देशातील प्रत्येक क्षेत्रात बदल होत असला तरी माध्यमे मात्र बदलास तयार नाहीत, असे अर्थमंत्री जेटली यांना वाटत असेल तर माध्यमांसाठी ते मोठे प्रमाणपत्रच आहे.

प्रत्येक राजकीय पक्षास सत्ता मिळाली की माध्यमांची अडचण वाटू लागते आणि याच राजकीय पक्षांवर विरोधी बाकांवर बसावयाची वेळ आली की त्यांना हीच माध्यमे लोकशाहीचा आधारस्तंभ वाटू लागतात. तेव्हा या न्यायाने जेटली यांना सध्या माध्यमांचे न बदलणे हे टोचत असेल तर तो दोष माध्यमांचा नाही. जेटली यांच्या सत्तेचा आहे.

काळाच्या ओघात सारेच काही बदलत असले तरी या विश्वाचा कारभार सुरळीत सुरू आहे तो रेटय़ातही न बदलता आपल्या जागी ठाम राहू शकणाऱ्यांमुळे. पृथ्वीच्या फिरण्याची गती बदलते, पण ध्रुवतारा आपल्या जागी ठाम असतो. त्याच्या स्थानात बदल होत नाही. अफाट भौतिक प्रगतीत नातेसंबंध बदलतात. परंतु आई/मूल यांतील संबंधांचा ओलावा बदलत नाही. व्यावहारिकतेच्या, यंत्रमानवाच्या, संगणकीय व्यवहारांच्या काळातही कवितेचे जन्म घेणे थांबलेले नाही. काळानुसार कविता बदलली असेल. पण म्हणून कवितेची ऊर्मी संपली असे झालेले नाही. संगणकाने कुंचल्यास कितीही पर्याय दिले म्हणून मानवी मनातील रंगरेषाआकारातून व्यक्त व्हावे असे वाटण्याची गरज नामशेष झालेली नाही. ध्वनिमुद्रणाच्या तंत्राने अचाट प्रगती केली असली तरी गाण्याच्या प्रेरणेत बदल झाला आहे, असे घडलेले नाही. मानवाने प्रगतीची नवनवी शिखरे काबीज केली असली तरी अजूनही माणसाच्या मनातील नव्याची आस तशीच आहे. नव्या काळात नव्याने जन्माला येणाऱ्या नव्या कोलंबसाला नव्या विश्वाचा शोध अजूनही घ्यावासा वाटतोच. त्याची ही शोधयात्रा नव्या काळातही बदलत नाही. न्यूटनच्या आधी आणि नंतरही झाडावरून सफरचंदे पडतच होती. न्यूटनला त्यातून गुरुत्वाकर्ष नियम उमजला. परंतु म्हणून आज गुरुत्वाकर्षणाच्या गाभ्याचे आकर्षण कमी झाले असे नाही. पृथ्वीच्या उगमापासून मानवी जीवन जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तसेच फिरत आहे. म्हणून मृत्यूवर मात करण्याची मानवी प्रयत्नांची ऊर्मी अजूनही कमी झालेली नाही. असे अनेक दाखले देता येतील. सगळ्याचा अर्थ एकच. काही गोष्टींचे न बदलणे हेच बदलापेक्षा महत्त्वाचे आणि मननीय असते. त्याचमुळे देशातील प्रत्येक क्षेत्रात बदल होत असला तरी प्रसारमाध्यमे मात्र बदलास तयार नाहीत, असे देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना वाटत असेल तर माध्यमांसाठी याइतके मोठे प्रमाणपत्र नसेल.

