चाळीस र्वष गेली विडय़ा वळण्यात! तेव्हा काय नाय झालं. पन आता हा खोकला पाठ सोडत नाय. स्वत:च्या खिशात दमडी नाय. मंग असंच मरायचं. विडय़ा ओढनारा नशेचा आनंद घेतो. विडय़ा वळनाऱ्या बायांच्या जिंदगीची मात्र तंबाखूची राख झालेय! विडय़ा वळण्यात आयुष्य सरलेल्या बिडी कामगार नागमणी कोटा हिची कहाणी..

घडय़ाळाचा काटा बाराकडं सरकला, तशी मी उठले. विडय़ांची बंडलं मोजली. थैलीत भरली आणि विडीच्या कारखान्यात निघाली. थैलीत सहाशे विडय़ा होत्या. पैसे काय जास्त भेटणार नाय आज. हजार विडय़ा झाल्या असत्या तर १२६ रुपये भेटले असते. जवानीत एका दिवसात दीड-दोन हजार विडय़ा वळायची. तवा रोज कमी होता म्हणा! पण आता रोज वाढलाय तर काम झेपना झालंय! चालता चालता वाटेत राधाबाई, जाना भेटली. संगतीनं कारखान्यात गेलो. तिथं धा बायांची आधीच लाईन होती. आम्ही लायनीत उभं राह्य़लो.
राधाबाईच्या हजार विडय़ांची बंडलं मोजून झाली. माझा नंबर आला. मुकादमाने एक विडी बंडलातून फर्रकन ओढली. खोलली. ‘काय नागमणी, तंबाखू इतकीच भरलीस विडीत?’ असं बोलत बोलत पन्नास विडय़ांचं ते बंडल दिलं कचऱ्यात टाकून! दुसरं बंडल उचललं. आणखी एक विडी काढली. ‘विडीचं पान फाटलंय, ओलं बी हाय’ असं बडबडत ते बंडलपण कचऱ्यात लोटलं. जीव कळवळला माझा. म्हटलं, ‘अवो माझी दोन तासाची मेहनत वाया गेली. एका विडीसाठी १०० विडय़ांची मजुरी बुडल ना माझी!’ तो मुकादम आला की अंगावर धावून, ‘ए ऽऽ म्हातारे, तुला परवडत नसल तर बंद कर काम! रग्गड तरण्या पोरी भेटतात ह्य़ा कामाला! त्येपण ११० रुपये मजुरीवर! चल निघ इथून! नाय देत आज तुला पानं बी आन् तंबाखू बी!’ मी हेलपाटले. ह्य़ाने माल नाय दिला तर आजची मजुरी बुडल! पोराचं शिलाई काम बंद पडलंय. मालक बी घरीच हाएत. कसं जमायचं? राधाबाई पुढं झाली. ‘असं करू नका हो. द्या तिला पानं आन् तंबाखू! दोऱ्याची आटी बी द्या तिला!’
मुकादमानं ६०० ग्राम विडीची टेंभुर्णीची पानं आणि २०० ग्राम तंबाखू दिला. आता एवढय़ा मालात काय हजार विडय़ा बसत नाय. तंबाखू विडीत कमी भरलेला बी चालत नाय. म्हणून पाव शेर तंबाखू आणि ३० रु पयांची पावशेर पानं पदरची घातली. २० रुपये देऊन कात्रीला धार लावली. बाजूवाल्या म्हातारीच्या चरख्यावर दोऱ्याची आटी आन् भिंगरी दिली. तीन रुपये घेऊन तिने रिळाची भिंगरी हातात दिली. ती घेतली. आजचा रोज साफ बुडाला. कालधरनं पाठीला रग लागंस्तोवर तेरा तास काम केलं होतं, ते पण पाण्यात गेलं. नशीब आपलं. दुसरं काय?
घरी आल्याबरुबर बादलीत पाणी घिऊन त्यांत पानं भिजत घातली. आता जेवण बनवून खाईस्तवर दोन तासांत ती भिजतील. डाळ, भात, भाजी केली. मालकाला, पोराला वाढलं. उरलंसुरलं माज्या ताटात वाढलं. जेवले. हात धुतले आन् तशीच विडय़ा वळाया बसले. दोन तासांत पानं झाक ओली झाली होती. कातरीला धार बी चांगली होती. दोन तासांत हजार पानं कापून झाली. आता पाठीला रग लागली. मिश्रीची लय तलफ आली. तशी उठली. तंबाखूची मिश्री भाजली तशी जीव जातोय का ऱ्हातोय अशी खोकल्याची उबळ आली. पानी प्यालं तरी धाप लागलेली थांबंना. खोकला ऱ्हाईना. दिवस सराया आला तरी एक विडी वळून झाली नव्हती. खोकत खोकत सूप पुढं ओढलं. त्यांत तंबाखू वतली. भराभरा हात चालाया लागला तसा खोकला हळूहळू थांबला.

