‘‘समदं सामसूम झालं तसा झाडू उचलला. रोडवर सांडलेलं धान्य गोळा क्येलं. उद्या त्याला चाळण मारन, धुवीन आन् त्ये मातेर दळून आणेन तवा कुटं पोरांच्या पोटात भाकर घालन. आयुष्याचं मातेर झालया, पन त्येच मातेर जीव जगवतंय.’’ धान्य बाजारात सांडलेलं धान्य गोळा करता करता आयुष्य गोळा करणारी मातेरवाली सिद्धमा कांबळे हिचं आयुष्य तिच्याच शब्दांत..

 

स काळ झाली तसं पोरं उठायच्या आंत समदे डबे हुसाकले पन काय बी गावंना. तशी कप घिऊन भाएर पडले. नाक्यावरल्या दुकानांतून पाव-बटर घेतला. शेजारणीकडून गाईचं दूध कपात घेतलं. नवऱ्याची रातची दारू उतरली नव्हती. त्याला तसंच झोपू दिलं आन् पोरांना उठीवलं. घोटभर दुधाचा चा क्येला आन् पोरांना चा-बटर खाऊ घालूनशान शाळत पाटविलं. धाकल्याला आंगणवाडीत धाडलं. मी मोरीत अंगावर दोन तांबे घातलं आन् लुगडं पोटाला घट्ट आवळून कामासाठी भाएर पडले.

चिंतामणी दुकानात पोचले तवा कोंडय़ा दुकानाचा टाळा खोलत व्हता. आंत शिरल्या बरुबर मटक्यात राह्य़लेलं कालच शीळं पानी भांडय़ात वतून घटाघटा प्यायली. त्या ठंडगार पान्यानं पोट भरलं तसा जीव थाऱ्यावर आला. काल रातधरनं पोटांत अन्नाचा कण न्हवता. हिथल्या कोठारांत धान्य भरल्येलं हाय पन आमाला त्याचा काय उपेग? कोपऱ्यातला झाडू उचालला आन् दुकान झाडाया लागले. लादी पुसली. मटक्यात ताजं पानी भरलं. संडास-बाथरुम धुतलं तेवढय़ांत शेठ दुकानांत आलं. त्यांनी पूजापाठ क्येला. अगरबत्ती लावली आन् मी शेठचा च्या सांगाया भाएर पडली.

