भाजपकडे तितकाही शहाणपणा नाही. हल्ली सर्वत्र परिस्थितीचे गांभीर्य नसलेल्या आणि सत्ताचरणी लोटांगणास सदैव तत्पर असलेल्यांच्याच हाती सत्तासूत्रे देण्याची प्रथा असल्याने कोणीही काहीही केले नाही. यामुळेच निराश होत अखेर रोहित याने आत्महत्येचा आततायी मार्ग पत्करला आणि तो हकनाक आपला जीव गमावून बसला.
रोहित वेमुला या तरुणाने आत्महत्या केल्याने सध्या भारतीय समाजकारण आणि राजकारण ढवळून निघालेले आहे. रोहित हा नुसताच तरुण नव्हता. तो दलित तरुण होता. हा फरक अशासाठी नमूद करावयाचा की नवश्रीमंत आणि उच्चभ्रू अशा नव्या साडेतीन टक्क्यांतले तरुण सोडले तर अन्य तरुण आणि दलित तरुण यांना भेडसावणाऱ्या समस्या सारख्याच असतात. पण तरीही दलित तरुणांसाठी त्या अधिक दाहक असतात. अन्यांना त्यांच्या ओळखीसाठी झटावे लागत नाही. त्यांचा संघर्ष त्यातल्या त्यात बऱ्या अवस्थेतून सुखवस्तूपणाकडे कसे जाता येईल, यासाठी असतो. परंतु दलित तरुणांची लढाई ही मुळात अस्तित्व ओळखीसाठी असते. आपल्यासारख्या समाजात तीच मान्य केली जात नसल्यामुळे पुढील संघर्ष अर्थहीनच असतो. कारण एखाद्याचे अस्तित्वच अमान्य केले की त्याला त्याचे न्याय्य स्थान देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रोहित विचार करणारा असल्यामुळे त्याला ही स्थिती छळत होती आणि तीमधून बाहेर कसे पडता येईल यासाठी त्याचा संघर्ष सुरू होता. या संघर्षांतील पहिली पायरी वास्तविक त्याने जिंकली होती. ती होती त्याची बौद्धिक क्षमता प्रस्थापित व्यवस्थेने मान्य करण्याची. ते झाले होते आणि रोहित यास शिक्षणासाठी शिष्यवृत्तीदेखील मिळालेली होती. त्याच्या संघर्षांचा आता पुढील टप्पा सुरू झाला होता. तो होता त्याच्या व्यवस्थेविरोधातील भूमिकेचा आदर व्यवस्थेने करावा यासाठी.

