06 July 2020

News Flash

प्रामाणिक प्रयत्न असूनही..

मी घाईघाईत माझ्या वस्तीतल्या अंगणवाडीकडे चालले होते

ती अंगणवाडी सेविका. मुलांना थोडंफार शिकवावं, पौष्टिक अन्न खायला घालावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारी, परंतु त्या अंगणवाडीलाच भवितव्य नव्हतं मग तिला कसं असणार? अंगणवाडीच्या पलीकडे अनेक कामं करूनही निराशाच पदरी येणारं जीवन जगणाऱ्या अंगणवाडी सेविका सविताताईंचं आयुष्य त्यांच्याच शब्दांत..

सकाळी दहाची वेळ! मी घाईघाईत माझ्या वस्तीतल्या अंगणवाडीकडे चालले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नुसते घाणीचे ढीग! अस्सा राग आला! ‘जागोजागी कचराकुंडय़ा आहेत. तिथे कचरा टाकायचा की असा रस्त्यावर फेकायचा? कधी सुधारणार ही माणसं? किती समजवायचं? किती शिकवायचं?’ मनाशी बडबडत चालले होते तर पायाखाली कसली तरी पाकिटं आली. खाली वाकून उचलली आणि कपाळावर हात मारला. कालच टीएचआर (टेक होम रेशन) पाकिटं आली होती.
मी आणि माझी मदतनीस राजश्री हिने पाय मोडेस्तोवर वस्तीत फिरून ती वाटली होती. बालकल्याण विभागाकडून सुकडी, शिरा, उपमा असा कोरडा पौष्टिक आहार कुपोषित मुलांसाठी येतो. त्यात चांगली जीवनसत्त्व असतात. त्याने मुलांच्या तब्येती सुधारतात. पण वस्तीतल्या काही अडाणी बायका ही पाकिटं चक्क कचराकुंडीत टाकून देतात. मला अंदाज होता हे कोणाचं काम! सरळ शेवंताचं घर गाठलं. म्हटलं, ‘‘तुझ्या मुलांसाठी काल दिलेली ही पाकिटं कचऱ्यात का टाकलीस?’’ म्हणाली, ‘‘मी? नाय बा!’’ म्हटलं, ‘‘खरं सांग. नायतर उद्यापासून तुझ्या मुलाचं नाव लाभार्थी यादीतून काढून टाकेन!’’ ती घाबरली. म्हणाली, ‘‘बाय, ही पाकिटं शिजवत बसायला वेळ कुठे आहे? त्यापेक्षा गहू, तांदूळ द्या की आम्हाला. खिचडी शिजवून घालीन पोरांच्या पोटात.’’ तिच्या अडाणीपणावर काय बोलणार? शेजारची सुमन पुढे झाली. म्हणाली, ‘‘सविताताई माझ्या घरात चला की’’, म्हटलं, ‘‘अगं मला उशीर होतोय. अंगणवाडी उघडायचीय!’’ तिने ऐकलंच नाही. तिचं घर स्वच्छ, नीटनेटकं होतं. तिनं समोर हात केला. घरात एका कोपऱ्यात एका स्वच्छ बाटलीत गूळ, चणे, शेंगदाणे भरलेले होते. आमच्या अंगणवाडीत असा खाऊचा कोपरा असतो. ती पटकन म्हणाली, ‘‘तुम्ही सांगता ना म्हणून मी हा मुलांसाठी ‘बाळ कोपरा’ केलाय. आता मी मुलांना वडापाव, समोसा, गोळ्या, बिस्कीट नाही देत!’’ तिच्या पाठीवर थोपटलं आणि निघाले.
माझ्या अंगणवाडीत आले. बघते तर तिथलं दार उघडं! आतमध्ये कुणीतरी आपल्या घरातली भांडीकुंडी, कपडय़ांची बोचकी, गॅस सिलेंडर आणून तिथे ठेवलेलं. रामभाऊ मशेरी चोळत आत उभा होता. म्हटलं, ‘‘भाऊ हे सामान कोणाचं?’’ म्हटला, ‘‘माझंच हाय की! घराची डागडुजी करतो नव्हं! मंग सामान कुठं ठेऊ?’’ मी म्हटलं, ‘‘अरे पण आत्ता इथे मुलं येतील त्यांना कुठे बसवू? त्यांना डाळ खिचडी, गव्हाची लापशी द्यायचीय! ती कुठे देऊ?’’ त्याने खांदे उडवले. पचकन थुंकला आणि बाहेर पडला.
