भांडवली बाजाराच्या उसळीने सर्वसामान्यांनी हुरळून जाण्याचे कारण नाही.. वास्तव हे वेगळेच आहे.

माणसाने आनंदी असावे, हे मान्य. परंतु आनंदासाठी काही कारण असावे लागते. आनंदी आनंद गडे असे विनाकारण ज्यांना वाटते ते सच्चे आध्यात्मिक असतात किंवा वास्तवाचे भान नसलेले मनोरुग्ण. या दोन सदानंदी वर्गात आणखी एकाची भर घालता येऊ शकेल. तो म्हणजे झरझर वेगात वर जात असलेला भारतीय भांडवली बाजार. म्हणजे स्टॉक मार्केट. सध्या या बाजारात दररोज सरत्या दिवसाच्या निर्देशांकास मागे टाकण्याची स्पर्धा सुरू आहे की काय असे वाटावे. आज काय व्याज दरकपातीच्या शक्यतेने बाजार खुलला. निर्देशांकाचा उच्चांक. उद्या काय परकीय गुंतवणुकीचे दालन अधिक खुले होणार म्हणून बाजार आनंदी. निर्देशांकाचा उच्चांकी उच्चांक. अशी अनेक कारणे सांगता येतील. अलीकडे शहरांत ठिकठिकाणी हास्यमंडळांचे खूळ वाढू लागले आहे. त्यात सामील होणारे पाचपन्नास स्त्री-पुरुष भल्या सकाळी काहीही कारण नसताना खो खो हसताना दिसतात. काहीही करून आपण हसायचेच असा त्यांचा अट्टहास. सध्या आपल्या भांडवली बाजार हा असा हास्यगटात सामील झाला आहे की काय अशी शंका येते. अर्थात वैयक्तिक पातळीवर उगाचच किरकिर करणाऱ्यांपेक्षा उगा हसणारे परवडतात हे जरी खरे असले तरी असा उदारमतवादी दृष्टिकोन गंभीर गुंतवणूक व्यवहारासंदर्भात बाळगणे धोक्याचे असते. कारण येथे प्रश्न काहींच्या कष्टाच्या पैशाचा असतो. काहींच्या असे म्हणावयाचे कारण सर्वच गुंतवणूकदार केवळ चूष म्हणून या व्यवहारात असतात असे नाही. पारंपरिक गुंतवणूक मार्गात रोडावलेल्या परताव्यातून दैनंदिन खर्च निघत नाहीत. म्हणूनही अनेक जण आपली कष्टाची कमाई भांडवली बाजारात लावीत असतात. त्यांना या वाढत्या निर्देशांकाने दिलासा मिळत असला तरी तो सच्चा असायला हवा. तसा तो नसेल तर त्या वाढीस बुडबुडा असे म्हणतात. आपल्या भांडवली बाजारात तसा तो होतो किंवा काय हे आता तपासून बघावे लागणार आहे.
याचे कारण आपल्या ३० समभागांच्या भांडवली निर्देशांकाने १३ जुलै रोजी, म्हणजे गेल्या गुरुवारी, ३२ हजार अंशांचा टप्पा ओलांडला. हा विक्रम आहे. याचा अर्थ आपला बाजार इतका उचंबळलेला कधीच नव्हता. गेले काही दिवस हा भांडवली बाजार विक्रमी वेगाने वाढत असून १३ जुलैस तर त्याने कहरच केला. यामुळे आपल्या भांडवली बाजाराचे बाजारमूल्य त्या दिवशी २ लाख कोटी डॉलर्सवर जाऊन पोहोचले. वरकरणी ही बाब आनंददायी असली तरी हे बाजारमूल्य आणि आपली सांपत्तिक स्थिती यांचा काही संबंध आहे काय हे अशा वेळी तपासून पाहावे लागते. याचे कारण या उच्चांकाने आपल्या या बाजाराची स्थिती ही कॅनडा अथवा जर्मनी या देशांच्या भांडवली बाजाराच्या बाजारमूल्याइतकी झाली. हे दोनही देश श्रीमंत या सदरात मोडतात. किंबहुना जर्मनी ही तर आजमितीला युरोपातील सर्वात श्रीमंत अर्थव्यवस्था. म्हणजे आपल्या भांडवली बाजाराने या दोन देशांच्या बाजारमूल्यांचा टप्पा गाठला. परंतु आपली अर्थव्यवस्था सद्य:स्थितीत या दोन देशांशी तुलना व्हावी इतकी सक्षम आहे काय या प्रश्नाचे उत्तर कोणतीही किमान शहाणी व्यक्ती होकारार्थी देणार नाही. अभिक बर्मन या अर्थविश्लेषकाने दाखवून दिल्यानुसार प्रत्येक जर्मन नागरिकाचे सरासरी वार्षिक उत्पन्न ४१,९०१ डॉलर्स इतके आहे. कॅनडियन नागरिक वर्षांला सरासरी ४२,२१० डॉलर्स कमावतो. आणि त्यांच्या भांडवली बाजाराशी बाजारमूल्याची स्पर्धा करणाऱ्या भारतीयाचे वार्षिक उत्पन्न मात्र १७२३ डॉलर्स इतकेच असते. वास्तवात ही इतकी तफावत असताना, म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या अन्य अंगांना जरत्कारू स्वरूप आलेले असताना एकटय़ा भांडवली बाजारानेच शड्डू ठोकावेत हे अनेक प्रश्नांना जन्म देणारे आहे. याचाच अर्थ भांडवली बाजाराची ही आनंदयात्रा कोणाच्या जिवावर सुरू आहे, असा प्रश्न पडायला हवा.