जेटली यांचा या विधानामागील रोख होता निश्चलनीकरणामुळे लोकांच्या हालअपेष्टाच माध्यमे चित्रित करीत आहेत, यावर. त्यांचे म्हणणे असे की या निर्णयामुळे इतके काही चांगले होणार असताना माध्यमे त्याचे फक्त नकारात्मक चित्र रंगवीत आहेत. सबब माध्यमांनी बदलायला हवे. जेटली यांच्या म्हणण्याचा अर्थ म्हणजे माध्यमांनी सरकारची तळी उचलणे शिकायला हवे. जेटली यांना आठवतच असेल की ते ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात त्या पक्षाने देशाने सुदैवाने एकदाच अनुभवलेल्या आणीबाणीत माध्यमांची साथ दिली होती. त्या वेळी माध्यमांची कामगिरी आणि भूमिका ही जेटली आणि त्यांच्या पक्षाच्या मते अत्यंत स्पृहणीय होती. ती स्पृहणीय होती कारण माध्यमे. विशेषत: आमचा एक्स्प्रेस समूह. सरकारी दबावापुढे झुकला नाही. त्या वेळी माध्यमांचा जो गुण जेटली यांच्यासाठी कौतुकास्पद होता तो आता त्यांच्या मते दुर्गुण ठरतो. याचे कारण माध्यमे नव्हेत, तर बदलले ते जेटली. इतका काळ ते विरोधी पक्षांत होते. ते आता सत्ताधारी झाले. कोणत्याही बंडखोरांस सत्ता सुतासारखी सरळ करते असे म्हणतात. त्यात जेटली आणि त्यांचा पक्ष कधीच बंडखोर नव्हते. ही स्थितिवादी मंडळी फक्त सत्तेच्या प्रतीक्षेत होती. ती हाती लागल्यावर हे आपसूक सरळ झाले. त्यात गैर काहीही नाही. असलेच तर माध्यमांनी बदलायला हवे हा त्यांचा शहाजोग सल्ला.
तर जेटली यांना वाटते त्याप्रमाणे माध्यमांनी बदलायला हवे, म्हणजे काय? म्हणजे विरोधी पक्षांत असताना वस्तू आणि सेवा कर हा अनावश्यक आहे, तो रोखायला हवा असे म्हणणारे जेटली आणि त्यांच्या पक्षाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे सत्ता मिळाल्यावर त्याच वस्तू आणि सेवा करासाठी प्रयत्न करू लागतात, हा बदल माध्यमांनी दाखवू नये. किंवा, मोदी ही परमेश्वराने या भारतवर्षांस दिलेली भेट आहे, हे त्या पक्षाचे माजी अध्यक्ष वेंकय्या नायडू यांचे विधान हे देवकांत बारुआ यांच्या इंदिरा इज इंडिया या लाळघोटय़ा विधानाची आठवण करून देणारे आहे. सबब बारुआ यांचा काँग्रेस आणि नायडू यांचा भाजप यांच्यात गुणात्मक बदल कसा नाही, हे माध्यमांनी नमूद करण्याच्या फंदात पडू नये. बारुआ जाऊन, नायडू आले, हा बदल झाला असला तरी आतून सारेच कसे तेच ते आहे, हे माध्यमांनी दाखवून देऊच नये. किंवा काँग्रेसच्या काळात गुंडगिरी, वाढता नक्षलवादी हिंसाचार यांना प्राणपणाने विरोध करणाऱ्या भाजपला सत्ता मिळाली की गोमांसासारख्या क्षुल्लक मुद्दय़ावरून हिंसाचार होत असेल तर हा बदल माध्यमांनी शांतपणे स्वीकारावा. किंवा देशाचा पंतप्रधानच एखाद्या दूरसंचार कंपनीच्या जाहिरातीत उठून दिसत असेल तर खासगी जाहिरातींचे हे नवे मॉडेल म्हणून माध्यमांनी ते स्वीकारावे. विरोधी पक्षांत असताना जेटली आणि त्यांच्या पक्षाने तत्कालीन दूरसंचारमंत्री ए राजा यांनी काही खासगी दूरसंचार कंपन्यांसाठी काम केले म्हणून आकाशपाताळ एक केले होते. त्यात भ्रष्टाचार होता आणि देवाणघेवाण होती. मोदी यांनी दूरसंचार कंपनीची जाहिरात करण्यात तसे काही नसेल. परंतु तरीही त्यांची कृती त्या कंपनीला झुकते माप देणारी नाही, असे मानण्याइतका बदल माध्यमांनी स्वत:च्या समजूतशक्तीत करावा. किंवा पाकिस्तानचा प्रश्न सत्ता मिळाली की चोवीस तासांत सोडवू या विधानाची आठवण नरेंद्र मोदी यांना करून देऊ नये. किंवा, लक्ष्यभेदी हल्ल्यानंतरही अनेक भारतीय सैनिक पाकिस्तानी हल्ल्यात शहीद होत असतील तरीही लक्ष्यभेदी हल्ल्याच्या परिणामकारकतेबाबत माध्यमांनी काहीही शंका व्यक्त करू नये. किंवा देशातले ८६ टक्के चलन एका क्षणात कागज का टुकडा बनल्यानंतर जनतेच्या हालाचे वर्णन माध्यमांनी करूच नये. किंवा या निर्णयामुळे जनतेत राष्ट्रभावना निर्माण होऊन बँकांसमोरच्या रांगांमुळे बंधुभाव कसा प्रस्थापित होत आहे, हेच जनतेस समजून सांगावे. किंवा.. असेच काही. याचा अर्थ इतकाच की माध्यमांनी सरकारला काहीही प्रश्न विचारू नयेत. म्हणजे नंदीबैल व्हावे. किंवा भक्तभाट म्हणून सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत करावे.