हे तर आता रोजचं झालया. चाळीस र्वष गेली विडय़ा वळण्यात! तेव्हा काय नाय झालं. पन आता हा खोकला पाठ सोडत नाय. मजुरीतून युनियन फंड, बोनस कापते. त्यातून सरकारी दवाखान्यात फुकट दवा मिळतो. गेल्या साली चष्मा केला त्याचे साडेतीनशे मिळाले. दर हफ्त्याला सरकारी दवाखान्यातला दवा मिळतो. तो खोकल्यासाठी घेते. आता डॉक्टर म्हनतात, नागमणी, तपासणी करू. एक्स रे काढू. अरे पण प्रायव्हेटमध्ये तपासणी केली, भरती झालं तर पैसा नाय मिळत. स्वत:च्या खिशात दमडी नाय. मंग असंच मरायचं. सासू मेली तसंच! विडय़ा वळून वळून म्हातारीचं डोस्कं पार जमिनीला टेकलं होतं. कमरेतनं वाकून धनुकली झाली होती. अखेरला पिशवीचा कर्करोग झाला अन् म्हातारी दवापान्याबिगर गेल्या साली गुजारली. आमच्या नशिबात पन तेच!
मिश्री लावल्यावर तरतरी आली. हात फटाफट चालायला लागले. दारात सावली दिसली. भाऊ आला होता. मायला बरं नाय. घरी चल म्हनला. डबे उचकटले. साखर हुती पण चायपत्ती संपलेली. त्याला चा करून बी दिला नाय. तशीच उठली. लुगडं झटकलं. पानं, तंबाखू थैलीत भरलं आन् भावसंगं हडपसरला आईकडं गेली. आई तेव्हा गंजपेठेत राहायची. ती दिवसाला दीड हजार विडय़ा वळायची. मला सातवीपर्यंत शिकवलं. मंग शिक्शन परवडंना तसं घरी बसवलं. शाळंत होती तवाधरनं आईसंग पानं कापायला, दोरा बांधायला शिकले. घरी बसल्यावर रोज दोघी मिळून दोन हजार विडय़ा करायचो. एक हजाराला पन्नास रुपये भेटायचे. बापाची कमाई नव्हती. भाऊ लहान. आईने पैसे साठवून लग्नाचा घाट घातला. आमच्या पद्मसाळी तेलगू समाजातलं स्थळ आलं माझ्यासाठी. मुलगा विडीच्या कारखान्यात कामाला. शिक्षण पाचवी पास. त्याच्या बापानं विचारलं, ‘पोरगी विडय़ा किती वळती?’ आई म्हणाली, ‘हजाराच्या वर!’ ‘मंग मुलगी पास!’ असं लगीन ठरलं. झालं. थोडय़ा दिवसात कळलं, नवरा ताडी पितो. तो ताडी पिऊन लय मारायचा. संशय घ्यायचा. आईने सोलापूरहून पुन्यात आणलं. विडी वळायच्या कामाला लावलं. हे काम बरं! घरांत बसून स्वयंपाकपाणी, घरकाम करताना करता येतं. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून येकदा कॅनालवर जीव द्यायलाबी गेली होती. पन आता तो सुधारला. बरा वागतो.

आईशी सुखदुखाच्या गोष्टी करता करता पाचशे विडय़ा वळून झाल्या. त्या घेऊन घरांत शिरले तर संगीताच्या घरातून राडय़ाचा आवाज आला. धावत जाऊन बघितलं तर तिला तिची दोन्ही पोरं केसाला धरून मारत होती. पैसं मागत होती. पैसं दिलं नाय म्हणून येका पोरानं वरण मोरीत ओतलं. दुसऱ्या पोरानं आरसा फोडून काचा कोबीच्या भाजीत घातल्या. संगीताला पोरांच्या तडाख्यातनं सोडविलं. घरात आणलं. जेऊ घातलं. दोघीबी रडत रातच्या बारा वाजेस्तोवर विडय़ा वळत बसलो. संगीताची दोघी जुळी पोरं आऊट लायनीला गेलेत. आमच्या वस्तीतल्या व्हिडीओ पार्लरमधी जाऊन गेम खेळतात. संगीता विडय़ा लपवून ठेवते. नाय तर दोघं त्या विडय़ा भकाभका पित्याती. संगीताला म्हनलं, ‘‘पोरांना नेऊन टाक आश्रमशाळंत. नगं ठिऊ तुझ्याजवळ. नवरा दारूच्या नशेत विहिरीत पडून मेला. तुझंबी तेच होईल. ऐक माझं.’’
संगीता ऐकत नाय. पोरांना दूर लोटत नाय. आमच्या समाजात घराघरात अशा संगीता हायेत. दिवसभर घरकाम, धुणं-भांडी, स्वयंपाकपाणी करायचं. कुटं कुणाकडं जाणं नाय -येणं नाय. निवांत बसणं नाय. टी.व्ही बघता बघता हातानं विडय़ा वळणं चालू. कुठं लग्नाला, बारशाला ग्येलं तरी थैलीत पान-तंबाखू संगं न्यायची आन् तिथंबी विडय़ा वळत बसायचं. आईला घशाचा कॅन्सर झालाय. माझाबी खोकून खोकून पार खुळखुळा झालाय. पाठ, कंबर, हात मोडून गेलेत. पन मरस्तवर विडय़ा वळायच्याच.
विडय़ा ओढनारा नशेचा आनंद घेतो. विडय़ा वळनाऱ्या बायांच्या जिंदगीची मात्र तंबाखूची राख झालेय! ल्ल
माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com