चॅम्पियन्स करंडक या फुटकळ स्पर्धेआधी आणि नंतर भारतात राष्ट्रवादाचा, राष्ट्रप्रेमाचा जो काही धुरळा उडाला तो निर्थक आणि निर्बुद्धतेचा नमुना ठरावा.

वास्तविक चॅम्पियन्स करंडक नामक फुटकळ क्रिकेट स्पर्धेतील यशापयशाच्या चर्चेस संपादकीयांत स्थान द्यावे इतके ते महत्त्वाचे नाही. तसे पाहता क्रिकेटमधील विश्वचषक हादेखील अतिशयोक्त अलंकाराचा नमुना ठरतो. जगभरातील २०० देशांतील जेमतेम डझनभर देश क्रिकेट खेळतात. तेव्हा त्यांतील विजेत्यास विश्वविजेता म्हणणे म्हणजे भातुकलीच्या विवाहातील वधुवरांच्या सरकारी नोंदणीचा आग्रह धरण्यासारखे. अर्थात एवढेच देश क्रिकेट खेळतात हा काही क्रिकेटप्रेमींचा दोष नाही, हे मान्य. त्यामुळे त्यांतील विजेत्याचा अधिक्षेप करण्याचे कारण नाही, हेदेखील कबूल. परंतु म्हणून विजेत्यास डोक्यावर घेऊन नाचण्याइतका ताळतंत्र सोडावयाचे काही कारण नाही, ही बाबदेखील मान्य करावयास हवी. चॅम्पियन्स करंडकाबाबत तर असे करणे अगदीच अयोग्य. कारण त्यात आपण पाकिस्तान विरोधात हरलो. हा पराभव अगदीच केविलवाणा म्हणावा लागेल. याचे कारण पाकिस्तानचा संघ ही स्पर्धा सुरू होत असताना तळाला होता आणि आपण सर्वात वरती. ही स्पर्धा क्रिकेट खेळणाऱ्या देशांतील सर्वोत्तम आठ संघांत होत असते. यंदा या सर्वोत्तम संघांत बांगलादेशाचा समावेश होता. वेस्ट इंडिज वा झिम्बाब्वे हे संघ या स्पर्धेत नव्हते. तेव्हा पाकिस्तानचा संघ या सर्वोत्तम आठांतील आठवा होता. अशा देशाकडून आपण हरलो. जिंकलो असतो तरीही या विजेतेपदाची दखल घ्यावी इतके काही ते महत्त्वाचे नाही. तेव्हा पराभूत झाल्यानंतर त्यावर भाष्य का करावयाचे?

