म्हावरं घिऊन रोज मालडब्यातु चडावं लागतंय. बायकांच्या डब्यात गेलो ते बायका ओरडतान, वास येतंय. मे बोलते, ‘‘अरे! हे म्हावरं तुमच्यासाठीच घिऊन चालली हाय ना?’’ मच्छीमारीचा पारंपरिक व्यवसाय करणारी गीताबाय कोळणीचं जीवन तिच्याच शब्दांत..
भोगले जे दु:खं त्याला

स कालचे तीन वाजले. वाटलं, अंथरुणातच पडून ऱ्हावं. उठूच नये. भाएर लय थंडी! घरान् नल नाय. हंडा, कलशी उचलली आनी पान्याला भार पडलु. आमच्या रस्त्याव लायटी नाय! सकालच्या कालोखान् चिखलांशी भरलेल्या रस्त्यांवरशी एकेका दगरावर पाय ठेवीत नलाचे मेरे गेलु. नशिब! नलाव कोनीच न्हवतं. नाय ते नलावर नुसता कज्जा असते! रस्त्याव थोडुसा उजेडातु कायतरी हलताना दिसलं. अगो बाय! कवरा मोठ्ठा साप! माजा पाय परला असता त? आयचं (एकवीरा देवी) नांव घेत घरतु आयलु. पानी भरून झयला हुता. रोटय़ा केल्या. आनी भाऊच्या धक्क्याला निंगालु.
स्टेशनावर आयलु त नुकताच चारची गाडी येत हुती. आमी धाबारा बायकांजु गाडी पकडीली आनी संडासरोडला उतरलो. टेंपोशी बंदराव गेलुते होडींशी म्हावऱ्याचे हेल खाली उतरवायची खलाशांची नुसती धांदल चालली हुती. मे सांभालूनशी रस्ता काढत चाललु होतु. मना बाय शिंगाडय़ाच्या काटय़ांची भारी भीती! जालीम विषारी कांटा! धक्क्याव कालचेच म्हावऱ्याचा आवरा वास येत हुता, डोकं नुसतं वासाशी भणभणत हुतं. कमरला फरकं बांधूनशी निंगाले.
सतरावं वर्षी माजं लगीन झायलं. न्हवरा, सासू म्हावरं पागायला जायचे. मी बी पयले आयचे संगाती म्हावऱ्यात जात होतु. आयच्या संगती जावशी जावशी आता ह्य़ा धंद्यान माजा पक्का जम बसलाय. माजा मोठा धावीत शिकते आनी धाकला पाचवीत! करनार काय? पोरांना शिकवावंच हाय! आनी घराचं पन चालवीलं पायजे. धंद्यातू पैसा पन हाय आनी मेहनत पन हाय आन् माजी करावची तयारी पन हाय.
धक्क्याव होऱ्या लागतात सकालधरनं. आता मना त्या टोकावं जायचाय. ह्य़ा बापयांचे धक्के त लागतातच. एकदा काय झायलं. नवीन नवीन हुतु. येकाचा धक्का लागला. मना वाटलं, मुद्दय़ाम मारला. मी उलटी फिरलु आन् दिली त्याच्या येक कानपटातूच! आनी बोललु ‘‘काय रे मेल्या, काय आयाभयनी हात का नाय तुला?’’ त येक डोकरी पुरं आयली आनी बोलली, ‘‘अगो बाय ह्य़ा गर्दीतु अशे धक्के लागावचेच! कोन काय मुद्याम मारी नाय. त्याला बोलावचं, भाऊ जरा नीट बगून चाल, त्याचा राग नय मानावचा.’’
तवच याला ‘भाऊचा धक्का’ बोलतान! तवशी मला याचं काय वाटेनाय. किसन्या दादाची होरी बघुनशी तयला गेलु. बघीतेते तयला सुरमय, कुपा, सरंगे, घोल, कोलंबी, रावस असं म्हावरं हुतं. बाजार जरा बरा हुता. लीलाव चालू झायला हुता. काय घेऊ मी? सरंग्याची कोरी बावीस नगाची असती. सरंग्याच्या येका कोरीचा भाव नऊशे चालला हुता. आनी खापरी सरंग्याचा भाव दोन-अडीच हजार हुता. सरंगे जानते नव्हते पन बरे हुते. बोली पाचशेची चालू झायली हुती. बोटं वरती करत करत सरंग्याचा लिलाव- नऊशेवर तुटला आनी खापरीचा बावीसशेला तुटला.