मी त्याचं सामान हटवून मुलांना बसायला जागा केली. त्यांच्यासाठी फळा-फुलांचे चार्ट करून आणले होते. ते भिंतीवर टांगले. मुलांना सुकडीची पाकिटं वाटता वाटता मुख्यसेविका आत आली. पंचवीस अंगणवाडय़ांवर तिची देखरेख चालते. त्यासाठी येत असते अशी अचानक व्हिजिट द्यायला. तिने खोलीभर नजर टाकली आणि अश्शी गरजली माझ्यावर! ‘‘अहो सविताबाई, तुम्ही हे सामान का ठेऊ दिलंत इथे? आणि त्या गॅस सिलेंडरजवळ पोरांना बसवलंत. मुलांना काही झालं म्हणजे? अशा कशा बेजबाबदारपणे वागता तुम्ही?’’ माझा एक शब्दही ऐकून न घेता मला ताडताड बोलली आणि व्हिजिट बुकवर शेरा मारून निघून गेली. आता हा सामान ठेवणाऱ्या रामभाऊची पोहोच दूपर्यंत. तो माझं ऐकणार होय? पण आम्हा अंगणवाडी सेविकांना काय कुणीही उठावं आणि टपली मारून जावं तशी गत!
आज दुपारी वस्तीतल्या गरोदर बायकाचं आम्ही डोहाळजेवण ठेवलंय. कालच मी आणि वैशाली वस्तीतल्या कार्यकर्त्यांकडे वर्गणी गोळा करायला झोळी घेऊन फिरलो. दुपारी वस्तीतल्या बायका समाज मंदिरात जमल्या. मी, वैशाली आणि शैलजानी मिळून फळं, आयर्नच्या गोळ्या आणि सुकडीच्या पाकिटांनी त्यांच्या ओटय़ा भरल्या. त्यांना बाळंतपणात स्तनपान कसं द्यावं, बाळाची काळजी कशी घ्यावी ते सगळं नीट समजावलं. सगळ्यांनी गाणी म्हटली. हसतखेळत कार्यक्रम पार पडला. आमचा कार्यक्रम संपला आणि ज्या मंडळाचं हे समाज मंदिर आहे त्याचे अध्यक्ष आले. म्हणाले, ‘‘उद्याच्या उद्या ही समाज मंदिरातली अंगणवाडी इथून हलवा. आमचा इथे आठवडाभर कार्यक्रम आहे. झालं गेल्या सहा महिन्यांत तिसऱ्या वेळा मला नवी जागा शोधायला लागतेय! तशीच निघाले. जगूकडे गेले. म्हटलं, ‘‘तुझ्या घरातली बाहेरची खोली देतोस अंगणवाडीसाठी?’’ तो चिडला, म्हणाला, ‘‘गेल्या साली खोली दिली. त्याचं ७५० रुपये भाडं तुम्ही लोकांनी अजून नाय दिलं.’’ म्हटलं, ‘‘अरे खात्याकडून पैसे नाय आले तर मी तरी काय करणार?’’ जगूनं हाकललंच. तिथून दहा ठिकाणी फिरले. पण कोणी जागा देईना. अशी घरात अंगणवाडी चालवायची म्हणजे नुसता वैताग. आत दारू पिऊन त्यांचे झगडे चाललेले. मुलं रडतायत. त्यातच मुलांना शिकवायचं. वर जसे काही आमच्यावर मेहरबानीच करतात. मला कळत नाही, अंगणवाडी सेविकेनं कामं तरी काय काय करायची? लसीकरण, पल्स पोलिओची कामं करायची, मुलांना शिकवायचं, पोषक आहाराचं वाटप करायचं. किशोरवयीन मुलींसाठी शिबिरं घ्यायची. गरोदर बायका, स्तन्यदा मातांसाठी मार्गदर्शन हे सगळं काम आरोग्यसेविकेला करावं लागतं. शिवाय आधारकार्ड, रेशनकार्डाची कामं करायची. सव्‍‌र्हेसाठी दारोदार फिरायचं. त्यातच एनजीओवाले वस्तीतल्या लोकांसाठी प्रोजेक्ट घेऊन येतात. ते शे-पाचशे रुपये टेकवतात हातात आणि त्यांच्या प्रोजेक्टसाठी आम्हालाच राबवतात. ठीक आहे. आम्ही एवढंच बघतो, वस्तीतल्या मुलांचा आणि आयाबायांचा फायदा होतो ना! झालं तर मग! अरे, पण कधी तरी आमचा, आमच्या कष्टाचा विचार कराल की नाही?