याचे कारण या स्पर्धेआधी आणि नंतर या विषयावर जो काही राष्ट्रवादाचा, राष्ट्रप्रेमाचा धुरळा उडाला तो किती निर्थक आणि निर्बुद्ध होता हे दाखवून देता यावे म्हणून. याआधी या देशातील मातृभूमी भक्तांना भारताने पाकिस्तानशी खेळूच नये असे वाटत होते. पाकिस्तान आपल्या काश्मिरात कलागती लावतो, उत्पात घडवतो आणि सामान्यांचा त्यात बळी जातो. त्यामुळे पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी क्रिकेट खेळताच नये, असे दे. भ. प. (म्हणजे देश भक्त परायण) शिवसेना आदी पक्षांचे मत होते. त्याकडे एरवी बालसुलभ बडबड म्हणून दुर्लक्षिता आले असते. परंतु या वेळी या देभपंचा सूर चांगलाच टिपेला गेला. याचे कारण त्यांना या वेळी नवराष्ट्रवाद्यांची साथ मिळाली. देशातील विद्यमान राजकीय वातावरणात या नवराष्ट्रवाद्यांचे अमाप पीक आले असून देशासंदर्भात कोणत्याही घटकावर टीका केली की त्या व्यक्ती वा संस्थेची गणना राष्ट्रद्रोह्यांत करण्यात हे नवराष्ट्रवादी धन्यता मानीत असतात. लष्करप्रमुखांच्या अतिरेकी विधानांवर कोणी टीका केली किंवा लष्कराच्या मुख्यालयात पाकिस्तानी दहशतवादी घुसतातच कसे त्याबाबत प्रश्न विचारले किंवा निश्चलनीकरणाचा फोलपणा कोणी दाखवून दिला की लगेच अशा सर्वाना राष्ट्रद्रोही म्हणून जाहीर करण्याचा घाऊक ठेका या नवराष्ट्रवाद्यांनी घेतलेला आहे. यांतीलच काहींनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे सामने खेळावयास हरकत घेतली. पाकिस्तानी पंतप्रधानांना शपथविधीस बोलाविण्याच्या अथवा त्यांच्या जन्मदिनी अभीष्टचिंतनास वाकडी वाट करून जाण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीस या मंडळींचा आक्षेप नाही. वास्तविक मोदी यांच्या लाहोर भेटीनंतर पाकिस्तानने भारतीय लष्कराची अगदीच बेअब्रू केली. तरीही या नवराष्ट्रवाद्यांना भारत सरकारच्या पाकिस्तान धोरणाबाबत काहीही प्रश्न उपस्थित करावेसे वाटत नाही. परंतु भारताने पाकिस्तानशी क्रिकेटचे सामने आयोजित करण्याचा मुद्दा येताच या नवराष्ट्रवाद्यांच्या हृदयातील मातृप्रेम उचंबळून आले आणि त्यांनी असे सामने खेळावयास प्राणपणाने विरोध केला.

पण त्याबाबतही या विरोधकांत प्रामाणिकपणाचा अभावच दिसून आला. पुराणातील ऋषींच्या प्रत्येक शापाला जसा उशाप असतो तसा या नवराष्ट्रवाद्यांनी पाक विरोधासाठीदेखील उशाप जाहीर केला. तो असा की पाकिस्तानशी आपण आपल्या वा पाकिस्तानच्या भूमीवर खेळावयाचे नाही. परंतु तिसऱ्या देशात भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी खेळले तर आमची हरकत नाही, अशी ही चोरवाट. शुद्ध शब्दांत ही वैचारिक लबाडीच. याचे कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यात सौहार्दपूर्ण संबंधांत काहीच होऊ नये अशी जर भूमिका असेल तर तिसऱ्या देशात हे सामने खेळल्याने तिचा आदर कसा होणार? परंतु नवराष्ट्रवाद्यांना प्रश्न विचारणे हे राष्ट्रद्रोहाच्या आरोपास निमंत्रण देणारे असल्याने या संदर्भात कोणीही काहीही बोलले नाही आणि साहेबाच्या भूमीवर भारत आणि पाकिस्तान यांनी सामने खेळणे मुक्रर झाले. वास्तविक क्रिकेटच्या खेळास भारत आणि पाकिस्तान याच्या इतकी मोठी बाजारपेठ कोणती नाही. तेव्हा हे दोन देश खेळणार नसतील तर क्रिकेटला कोणी हिंग लावून विचारीत नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वा क्रिकेटचे माहेरघर असलेल्या इंग्लंडमध्ये या खेळाचा बाजार कधीच उठला. झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, बांगलादेश या देशांचीच अर्थव्यवस्था बेतासबात. त्यामुळे ते क्रिकेटवर काय उधळपट्टी करणार? राहता राहिले श्रीलंका, भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश. या तिन्हांतील श्रीलंकेविरोधात खेळण्यात तितका अंगार नसतो. याचे कारण या देशातील नवराष्ट्रवाद्यांच्या विचारधारेनुसार श्रीलंका तसा ‘आपल्या’पकी. म्हणजे उरला फक्त पाकिस्तान. या देशाला पराभूत करण्यात जो धर्मविचार आहे तो अन्य देशांना हरवण्यात नाही. त्यामुळे पाकिस्तानविरोधातील सामन्यांत क्रीडाप्रेमाच्या बरोबरीने राष्ट्रप्रेम नावाचा अदृश्य घटकही असतो. त्यात आपली पंचाईत अशी की या पाकिस्तानला क्रिकेट वा हॉकी आदी खेळांत हरवण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही. त्या देशाने कितीही कुरापती काढल्या, दहशतवादी कृत्ये केली तरी आपला प्रतिसाद हा संयतच असतो आणि तो तसाच असायला हवा. याचे कारण एखाद्याच्या वेडपट कृतीचे प्रत्युत्तर अधिक वेडपट कृती हे असू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानविरोधात आपले हात बांधलेले राहतात. तेव्हा निदान त्यांना खेळात तरी पराभूत करूया या विचारांतून भारत-पाक सामन्यांना चेव चढतो आणि प्रसारमाध्यमे त्यात आपल्या टीआरपीचे तेल ओततात. या सामन्यांआधीच्या चॅनेलीय चर्चात ढोलताशे काय, भारतमातेचा उद्घोष काय. सगळेच हास्यास्पद आणि ओंगळवाणे.