त्यात अनेक अडथळे होते. सर्वप्रथम रोहित याचे विद्यापीठ. आंध्र प्रदेश आणि त्याच्या पोटातून तयार झालेले तेलंगण हे प्रांत सरंजामी वृत्तीसाठी ओळखले जातात. ही वृत्ती सर्वक्षेत्री आणि सर्वपक्षीय आहे. आंध्रच्या राजकारणावर एक दृष्टिक्षेप टाकल्यास याची अनेक उदाहरणे सापडतील. परिणामी या सरंजामी वृत्तीच्या विरोधात सजग तरुण विद्यार्थी वयात भावना भडकावण्याचे काम त्या राज्यात तितक्याच समर्थपणे सुरू आहे. ब्राह्मण आणि नाझी या एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत असा ‘सिद्धान्त’(?) मांडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत अमाप लोकप्रिय असलेले प्रा. कांचा इलय्या हे हैदराबादचेच हा काही योगायोग नाही. गांधी आणि आंबेडकर यांच्यातील मतभेदांस कमालीच्या जातीय रंगात रंगवणारे, ब्राह्मण हे परोपजीवी असतात आणि हिंदूंचे नामोनिशाण पुसून टाकण्यासाठी दलितांना शस्त्रे हाती घेण्याखेरीज पर्याय नाही, अशी भडक भाषा करणारे प्रा. इलय्या दलित विद्यार्थ्यांत कमालीचे लोकप्रिय आहेत. तेव्हा अशा वातावरणात जातीय वणवे भडकणे टाळण्यासाठी कमालीची संवेदनशीलता असावयास हवी. विद्यार्थ्यांकडून आणि त्यातही आपण बळी आहोत ही भावना अंगी बाळगणाऱ्या दलित विद्यार्थ्यांकडून अशा संवेदनशीलतेची अपेक्षा करता येणार नाही. ती विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडेच असावयास हवी. ती नव्हती. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या तालावर नाचण्यास उतावीळ असणाऱ्या विद्यापीठ पदाधिकाऱ्यांनी भाजपचा लिंबूटिंबू संघ असलेल्या अभाविपच्या तालावर नाचणे पसंत केले. महाविद्यालयीन पातळीवर वावरणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या संघटनांत एक प्रकारचा वावदूकपणा असतो. मग ती डाव्यांची एसएफआय असो वा काँग्रेसची एनएसयूआय वा भाजपची अभाविप. आपल्या नेत्यांच्या राजकारणाचे आंधळे अनुकरण करणे हेच या विद्यार्थी संघटनांचे काम. त्यामुळे रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी याकूब मेमन याच्या फाशीविरोधात घेतलेली भूमिका भाजपच्या या वासरांना पटली नाही. वास्तविक अशी भूमिका घेणारे रोहित आणि सहकारी काही एकटेच नव्हते. प्रस्तुत वर्तमानपत्रासह अनेक विचारी जनांनी याकूब मेमन यास फासावर लटकावण्यामागील भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. अशा प्रश्नांना भिडण्यासाठी लागणारे वैचारिक स्थर्य आपल्या समाजात अभावानेच असल्याने याकूब मेमन याच्या फाशीस विरोध म्हणजे राष्ट्रविरोध अशी सरसकट निर्बुद्ध भूमिका अनेकांनी घेतली. तरुण वय हे अशा निर्बुद्धतेस अधिक आक्रमक बनवते. हैदराबाद विद्यापीठात हेच दिसले आणि रोहित आणि त्याचे सहकारी विरुद्ध अभाविप असा संघर्ष झाला. अशा संघर्षांसाठी अभाविपस सध्या अधिक जोम आहे. कारण त्यांच्या ज्येष्ठांचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे अभाविपने रोहित आणि साथीदारांविरोधात विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली आणि कोणीही सत्ताधीश असो त्याची तळी उचलण्यात धन्यता मानणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाने तिची दखल घेत रोहित आणि पाच जणांना विद्यापीठ प्रवेशबंदी केली. त्यामुळे रोहित आणि साथीदारांची शब्दश: उपासमार होऊ लागली. त्यांनी विद्यापीठाबाहेर ऐन थंडीत ठाण मांडले. परंतु कोणालाही त्यांची कणव आली नाही. वास्तविक दोन्ही बाजूंनी अशा टोकाच्या भूमिका घेतल्या जात असताना विद्यापीठ प्रशासनाने पोक्तपणा दाखवीत प्रश्न चिघळणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक होते. परंतु हल्ली सर्वत्र परिस्थितीचे गांभीर्य नसलेल्या आणि सत्ताचरणी लोटांगणास सदैव तत्पर असलेल्यांच्याच हाती सत्तासूत्रे देण्याची प्रथा असल्याने कोणीही काहीही केले नाही. यामुळेच निराश होत अखेर रोहित याने आत्महत्येचा आततायी मार्ग पत्करला आणि तो हकनाक आपला जीव गमावून बसला.