आता बघा, ९३ साली कामाला लागले तेव्हा अंगणवाडी सेविका म्हणून १७५ रुपये मानधन होतं माझं! नवऱ्यानं सोडलं होतं. पोरांना वाढवायचं होतं. अडलेली होते. वाटलं, सरकारी काम आहे. पुढे प्रगती होईल. पण कसलं काय? आज जेमतेम पाच हजार रुपये हातात पडतायत. त्यात कसं भागवायचं महिनाभर? ना सरकारी वेतन, ना निवृत्तीवेतन. २००५ पासून आमचा लढा चालू आहे. चार चार महिने पगारसुद्धा हातात पडत नाही. आमदार, नगरसेवकांना मानधन देतात. सरकारी नोकरांना भक्कम पगारवाढ देतात. आमच्या तोंडाला मात्र..? मोर्चा नेला की आश्वासनं मिळतात. त्यावर आमच्या बायका खूश. त्यात कधी आजारी पडलं आणि कामावर गैरहजर राहिलं तरी मुख्यसेविका आमचं पूर्ण मानधन बँकेत जमा करते आणि आम्हाला ऑफिसमध्ये बोलावून रजेचा पगार परत द्या म्हणून दम देते. आम्हाला नोकरी टिकवायची असते ना? मग देतो पैसे परत! सव्‍‌र्हेसाठी आम्ही फिरतो त्याचा टी.ए.सुद्धा कधीही आमच्या हातात पडत नाही.
एकदा काय झालं माझ्या अंगणवाडीत लसीकरण चालू होतं. आमच्यावर देखरेख करायला एक मुख्य सेविका आली होती. तेवढय़ात तिथं दोघंतिघं ठेस दारू पिऊन आले. ती इतकी घाबरली की आम्हालाही खोलीबाहेर जाऊ देईना. मनात म्हटलं, ‘‘आम्ही रोज अशाच वातावरणात, अशाच माणसांत काम करतो. आमच्या प्रोटेक्शनचं काय गं बाई?’ खरंच आम्हाला काहीच संरक्षण नाही. गेल्या हप्त्यात लाभार्थी मुलांसाठी मिसळपाव आला होता. आता तो सरकारी यादीतल्या लाभार्थी मुलांना वाटायचा हा नियम! पण माझ्या वस्तीतली काही दांडगट माणसं आली मोठमोठी भांडी घेऊन. मी त्यांना नाही देणार म्हणााले तर लागले शिव्या द्यायला. त्यात ज्यांना मिसळपाव नाही मिळाला ते येता-जाता शिव्या घालायला लागले. मला रडू फुटलं. मी आणि वैशालीने पावाचा एक तुकडासुद्धा खाल्ला नव्हता. काय बोलणार?
निवडणूक जवळ आली की राजकारणी मंडळी येतातच. आम्हाला या वस्तीतली मतं मिळवून द्या म्हणतात. आणि नंतर..! एकदा एका नगरसेवकाने कॅलेंडर वाटली मुलांसाठी. मी ते कॅलेंडर भिंतीवर टांगलं तर दुसऱ्या पक्षाचा पुढारी आला. म्हणाला, ‘‘त्याचं कॅलेंडर लावता काय? आता या तर खरं मदत मागायला, बघतोच मी!’’ एकदा एका नगरसेवकानं मुलांसाठी वजनकाटे दिले. झालं! दुसऱ्या एका पक्षाच्या पुढाऱ्याने ते पाहिलं आणि वैतागलाच. म्हणाला, ‘‘माझ्या कार्यालयात ही अंगणवाडी चालवता ना! आता व्हा चालते इथून.’’
आमच्याकडे वस्तीतली माणसं आधाराला येतात. आम्ही त्यांना मदत करतो. पण त्याचे परिणाम कधी कधी भयंकर होतात. बारामतीमध्ये एका सेविकेनं गावातले दारूचे गुत्ते बंद करण्यात पुढाकार घेतला. त्याची ‘खुन्नस’ ठेवून, ती झेंडावंदनाला निघाली असताना त्या गुत्तेवाल्यांनी रस्त्यात गाठून तिची साडी फेडली. तिला खूप मारलं. अत्याचार केले. काय काय सोसायचं आम्ही? गेल्या महिन्यात एका अंगणवाडी सेविकेला मुलीची शाळेची फी भरायची होती. पण तिला मानधन वेळेवर मिळालं नाही. त्या टेन्शनमध्ये ती रेल्वेखाली सापडून जागीच ठार झाली. तिची मुलं रस्त्यावर आली. आमच्या संघटनेच्या अध्यक्षांनी नितीन पवारसाहेबांनी आर्थिक मदत केली. आम्ही थोडा हातभार लावला. तेव्हा ते कुटुंब थोडं सावरलं.
पण हे असं कुठवर चालणार? अशा किती अंगणवाडी सेविकांचा बळी जाणार? कुणी देईल का माझ्या प्रश्नाला उत्तर?
madhuri.m.tamhane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2015 1:28 am

Web Title: chaturang article on anganwadi worker
टॅग Chaturang
Next Stories
1 ‘‘म्हावरं हीच आपली लक्ष्मी’’
2 मुलं शिकली तर सण यील जिंदगीत!
3 नशा विडी ओढणाऱ्याला, राख मात्र आमाला!
Just Now!
X