म्हावरं घेतलं आन् हेल माझ्या हमालाच्या डोक्यावं दिला. धा नंबरचा गाला माजा! गाल्यात हेल ठेईले. परत फिरलु. मना सुरमय आनी कुपे- बघावचे हुते. लिलाव चालुच हुता. तवाशी ते म्हावरं घेतलं आनी माजे धा नंबरचे गाल्याचे मेर येत हुती. ह्य़ा हमालांचा काय नेम नाय. एकादा हेल आवरशीच लंपास व्हयाचा. तवऱ्यानं येकीचा कोलंबीचा बोचका लंपास झायला हुता आनी हमालाचा आन् तिचा धिंगाणा चालला हुता. म्हावरं घेऊन धा नंबरच्या गाल्यात पोहोचले. बरफवाल्या भय्याला बोलीवला. बरफाचा भुक्का क्येला आनी प्रत्येक हेलातून म्हावऱ्याच्या बरुबर भरला आनी टेंपोच्या मेरे निंगालु. एक हेल आनी त्यावर बोचकं ठेऊनशी हमालाला दिलं आनी पन्नास-साठ किलोच्या एक हेल माज्या डोक्याव घेवुनशी टेंपोचे मेरे निंघालु. मात्र लक्ष सारकं सारकं मागचे हमालाचे मेर हुतं. कवापासून मुताव जायचं हुतं. आयें मोरीची पन सोय नाय. जायचं कवार? हेल त सोडूनशी जाऊ शकत नाय. जीव नुसता वैतागलेला! काय करनार? पोरांसाटी सर्व करावं लागते. काय झालयं तरी मला धक्क्याव यावच लागतं. नाय आयलुत नेहमीचं गिऱ्हाईक पन तुटते. करनार काय? मी साडी कमरंला खोचली आनी टेंपोतु चढलु. टेंपोत हेल भरताना लक्ष ठेवाव लागतं. चोऱ्या पन तशाच व्हत्यान. आमचे बायचे एक हेलच उडविला होता.
सकालशी पोटातु काहीच नाय, सकालचा चा घेतला हुता तवराच तो काय आधार! समोर वडापाव, भजीच्या गाडय़ा लागलेल्या हुत्या. हमालाला बोललु, ‘‘जारे बाबा. तुला आनी मला काय तरी घेऊनशी ये खायला. टेंपोतु आनखी चार जनी हुत्या. येशीला बोललु, काय गं खातीस काय? ती बोलली नकु मना. दुसरी बाय मशेरी चोलींत कोपऱ्यात बसली हुती.
परत मी बोरीबंदर स्टेशनाव आयलु. हमाल होतेच. माजे सगळे हेल ठाणा गाडीच्या मालडब्यात चढवीले. मालडबा दादरला भय्यांनी भरला. मला घुरत बोलले, ‘‘मावशे तुजा हेल थोडा हलव!’’ मी बोललु, तु जा तयला. आवरी जागा परली हाय. यांचा नुसता गोंगाट असतो सकालचा. अजिबात ऐकत नाय. काय करनार? म्हावरं घिऊन रोज मालडब्यातु चडाव लागतंय. बायकांच्या डब्यातु गेलो ते बायका ओरडतान, वास येतंय. मे बोलते ‘‘अरे! हे म्हावरं तुमच्यासाठीच घिऊन चालली हाय ना?’’
स्टेशनाव टोपल्या उतरविल्या बरुबर समोरच मास्तर हुता. त्याला लाल पास दाखीवला आनी वललु. मागे नेहमीचे हमाल हुतेच. जागेवर आयलु त अंगाला म्हावऱ्याचा वास मारीत हुता. घरा गेलु. आंग धुवूनशी विकावची जागेव आयलु.
घरच्या बाजूला शांतीच्या पोरीचे लग्नाचा बँड वाजत हुता. आज हळद हाय. कोलीवाडय़ात कवारशी न कवारशी गाण्यांचा आवाज येतच असते. कोनाचं लगीन कोनाची हलद त कोनाचं बारसं आसलं का जोरान गानी लागतातच. त्याच आवाजात माजा पोरगा दहावीचा अभ्यास करीत हुता. करील काय बिचारा? त्याला ह्य़ा धंद्यातु पडावचं नाय. पन मी बोलले त्याला, ‘‘सोन्या आपल्या बापजाद्यांनी म्हावऱ्याचाच धंदा क्येला. तू बी शिक्शन घे पन ह्य़ाचा तुच काय तरी कर! आरं म्हावरं लक्ष्मी आपली. तिला सोडू नगं!’’ ल्ल
madhuri.m.tamhane@gmail.com