शेठ आन् मुनिमजी चा प्यायला बसले आन् मी कट्टा चाळाया घेतला. येकडाव वाटलं, शेठनी घोटभर च्या दिला तर? तेवढय़ात दुकाना म्होर गाडी लागली. हमाल भराभरा माल उतराया लागले. धान्याचे बोरे लावाया लागले. तसा बोऱ्यातनं धान्य सांडाया लागलं. हमाल लागले वरडाया, ‘अवोबाई मातेर गोळा करा की! काय बसल्यात? धान्य टोचतं न्हव पायाला! आवरा पटापटा!’ कट्टा चाळाया घेतल्येला त्ये काम बाजूला सारलं आन् झाडू उचालली. सांडलेलं धान्य गोळा क्येलं. ज्या कट्टय़ातून सांडलं व्हतं त्या कट्टय़ात बैजवार भरलं. तेवडय़ात थोडं धान्य खाली सांडलं तसा म्हादू हमाल वरडाया लागला, ‘सिद्धमा, तुला धान्य कट्टय़ात भरता बी येईना व्हय? गोणी खांद्यावर व्हाऊन आनताना खंड आन् धान्य पायाला कसं टोचतं तुला कळना व्हय?’ मी गप ऱ्हायली. शेठची मान्स हमालावर वराडतात आन् त्ये आमच्यावर वराडतात? परत कट्टे चाळाया बसली. बोऱ्यातनं धान्य काढलं. मोठय़ाल्या चाळणीत घ्येतलं आन् लागली चाळाया! कट्टा व्हता पन्नास किलोचा! त्यो अर्धा बी चाळून झाला न्हाय तवर शेठकडं बाजारातले दुकानदार आले. किरकोळ विक्रीच्या दुकानदाराम्होरं शेठच्या नोकरानं धान्याचे ढीग टेबलावर मांडले. सुरती कोलम, वाडा तांदूळ, लोकवन, गहू, मका.. त्येंचा वेव्हार फिसकटला. त्ये उठून ग्येले. तशी मी त्यांना दाखविलेला माल पुन्ना त्या त्या कट्टय़ात भरायाला लागली. ह्य़े काम करताना लय बगावं लागतं. न्हायतर तांदळाच्या कट्टय़ात गहू आन् गव्हाच्या कट्टय़ात मका जायचा.. तसं झालं तर शेठ हाकूनच दिल कामावरनं.. चाची लय तल्लफ आलीया. जुलेखा आन् सुमनबाय चालली च्या घ्यायला.. माज्याकडं पैका न्हाय च्या प्यायलाभी. त्यांच्या संग गेली तर त्या देतील घोट घोट त्यांच्यातला.. शेठला सांगून निघाली. घोटभर च्या पिऊन आली तर मुनिम लागला वरडायला! माल बगाया गिऱ्हाईक आल्यात. जा पयला च्या सांग त्यांच्यासाठी! मी च्या सांगून आल्ये तवर नोकरांनी धा कट्टय़ातलं धान्याचं सॅम्पल त्यांना दाखविलं व्हतं. त्ये शेठला आर्डर दिऊन ग्येले आन् मी टेबलावरचा माल कट्टय़ात भरू लागली. टेबल साफ क्येलं. जमिनीवर सांडलेलं धान्य परत बोऱ्यांत भरलं आन् कट्टा चाळाया बसले. बिगारी पोती आणून टाकत व्हते. तेवढय़ात एक कट्टा उसवला. समदी ज्वारी दुकानभर पसरली. शेठ अंगावर धावून आला. आता माजी काय चुकी? पन त्याची नुकसानी झाली त्याचा राग माज्यावर! मी कट्टा शिवला. ज्वारी गोळा क्येली. पुन्हा पोत्यांत भरली. तवर जेवणाची सुट्टी लागली. आज घरांत कायसुदीक न्हवतं. भाजी-भाकरी कुठनं खानार? वडापाव खायला बी पैस न्हाय. पानी प्यायलं आन् गुमान बसून ऱ्हायले.

ह्य़े आजचं थोडंच हाय! लहान व्हती. शेतावर काम करायची. तवा बी चटणी हाय तर भाकरी न्हाय आन् भाकरी हाय तर चटणी नाय अशी गत! शेवटाला बापानं लगीन लावून दिलं. मला मावळणीकडं दिलं. नवरा वयानं मोठा! त्यो घरच्यांना म्हनला, माज्या संग शहरात धाडा तिला. घरचे म्हनले, लेकरू ल्हान हाय. जरा दम धरा. कसचं काय? त्यो ऐकना. शहरात घिऊन आला. पुन्यात येका तबेल्यात सहा रुपयं भाडय़ाचं घर घेतलं. त्यो आन् देर हातगाडी वढायचे.मी डबाबाटलीचं काम कराया लागले. त्यांत भागना म्हून हिरीवर काम सुरू क्येलं. लय कष्टाचं काम! सांजच्याला मजुरी हातांत पडली कां न्हवरा समोर हुबा ऱ्हायचा. दारू, गांज्यासाठी समदी मजुरी घिऊन जायचा. मग मार्केटमंदी आली. सव्वा रुपया रोजावर कामाला लागली.

दिवस ऱ्हायले तरी बी काम करतच व्हते. संक्रांतीचा दिवस व्हता. पोटात दुकायला लागलं. पन कोनी बी मला बसू दिना. वर चढ, मातेर लोट, धान्य चाळ, दुकान साफ कर.. दिवसभर चालू व्हतं. शेवटाला राती सरकारी दवाखान्यात भरती झाले. इतकं काम करूनबी तीन दिस अडाकली व्हते. अशी तीन पोरं झाली..

पोरांचा आठव आला आन् जीव कसनुसा झाला. परवाच्या दिवशी संशय घिऊन नवऱ्यानं लय भांडण क्येलं. दारू चढलेली. म्हनला भाएर पडलीस तर तंगडं मोडीन. आता आपलं पोट हातावर? पैका कमवून आनला नाय तर काय ईख खावा म्हणते मी? मंग मी बी उपाशी झोपली. आन् पोरांना एकावर ऐक पालथं झोपिवलं. भुकेनं रातभर रडरड रडली पोरं आन् गेली झोपून!