अशा सामन्यांत भारताच्या बरोबरीने पाकिस्तानातही हवा तापवली जाते. त्या देशाला तर तसे करण्याखेरीज पर्याय नाही. याचे कारण काश्मीर ही त्या देशाची वाहती जखम आहे. पण हा प्रदेश पुन्हा त्या देशास मिळण्याची शक्यता नसल्याने भारताविरोधात काही ना काही करीत राहणे हे त्या देशाचे प्राक्तन आहे. अन्य मार्गाने भारताची अडचण करण्यात आपण यशस्वी होत असल्याचा भास त्या देशाला होत असतो. तेव्हा त्या बरोबरीने क्रिकेटच्या मदानातही भारतास धूळ चारल्यास त्या देशाच्या काश्मीर जखमांच्या वेदना कमी होतात. त्यात पुन्हा सामान्य पाकिस्तानी नागरिकास भारतीयाच्या तुलनेत मिरवावे असे काहीही नाही. तो देश कमालीच्या दैन्यावस्थेत आहे. तेव्हा क्रिकेट सामन्यात भारताला हरवणे हे त्या देशासाठी अनेक विवंचनांवर फुंकर घालणारे ठरते. त्यामुळे भारतास पराभूत करणे पाकिस्तानसाठी विश्वचषक जिंकण्यासमानच.

ही तिसऱ्या देशांची मानसिकता. पाकिस्तानने ती दर्शवली तर एकवेळ ते क्षम्य. परंतु आकार, अर्थव्यवस्था, औद्योगिक प्रगती आदी अनेक बाबतीत पाकिस्तानपेक्षा कैक पटींनी पुढे असणाऱ्या भारतातील नागरिकांनीही ती दाखवणे हे आपल्यातील बालिशपणा दर्शवणारे आहे. तेव्हा एखाद्या स्पर्धेत चॅम्पियन ठरलो म्हणून देश डोक्यावर घेण्याचे काही कारण नाही आणि चंपी झाली म्हणून माना खाली घालण्याचेही कारण नाही. खेळास.. विशेषत: पाकिस्तानबरोबरच्या.. मैदानाबाहेर महत्त्व देणे आपण सोडायला हवे. महासत्ता व्हावयाचे असेल तर आपल्या देभपंनी या क्षुद्र दंभचा त्याग करायला हवा. वास्तविक क्रिकेटच्या खेळास भारत आणि पाकिस्तान याच्या इतकी मोठी बाजारपेठ कोणती नाही. तेव्हा हे दोन देश खेळणार नसतील तर क्रिकेटला कोणी हिंग लावून विचारीत नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वा क्रिकेटचे माहेरघर असलेल्या इंग्लंडमध्ये या खेळाचा बाजार कधीच उठला. झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, बांगलादेश या देशांचीच अर्थव्यवस्था बेतासबात. त्यामुळे ते क्रिकेटवर काय उधळपट्टी करणार?


एकही प्रतिक्रिया नाही

Comments have been closed.

लोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.