंदा! एक चप्पल शिवली का एक भाकरी मिळायची. ती आम्हा सहा जण मिळून खायचो. आई बांधावरची बरबडा, आंबाडी, कुंजीर, तांदुळसा अशा भाज्या हुडकायची, खुडायची आणि उकडून आमच्या पोटात घालायची. सोळाव्यात माझं लग्न केलं. मला सवतीवर दिलं. नवरा पस्तिशीचा! सासरी खूप त्रास झाला. खूप मारहाण झाली. शेवटी सवतीच्या आणि माझ्या पोरांना घेऊन घर सोडलं. सफाई काम सुरू केलं. स्वत:च्या पायावर उभी राहिले. पण घरीदारी बाईला पायाखालीच ठेचतात. आज शोभा, माधवी आणि मी मुकादम झालोय, तर हाताखालचे बिगारी मुद्दाम काम ठप्प करतात. चेंबरमध्ये दगडं टाकतात. रस्ते, ड्रेनेज साफ करत नाहीत. कचऱ्याचे कंटेनर रिकामे करत नाहीत. मग नागरिक तक्रारी करतात. मग आम्हालाच शिक्षा! बाई मुकादम झालेली सहनच होत नाही पुरुषाला काय करणार?
पण समाजाने कितीही ठोकारलं तरी आपण इमानदारीनं काम करायचं. कष्टाची लाज नाय बाळगायची. गेल्या साली बोनस हातात पडला तशी लकीच्या सरांकडे गेली. लक्ष्मीपूजनाचा दिवस! सरांच्या हातात पाच हजार ठेवले. म्हटलं, ‘‘सर लकीच्या सी.ए.च्या क्लासची फी मी उधार ठेवली होती. ती फी घेऊन आलेय!’’ ते म्हणाले, ‘‘अहो लकीच्या आई, मला फी कसली देता? या पैशातून तुमची दिवाळी साजरी करा!’’ माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना म्हटलं, ‘‘सर माणसानं दिलेला शब्द पाळायला हवा. इमानदारीने वागायला हवं. अहो, मुलं शिकली तर रोज सण यील जिंदगीत!’’ मी त्या दिवसाची वाट बघतेय.. ल्लमाधुरी

– माधुरी ताम्हणे
madhuri.m.tamhane@gmail.com