पोरांच्या इचारात बसले व्हते दुकानाच्या पायरीवर. समदी गडीमानसं भाजी-भाकरी खात व्हते. माज्याबी पोटांत भुकेचा डोंब पेटलेला! तेवडय़ात न्हवरा साळतनं पोरांना घिऊनशान सायकलवरनं वाट वाकडी करून चाललेला दिसला. बघत बघत ग्येला! हाय बाबा बाईल कामावर! अश्शी रोज नजर ठिवतो. तीन पोरांचं पोट भरायचं म्हून घरकाम धरलं. शेठ-शेठाणी लय चांगली! पन येकडाव मला सोडाया कामावर न्हवरा आला आन् दुसऱ्या दिवशी घरी बशिवलं. म्हनला, ‘‘त्यो शेठ दार उघडाया आला तवा बघितला, अध्र्या चड्डीवर हुता त्यो. घरांत घिऊन त्यानं काय बाय क्येल तर? त्यापरीस मातेर गोळा कराया जा! रस्त्यावर चार मानसात उघडय़ावर काम कर!

मी उठली. जेवणाची सुट्टी संपली व्हती. दुकानातलं मातेर गोळा कराया लागली. शेठच्या डब्यातल्या जेवनाचा वास सुटलेला! भूक खवाळली. बोऱ्यातनं सांडलेलं शेंगदाणं झाडूनं गोळा करत व्हती. त्यांतलं चार दाणं तोंडात टाकलं आन् मुनिमजीनी बकोट धरलं. दुकानात कॅमेरे लावलेत. कोपऱ्यातलं दाणं तोंडात टाकलं तरी दिसतं न्हव! त्यानं शेठसमोर उब क्येलं. त्यो लय वराडला, ‘चोरी कराया येतीस व्हय हिथं? चालू पड. उद्यापासून येऊ  नग.’ मी शेठचे पाय धरले. लय रडले. आम्ही मोकळ्या हातानं यायचं. मोकळ्या हातानं जायचं! उचल घेतल्याली. त्यामुळे दिसभर काम करुनबी हातात काय मिळणार व्हतं? सांजच्याला घरी निघालो. तेवढय़ात ट्रक आला. आता हमाल माल भराया लागले. मुनिम म्हनला, कुठं निघालीस? बस तिकडं कोपऱ्यात. मी कोपऱ्यात जाऊन बसले. तेवढय़ात ट्रकच्या वरचा कट्टा फुटला. मुनिम म्हनला, चढ वर! माज्या पायात गोळं आलंतं. पोटांत अन्न नाय. दिवसभर अंगावर जातंय. दिवसभरात लघवीलाबी जाता आलं न्हाय! चक्कर येतीया. तशीच फळीवरनं गाडीवर चढले. कट्टा शिवला. धान्य गोळा क्येलं.

रात झाली. ट्रक लोड झाला. सुटला. दुकानाचं शटर बंद झालं. मी रस्त्याकडला बसून ऱ्हायले. दिवसभरांत ईळभरबी बसाया भेटत न्हाय. शेठलोक, हमाल धा वेळा मुतायला जात्यात. आमी ग्येलो का म्हनत्यात, संडास धुवून टाका. साधं च्या प्यायला गेलं तर म्हनतात, कुठं गेला व्हता? किती येळ फिरता? कामाची गरज न्हाय तर बसा घरी! परवा भावाच्या मयताला गेले दोन दिवस तर एका बायला पंचवीस रुपयं जास्त मजुरी देऊन कामावर ठिवली.

आता बी समदं सामसूम झालंय तसा झाडू उचलला. आन् रोडवर सांडलेलं धान्य कडंला गोळा क्येलं. उद्या त्याला चाळण मारीनं. धुवीन आन् त्ये मातेर दळून आणेन. तवा पोरांच्या पोटात भाकर घालन. आयुष्याचं मातेरं झालय खरं पन त्येच तर आमचा जीव जगवतया!

madhuri.m.tamhane@gmail.com