कालचा बांगलादेशविरुद्धचा सामना झाल्यावर अनेक हिंदी सिनेमात नेहमी दिसतो तो प्रसंग आठवला. नायक आणि खलनायक यांची खोल दरीच्या टोकावर मारामारी चालू असते. क्लायमॅक्सला नायकाचा हात टोकाच्या दगडावरून सुटतो. तो एका बोटाने कसाबसा दगड धरून ठेवतो. आणि कहर म्हणजे त्या नायकाच्या पायाला धरून नायिका दरीत लटकत असते. अशी जबरदस्त उत्कंठा ताणली जाते. कुठल्यातरी कारणाने खलनायकाचे लक्ष विचलित होते. नायक ती संधी साधून डाव उलटवतो. नायक आणि नायिका वर येतात आणि खलनायक दरीत पडतो. प्रेक्षकांचा रोखलेला श्वास सुटतो. हृदयगती पूर्ववत होते.
संघनायक धोनी असाच कालच्या सामन्यात एका बोटावर लटकला होता. ऐनवेळेस बांगलादेशने हाराकिरी केली आणि धोनी संघाला घेऊन सुखरूप दरीतून वर आला. (खेळात कोणीही खलनायक नसतो. त्यामुळे बांगलादेश हा प्रतिस्पर्धी म्हणूया खलनायक नव्हे)
या स्पर्धेतील भारताचा हा तिसरा सामना होता. हे तिन्ही सामने झाल्यानंतर ज्याचा भारतीय संघाविषयीचा विश्वास वाढला असेल त्याला ऑल द बेस्ट देतो. खेळपट्टी प्रमाणे संघाची निवड होत नाही, पहिल्या सहा फलंदाजापैकी एखादाच धावा करतो, आठपैकी सहा फलंदाजाना स्पीन खेळताना त्रास होतो. (आणि ते पाहताना आपल्याला यातना होतात) त्याबरोबर लपवलेल्या फिल्डर्सकडेच झेल गेले म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र!
पहिल्या तीन चार फलंदाजानी मॅच सेट करायची असते. तेव्हा ती फिनिशरला संपवता येते. पहिले फलंदाज गेम सेट करायचं काम पण फिनिशर वर सोडत असतील आणि त्या फिनिशरला मोठी धावसंख्या पार करायची असेल तर खूप अवघड जाते. (म्हणूनच ३३ शतके आणि ५० पेक्षा अधिक अर्धशतके करुन जवळ जवळ ९० सामन्यात गेम सेट करुन विजयाचा पाया रचणारा सचिन कोणत्याही फिनिशर इतकाच महान ठरतो)
रोहित आणि धवन क्लिक होण्याकरता अजून किती सामने घेणार आहेत? युवराजला सेट व्हायला वेळ देणे म्हणजे किती चेंडूंची आहुती द्यायची? टी-२० मध्ये दोन चेंडूला धाव नाही मिळाली की तणाव वाढतोच. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यात गवताचे एक पाते खेळपट्टीवर नसताना तिसऱ्या जलदगती गोलंदाजाचा हट्ट कशासाठी?
(हरभजन सिंगने धनुर्वाताचे इंजेक्शन जरूर घ्यावे)
कालच्या सामन्यात अश्विनची गोलंदाजी बरोबर धोनीचे चपळ यष्टिरक्षण, चाणाक्षपणा, साधूसारखी बाह्य उन्मन शांतता आणि ज्याचा सातबारा त्याच्या नावावर आहे ते नशीब ह्यांच्या जोरावर आपला संघ कसाबसा तरला.
बांगलादेशला हा पराभव पचवणे तितकेच अवघड जाणार आहे जितकी आपल्याला मियादादची चेतन शर्माला मारलेली सिक्सर अवघड गेली. बांगलादेशची हाराकिरी बघून
इयन चॅपलचे प्रसिद्ध तत्त्व आठवले. तो म्हणतो ‘हरण्याच्या भीतीपेक्षा जिंकण्याच्या उत्कंठेवर मात करणे अवघड असते’ बांगलादेशला जिंकण्याच्या शक्यतांमुळे हर्षवायु झाला आणि त्या उन्मादात कर्माकडे दुर्लक्ष झाले.
जिंकण्याचे डोहाळे
लाविती डोक्यासी टाळे.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com