यात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे प्रत्येक सत्ताधाऱ्यास माध्यमांविषयी हे असेच वाटत असते. तेव्हा विद्यमान सत्ताधारी आणि हे अन्य यांत गुणात्मक फरक तो काय? सध्या जेटली यांना नकोशी झालेली माध्यमे २०१४ सालाआधी तत्कालीन काँग्रेस कारभाराची लक्तरे वेशीवर टांगत होती, तेव्हा ती भाजपसाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ होती. त्या वेळी माध्यमांनी बदलून जरा सरकारचाही विचार करावा, असा सल्ला कधी जेटली यांनी दिला होता काय? किंवा देशाचा महालेखापाल खोटेनाटे आकडे फुगवून आर्थिक घोटाळ्यांचे अतिरंजित वर्णन करीत आहे, असे जेटली यांनी त्या वेळी कधी माध्यमांना सुचवले होते काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. याचा अर्थ इतकाच की प्रत्येक राजकीय पक्षास सत्ता मिळाली की माध्यमांची अडचण वाटू लागते आणि याच राजकीय पक्षांवर विरोधी बाकांवर बसावयाची वेळ आली की त्यांना हीच माध्यमे लोकशाहीचा आधारस्तंभ वाटू लागतात. तेव्हा या न्यायाने जेटली यांना सध्या माध्यमांचे न बदलणे हे टोचत असेल तर तो दोष माध्यमांचा नाही. जेटली यांच्या सत्तेचा आहे. ती गेली.. आणि कोणतीच सत्ता कधी आजन्म नसते.. तर हीच माध्यमे जेटली यांना प्राणप्रिय वाटू लागतील, यात शंका नाही.

या संदर्भात जॉर्ज ऑर्वेल यांना उद्धृत करणे समयोचित ठरेल. ‘सत्ताधाऱ्यांना जे छापू नये असे वाटते ते छापणे म्हणजेच पत्रकारिता, अन्य सर्व केवळ जनसंपर्क’, असे ऑर्वेल म्हणाला होता. अन्यांची खात्री नाही, परंतु जेटली तरी हे ऑर्वेल याचे मोठेपण ओळखण्याइतके जागरूक निश्चित आहेत. तेव्हा माध्यमांवर जेटली संतापले असतील तर त्याचे स्वागतच. माध्यमांचे हे असे फुलणे जेटलींसाठी सोयीचे नसेल पण लोकशाहीसाठी अंतिमत: आवश्यकच आहे.


एकही प्रतिक्रिया नाही

Comments have been closed.

लोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.