या प्रश्नाचे तार्किक उत्तर हे परदेशी वित्तसंस्था आणि भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या निधिप्रवाहात दडलेले आहे. जागतिक पातळीवर अमेरिकी अर्थव्यवस्थेत आता कुठे धुगधुगी निर्माण होऊ लागली आहे. परंतु चीनचे नक्की काय सुरू आहे, हे कळण्यास मार्ग नाही. जगातील दुसऱ्या क्रमांकाची आपल्या शेजारील देशाची अर्थव्यवस्था हे भलतेच गूढ प्रकरण आहे. पलीकडच्या जपानचीही अर्थव्यवस्था कुंठित. तो देश चलनघटीने बेजार. तिकडे कंबरडे मोडलेला युरोप अजून काही सरळ उभा राहण्यास तयार नाही. तर उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचाराने ब्राझील पूर्ण गांजून गेलेला. माजी अध्यक्ष लुईझ लुला डिसिल्वा यांना भ्रष्टाचारासाठी न्यायालयाने १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेली, नंतरच्या डिल्मा रूसुफ ऑलिम्पिक्सनंतर महाभियोगात पदच्युत झालेल्या आणि राजकीय वातावरण तापलेले. अशा देशांत कोण गुंतवणूक करणार? अशा वेळी जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांचे एकमेव आशास्थान फक्त भारतच. म्हणून परकीय वित्तीय गुंतवणूकदारांनी भारतीय समभाग बाजारात गेले काही महिने मोठय़ा प्रमाणात मोठय़ा आशेने गुंतवणूक केली. परंतु नवी रोजगारनिर्मिती हरवून बसलेला, बुडणाऱ्या बँका कृत्रिमरीत्या तगवत असलेला आणि खड्डय़ात गेलेल्या सरकारी महामंडळांचे न पेलणारे ओझे वागवणारा भारत आर्थिकदृष्टय़ा बदलण्यास तयार नाही असे स्पष्ट झाल्यावर या गुंतवणूकदारांनी भारतीय समभाग तितक्याच मोठय़ा प्रमाणावर विकले. म्हणजेच वर गेलेल्या भांडवली बाजारात नफा कमावला. आकडेवारी दर्शवते की यंदाच्या एप्रिल महिन्यापासून जवळपास २०० कोटी डॉलर्सचे समभाग परकीय गुंतवणूकदारांनी विकले. हे विकणे डोळ्यावर आले असते तर बाजार कोसळला असता. तसे झाले नाही. याचे कारण भारतीय बाजारातून काढता पाय घेणाऱ्या परकीय गुंतवणूक संस्थांकडचे हे समभाग देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विकत घेण्यास सुरुवात केली. आयुर्विमा महामंडळ आदींचा यात समावेश होतो. या संस्था वरकरणी स्वायत्त भासल्या तरी त्यावर सरकारचे नियंत्रण असते हे वास्तव लक्षात घेतल्यास त्यांनी ही खरेदी का केली हे समजून घेता येईल. म्हणजे या केंद्रनियंत्रित संस्थांनी ही खरेदी केली नसती तर बाजार कोसळला असता. तसे झाले असते तर अर्थातच काही आभाळ खाली आले नसते. कारण सव्वाशे कोटींच्या या भारतात भांडवली बाजारातील गुंतवणूकदार जेमतेम चार कोटीदेखील नाहीत. तरीही या भांडवली बाजारात काय होते यास महत्त्व दिले जाते. कारण तो देशातील एकंदर आर्थिक वातावरणाचा प्रतीक मानला जातो.

आणि कोणतेही सरकार प्रतीकात्मकतेलाच महत्त्व देणारे असल्याने कोसळत्या बाजारातून परावर्तित होणाऱ्या नकारात्मक संदेशास ते घाबरत असते. म्हणून बाजार चढता राहिलेला बरा. कारण बाजार ही एक नशा आहे. सच्चा नशेकरी एका नशेतून बाहेर आल्यावर दुसऱ्या नशेच्या शोधात असतो. बाजाराचे तसे असते. अलीकडेच गाजलेल्या ‘वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ या भयपटातील एक पात्र या नग्न सत्यास सामोरे जाताना म्हणते : ‘‘भांडवली बाजाराचा पहिला नियम.. तू वॉरन बफे किंवा अन्य कोणीही असलास तरी लक्षात ठेव. तो म्हणजे समभाग वर, खाली, डावीकडे, उजवीकडे का जातात हे कळण्याइतकी अक्कल कोणाकडेही नसते. गुंतवणूक दलालांकडे तर नसतेच नसते. पण तरीही आपल्याला ती आहे हे प्रत्येकाला दाखवावेच लागते. कारण बाजाराचे हित त्यातच असते.’’ थोडक्यात भांडवली बाजाराच्या उसळीने सर्वसामान्यांनी हुरळून जाण्याचे कारण नाही. वास्तव वेगळे आहे. पण ते दिसू न देण्यात बाजारास लागलेल्या कोल्हे-लांडग्यांचे हितसंबंध असतात. सुशिक्षितांनी ते समजून घ्यायला हवे, इतकेच.


एकही प्रतिक्रिया नाही

Comments have been closed.

लोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.