या आत्महत्येस हकनाक अशासाठी म्हणायचे कारण अशा प्रकारच्या कडेलोटी कृत्यातून काहीही साध्य होत नाही. उलट अशा कृत्यांमुळे तात्पुरती एक चघळगोळी तेवढी मिळते. रोहितच्या मरणाचे तेच झाले आहे. त्याच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर सीताराम येचुरी ते ममता बॅनर्जी ते रामदास आठवले व्हाया अनेक काँग्रेसजनांनी अशा गतीने हैदराबादेस धाव घेतली की हे सर्व जणू अशा काही घटनेच्या प्रतीक्षेतच होते. असे प्रसंग म्हणजे डावीकडील अतिडावे, समाजवादी, काँग्रेसी अशा सर्वाना आपले पुरोगामित्व मिरवण्याची सुवर्णसंधी. येथेही तेच झाले. परंतु याबाबत पुरोगाम्यांची अडचण अशी की खुद्द रोहित यानेच डाव्यांना जातीयवादी ठरवत एसएफआय संघटनेचा त्याग केला होता. रोहित मूळचा कम्युनिस्ट. परंतु मार्क्‍सचा वारसा सांगणारे या पक्षातील ढुढ्ढाचार्य एकजात ब्राह्मण. त्या पक्षाच्या सर्वोच्च निर्णय व्यवस्थेत.. म्हणजे पॉलिटब्युरोत.. एकही दलित नाही. याची जाणीव झाल्यावर डाव्यांचा पुरोगामीपणा रोहित यास दांभिक वाटला आणि ही संघटना सोडून तो आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेत दाखल झाला. हा भ्रमनिरास त्याच्यातील नवथरपणा दाखवतो. रोहित महाराष्ट्रात असता तर पुरोगामित्वाचे डिंडिम जोरजोरात बडवणाऱ्या समाजवाद्यांच्या साधना साप्ताहिकाचे बहुतेक सर्व संपादक ब्राह्मण कसे आणि या संपादकपदास लायक एकही दलित का नाही, असा प्रश्न त्यास पडला असता. रोहितच्या मरणाने काँग्रेसमधील पुरोगाम्यांनीही उचल खाल्ली नसती तरच आश्चर्य. कोणताही कार्यक्रम नसलेल्या, सरभर नेतृत्वाच्या काँग्रेसला या निमित्ताने नरेंद्र मोदी सरकारविरोधात आणखी एक मुद्दा मिळाल्याचा आनंद झाल्यास नवल नाही. परंतु वास्तव हे की काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांत अधिक दलितविरोधी कोण हे सांगता येणार नाही, इतके हे दोन पक्ष समांतर आहेत. जातीय वर्चस्ववादास कंटाळून आत्महत्या करणारा रोहित हा पहिला नव्हे. याआधी अनेकांनी असे आततायी कृत्य केले आहे. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेत असेच आयुष्य संपवणारा अजेय चंद्रन, रोहितच्याच हैदराबाद विद्यापीठात अशीच आत्महत्या करणारे सेंथील कुमार आणि मदरल वेंकटेश, दिल्लीतल्या ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसमध्ये आत्महत्या करणारा बालमुकुंद सारथी, आयआयटी रुरकीत आत्महत्या करणारा मनीषकुमार गुड्डोलन आदी अनेक उदाहरणे देता येतील. त्या वेळी डावे वा पुरोगामी यांनी मिठाची गुळणी घेणे पसंत केले. कारण सरकार या पुरोगामित्वाच्या नावे कुंकू लावणाऱ्या काँग्रेसचे होते. आता भगवे टिळे लावणारा भाजप सत्तेवर आहे. या दोन्ही पक्षांतील फरक इतकाच की दलित, मागास आदींच्या नावे काँग्रेस तोंडदेखली शब्दसेवा तरी करते. भाजपकडे तितकाही शहाणपणा नाही. तो असता तर या प्रश्नावर भाष्य करण्यासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण विदुषी स्मृती इराणी यांना तो पुढे करता ना. हे न करता या प्रश्नावर भाजपने किमान चौकशीचे आदेश देण्याइतकी जरी संवेदनशीलता दाखवली असती तरी हा वाद चिघळला नसता आणि विदुषी स्मृतीबाईंच्या वक्तव्याने लागलेली आग विझवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला अश्रू गाळावा लागला नसता.

यावरून लक्षात येईल की ज्या कारणांसाठी रोहित याने हे टोकाचे पाऊल उचलले त्या कारणात कोणालाही रस नाही. खुद्द रोहित ज्यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून वाहवत गेला ते प्रा. इलय्या यांना हे प्रश्न सोडवण्यापेक्षा भारताचे मार्टिन ल्युथर किंग होणे अधिक महत्त्वाचे वाटते. तेव्हा आपापल्या राजकीय पोळ्या भाजून झाल्या की रोहित याची आत्महत्या सोयीस्करणे विसरली जाईल. फार झाल्यास त्याच्या नावे एखादा पुरस्कार वगरे दिला जाईल वा हुतात्मा दिन पाळला जाईल. परंतु लक्षात ठेवावी अशी बाब म्हणजे अशा प्रकारच्या मुद्दय़ांवर हुतात्मा होण्यात काहीही शौर्य नसते. आसपासची व्यवस्था इतकी चतुर आहे की ती असे अनेक हुतात्मा पचवून ढेकरदेखील देईल. शहाणपण हे की या व्यवस्थेत राहून ती बदलायला हवी. हे ज्यांना कळले नाही त्यांचा एके काळी ‘मारुती कांबळे’ केला गेला. आता ‘मारुती कांबळे’ स्वत:च हुतात्मा होतील आणि तरीही व्यवस्था आहे तशीच राहील.


एकही प्रतिक्रिया नाही

Comments have been closed.

लोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.